मंगळवार, ६ जुलै, २०१०

लिहिते व्हा!

    फारा वर्षांपूर्वी एक विचित्र पक्षी होऊन गेला. तो म्हणे पावसाळा आला की शेतकरी लोकांना पेरते व्हा, पेरते व्हा असा संदेश देत असे. मग शेतकरी उठत आणि पेरणी सुरु करत. आता हा पक्षी सध्या अस्तित्वात आहे की नाही आणि नसला तर शेतकर्‍यांनी या संभाव्य अडचणीतून कसा मार्ग काढला आहे कुणास ठाऊक? सध्या पर्यावरणाचे असे कंबरडे मोडलेले आहे की कोण कधी नामशेष होऊन जाईल काही सांगता यावयाचे नाही. काळ मोठा कठीण आला आहे. 'आमच्यावेळी असं नव्हतं' असं म्हणणारेही आता फारसे राहिले नाहीत यावरुनच काळ किती कठीण आला आहे, परिस्थितीने कसे गंभीर रुप धारण केले आहे याची तुम्हाला कल्पना करता येईल.

   असो. मला म्हणायचे आहे ते वेगळेच. मला असे म्हणायचे आहे की जर शेतात धान्य पिकवणार्‍या शेतकर्‍यांना असा काही संदेश कुणी देत असेल तर कागदावर कथा कवितांचे पीक घेऊ इच्छिणार्‍या "लेखकू" मंडळीना 'लिहिते व्हा!' असा संदेश का देऊ नये? तोच संदेश मी आज लेखकांना मी देऊन टाकतो.

    दरवेळेस लोक विचारतात तुम्हाला लेखन सुचते कसे हो? तुम्ही कोणत्या वेळेला लिहता? अर्थात हे लोक मला विचारतात असे मी म्हणत नाहीये. मी कुठे, मोठमोठे लेखक कुठे? उगाच गोड गैरसमज करुन घेऊ नका. बहुतांश लेखकांना हा प्रश्न विचारला जातो हे मी सांगतो आहे. मी म्हणतो लेखन सुचते कसे यात एवढे आश्चर्य वाटण्यासारखे काय आहे? हे म्हणजे तुम्हाला जेवण पचते कसे हो? असे विचारण्यासारखेच आहे. मला तर सुचते पटापट. मी आताच मागे दोनतीन लेख हातासरशी लिहून काढले. ग्रंथालयात गेलो, लिहला त्यावर लेख. परीक्षेला गेलो, लिहला त्यावर लेख. आता तर लिहण्यावरही हा लेख लिहायला बसलो आहे. आहे काय त्यात मोठेसे?

    त्यामुळेच लोकांना लिहायचे म्हटले की सुचत नाही याचे मला भारी आश्चर्य वाटते. ग्रॅहम ग्रीन या आंग्ल लेखकाला पण माझ्यासारखेच आश्चर्य वाटले. फरक एवढाच की त्याला आधी आश्चर्य वाटले आणि मला नंतर वाटले. पण म्हणून माझ्या आश्चर्याचे मूल्य उणावत नाही. असो. तो म्हणतो,"Writing is a form of therapy; sometimes I wonder how all those who do not write, compose or paint can manage to escape the madness, the melancholia, the panic fear which is inherent in the human situation." बघा कसे आहे? लिहणे हे एक प्रकारचे उपचारच आहेत. लिहिल्याशिवाय, काहीतरी रंगकाम केल्याशिवाय, तुम्ही जगूच कसे शकता? मनुष्यजातीला हा जो; कधी न संपणारा दुःखाचा, भीतीचा वारसा मिळालेला आहे त्यातून काहीतरी प्रसवल्याखेरीज तुमची सुटका होते तरी कशी? केवळ आणि केवळ दुःखाने भरलेल्या या निर्दय, पाषाणहृदयी जगात तुमचे चालते तरी कसे?

    कसले अफलातून वाक्य आहे पहा! आणि एवढे रोजचे जगणे जिथे एक संघर्ष होऊन बसले आहे, परिस्थितीशी दोन हात करावे लागतात तिथे तुम्हाला लिहायला सुचू नये म्हणजे कमाल आहे. लिहिता येण्याची जादू अजून तुम्हाला कळालेली दिसत नाही. लिहिण्यातले सुख काय वर्णावे? जाऊदे. सांगत बसत नाही. अनुभवासारखा दुसरा शिक्षक नाही म्हणतात. ( बघा आता हे वाक्य माझ्या आधीच कुणी लिहिले नसते तर तिघेही एका चांगल्या वाक्याला मुकलो असतो. आता हे तिघे कोण? तुम्ही लेको अगदीच हे आहात. त्यात एवढे डोके खाजवण्यासारखे काय आहे? मी, पर्यायाने तुम्ही आणि पर्यायाने हा लेखही!)

    मी काय सांगत होतो ते आता तुमच्या थोडेफार लक्षात आले असेल. शिवाय आता लेखन करायचे झाले तर असेही नाही की लेखनाला लागणारी सामग्री तुमच्याजवळ नाही. म्हणजे लेखक होण्यासाठी अगदी आवश्यक असते, ( म्हणजे लोकांचा असा पक्का ग्रह झाला आहे) त्या अनुभवांच्या शिदोरीबद्दल मी बोलत नाहीये. लेखनसामग्री म्हणजे कागदाचे भेंडोळे आणि लिहायला पेन. व्यंकटेश माडगूळकर लहानपणी उत्तम चित्रे काढत असत. त्यांचा चित्रकलेचा हात चांगला होता. त्यांचे चित्रकलेचे कलाल मास्तर त्यांना म्हणाले,"तुझा हात चांगला आहे. शिकलास, कष्ट केलेस तर चांगला चित्रकार होशील." पण माडगूळकरांची परिस्थिती होती गरीब. रंगांशी खेळायचे म्हटले तर रंग आणि इतर साधनांना पैसे पडत होते. लेखनाला मात्र असले काही लागत नव्हते. कागद आणि साधेसे शाईचे पेन असले तरी पुरत असे. मग चित्रकार व्हायचे न जमल्यामुळे त्यांनी हातात लेखणी घेतली. पुढे त्यांनी कागदावरचीच पण चित्रापेक्षा वेगळी अशी शब्दचित्रे काढली कशी, माणदेश अजरामर झाला कसा हे वेगळे सांगायची आवश्यकता नाही.

    हे झाले तेव्हाचे. सध्या मात्र ही साधनेही आवश्यक आहेत असे नाही. (याबाबत मात्र काळ मोठा कठीण आलेला नाही हे आपले सुदैवच म्हणायचे.) समोर संगणकाचा कीबोर्ड टंकायला असला तरी पुरते. सगळ्यांकडे असतोच तो. फक्त त्यावर काय बडवायचे तेवढे कळले पाहिजे.

    लेखनसामग्रीची सोय झाल्यावर आता काय उरले? लिहावे कसे हा प्रश्न अजून राहिलाच आहे. त्याबद्दलही सांगून टाकतो. मध्यंतरी रविंद्र पिंग्यांचे एक पुस्तक वाचले. अप्रतिम होते. त्यात त्यांचा अर्नेस्ट हेमिंग्वेवर एक लेख होता. अर्नेस्ट हेमिंग्वेने नवोदित लेखकांना एक संदेश देऊन ठेवला आहे. पिंग्यांच्याच शब्दात तो बघू. हेमिंग्वे म्हणतो,"सतत चांगलं, अधिकाधिक चांगलं लिहिण्याचा ध्यास घ्या. आजच्यापेक्षा उद्याचं अधिक कलात्मक लिहून झालं पाहिजे. परवाचं त्यापेक्षा अधिक दर्जेदार हवं. असं हे अधिकाधिक चांगलंच लिहिण्याचं व्रत मरेपर्यंत चालवा आणि दरम्यानच्या काळात न मरण्याचीही खबरदारी घ्या."
आहे की नाही कमाल? "अधिकाधिक चांगलंच लिहिण्याचं व्रत मरेपर्यंत चालवा आणि दरम्यानच्या काळात न मरण्याचीही खबरदारी घ्या." मझा आ गया. वाचलं आणि दिल एकदम खुष होऊन गेला.

    तर आहे हे असे आहे. लेखनसामग्रीची सोय लावून दिली, लिहावे कसे हे सांगून झाले आणि आता एवढे सांगितल्यावर तरी आता तुम्हाला लिहिण्यात काही अडचण येऊ अशी आशा करतो. त्यामुळे आता उठून, कमरा बांधून तुमच्या लेखणीचा उदयोस्तू करायला लागा. अर्थात लगेच तुम्हाला या प्राप्तकालात सुंदर लेणी खोदता यायची नाहीत. त्याला जरा वेळ लागेलच. हरकत नाही. शेवटी सब्रका फलच गोड होता है. पण शेवटी लिहाल ते अधिकाधिक चांगलं लिहिण्याचं मात्र विसरु नका. नाहीतर मी 'लिहिते व्हा!' चा संदेश देतोय आणि वाचकांनी किंवा लेखन छापायला जाल तर संपादकांनी तुम्हाला 'चालते व्हा!' चा संदेश देऊ नये म्हणजे मिळवली. काय समजलात?

मंगळवार, १ जून, २०१०

हे जग सुंदर आहे? आहेच!

    हे जग सुंदर आहे असे माझे स्पष्ट मत आहे. कुणी म्हणेल "आम्हाला मान्य नाही". कुणी म्हणेल "आत्ता कळलं काय? बावळट आहेस लेका!"

    पण मी खरंच सांगतोय. हे जग सुंदरच आहे. रोज सकाळी मी उठतो. नित्यकर्मे पार पाडत असतो. नळाला पाणी येत असतं. गॅस गिझरच्या कृपेने केवळ ४० (की ५० पैसे?) पैशात गरम पाण्याची बादली मिळते. पेपर वाचायला जावं तर काहीबाही भयंकर बातम्या वाचायला मिळतात. पण अवघ्या तीन रुपयात ('सकाळ'च्या एका अंकाच्या छपाईला १८ रुपये खर्च येत असताना) कोणताही उपद्व्याप न करता जगाच्या उलाढाली कोणीतरी तुमच्या पर्यंत पोहोचवत असताना, त्या बातम्यांचे फारसे वाईट वाटून घेण्याचे काही कारण आहे का?

    आंघोळ उरकून बाहेर यावं तर खाली कांदे बटाटेवाल्याची हातगाडी आलेली असते. पों पों हॉर्न वाजवणारा इडली वाला एक चक्कर मारुन जातो. खारीवाल्याची ती नेहमीची ऍल्युमिनियमची भली मोठी पेटी सायकलवरून इकडेतिकडे फिरत असते. एवढंच काय तयार मोड आलेली मटकी सुद्धा मिळते. निदान आमच्या इथे तरी मिळते बुवा. आता अजून तुम्हाला काय पाहिजे? 'मटकी मोडाची' म्हणत जाणारी ही मटकीवाली मी रोज 'ऐकतो', अजुन तिला पाहिलेलं नाही. पण पाहायचा मी प्रयत्नही करत नाही. उगाच तिच्या आवाजावरुन माझ्या मनात तयार झालेली तिची प्रतिमा, तिला प्रत्यक्षात पाहून विस्कटून जाण्याची भीती मला वाटते. ( हे वाक्य थोडं तसलं झाले आहे, पण हरकत नाही. लेखकाला तेवढे स्वातंत्र्य असते.)

    मग मी टीव्ही लावतो. सकाळच्या वेळेस इथे फारसे काही घडत नसते. इथले सगळे दळण संध्याकाळी सातनंतर सुरु होते. सकाळी कुणाला टीव्ही बघायला वेळ नसतो, असे असले तरी काहीतरी तर दाखवावेच लागते. मग काय दाखवतात? तर इथेही कुणीतरी पोटावरची चरबी विरघळवणारे उपकरण, स्लिम सोना बेल्ट तयार करायचे कष्ट घेतलेले असतात. ही जाहिरात करतानाही केवळ प्रेक्षकांचे 'तोंद' विरघळावे म्हणून कुणीतरी एवढा वेळ गरम पट्टा पोटाला लावून घामाघूम होऊन बसलेले असते. या जाहिरातीत काम करणार्‍या सुंदरी पण भयंकर असतात. त्या फारच पुरूषी वाटतात. मग पुढचा चॅनल! तर इथेही माझ्या उद्योगधंद्याला कुणाची नजर लागू नये म्हणून कुणीतरी एवढे परिश्रम घेऊन, संशोधन करुन Evil Eye Shielding Technique वापरुन नजर सुरक्षा कवच बनवलेले असते. ते पाहून मला एकदम गलबलल्यासारखे होऊन जाते. मन एकदम भरुन येते. शिवाय ते तुम्हाला ५००० नाही, ४००० नाही, ३००० हजारही नाही तर केवळ २४९५ वगैरे किंमतीला दिले जाते. अशा परोपकारी व्यक्तींच्या सदहेतूबद्दल काही शंका घेण्याचे कारण आहे का? किती नावं ठेवाल? परत एकदा विचार करा! जग सुंदर आहे की नाही? आहेच!

    असो. तुम्हाला एक प्रसंग सांगतो, त्याशिवाय मी काय सांगतो ते तुम्हाला पटायचं नाही. आमचे एक परिचित एकदा बसने जायला निघाले. बसस्टॉपवर उभे होते. बस आली, बसथांब्यावर थांबली. हे सांगण्यासारखे आहे कारण बस पुण्यातली होती. (पुण्यात तुम्ही बसथांब्यावर थांबलात आणि बस तुमच्या समोर बसथांब्यावर थांबली तर सरळ अंगाचा चिमटा घेऊन बघावा. त्याने एकतर तुम्ही झोपेतून तरी जागे व्हाल, नाहीतर आजचा दिवस तुमचा आहे हे लक्षात घेऊन प्रेयसीला लग्नाची मागणी घालणे, मित्राकडे बरेच दिवस थकलेले पैसे मागणे अशी कामे उरकून घ्यावीत. ताबडतोब होऊन जातात!) . तर सांगत होतो की बस पुण्यातली होती, बसचा कंडक्टर पुण्यातला होता, हे गृहस्थही पुण्यातलेच होते आणि हा प्रकारही पुण्यातच घडण्यासारखा होता. तर बसमध्ये चढल्यावर कंडक्टर या गृहस्थांकडे आला (अहो आश्चर्यम!) आणि त्यांना विचारलं, "कुठं जायचंय?", गृहस्थांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर द्यायचे म्हणून अमुक अमुक जाण्याचे ठिकाण सांगितले. सर्व काही सुरळीतपणे चालू होते. उन्हातून बसमध्ये शिरल्यामुळे हे गृहस्थ रुमालाने घाम पुसण्यात मग्न झाले. कंडक्टरने त्यांचे तिकिट फाडले आणि त्यांच्या पुढे धरले. गृहस्थांचा घाम पुसून झाल्यावर त्यांना कंडक्टर आपल्याकडे काहीतरी काम आहे अशा नजरेने बघत असलेला दिसला. त्यांनी विचारले, "काय?"

    कंडक्टर वैतागला, त्याच्या चेहर्‍यावर आठी स्पष्टपणे झळकली. शिवाय 'हे पार्सल कुठल्या गावाहून आले आहे' ची सूक्ष्म छटाही त्यात मिसळलेली होती. "अहो, तुमचं तिकीट घ्या! सात रुपये झाले, सुट्टे नाहीत, दोन असले तर द्या, म्हणजे पाच द्यायला, नाहीतर उतरताना घ्या".

    रुमालाची घडी आपल्या खिशात ठेवत गृहस्थ म्हणाले, "अहो पण माझ्याकडे पास आहे, मला तिकिटाची काही आवश्यकता नाही". पुढे बसमध्ये कसे दोन गट पडले, कसा गदारोळ उडाला, कशी बाचाबाची झाली वगैरे मी सांगत बसत नाही. बसमधल्या सामान्यजनांना कोणाची बाजू बरोबर आहे हे ठरवणे अगदीच अशक्य होऊन बसले आणि कोणीच माघार घेत नसल्याने सर्वसामान्य परिस्थितीत जे करण्यात येते तेच करण्यात आले. बस आपला नेहमीचा रस्ता सोडून पोलिस स्टेशनाकडे वळली.

    पोलिस स्टेशनात विशेष म्हणजे त्या दिवशी पोलिस हजर होते. त्यांनी सगळे गार्‍हाणे ऐकून घेतले. आता पुढे काय ह्याची उत्सुकता सगळ्यांना वाटत होती. वेळ वाया जातोय म्हणून काही चाकरमाने निघून गेले असले तरी काही डांबरट लोक पुढे काय होते ते पाहण्यासाठी थांबलेले होते.

    पण पुढे काहीच झाले नाही. सायबांनी स्वत: तिकिटाचे सात रुपये भरले. शिपायाला सांगून दोन चहा मागवले. कंडक्टर आणि गृहस्थाला चहा पाजला. अटक, वॉरंट, जामीनावर सुटका, जातमुचलका (हा शब्द कसला सेक्सी आहे राव!), न्यायालयीन कोठडी, थर्ड डिग्री यातले काही म्हणजे काही झाले नाही. And they all lived happily ever after च्या चालीवर सगळेच सुरळीत होऊन गेले.

    बघा विचार करा! असा अनुभव यायला भाग्य लागते. हे जग सुंदर नसते तर असे काही शक्य झाले असते का? तिकिटाचे पैसे भरायचे राहिलेच बाजूला, मस्तपैकी चहाने वगैरे सरबराई झाली. तीसुद्धा पोलिस स्टेशनात. याला काय म्हणावे? या सगळ्याचे तात्पर्य काय? तात्पर्य दुसरे काही नाही! हे जग सुंदर आहेच.

    सावकाश विचार करुन तुमचे मत सांगा, तोपर्यंत मी हा लेख प्रसिद्ध करतो. ( बाकी लेख प्रसिद्ध करणे आणि तो प्रसिद्ध होणे/असणे या दोन्ही भिन्न बाबी आहेत. पण आपण एकाच शब्दावर काम उरकत आहोत. What you say?)

मंगळवार, १८ मे, २०१०

परिक्षेचा दिवस...

    म्हणता म्हणता परीक्षा जवळ आलीये, जवळ आलीये करत आली सुद्धा. शेवटच्या महिन्यात अभ्यासाने चांगलाच जोर पकडला होता. कवितांचा अर्थ लावून लावून डोक्याचा पार भुगा होऊन गेला. दुर्बोध लिहणार्‍या कवींनी माझ्याकडून अजून चार शिव्या खाल्ल्या. ग्रीक मायथॉलॉजी नसती तर ह्या लोकांना उपाशी मरावे लागले असते हे माझे मत अजूनच ठाम झाले. लिटररी क्रिटिसिझममधून दुसर्‍यांवर टीकाटिपण्णी करता करता काही लेखकांना आपण स्वत:ही किती रटाळ पुस्तके लिहली आहेत याचेही भान राहिले नाही. निदान प्रसिद्ध करण्यापूर्वी स्वत:च्या पुस्तकाचे परीक्षण केले असते तर आपण लिहलेल्या लिखाणातल्या एकाही वाक्याचा अर्थ लागत नाही हे तरी त्यांच्या लक्षात आले असते. अर्थात यातही, वाळवंटात रखरखाटाने जीव जायची पाळी यावी आणि अचानक हिरवाईने मन सुखावून जावे, असे अनुभव देणारे प्राईड ऍंड प्रेज्युडिससारखे पुस्तकही होते, नाही असे नाही. तरीही एकंदर तक्क्यावर रेलून आरामशीरपणे पुस्तक वाचणे वेगळे आणि What is the tragic flaw in the character of Othello? How far it is responsible for his tragedy? या प्रश्नाचे उत्तर लिहणे वेगळे! नाही का?
    तर परीक्षेचा दिवस उगवला. सकाळी अकरा ते दुपारी दोनचा पेपर होता. आबासाहेब गरवारे महाविद्यालयात यंदा आमचे स्थळ आले होते. तसे पाहता या वेळी विद्यापीठाने ते खूपच जवळ दिले म्हणायचे. मागच्या वर्षी त्यांनी मला इंदिरा कॉलेज, ताथवडे इकडे पाठवले होते होते. परीक्षा केंद्र निवडताना पुणे निवडल्याचे मला स्पष्ट आठवत होते. आमच्या गरीबांच्या ऑक्सफर्डला ताथवडे पुण्यातच आहे असे वाटले असावे. त्यावेळी जायला एक; यायला एक तास लागत होता. मला मात्र वाटत होतं की मुंबईलाच चाललो आहे परीक्षा द्यायला.
    मात्र यंदा तसे नव्हते. परीक्षेची वेळही सोयस्कर होती. अभिजीतने जाता जाता मला सोडले असते आणि येताना मी आलो असतो. त्याला म्हटले, आपण गाडीतूनच जाऊया. तो हो म्हणाला. (नाहीतरी त्याला असे कुणीतरी म्हणायचे कारण पुरते, लगेच गाडी नेण्यासाठी.) मग निघालो. पुण्यातच जायचे असले तरी सकाळची वाहतूक लक्षात घेता वेळ तर लागणारच होता. गाडीत वाचायला मात्र काही घेतले नाही. उगाच गाडीत वाचायला काहीतरी घ्या आणि नंतर मळमळत असताना एम.ए. चा पेपर लिहा, असे नको व्हायला. मग पोहोचलो परीक्षा केंद्रावर.
एम.एच्या परीक्षांना सगळ्या प्रकारचे लोक हजर असतात. काही काही वेळा वृत्तपत्रात जसे 'समाजाच्या सर्व थरातून लोक आले होते' असे लिहलेले असते अगदी तसेच एम. ए.च्या परीक्षांचे असते. अगदी '८३व्या वर्षी आजींनी दिली एम.ए.ची परीक्षा' या बातमीतल्या आजीबाई नसल्या तरी कॉलेजकुमारांपासून ते ज्येष्ठ नागरीक म्हणता येईल इतपत विविध वयोगटातले परीक्षार्थी हजर असतात. बहुतेकांच्या हातात बाजारात मिळणार्‍या एकाच लेखकाच्या नोट्स होत्या. या नोट्सचा दर्जाही काय वर्णावा? तसे पाहिले तर एम.ए.च्या बहि:स्थ विद्यार्थ्यांचे हाल कुत्राही खात नाही. अगदी अभ्यासक्रम मिळवण्यापासून ते 'मटेरियल' गोळा करण्यापर्यंत त्यांना रक्त आटवावे लागते. परत मूळ पुस्तकं मिळायची मारामार. मूळ पुस्तक मागितले की अप्पा बळवंतातले दुकानदार हा कुठल्या परग्रहावरुन आला आहे असा चेहरा करुन तुमच्याकडे बघतात. आजूबाजूचे चारपाच जणही तुमच्याकडे अथ पासून इतिपर्यंत टवकारुन बघतात. च्यायला आजकाल मूळ पुस्तक वाचतो कोण?
    परत आणि पुणे विद्यापीठाच्या संकेतस्थळाबद्दल काय बोलावे? (खरोखर काहीच बोलत नाही. त्याच्यावर एक स्वतंत्र लेख लिहता येईल. उगाच ब्लॉगच्या एका उत्तम लेखाचा विषय कशाला वाया घालवा?)
    आपला नंबर कोणत्या खोलीमध्ये आला आहे हे बघण्यासाठी नोटीस बोर्डाजवळ भयंकर गर्दी उसळलेली असते. तिथे जाऊन मी माझा नंबर शोधतो. परीक्षा हॉलमध्ये शिरताना एवढा गलका कसला चालला आहे असा विचार केल्यावर लक्षात येते की अरे इथे जवळ जवळ ९० टक्के स्त्रियाच जमल्या आहेत. जशा सामुदायिक पोथी वाचन वगैरेला महिला जमतात तशा सामुदायिक एम.ए.परीक्षा द्यायला एखादे महिला मंडळ आले आहे की काय? प्रत्येकजण अगदी अनेक वर्षांच्या ओळखी असल्यासारख्या एकमेकींशी बोलायला सुरुवात करतात. अर्थात मला त्याचे काही वाईट वाटायचे कारण नाही पण थोडे अस्वस्थ वाटायला लागते. या सगळ्यांनी मिळून माझ्याविरुद्ध डाव केला आहे, ते सगळेजण मिळूनच पेपर लिहणार आहेत वगैरे वगैरे विचार माझ्या मनात यायला लागतात. मग परीक्षक वर्गात प्रवेश करतात. "सगळ्यांनी आपापल्या बॅगा, पर्स, सॅक्स पुढे आणून ठेवा. मोबाईल स्विच ऑफ करुन आपापल्या बॅगेत ठेवा. कुणाचाही मोबाईल वाजता कामा नये."वगैरे वगैरे.....
अचानक माझ्या लक्षात येतं की दरवेळेस माझ्या पुढच्या बाकावरचा परीक्षार्थी गैरहजर असण्याची परंपरा यंदा मोडीत निघालेली आहे. एक मुलगी माझ्या पुढच्या बाकावर बसलेली आहे. अर्थात तिचं लिहलेलं बघून मला उत्तरं लिहता येतील अशी शक्यता नसते. (परीक्षेत दहा बारा निबंधासारखी उत्तरं लिहायची असताना कॉपी कसली करणार डोंबलाची?) पण दरवेळेस परीक्षकच चालता चालता मध्येच त्या रिकाम्या बाकावर बसतात आणि एखादा सरडा जसा अगदी पार्श्वभूमीच्या रंगासारखा रंग घेऊन एकरुप होऊन जातो, तसाच हा परीक्षकही विद्यार्थ्यांत बसून, कॉपी करणार्‍याला रंगेहाथ पकडायचा विचार करत असावा. मात्र यावेळेस तसं होणार नसतं.
    मग उत्तरपत्रिका मिळते. माझ्या आख्ख्या विद्यार्थीजीवनातल्या सवयीप्रमाणे मी लगेच पानाच्या दोन्ही बाजूने अगदी थोडे थोडे समास आखून घ्यायला सुरुवात करतो. आपला परीक्षा क्रमांक, तारीख, विषय, सेंटर लिहून होतं. इंग्रजीच्या पेपरलाही मिडीयम ऑफ आन्सर लिहावे लागते. पाच दहा मिनिटं होतात आणि मग तो चिरपरिचित टण्णऽऽ असा आवाज होतो आणि 'याचसाठी केला होता अभ्यास' असं जिच्याबाबत म्हणता येईल ती प्रश्नपत्रिका माझ्या हातात येते. मी ती अधाशासारखी वाचायला सुरुवात करतो.

ह्म.... ह्म.....
अच्छा! .....
हा प्रश्न विचारलाय काय? .....
बोंबला.....
अरे चोरांनो..... कात्रीत पकडायला बघता काय?.....
अरेच्चा हा तर मागच्या वर्षीच्या पेपरात पण होता. अरेरे! मागच्या वर्षी आला म्हणून या वेळी येणार नाही असं वाटून त्याकडे फारसे लक्षच दिले नव्हते आपण....
अरे वा! याचे मुद्दे तर आपण सकाळीच वाचले आहेत. वा वा वा! .....

    माझे विचार सुरु होतात. मग एकदम वाचतच किती वेळ गेला हे लक्षात येऊन मी झरकन लिहायला सुरुवात करतो.
वेळ सरकत सरकत पुढे चाललेला असतो. थोडंफार लिहून होतं. मी इकडे तिकडे नजर टाकतो. काही हात भरभर लिहण्यात गुंतलेले असतात. काही शून्यात नजर लावून बसलेले असतात. असं रिकाम्या बसलेल्या लोकांकडे बघितल्यावर जरा बरं वाटतं. मात्र आता एक नवीनच त्रास सुरु झाला असल्याचं मला जाणवतं. माझ्यासमोर बसलेल्या मुलीचे केस सॉलीड लांब आहेत. अगदी शाम्पूच्या जाहिरातीत दाखवतात तसे 'स्मूथ नि सिल्की'! मध्येच तिने मानेला झटका दिला की तो आख्खाच्या आख्खा केशसांभार इकडून तिकडे हालतो. माझं लक्ष विचलित होतं. काय वैताग आहे हा? थोडं लिहलं की लगेच झटका. अजून एक परिच्छेद लिहला की परत झटका. मी वैतागतो. मग तो सरडा परीक्षकच काय वाईट होता?
    या वर्गात वरती फॅन लावलेले आहेत पण ते दोनच आहेत आणि नेहमीप्रमाणे माझ्यापासून बरेच लांब आहेत. एखादी वार्‍याची झुळूक आलीच तरी त्या गरम वार्‍याने बिलकूल गार वाटत नाही. बर्‍यापैकी उकाडा जाणवत राहतो. पांडुरंग सांगवीकरसारखा आपणही शर्ट काढून पेपर लिहावा की काय असा विचार माझ्या मनात येतो. पण तेवढे धाडस माझ्याच्याने अर्थातच होत नाही. उगाच एवढ्या बायाबापड्यांसमोर असला आचरटपणा कसा करणार?
    बघता बघता पेपराची वेळ संपत येते. शाम्पू मुलगी पण जोरात लिहीत असते. नेहमीप्रमाणे मी मागे पडलेला असतो. सुरुवातीच्या अक्षरात आणि आताच्या अक्षरात थोडा फरक दिसायला सुरुवात झालेली असते. रिस्टोरेशन कॉमेडीचे मुद्दे आठवता आठवत नसतात. बर्‍याच प्रयत्नांनी एक मुद्दा आठवतो. Licentious way of living..... दुसरा आठवतो Loose morals..... मग पुढचे सगळेच आठवायला लागतात Adulterous relationships.....वगैरे वगैरे

    ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर चं जसं गणितात एक आणि एकच उत्तर असतं तसं एम.ए. बाबत कधीच होत नाही. शिवाय गणितात आख्खा पेपर सोडवल्याचं एक समाधान तरी जाणवतं. आपण काय गणितं सोडवली आणि किती गुण मिळणार आहेत याचा स्पष्ट अंदाज बांधता येतो. इथे तसं काहीही नसतं. कितीही लिहलं तरी ते पुरेसं असल्यासारखं वाटत नाही. शेवटी शेवटी लिहून लिहून आपल्याला हात आहे की नाही याची जाणीवदेखील राहत नाही. अजून थोडा वेळ तसंच लिहलं तर सरळ हातापासून त्याचा वेगळा तुकडा पडेल असं वाटायला लागतं.
    वेळ संपल्याची घंटा होते. परीक्षक पेपर गोळा करायला सुरुवात करतात. एखादा चिवट गडी अजूनही लिहितच असतो. परीक्षक त्याच्या हातातून पेपर जवळजवळ हिसकावून घेतात. मी हाताची बोटं तुटेपर्यंत वाकवून, गेलेली संवेदना परत मिळवायचा प्रयत्न करत असतो. सुरुवातीसारखाच गलका वर्गात आता परत सुरु झालेला असतो. प्रश्नपत्रिकेचं पद्धतशीर शवविच्छेदन सुरु झालेलं असतं. शिवाय मला नेहमीप्रमाणे मागून काहीतरी शब्द ऐकू येतात, "आमचे हे नंदूरबारला असतात." "मग तुम्ही काय नोकरी वगैरे करता का?" वगैरे वगैरे... मात्र नंदूरबार पुण्यापासून किती लांब आहे याचा काही अंदाज नसल्याने नक्की किती हळहळ व्यक्त करावी हे मला कळत नाही. फारसा वेळ न घालवता मी पॅड, कंपास सॅकमध्ये भरतो आणि बाहेर पडतो.
    बाहेर आल्यावर उन्हाचा कडाका पाहून परीक्षा हॉलमधलं उकडणं म्हणजे काहीच नाही हा निष्कर्ष सहज निघतो. परत मग रिक्षाचा शोध. एकजण पुणे सातारा रोडला यायला तयार होतो. नेहमीसारखा खडाक टिंग आवाज नि रिक्षाचा प्रवास सुरु! दुपारच्या दोन वाजताच्या ऊन्हाच्या गरम झळा रिक्षात प्रवेश करत असतात. मी केलेला अभ्यास, मी लिहलेला पेपर आणि मला मिळणारे गुण यांचा विचार करत मी आरामशीरपणे मागे टेकून बसतो. चुक..... चुक..... चुक अशा आवाजात मीटरचे आकडे पडत राहतात.

सोमवार, १० मे, २०१०

दैनंदिनीतले एक पान...

    मराठी ग्रंथालयातून आणलेली पुस्तकं बरीच दिवस बदललेली नव्हती. गोनीदांचे रामायण तर एका बैठकीतच संपवले होते. दुसरे होते ते द. पा. खांबेटे यांचे मोठ्या माणसांच्या गंमतीदार गोष्टी. राजवाडे, सेतूमाधवराव पगडी, वासुदेवशास्त्री खरे, टिळक, आगरकर, राजारामशास्त्री भागवत, न.चि. केळकर, ज्ञानकोशकार केतकर, धर्मानंद कोसंबी, वा.म. जोशी, रानडे अशा पर्वतप्राय व्यक्तींच्या अनेक आठवणी, किस्से, त्यांचा व्यासंग वगैरे वगैरे...
    अभिजीत गाडीवरुन सोडतो म्हणाला. येताना बसने येणार होतो. निघालो. अभिजीतचे गाडी चालवणे म्हणजे काय! जीव मुठीत धरुनच त्याच्या मागे बसावे लागते. त्यात गाडी पण करिझ्मा. मग काय विचारायलाच नको. पुण्यातल्या वाहतुकीची तर मी धास्ती घेतली आहे. आधीच चालता नीट येण्याची मारामार, त्यात घरी सुखरुप येतो की नाही याची निश्चिती नाही.
ग्रंथालयात गेलो तर फारशी गर्दी नव्हती. हे ग्रंथालय म्हणजे पुणे मराठी ग्रंथालय. भलेमोठे आहे. कुठले पुस्तक मिळत नाही असे होत नाही. प्रत्येक पुस्तकावर साडेतीन रुपये असा सात रुपये दंड भरला. या ग्रंथालयात दहा दिवसात पुस्तक बदलावे लागते, नाहीतर दंड भरा. ब्रिटीश लायब्ररीत मात्र असे नाही, महिनाभर तर ठेवताच येते पण फोनवरुनही मुदत वाढवता येते. ब्रिटीश लायब्ररीबद्दल बरेच सांगण्यासारखे आहे ते नंतर कधीतरी.
    विशेष असे कुठलेच पुस्तक घ्यायचे नव्हते. त्यामुळे जास्त धुंडाळत न बसता टेबलावरच मिळालेली दोन घेतली. निवडक केशवसुत आणि निरंजन घाटे यांचा मृत्यूदूत हा विज्ञानकथा संग्रह.
    मग निघालो परत चालत, 'नीलम’ भांड्यांचे भले मोठे दुकान मागे पडले. नुमविच्या समोर आलो. या शाळेला इतके भयंकर रंग दिले आहेत अलीकडेच. कुणीतरी एखाद्या इमारतीला रंग देताना मूळ रंगांचा वापर करेल का? लाल काय, काळा काय, पिवळा काय कशाला काही अर्थच नाही. एखाध्या नुमवियाला याचा राग येईल पण खरेच हे रंग फारच विचित्र दिसतात. पुढे निघालो, अप्पा बळवंत चौक! जिकडे बघावे तिकडे पुस्तकांचीच दुकाने. धार्मिक पाहिजेत ती आहेत, कथा कादंबर्‍या आहेत, शालेय आहेत, क्रमिक आहेत, नोट्स आहेत गाईड्स आहेत, इंग्रजी आहेत, अनुवादित आहेत. पांढर्‍यावर काळे करण्यासाठी लागणार्‍या स्टेशनरीची भलीमोठी दुकाने आहेत. कोणी रस्त्यावर पथार्‍या मांडून बसले आहे, कोणी पुस्तके अर्ध्या किंमतीत विकत आहे, कुणी विकत घेत आहे. यात भर म्हणजे सकाळचे अकराचे रणरणते उन आणि पुणेरी रस्त्यांवरची अविभाज्य, बेफाम वाहतूक. मध्येच एमेटीवर एक ज्येष्ठ गृहस्थ आपल्या नातीला घेऊन निघाले होते. सिग्नलची वेळ संपली तरी हे आपले चाललेच आहेत पुढे पुढे. पोलिसाने शिट्टी वाजवली, त्यांना साईडला घेतले. मी पुढे निघालो, तर "एवढे काय अर्जंट काम काढले आहे आज, काका?" असे काहीतरी शब्द मागे ऐकू येत होते. प्रगतीत घुसलो. माझे एक अभ्यासाचे पुस्तक घेतले. बिचार्‍याकडे नव्हते, ते त्याने दुसरीकडून आणून दिले.
    मग पुढे चालत परत वसंत टॉकीजला आलो. सकाळच्या वेळेस फारशी गर्दी नव्हती. बसेस येत होत्या, जात होत्या, माणसे उतरत होती, चढत होती, काही पुढेच जाऊन थांबत होत्या, त्यांच्या मागे माणसांची पळापळ, कोणी मध्येच थुंकत होते. मग शेवटी बस आली एकदाची. बसमध्ये आलो. एकदम रिकामी. ड्रायव्हर,कंडक्टरशिवाय त्यात कुणीच नव्हते. गजबजलेल्या रस्त्यांवरुन बस निघाली. पुढेच बसलो होतो. थोडी पुढे जातेय न जातेय तोच परत बस थांबतेय, मध्येच एखादा रिक्षावाला कडमडतोय. बसची पाटी जरा विचित्रच आहे. विचित्र म्हणजे ती उलटी लावलेली आहे. कात्रज ते आकुर्डी स्टेशन. त्यामुळे बस आकुर्डीवरुन येऊन कात्रजला जाणार असूनही ती कात्रजला चाललीये की आकुर्डीला हे लोकांना कळत नाहीये. लोक मग पुढच्या दारात येऊन ड्रायव्हरला विचारतात. एक मध्यमवयीन गृहस्थ विचारतो,"कात्रज का?" ड्रायव्हर काहीच उत्तर देत नाही. गृहस्थ निघून जातो. पुढे एक बाई विचारते, "कात्रज का?" ड्रायव्हर या आत अशी मान हलवतो. बाई आत येते. कंडक्टर एव्हाना माझ्याजवळ येतो. मी दहा रुपयांची नोट देतो. तो एक रुपया सुट्टा मागतो. मी पाच रुपये आणि तिकीट घेतो. बस अजून पुढे सरकते. ती सरकतच असते. बहुतांश वेळ पहिल्यावरच, क्वचित दुसर्‍यावर आणि तिसरा टाकायला तर ड्रायव्हरला वेळच मिळत नाही. मला मात्र क्लच जास्त वेळ दाबून ठेऊ नये हा गाडी शिकताना शिकलेला धडा आठवतो. च्यायला, ही अवाढव्य बस किती ऍव्हरेज देत असेल? ग्लोबल वॉर्मिंग, ग्रीन हाऊस गॅसेस, इंधनबचत यांबद्दल या गृहस्थाचे काय मत असावे?
    पुढे हळूहळू सरकत बस मंडईजवळ येते. इथेही भयंकर गर्दी आहे. एवढे लोक, एवढी त्यांची खरेदी, बारीकसारीक टेंपो, हातगाड्या, मध्येच लागणारी मंदिरं, त्यापुढच्या भक्तांच्या रांगा, कोणी फुलं विकतंय, कोणी नारळ विकतंय, सॉलिड गोंधळ चालू आहे. स्वारगेटला आलो तर वाहतुकीची जाम कोंडी झालेली. इंचाइंचाने सुद्धा वाहतुक पुढे सरकायचे नाव घेईना. अचानक लक्षात येतं की अरे आपल्या सॅकमध्ये दोन सुंदर पुस्तकं आहेत. ती वाचायला इथेच सुरुवात करुया. निवडक केशवसुत.... लेखक वामन देशपांडे! मग मी कविता वाचायला सुरुवात करतो.

एक तुतारी द्या मज आणुनि,
फुंकिन मी जी स्वप्राणानें,
भेदुनि टाकेन सगळी गगनें,
दीर्घ जिच्या त्या किंकाळीनें,
अशी तुतारी द्या मजलागुनि.

इंजिनाजवळून येणारी गरम हवा, प्रदूषण, टळटळते ऊन, कोलाहल या सगळ्यांचे एक जालीम मिश्रण बसमध्ये तयार झाले आहे आणि मी आपला तुतारी वाचतो आहे.

जुने जाऊं द्या मरणालागूनि,
जाळूनि किंवा पुरूनी टाका,
सडत न एक्या ठायी टाका;
सावध! ऐका पुढल्या हांका;
खांद्यास चला खांदा भिडवुनि;

    या बसच्या समोरच दुसरी बस होती. ड्रायव्हर महाशय पुढच्या बसला इतकी चिकटवून चालले होते की जणू काही खांद्याला खांदा भिडवूनच चालला आहे. त्यातनं एखाद्या कोंबडीला पण जायची मारामार होईल. पाच, दहा, पंधरा मिनिटं झाली तर आम्ही आपले तिथेच. ड्रायव्हरच्या मुखावर मात्र कोणताही वैताग दिसत नाही. हे सगळे जणू काही रोजचेच आहे! तो शांतपणे सीटमागच्या कप्प्यातून पाण्याची बाटली (ऍक्वाफिना) बाहेर काढून पाण्याचे घोट घेत राहतो. सगळ्या आयुष्याचा कोळलेला अर्कच पचवण्याचे सामर्थ्य याच्यात असावे.

घातक भलत्या प्रतिबंधावर
हल्ला नेण्या करा त्वरा रे!
उन्नतिचा ध्वज उंच धरा रे
वीरांनो! तर पुढे सरा रे--
आवेशाने गर्जत ’हर-हर’!

    क्वचित पुढची बस सरकलीच तर क्लचवर तो बस उचलत असे. एव्हाना डाव्या बाजूलाही एक बस आलेली आहे. तिच्याही पुढे एक बस आहे. मात्र आमच्या आणि शेजारच्या बसमध्ये एक दुचाकीस्वार चांगलाच अडकलेला आहे. त्याला स्वारगेट चौकात डावीकडे हडपसरकडे जायचे आहे. तो डावीकडच्या बसचालकाला सांगतो की त्याला पलीकडे जाण्यासाठी त्याने थोडी जागा द्यावी. कारण हाही ड्रायव्हर त्याच्या पुढच्या बसला चिकटून चालला आहे. "तुला कुठं जायचंय?" ड्रायव्हरचा प्रश्न! "डावीकडे" हे उत्तर. "मलाही तिकडेच जायचंय" म्हणत ड्रायव्हर मला डोळा मारतो. मला भयंकर हसायला येतं. काय चाललंय काय राव? शेजारचा ड्रायव्हर अजून गाडी आत दाबतो, दुचाकीवाला ए, ओ करत ओरडायला लागतो. शेवटी एकदाचा सिग्नल सुटतो आणि आम्ही पुढे मार्गस्थ होतो. पुढे मग बीआरटीचा मार्ग! इथेही केवळ दोनच बसला यायला जायला जागा असूनही ड्रायव्हर आरामशीरपणे ओव्हरटेक करतोय. लोण्यातून सुरी फिरते तशी तो बस चालवतो. स्वारगेटनंतर लक्ष्मीनारायण, पंचमी हॉटेल, सिटीप्राईड येतं, जातं. बाराचा शो सुरु झालेला असावा. तिकिटखिडकीवर तुरळक माणसं दिसतात. स्टॉप येतात, लोक उतरतात, चढतात, थोड्या काळासाठी का होईना, कंडक्टरची गंगाजळी हळूहळू वाढतेय. विवेकानंद स्मारक येतं, छोट्याशा बागेत सावलीत स्वामी विवेकानंदांचा पुतळा उभा आहे. गळ्यात वाळलेला हार! शेवटी मी माझ्या स्टॉपवर उतरतो.

    ग्रंथालयातून दोन पुस्तकं बदलणं आणि एका पुस्तकाची खरेदी यांसाठी आपण घालवलेला वेळ याचा हिशोब करत मी घरी पोहोचतो. बघू! जमलं तर यावर एखादा लेखही लिहता येईल.

शनिवार, ८ मे, २०१०

कसाबला फाशी आणि सकाळचा चंपक अग्रलेख...

    कसाबला फाशी झाली. दोन दिवस झाले. समाजाची स्मरणशक्ती तशी कमी असतेच म्हणा. थोड्याफार दिवसांची गोष्ट आणि कुणाच्या हे लक्षातही राहणार नाही. मला मात्र सकाळमध्ये जो अग्रलेख प्रसिद्ध झाला तो वाचून हसावे की रडावे हे कळेनासे झाले आहे.
    बकवास शीर्षकापासूनच याची सुरूवात झाली आहे. "कसाबचा झाला; आता इतरांचाही करा हिसाब"
कसाब काय हिसाब काय? यमकाचा हा कसला फालतू अट्टहास?

    पण पुढे आख्खा अग्रलेखच इतक्या हास्यास्पद विधानांनी भरलेला आहे की शीर्षकाचे काहीच वाटायला नको. सुरुवातीचा भाग ठीक आहे. पण पुढेपुढे असली नमुनेदार विधानं केली आहेत ती बघण्यासारखी आहेत.
    "कसाब जिवंत हाती लागला त्यामुळे भारतातील अतिरेकी कारवायांमधील पाकिस्तानचा हात स्पष्ट झाला." - हे आधीही स्पष्ट झालेलं आहे, त्याने पाकिस्तानला काय फरक पडला? पाकिस्तानवर कुणी कारवाई केली आहे काय?

    "कसाब पकडला गेल्यामुळे पाकिस्तानला नाटक म्हणून का होईना, पण मुंबईतील अतिरेकी हल्ल्यांसंबंधीचा खटला चालवावा लागला." - याच्यातून काय निष्पन्न झाले? कुणाला शिक्षा झाली?

    "दोन दिवसांपूर्वी अमेरिकेतल्या टाइम्स स्क्वेअरमधे बॉंब ठेवताना पकडल्या गेलेल्या फैजलने आपण पाकिस्तानातून प्रशिक्षण घेऊन अतिरेकी कारवाया करण्यासाठी आल्याचे कबूल केल्याने महासत्तेला आता पाकिस्तानविरुद्ध डोळ्यांवर कातडे पांघरुन स्वस्थ बसणे शक्य होणार नाही." - अमेरिका? पाकिस्तानवर कारवाई? पाकला मध्येच आठवण आली की सज्जड दम, तंबी वगैरे देणे आणि दरवेळेस डॉलर्सच्या मदतीचा ओघ वाढवणे यापेक्षा अमेरिका दुसरे काहीही करत नाही. आता तुम्ही बरे झाले सांगितले. अमेरिका नक्कीच धोरणात बदल करेल.

    "वरच्या न्यायालयांमध्ये कसाबला झालेल्या शिक्षेची जसजशी शहानिशा होईल, तसतसे पाकिस्तानला अतिरेकी कारवायांशी असलेला आपला संबंध नाकारणे जड जाईल." - खी: खी: खी:

    "१९९३ च्या बॉंबस्फोट खटल्यापेक्षा कसाबचा खटला वेगाने चालला आणि त्यातील साक्षीपुराव्यांनुसार आरोपीला कठोर शिक्षा केल्याने भारताचा याबाबतीतील कठोरपणाही जगासमोर आला." - कुठे आहे हा कठोरपणा? आम्हाला कसा दिसला नाही अजून? काही ठराविक व्यक्तींनाच दिसतो काय? म्हणजे तुम्ही बॉंबस्फोट करा, शेदोनशे माणसं मारा आणि आम्ही त्याचा लवकर खटला चालवतो आणि त्यांना कठोर शिक्षा करतो. बकवास!

    "भारत हा अतिरेकी कारवायांसाठी कायमचा बकरा बनणार नाही हेही या निकालाने अतिरेकी कारवायांना पाठीशी घालणार्‍या आणि पाठबळ पुरवणार्‍या शेजारी देशांनी लक्षात घेतलेले बरे." - खी:खी: खी:! त्यांनी लक्षात घेतले आहे. तसे सांगणारा इमेल मला कालच आला. पण मग तरीही पुण्यातले बॉंबस्फोट कुणी केले बरे?

    "भारतीय न्यायव्यवस्थेवर असलेला आमचा विश्वास या निकालाने आणखी दृढमुल झाला अशी भावना अनेकांनी ठामपणे बोलून दाखवली." भारत हा एक मूर्ख लोकांचा देश आहे. कोण आहेत हे लोक? त्यांचा पत्ता तरी द्या. अरे अफजल गुरुच आता फाशीची शिक्षा झालेल्यांमध्ये २२ व्या नंबरला आहे. त्याला अजून शिक्षा नाही. आणि कसाबचं काय घेऊन बसलाय? मला तर असं वाटतंय की एखाद्याचा खून करुन फाशीची शिक्षा घेऊन बसावं. बरीच वर्षे आरामशीरपणे काढता येतील. पोटापाण्याची चिंता करायची कारण नाही. या काळात उत्तमोत्तम ग्रंथ वाचावेत, टिपणं काढावीत, लिखाण करावं. एकूणातच चिंतन, मनन करत आयुष्य घालवावं. कसला आला आहे पश्चात्ताप?

    "देशद्रोही कसाबला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर आनंद व्यक्त करणारे, मिठाई वाटणारे मुस्लिम समाजातलेही नागरिक होते, ही देशफोड्या अतिरेक्यांना भारतीयांनी लगावलेली सणसणीत चपराक आहे." - ही असली वाक्यं लिहणारा कोण आहे? संपादक की बुजगावणं? कुठल्या जगात वावरता आहात तुम्ही? चपराक? चपराकचा अर्थ कळतो का तुम्हाला? साधं या अतिरेक्यांच्या यावनी दाढीलाही भारताला अजून हात लावता आलेला नाही आणि चपराक कशाची डोंबलाची? स्वत:ची पाठ थोपटायची तरी किती? या असल्या पुचाट विधानांनी स्वत:ची समजूत किती दिवस काढणार?

    एकंदरीत एखाद्या बुजगावण्याने हा अग्रलेख लिहलाय असेच मला तरी वाटत आहे. केवळ आणि केवळ जाहिरातींच्या मागे लागलेल्या आणि वर्षभर खरेदीची फालतू प्रदर्शने भरविणार्‍या सकाळने हे असले बकवास अग्रलेख लिहावेत तरी कशाला? तुम्हाला जर सरकारला कडक शब्दात सुनावता येत नसेल, जाब विचारता येत नसेल तर त्यापेक्षा वसंत संपात कधी येतो, सहस्रचंद्र दर्शनाचा कार्यक्रम कधी करावा? आणि अधिक मास कधी येतो, त्यात काय काय करावे हीच चर्चा चालू राहू द्या की! कसे?

शुक्रवार, ३० एप्रिल, २०१०

समुद्रकिनारा...



कोकण...

गुरुवार, २९ एप्रिल, २०१०

समज गैरसमज...

    "आई, मला एक सांग, या विवाह नामक प्रकाराची लोकांना एवढी आवड का आहे बरे? जो तो उठतो तो आपला विवाह करायला बघत असतो. आणि म्हणे की लोकांचा विवाह संस्थेवरचा विश्वास उडायला लागला आहे. लुच्चे, खोटारडे कुठले!"

"नाही तरी तुझी काही लग्नाची तयारी नाही. सांगून सांगून थकले मी. माझी अर्धी लाकडं आता स्मशानात गेली तरी सूनमुख पाहण्याचं काही माझ्या नशिबात दिसत नाही. ज्यांना करायचा आहे ते करतील. तुला त्याचा त्रास का बाबा?

"मला त्रास का म्हणजे? वा गं वा! पेपरात असलं काही छापून येतं ते आम्हालाच वाचावं लागतं ना? ऑं? तुम्हाला काय करायचं ते करा म्हणावं चार भिंतींच्या आत! पेपरात छापून आणून आमच्या आईवडिलांची आमच्या मागे भुणभुण कशाला सुरु करता?"

"अरे पण कधी ना कधी तर लग्न करायलाच लागणार ना बाबा? पुढे तुझं वय वाढल्यावर हातीपायी धड मुलगी मिळायची मारामार होऊन बसेल."

"अगं आई, असं नसतं आता आजकाल, एकाने पोट भरलं नाहीतर लोक तीनचार देखील करायला मागे पुढे पाहत नाहीत. आणि वयाचा तरी कुठे प्रश्न उरला आहे? अगं जिथे ’बालिकावधू’चं लग्न लोक मिटक्या मारत बघत आहेत आणि कसल्या कसल्या वाह्यात लोकांचे ’स्वयंवर’ होऊन त्यांना बायका मिळत आहेत तिथे माझ्या लग्नाची काय काळजी करतेस?"

"अरे देवा! कालचं बालिकावधू बघायचं राहून गेलं की रे! अरे न्यूजचॅनलवर त्या दोघांची एकत्र अशी पहिलीच मुलाखत लागली होती ती बघता बघता राहूनच गेलं."

"असल्या मालिकांचं रोजचं दळण बघणारी, डोक्याने अधू असलेली माणसं आहेत; म्हणूनच या कुलवधूंचं फावलं आहे."

"काय म्हणालास?"

"कुठे काय? काही नाही. तूच कुणा दोघांबद्दल काहीतरी सांगत होतीस."

"काय छान दिसत होते दोघं अरे... मला तर फार आनंद झाला बघ. किती वाद, भानगडी झाल्या पण शेवटी सगळं काही सुरळीत झालं हे काय कमी आहे का?"

"एवढं सगळं काही बाहेर आल्यावर आता तसं सुरळीत चाललंय असंच म्हणावं लागेल. तू म्हणतेस ते बरोबर आहे. तसे वयाच्या मानानं चांगलेच आहेत म्हणायचे दोघेही दिसायला. तो तर काय परराष्ट्रातलाच ना? ती पण तशी ठीक आहे म्हणा."

"परराष्ट्र? अं हो हो, ते परराष्ट्रच आहे म्हणा! पण मी काय म्हणते की एवढे चांगले चांगले इतर पर्याय असताना आधीच एक लग्न झालेला मुलगा तिने का निवडला असावा?"

"मला काय माहित? नोकरीला जशी अनुभवाची गरज असते तसेच आता लग्नाचा जोडीदारही अनुभवीच हवा असा लोकांचा ग्रह होऊ लागलेला दिसतो."

"काय माहित बाबा? तसेही असेल. कशाचा कशाला धरबंद राहिलेला नाही. उद्या काय बघावे लागेल, वाचावे लागेल काही सांगता यायचे नाही."

"पण मी काय म्हणतो आई, ही बातमी बाहेर फुटलीच कशी? स्वत:च्या लग्नाची बातमी पेपरात छापून येते, रिकामटेकडे लोक ती चांगली चघळत बसतात, तिचं चर्वितचर्वण करतात, हे पाहून यांना काहीच कसं वाटत नाही?"

"अरे हे सगळं त्या नालायक मीडियाचं काम रे! ब्रेकिंग न्यूज मिळवता मिळवता स्वत:चं कंबरडं मोडायची वेळ आली तरी त्यांना काही व्हायचं नाही."

"हो ना तसे आहे खरे! पण मी काय म्हणतो, हा एवढा सगळा गदारोळ झाला, एवढी लफडी कुलंगडी बाहेर पडली, आता त्या संघांचे काय होणार काय माहित!"

"संघाचे काय होणार कप्पाळ! तो पुढेही त्याची खेळी खेळतच राहील बघ. उलट त्याच्या कामगिरीत सुधारणाच होईल बघ."

"सुधारणा कसली व्हायची आहे डोंबलाची. त्याला खूप पश्चाताप होऊन त्याच्या वागणुकीत सुधारणा होईल असे तुला वाटत असेल तर तो भ्रमच म्हटला पाहिजे."

"हो रे बाबा! पुरुषाचीच जात ती! कधी सुधरायची नाही. पण आता कोणत्या देशाचे प्रतिनिधित्व करणार वगैरे काही कळलं का रे?"

"प्रतिनिधित्व वगैरे काही नाही आता. भारतातून गच्छंती व्हायची वेळ आल्यावर कसलं आलं आहे प्रतिनिधित्व?"

"असं का बोलतोस रे? मी तर त्यांना आशीर्वाद दिलाय. ’सुखाने नांदा पुष्कळ’!"

"काय म्हणालीस? हे बरं आहे की! तुला बरं सगळं माहित असतं आजकाल आई! तुला अगदी नावसुद्धा माहित आहे सुनंदा पुष्कर?"




"काय? कोण ही सुनंदा पुष्कर? कशाबद्दल बोलतो आहेस? तू स्वत: कोणती मुलगी बघितली आहेस का? माझी काही हरकत नाही हं बाबा! उगीच डोक्यात राख घालून घेऊ नकोस."

"काय? माझं लग्न सुनंदा पुष्करशी? अगं आई काय बरळतेस तू?"

"अरे गाढवा तू काय बोलतो आहेस मग?

"अगं आई मी तर शशी थरुर आणि सुनंदा पुष्कर यांच्याबद्दल बोलत होतो. तू कशाबद्दल बोलत होतीस?"


"अरे देवा, मी तर सानिया आणि शोएब मलिक बद्दल बोलत होते रे..."

"दुर्दैव आपलं, दुसरं काय? मी काय म्हणतो आई, आता आपण लोकांच्या दुसर्‍या तिसर्‍या लग्नाबद्दल, जी निश्चितच अभिनामाने सांगण्यासारखी गोष्ट नाहीये, तिच्याबद्दल बोलत असतानाही; मी जे बोलत होतो त्याचसारख्या दुसर्‍या एका घटनेबद्दल तू बोलत होतीस याला काय म्हणावं? जगाची नीतिमत्ता एवढी खालावली गेल्या काही वर्षांत?"

"चिंता करण्यासारखीच परिस्थिती आहे बाबा! कलियुग कलियुग म्हणतात ते हेच."

"आई तुझी माफी मागितली पाहिजे."

"कसली माफी मागतोस बाबा? जिथं लोकांनाच काही लाज उरलेली नाही, तिथं तू आणि मी एकमेकांची माफी मागून काय होणार? जे जे होईल ते बघत राहणे हेच सामान्य माणसाच्या हातात राहिले आहे."

गुरुवार, २२ एप्रिल, २०१०

चीन : एक अपूर्व अनुभव

    मागच्या एका नोंदीत मी गाडगीळांच्या बर्‍याच प्रवासवर्णनपर पुस्तकांबद्दल लिहले होते. गोपुरांच्या प्रदेशात हे गंगाधर गाडगीळांचे पहिले प्रवासवर्णन. पुढे त्यांना रॉकफेलर फाऊंडेशनची अभ्यासवृत्ती मिळाली तेव्हा त्यांनी युरोप, इंग्लंड, अमेरिका, हवाई, जपान, बॅंकॉक, सिंगापूर असा भरभक्कम प्रवास केला. या प्रवासावरच त्यांनी बहुतेक प्रवासवर्णने लिहलेली आहेत. (अर्थात प्रत्येक प्रवासावर पुस्तक लिहलेले नाही. :-(
    तर गंगाधर गाडगीळांनी लिहलेले लिहलेले ’चीन:एक अपूर्व अनुभव’ हे प्रवासवर्णन नुकतेच वाचले. लेखकांच्या प्रतिनिधी मंडळाचा सदस्य म्हणून त्यांना नोव्हेंबर १९९१ मध्ये चीनला जाण्याची संधी मिळाली. त्यातल्या अनुभवांवर हे पुस्तक बेतलेले आहे. तसे रुढार्थाने याला प्रवासवर्णन म्हणता येणार नाही. कारण प्रवासाची सुरुवात कशी झाली, कोणती ठिकाणे बघितली, त्यांचा इतिहास, त्या देशातल्या लोकांचे राहणीमान, आलेले अनुभव, घडलेले प्रसंग अशा वळणाने जाणारे हे पुस्तक नाही. गाडगीळांच्या आधीच्या प्रवासवर्णनपर पुस्तकांपेक्षा हे थोडे वेगळे आहे.
    पण मग वेगळे म्हणजे कसे? गाडगीळ प्रस्तावनेत म्हणतात, "चीनचे प्रवासवर्णन हे अनुभवांचं प्रवासचित्रण असलं तरी प्राधान्यानं कलात्मक निर्मिती नव्हती. माहिती देणं, अनुभवांचा अन्वयार्थ लावणं हा या लेखनामागचा हेतू होता. त्यामुळे सातासमुद्रापलीकडे या पुस्तकातील लेख लिहताना जी पद्धती मी वापरली ती येथे वापरणं शक्य नव्हतं. चीनचं प्रवासवर्णन लिहताना काहीशी वेगळी पद्धती मी अनुसरली आहे. साहित्य, आर्थिक स्थिती, समाजजीवन इत्यादींबद्दलची प्रवासभर विखुरलेली निवेदनं मी एकत्र केली आहे. त्याचं विश्लेषण करुन अन्वयार्थ लावला आहे."

    स्वत: गाडगीळ अर्थतज्ज्ञ होते. त्यामुळे साम्यवादाने वाटचाल करणार्‍या चीनचे त्यांनी बारीक निरीक्षण केले आहे. शहरांमधील मॉलमध्ये असणार्‍या गर्दीवरुन लोकांच्या क्रयशक्तीबद्दल, झोपडपट्ट्यांच्या प्रमाणावरुन साम्यवादाच्या उपयुक्ततेबद्दल अशा छोट्या छोट्या बाबींवरुन गाडगीळांनी या अजस्र ड्रॅगनचा शोध घ्यायचा प्रयत्न केला आहे.
    एवढंच काय तर ते राहत असलेल्या हॉटेलातलं निरीक्षण नोंदवताना ते म्हणतात," चीनमध्ये आम्ही ज्या हॉटेलात उतरलो होतो तेथे कधी कधी चार-पाच घड्याळे लावलेली असत. त्यात चीनमधील वेळेप्रमाणे अन्य महत्त्वाच्या शहरातील वेळही दाखवलेली असे. त्यामुळे चीनला कोणती शहरे महत्त्वाची वाटतात ते चटकन कळायचं. या घड्याळात टोकियो, न्यूयॉर्क, लॉस ऍंजेलिस, लंडन इत्यादी शहरांतल्या वेळा दाखवलेल्या असत. त्याबरोबरच कराचीतील वेळही दाखवलेली असे. पण दिल्ली अगर मुंबई येथील वेळ मात्र दाखवलेली नसे. म्हणजे चीनला पाकिस्तान जवळचा आणि महत्त्वाचा वाटतो, भारत नव्हे. आपण तिबेट चीनला आंदण दिल्यावर असं व्हावं हे अपेक्षितच होतं. भाईभाई असा उदघोष करणार्‍या आमच्या महान नेत्यांना मात्र ते कळलं नाही."
    गाडगीळांची बारीक नजर पुस्तकात अशी सतत जाणवत राहते. एखाद्या लहान मुलाने प्रत्येक वस्तू कुतुहलाने न्याहाळावी तशी!
    या प्रवासात त्यांनी चीनचा ग्रामीण भागही जवळून बघितला. चीनमधला ग्रामीण भाग आणि भारतातल्या गावाकडच्या चित्राची तुलना करताना त्यांनी लिहले आहे,"आपल्या ग्रामीण भागातून प्रवास करताना अनेक रिकामटेकडी माणसं रस्त्याच्या कडेला बसून गप्पा छाटताना आणि विड्या ओढताना दिसतात. अनेक परदेशी लोकांनी तुमच्या देशात माणसं अशी रिकामटेकडी कशी बसलेली असतात, असा प्रश्न मला विचारलेला आहे. चीनमध्ये मात्र रस्त्याच्या कडेला बसलेली अशी रिकामटेकडी माणसं मला आढळली नाहीत. सगळी माणसं कोणत्या ना कोणत्या कामात गुंतलेली होती. नाही म्हणायला एक अगदी म्हातारी बाई आपल्या घराच्या बाहेर खुर्चीवर बसलेली मला आढळली. पण तिच्या हातात सुद्धा काहीतरी विणकाम होतं." खूपच मार्मिक निरीक्षण आहे हे! डोळ्यात झणझणीत अंजन घालणारं हा वाक्प्रयोग वापरायचा मोह होतोय, तो आवरतो; मात्र काही तरी बोध देणारं नक्कीच म्हणता येईल. आणि गेल्याच काही वर्षात झपाट्याने आपल्या पुढे गेलेल्या चीनचं रहस्य उलगडणारंही!

    चीनच्या प्रवासाला गेल्यावर तिथल्या अगम्य खाद्यसंस्कृतीबद्दलही काहीतरी उल्लेख येणे अपरिहार्यच आहे. तसा तो या पुस्तकातही आलेला आहे. गाडगीळ म्हणतात,"एका वाटोळ्या टेबलाभोवती आम्ही बसलो. त्या टेबलावर एक जराशी लहान वाटोळी तबकडी होती. तिच्यावर एकामागून एक पदार्थांच्या बश्या आणून ठेवल्या जाऊ लागल्या. चॉपस्टिकने खाता यावं इतकेच पदार्थाचे तुकडे केलेले असत, पण आमचे चिनी स्नेही आपल्या चॉपस्टीक्स इतक्या कौशल्यानं वापरत होते की आम्ही चकितच झालो. जेवणात किती पदार्थ असणार ते आम्हाला सांगितलेलं नसे. एकामागून एक असे ते सारखे येतच राहात. ते पंधरा तरी सहज असत. बॅंक्वेट असलं की त्यांची संख्या वीस किंवा अधिक असायची. त्यामुळे आपण काय खायचं, किती खायचं, कुठे थांबायचं हे ठरवणं फार अवघड व्हायचं."

    अर्थात चीनला गेल्यावर गाडगीळांनी चंद्रावरुनही दिसण्याचा पोकळ दावा करणार्‍या जगप्रसिद्ध The Great Wall of China लाही भेट दिलीच.. त्याबद्दल ते म्हणतात,"...........


    असो. पुस्तकाच्या ओळखीसाठी आणि मनुष्य प्राण्यांमध्ये उपजत असलेले कुतुहल जागे करण्यासाठी इतके लिखाण पुरे आहे. सगळेच सांगण्याचे काही कारण नाही, तेव्हा इथेच थांबतो.

पुस्तकाची पाने, प्रकाशक, मूल्य इ. बाबत माहिती देऊ शकत नसल्याबद्दल क्षमस्व! मी ते लायब्ररीतून आणून वाचले. बरीच जुनी प्रत होती.

-सौरभदा.

रविवार, ११ एप्रिल, २०१०

गावाकडे...

    गेले काही दिवस ब्लॉग लिखाणातून विश्रांती घेतली होती. मामाकडे जाऊन गावाला चांगला आठवडाभर राहून आलो. दरवेळेस जाऊन एक दोन दिवसांसाठी तोंड दाखवून परत येत असल्यानं यावेळेस भरपूर राहण्याची तयारी करुनच गेलो होतो. मामाचा आग्रहही होताच. करमत नाही, कंटाळाच येतो वगैरे कारणं एकदम बाजूला सारून टाकली. शहरात रोज संगणकाची, इंटरनेटची सवय लागलेली होती. एक दिवस इंटरनेटवर भटकणे, विरोप तपासले नाहीत तर चुकल्या चुकल्यासारखं वाटतं. अजूनही हे मान्य करायला कचरतो पण इंटरनेट, संगणकाचे मला व्यसन लागले आहे असे म्हटल्यास चुकीचे होणार नाही. त्यामुळे गावाला जाताना बरोबर लॅपटॉप घेतला नाही, मोबाईल तर माझ्याजवळ नाहीच त्यामुळे त्याचा काही प्रश्नच नव्हता. यात कॅमेरा पण आणलेला नाही हे माझ्या तिथे गेल्यावर लक्षात आले. हळहळ वाटली पण झाले ते बरेच झाले असे मानून गप्प बसलो.

   वेळ कसा काढायचा म्हणून अर्थातच पुस्तकं वाचायला घेतली होती. अभ्यासाच्या पुस्तकांमध्ये इंग्रजी पुस्तकं, इंग्रजी डिक्शनरी घेतली. ग्रंथालयातून आणलेले वसंत बापटांचे देशांतरीच्या गोष्टी, खांडेकरांचा वनदेवता हा रुपक कथांचा संग्रह पिशवीत टाकला आणि निघालो. आईला आणि मला सोडून भाऊ परत निघून गेला.

   पुण्यामुंबईत भारनियमन बंद झालेले असले तरी गावाकडे ते अजूनही चालूच आहे. इथल्या लोकांनी त्यांचे रोजचे जगणेही त्याच्या वेळापत्रकाप्रमाणे आखून टाकले आहे. टीव्हीवरचे रोज बघितलेच पाहिजे असे काही नसल्याने (संगणक वापरातून वेळ मिळाला तर टीव्ही बघशील ना असे आईचे मत आहे ) वीज असली काय नसली काय काही फरक पडत नव्हता. इतर दुसरी वीज लागतील अशी उपकरणं पुण्यातच सोडून आलो त्यामुळे भारनियमनाचे वेळापत्रक लक्षात ठेवण्याचे काही कारण नव्हते. उन्हाळ्यात रात्री झोपताना अगदी गळ्याशी आले तरच पंखा लागतो आणि शिवाय पुण्यात सूर्य आता आग ओकायला लागला असला तरी गावाकडे त्याचे चटके बसत नव्हते. त्यामुळे पंख्याचाही प्रश्न निकालात निघाला.

   पहिल्या दिवशी कोणाचे काय, कोणाचे काय वगैरे क्षेमकुशल विचारुन झाले. नाहीतरी पुण्यापासून तसे गाव जवळच आहे त्यामुळे अगदीच कित्येक वर्षांनी भेटतो आहे वगैरे प्रकार नव्हता. दुसर्‍या दिवशी काय करु हा प्रश्न छळायला लागला. पुस्तकं आणलेली असली तरी ती पिशवीतून काढून वाचायला हातात घ्यायची इच्छा होईना.

   मामाने इकडे कोकाकोलाची एजन्सी घेतलेली आहे. त्याचा स्वतःचा टेंपो आहे. या भागातल्या विविध दुकाने, हॉटेलांमध्ये तो माल पुरवतो. शिवाय कोंबड्यांचे पोल्ट्री फार्म आहेत. बर्‍यापैकी शेती आहे. त्यामुळे गावी गेल्यावर मळ्यात जाणे हा नेहमीचा परिपाठ आहे. कोकाकोलाची एजन्सी चालवणे हे कष्टाचे काम आहे. माल घेऊन गाडी आली तर तो उतरवून घेणे, आधीचे रिकाम्या बाटल्यांचे क्रेट त्यात भरुन देणे हे दरेक तीन चार दिवसाला करायचे काम असते. शिवाय आलेला माल टेंपोत भरून दुकानांमध्ये माल पुरवणे, त्यांच्याकडूनचे रिकामे क्रेट गोळा करणे, ते परत आणून उतरवणे असे भरगच्च काम असते. शिवाय दुकाना,हॉटेलांमधून गोळा केलेले क्रेट वर्गीकरण केलेले नसतात. हे एक वेगळेच म्हटले तर सोपे पण वेळखाऊ काम आहे. म्हणजे एखाद्याला जर समजा स्प्राईटचे दहा, कोकचे पाच, माझाचे सहा क्रेट दिलेले असतील तर परत घेताना मात्र रिकाम्या बाटल्या सगळ्या एकत्र येतात. म्हणजे कोक, स्प्राईट, माझा, फँटा सगळे एकत्रच येते. या मग रिकाम्या बाटल्या कंपनीला जसेच्या तशा पाठवता येत नाहीत. वर्गीकरण करुन पाठवावे लागते. अन्यथा परत ते वेगळे करायचे पैसेही कंपनी कापून घेते. बहुराष्ट्रीय कंपन्यांची ही मनमानीच म्हणावी लागेल. गावाला गेल्यावर मग हे कामही करुन बघितले. मळ्यात फ्रीज नसल्याने काम करुन झाल्यावर मग त्यातलीच एक माझाची बाटली फोडून गरमगरम शीतपेयाची मजा घेतली.

   झोपायला पण मग मळ्यातच. कोंबड्यांचे खाद्य, त्याचा विशिष्ट वास, इकडून तिकडून खुडबुड करत फिरणारे उंदीर, त्यामुळे सतत अंधारात आपल्याबरोबर अजूनही कोणी या खोलीत आहे असे होणारे भयकारी भास अशा वातावरणात जमिनीवर पथारी पसरुन गुडूप झोपून गेलो. एकदम नीरव म्हणतात त्या शांततेत!

-सौरभ.

रविवार, २८ फेब्रुवारी, २०१०

विश्रांती...

८ मार्च पर्यंत ब्लॉग लिखाणातून विश्रांती घेत आहे.
धन्यवाद.

-सौरभ.

शनिवार, २७ फेब्रुवारी, २०१०

घोर अपेक्षाभंग.....

    यावर्षी नेहमी प्रमाणे अर्थसंकल्प सादर झाला, त्यावर उलटसुलट चर्चा झाल्या, वाद प्रतिवाद झाले, काय महागलं काय स्वस्त झालं याच्या बातम्या जनतेने बारीक डोळे करुन वाचल्या.

    पण माझी मात्र घोर निराशा केली आहे या अर्थसंकल्पाने..... एका नाही दोन्ही अर्थसंकल्पांनी. वर्षभरात एकदाच येणारा योग चुकला खरा....

    मी अगदी आतुरतेने वाट बघत असलेली गोष्ट घडलीच नाही. 'तोंडाला पाने पुसली' हा वाक्प्रचार यावेळेस काही केल्या मला वर्तमान पत्रांच्या मुखपृष्ठावर वाचायला मिळाला नाही. असंघटितांच्या तोंडाला पाने पुसली असे बाबा आढाव म्हणाले पण ही बातमी अगदी कुठे कोपर्‍यात होती.

    बॅनर्जी बाईंनी रेल्वे अर्थसंकल्पात महाराष्ट्राला भरभरुन दिले. (त्यालाही महाराष्ट्राच्या झोळीत किंवा पदरात अमुक अमुक पडले अशा बातम्या वृत्तपत्रांनी छापल्या.) प्रणवदांनी सामान्यांचा खिसा कापणारा अर्थसंकल्प सादर केला, म्हणजे काही देणार होते आणि दिले नसते तर तोंडाला पाने पुसली असे म्हणता आले असते,मुळात त्यांनी काही दिलेच नाही मग असे कसे म्हणणार?

    एवढे नाही निदान 'अर्थसंकल्पात महाराष्ट्राला गाजर' अशी बातमी तरी पाहिजे होती. अर्थात 'तोंडाला पाने पुसली'ची सर त्याला नाही पण तेवढ्यावर चालवून घेतले असते.

असो. घोर अपेक्षाभंग झाला आहे. :-)
tags: Language, phrases, humour
-सौरभ.

सोमवार, २२ फेब्रुवारी, २०१०

शब्दकोड्यातले काही खास शब्द!

    वृत्तपत्रातून नियमितपणे प्रसिद्ध होणारी शब्दकोडी सोडवण्याची बर्‍याच जणांना आवड असते. मध्यंतरी सुडोकूचे पण अगदी पेव फुटले होते. जवळजवळ प्रत्येक वृत्तपत्राने सुडोकू छापायला सुरुवात केली होती. मध्ये काही प्रदर्शनांना भेटी दिल्या तेव्हा तिथे सुडोकूची देखील पुस्तके विकायला ठेवलेली पाहून मी चाटच पडलो होतो.
    असो. तर सांगत होतो की वृत्तपत्रातून येणारी शब्दकोडी सोडवणे हा वेळ घालवण्याचा एक झकास उपाय आहे. तुम्हाला जर वाटत असेल की आपले मराठी बर्‍यापैकी आहे तर शब्दकोडी सोडवून पहा. तुम्हाला काही नवीन शोध लागण्याची शक्यता आहे. :-)
    ही शब्दकोडी दररोजच प्रसिद्ध होत असतात. काही जण त्याकडे ढुंकुनही पाहत नाहीत पण नियमाने कोडे सोडवणार्‍यांना एक दिवस कोडे आले नाही (शब्दकोडे न सुटण्याबद्दल मी म्हणत नाहीये तर प्रसिद्ध झाले नाही की) तर अस्वस्थ व्हायला होते. उदाहरणार्थ बर्‍याचदा कोडी सोमवार ते शुक्रवारच प्रसिद्ध होतात. पण मग कोडेवेड्यांसाठी रविवारी खास जंबो किंवा महा शब्दकोडे असते. हे नुसते महाच नसते तर यातल्या काळ्या चौकोनांची विशेष रचना (Design) ही बनवलेले असते.
    पट्टीचे कोडे सोडवणार्‍यांना त्यात येणारे खास शब्द माहित असतात. हे शब्द तुम्हाला माहित असणे जरुरीचे आहे. कारण हे शब्द खास शब्दकोड्याचेच शब्द असतात. रोजच्या जीवनात यांचा वापर कुणी करत नाही. शिवाय रोजचे कोडे बनवणारी व्यक्ती पण एकच असल्याने त्या व्यक्तीचे खास शब्द, शैली पण कळून यायला लागते.
    तर हे खास शब्द कोणते असतात? (मी काही पट्टीचा कोडे सोडवणारा नाही पण साधारणत: कधीतरी संपूर्ण सुटते आणि बर्‍याचदा एखादा दुसरा शब्द अडून बसतो/राहतो.) रमणा या शब्दाचा अर्थ किती जणांना माहित आहे? हा नेहमी येणारा शब्द आहे. त्याचा अर्थ होतो दक्षिणा वाटण्याची जागा! माहित होतं तुम्हाला? दुसरा एक आहे र नेच सुरु होणारा. फाशांवरुन शकुन ओळखण्याच्या विद्येला काय म्हणतात? काही अंदाज? याचा योग्य शब्द आहे रमल. हा एक विचित्रच शब्द आहे. एकवेळ जेवून राहण्याचे एक व्रत आहे त्याला काय म्हणतात? नक्त!

    तर असेच काही खास शब्द रोज कोडे सोडवलं तरच कळतील असे असतात. त्यासाठी आज कोडे सोडवून परत उद्या त्याचे उत्तर तपासून बघावे लागते. असे केलं तर निव्वळ दोन आठवड्यात तुम्हीही यात तरबेज होऊ शकाल. कधीतरी इंटरनेटवर विहरताना करताना कंटाळा आला तर कोडं सोडवून बघा. त्यात एक वेगळीच मजा आहे.
tags:Crossword, Language, Time pass
-सौरभ

शनिवार, २० फेब्रुवारी, २०१०

मराठीतील प्रवासवर्णने

    मराठीत अनेक दर्जेदार लेखकांनी दर्जेदार प्रवासवर्णने लिहून ठेवली आहेत. अगदी गोडसे भटजींपासून ते मीना प्रभूंपर्यंत वेगवेगळ्या लेखकांनी हा लेखनप्रकार हाताळलेला आहे. त्यात प्रत्येकाची लिहण्याची शैलीही वेगळी. त्यामुळे अगदी व्यामिश्र म्हणता येईल इतकी वेगवेगळी प्रवासवर्णने मराठीत आहेत. थोडी काही नावे देतो. वासंती घैसास यांनी भारतातील प्रवासावर वर्णने लिहली आहेत. पुलंची तीन प्रवासवर्णने 'अपूर्वाई', 'जावे त्यांच्या देशा' आणि 'पूर्वरंग' सगळ्यांना माहित आहेतच. ( तुम्ही अजूनही वाचली नसतील एकतर तुम्हाला वाचनाची आवडच नसावी किंवा मग तुम्हाला कर्मदरिद्री म्हणण्यास हरकत नाही.) त्यानंतर रमेश मंत्रींनी अतिशय उत्तम प्रवासवर्णने लिहली आहेत. ते युसिस मध्ये कामाला होते त्यामुळे त्यांची सारखीच भटकंती चालू असे. गंगाधर गाडगीळांची गोपुरांच्या प्रदेशात, 'चीन-एक अपूर्व अनुभव', 'नायगाराचे नादब्रम्ह', 'रॉकी-अमेरिकेचा हिमालय' अशी एकाहून एक उत्तम प्रवासवर्णने आहेत. पण त्यांचे 'सातासमुद्रापलीकडे' हे माझे भयंकर म्हणजे भयंकर आवडते पुस्तक आहे. थोड्याशा ललित अंगाने जाणारे हे पुस्तक म्हणजे मराठीतल्या प्रवासवर्णनांमधले एक मानाचे मान पान आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे मीना प्रभूंनी देखील उत्तम प्रवासवर्णने लिहली आहेत. उलट त्यांचा हा एकच लेखनप्रकार मी वाचला आहे. याशिवाय त्यांनी इतर काही लेखन केलेले असल्यास मला तरी माहिती नाही. यामध्ये 'इजिप्तायन', 'तुर्कनामा', 'ग्रीकांजली', 'रोमराज्य भाग १ आणि २', 'चीनी माती' वगैरे बरीच पुस्तके आहेत. अण्णा भाऊ साठे यांचे 'माझा रशियाचा प्रवास' हे अवघे साठ सत्त्तर पानांचे पुस्तक तर अवश्य वाचनीय आहे.

    अनेक उत्तमोत्तम पुस्तके मराठीत उपलब्ध आहेत. येत्या काही दिवसांत यांमधल्या काही पुस्तकांवर मी जरुर लिहीन. तोपर्यंत तुम्ही काही मिळवू शकलात तर जरुर वाचा. प्रत्येकाचीच पुस्तकाबद्दलची प्रतिक्रिया वेगवेगळी असते आणि वाचलेल्या सामाईक पुस्तकांबद्दल दुसर्‍याशी चर्चा करण्यासारखा आनंददायक अनुभव सारखा सारखा मिळत नाही.

-सौरभ.

गुरुवार, १८ फेब्रुवारी, २०१०

रेहमानचे गुणगुणणारे डास

काही दिवसांपूर्वी ए. आर. रेहमानचा नवीन संगीत अल्बम बाजारात आला होता. तुमच्या पैकी काही जणांनी त्याच्या जाहिराती टीव्हीवर पाहिल्या असतील. 'कनेक्शन्स' हे त्या अल्बमचं नाव.

त्यातली 'मॉस्किटो' नावाची रचना खूपच सुरेख आहे. एकदम अफलातून. तुम्ही अजून ऐकली नसेल तर जरुर ऐका. उगाचच नाही त्याला ऑस्कर आणि ग्रॅमी पुरस्कार मिळालेले!





तुमच्या प्रतिक्रिया जरुर कळवा!

सोमवार, १५ फेब्रुवारी, २०१०

छंदातूनच उपजीविका?

    आजकाल मुलांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रातच करियर करु देण्याचा सल्ला जो तो पालकांना देतो आहे. 'थ्री इडियटस' मध्येही हा विषय येऊन गेला आहे. ज्याची आपल्याला बिलकूल आवड नाही अशा क्षेत्रात काम करण्यापेक्षा आवडीच्या क्षेत्रात काम करुन कमी पैसे मिळाले तरी चालतील पण कामाचं समाधान मिळेल, तुमच्या आवडीचंच काम असल्यामुळे त्याचा ताण जाणवणार नाही असा यामागचा विचार आहे. पण आपल्यापैकी किती जण अशा त्यांच्या आवडीच्या क्षेत्रातच काम करत आहेत हा संशोधन करण्यासारखा विषय आहे.

    काही दिवसांपूर्वी वाचलेल्या माडगूळकरांच्या लेखात एक वेगळाच विचार वाचायला मिळाला. व्यंकटेश माडगूळकरांच्या 'चित्रे आणि चरित्रे' मध्ये एक लेख आहे. 'रंगरेषांचे मृगजळ' म्हणून. उत्तम आहे. माडगूळकरांना खरेतर चित्रकलेची फार आवड होती. पण परिस्थितीमुळे त्यांना चित्रकलेचा अभ्यास करता आला नाही. आपलं बालपण, आईच्या व्रतवैकल्यावेळी काढलेली वेगवेगळी चित्रं, पोळ्याला मातीचे बनवलेले बैल, शाळेतले चित्रकलेचे कलाल मास्तर, पुढे नोकरीधंद्यातले उमेदवारीचे दिवस अशा अनेक आठवणी माडगूळकरांनी या लेखातून आठवल्या आहेत.

त्यात ते म्हणतात,
    "आपल्या छंदातूनच उपजीविका करता आली, तर उपजीविका करणं हे माणसाच्या मानेवरचं जोखड न होता विटीदांडूसारखा एखादा खेळ होईल. पण असे भाग्यवान फारच थोडे असतात, की ज्यांचा छंद आणि उपजीविकेचं साधन एकच असतं. आणि जरी असलं, तरी ज्याचा उपयोग अनावश्यक वस्तू खरेदी करण्यापलीकडं होत नाही, असा अधिक पैसा मिळवण्यासाठी या छंदाचा, आणि स्व:तची उपजीविका करणार्‍या खेळाचा बोल बोल म्हणता धंदा होतो आणि कसलाही धंदा करायचा म्हटलं, की माणूस म्हणून आपण उणे उणेच होत जातो."

    पटण्यासारखे आहेत हे विचार. एखाद्याला समजा चित्रकलेची आवड आहे. पण अमुक एखाद्या चित्रकाराच्या चित्राला एवढी रक्कम मिळाली म्हणून मग आता माझीही चित्रं अशीच विकली जाण्यासाठी एखाद्याने विचार सुरु केला तर छंदाचा आनंद मिळणे दुर्लभ होऊन जाईल. पोस्टाची तिकिटं गोळा करणे हा मला वाटतं जगातल्या सर्वाधिक लोकांचा छंद असावा. आता त्यातही एखाद्या संग्राहकाने मी अमुक तमुक तिकिटे मिळवीनच आणि त्यातली काही विकून एवढे पैसे मिळतील असा विचार केला तर तो छंद मनाचा विरंगुळा न राहता डोकेदुखी होऊन बसेल, नाही का?
tags:Thoughts, Literature, Painting, Hobby
-सौरभ.

शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०१०

दरोड्याची तयारी

       दरोड्याची तयारी कशी करतात? त्यावेळेस काय काय बरोबर घ्यावे लागते? कोयता, लोखंडी गज? पाण्याची बाटली? कुणाला माहिती आहे का? दरोड्याच्या तयारीतील अमुक अमुक जणांना अटक ही बातमी आजकाल सारखीच पेपरात वाचायला मिळते. या बातमीने मला फारच प्रश्न पडायला लागले आहेत.

       आपल्याकडचे पोलिस खाते बर्‍यापैकी दक्ष असले तरी बहुतेक वेळा ते गुन्हा घडून गेल्यावरच जागे होतात. (जसे की अतिरेकी हल्ल्यानंतर सगळीकडे कडक सुरक्षा बंदोबस्त ठेवतात. त्याने काय होते हे अजून मला कळलेले नाही.) तर तेच पोलिस खाते दरोड्याच्या तयारीतल्या अमुक अमुक जणांना पकडते हे एकदम आश्चर्यजनक आहे.

       बरे दरोड्याच्या तयारीत जेवढ्या जणांना पकडतात तो आकडा नेहमी सहाच असतो असेही माझे निरीक्षण आहे. अगदी क्वचितप्रसंगी हा आकडा आठ असतो पण विषम तर तो मुळीच नसतो. मी या बातमीचा फार फार विचार केला आहे. कुणाला हे निरर्थक वाटण्याचा संभव आहे पण मला तरी बरेच प्रश्न पडले आहेत.

       या लोकांना जेव्हा पकडतात तेव्हा ते नक्की काय करत असतात? हत्यारं वगैरे परजून उभे असतात की बसलेले असतात? ( या टोळीचा म्होरक्या आणि त्याचे साथीदार एका वाळूच्या ढिगार्‍यावर अंधारात बसले आहेत, म्होरक्या हजेरी घेत आहे, "कारं तो चंद्या कुठं उलथलाय? आला का नाही?" ,"सरदार, त्याची म्हातारी मरायला टेकलेली हाय" वगैरे संवाद चालू आहेत असं एक चित्र मी बनवलं आहे पण ते खात्रीलायक वाटत नाही. ) त्यावेळेस हे एका रांगेत उभे असतात का? त्यावेळेस त्यांचा म्होरक्या कुठे उभा असतो? बरे पोलिसांना हे वेळेत समजते कसे?

       मग ते आल्यावर काय होते? एकदम रो रो करत पोलिसांची जीप येते आणि मग पळापळ होते, पोलिस त्यांना पकडतात, कोयते, काठ्या, लोखंडी गज जप्त करतात असे काही होते का? काहीच कळत नाही. ( आपल्या म्हातारीसाठी घरी राहिलेला चंद्या वाचला काय? )

       बरे मग नेमके तयारीत असतानाच कसे पकडतात? दरोडा घालताना किंवा दरोडा घालून झाल्यावर किती जणांना पकडतात? त्याची आकडेवारी काय?

       असो. असे हजार प्रश्न आहेत. मान्य आहे की कुणाला हे सगळेच हास्यास्पद वाटेल पण पेपरातली ही बातमी वाचली की मला दर वेळेस असे वाटत राहते. दरोड्याच्या तयारीतल्या गुंडांना बघायला मिळाले तर बरे होईल असेही वाटून जाते. :-)
Tags:Newspaper, Languagee, News, Satire
-सौरभ

बुधवार, १० फेब्रुवारी, २०१०

शिलॉंग पीक कडे.... - छायाचित्र



    या ब्लॉगवर काही छायाचित्रेही मी टाकणार आहे. त्यातलं हे पहिलं. आसामच्या सहलीत शिलॉंग शहराला देखील भेट दिली होती. शिलॉंग शहराच्या आसपास बरेच पॉईंटस आहेत बघण्यासारखे. त्यातला शिलॉंग पीक हा आहे. येथून पूर्ण शिलॉंग शहराचे दृश्य बघता येते. शिलॉंग पीक कडे जाताना रस्त्यावर काढलेला हा फोटो.
Tags: Shillong. Photography, Camera, Travel

शुक्रवार, ५ फेब्रुवारी, २०१०

प्रभाते मल दर्शनम्।

    मागच्या नोंदीत मी अत्र्यांच्या शैलीबद्दल लिहले होते. त्यांच्या काही पुस्तकांची नावं सुद्धा त्यात होती. अत्र्यांचे एक पुस्तक 'ही ईश्वराची दया' मध्यंतरी वाचले. विविध विषयावरचे निबंध/लेख या पुस्तकात आहेत. 'प्राचीन भारत आणि गोमांस', 'प्राचीन भारतातील मद्यपान', 'आम्ही महार असतो तर..' असे एकाहून एक स्फोटक आणि भन्नाट लेख या पुस्तकात अत्र्यांनी लिहले आहेत. इथे त्याबद्दल अधिक काही लिहत नाही. इथेच सगळे लिहले तर तुम्ही ते पुस्तक कशाला वाचायला जाल? तर त्यातल्या एका लेखाचे शीर्षक आहे 'प्रभाते मल दर्शनम्|'

    'प्रभाते कर दर्शनम्' चा मूळचा संस्कृत श्लोक बहुतेकांना माहीत आहेच. तो इथे परत देत बसत नाही. या लेखात अत्र्यांनी विनोबा भावे यांचा खास त्यांच्या ष्टाईलने समाचार घेतला आहे. विनोबा भाव्यांचे एक वचन/मत असे आहे की प्रभाते मल दर्शनम्|. (मला वाटतं ’माझा साक्षात्कारी हृदयरो’ मध्ये अभय बंग यांनीही या वचनाचा उल्लेख केला आहे.) तर विनोबांच्या मते सकाळी मलाचे दर्शन घेऊन त्याच्या रुपावरुन आपल्या प्रकृतीचे उत्तम विश्लेषण करता येते. त्यानेच आहार विहार सुधारुन उत्तम आरोग्य संपादता येते. शिवाय आपल्या शरीरातून बाहेर पडलेल्या मलाचे ओंगळ रुप पाहून शरीराबद्दल अनासक्ती उत्पन्न होते वगैरे वगैरे....

अत्र्यांनी याचा समाचार घेताना म्हटले आहे
    'भंगी लोकांना रोजच्या रोज सामुदायिक मलदर्शन होते. मग त्यांना उत्तम तर्‍हेच्या आरोग्याचा, वैराग्याचा नि ऐश्वर्याचा कुठे लाभ होतो?'
    'मानवी शरीर हे खरोखरच निसर्गाचे देणे आहे. त्यात नाना तर्‍हेचे सौंदर्य भरलेले आहे. रुपाचे आहे, रंगाचे आहे, आकृतीचे आहे, बलाचे आहे, नाना तर्‍हेच्या गुणाचे आहे. अरे जा रे जा, आम्ही निसर्गाची निरामय अपत्ये ह्या सृष्टीतल्या हर्षाचा, आनंदाचा नि संतोषाचा आजन्म मनसोक्त आस्वाद घेऊ. तुम्ही पाहिजे तर खुशाल तुमच्या कमोदात दाढी खुपसून आपल्या मलाचे यथेच्छ दर्शन नाही तर सेवन करत बसा.'

    बापरे! काय भयंकर आहे ही भाषा! वाचता वाचता कधी अशा भाषेतलेही काही वाचायला मिळते.
Tags: Literature, Satire, Parody

सोमवार, १ फेब्रुवारी, २०१०

अत्रे शैली...

    आचार्य अत्र्यांचे लिखाण मला आवडते. इतरांनाही आवडत असावे, पण असं कुणी फारसे म्हणताना दिसत नाही. कारण म्हणायचा अवकाश की अत्रे विरोधक लगेच पुढे सरसावतात. आणि मग तुम्हाला वेड्यात काढतात, तुमच्या चुका दाखवतात. त्यांचे कुठे चुकले, ते असेच होते, त्यांचे वागणे तसेच होते इ.इ. गोष्टी उदाहरणांसकट ते तुम्हाला सांगतात. थोडक्यात काय तर ते तुम्हाला झोडपू पाहतात. पण आपण तिकडे लक्ष देऊ नये.
    मला वाटते अत्र्यांचे व्यक्तिमत्वच असे आहे की ज्यांना ते आवडतात त्यांना ते शंभर टक्के आवडतात आणि आवडले नाही तर बिलकूलच आवडत नाहीत. म्हणजे एखाद्याला तुम्ही भेटला तर तो तुम्हाला असे म्हणणार नाही की, "अरे अत्रे काय फाकडू लिहतात रे! पण त्यांचे इथे जरा चुकलेच" वगैरे वगैरे. एवढे स्पष्टीकरण पुरेसे आहे.
    अत्र्यांचे लिखाणातले मला आवडते ती म्हणजे त्यांची भाषा. अत्र्यांइतके सुगम, सोपे मराठी लिहणारे मराठी भाषेत इतर कोणी असल्यास मला ते माहित नाही. त्यांची काही पुस्तके वाचली आहेत (महापूर, हशा आणि टाळ्या, बत्ताशी आणि इतर कथा, मी कसा झालो, कर्‍हेचे पाणी इ.)त्यावरुन मला तरी असे वाटले. त्यात बोजड, कृत्रिम भाषा सापडणार नाही. ज्याचा मराठी वर्तमानपत्रे, मराठी साहित्य म्हणेज एकूणातच लिहिण्यावाचण्याशी फारसा संबंध आला नाही अशा व्यक्तीलाही समजण्यास अडचण पडणार नाही असे.
    वृत्तपत्र चालवण्यात अत्र्यांचे बरेच आयुष्य गेले असल्याने असे असावे. वृत्तपत्रातली भाषा हा एक वेगळाच प्रकार आहे. त्यात जडजंबाल भाषेत लिहून काही उपयोगाचे नाही. एकदा वाचून समजले नाही तर लोक सरळ पान उलटतात. परत वाचून समजून घेण्याच्या फंदात कुणी पडत नाही. दुसरे असे की वृत्तपत्राचे आयुष्य असते उणेपुरे एक दिवसाचे. दुसर्‍या दिवशी त्याची रद्दी होते. पुढे त्याचा काही वापर झालाच तर तो फुलपुडी बांधण्यात किंवा वाण्याकडे.
    त्यामुळे अत्र्यांची हीच सोपी भाषा इतर साहित्यातही उतरली असे मानता येईल. अर्थात त्यांनी स्वत: असा काही विचार केला होता का हे आपल्याला आता कसे कळणार?
tags: literature, writing style, opinion, newspaper
-सौरभ.

शुक्रवार, २९ जानेवारी, २०१०

ललित नभी मेघ चार....

   काही दिवसांपूर्वी शांता शेळके यांचे 'ललित नभी मेघ चार' वाचत होतो. ललित लेख आणि ते देखील शांताबाईंचे हा एक दुग्धशर्करा योग आहे. मुळात ललित हा प्रकारच इतका सुंदर आहे (ललित नावाखाली बोजड, दुर्बोध आणि अति अलंकारिक भाषा वापरुन ललित लिहणारे इथे अपेक्षित नाहीत.) तर या पुस्तकात असाच काही संदर्भासाठी विल ड्युरंट यांचा आधीच्या नोंदीतला परिच्छेद शांताबाईंनी दिलेला आहे. साध्या सोप्या भाषेतला हा मराठी अनुवाद या नोंदीत बघू.
   "मानवी संस्कृती हा एक वाहता प्रवाह आहे. त्याला किनारे आहेत. माणसे आपापसात लढतात. चोर्‍यामार्‍या करतात. एकमेकांचा वध करतात. खूप संघर्ष करतात. त्यांच्या रक्ताने हा प्रवाह भरुन जातो आणि इतिहास या संघर्षाची, रक्तपाताची इमानेइतबारे नोंद करतो. पण त्याच वेळी याच या प्रवाहाच्या दोन्ही तीरांवर, शांतपणे, कुण्याच्या ध्यानातही येणार नाही अशा रीतीने, माणसे प्रेम करतात. विवाहबद्ध होतात. मुलाबाळांना जन्म देऊन त्यांचे संगोपन करतात. गाणी म्हणतात, नाचतात आणि कविता लिहतात. मानवी संस्कृतीचा इतिहास म्हणजे खरोखर या प्रवाहाच्या तीरावर जे घडते त्याचा इतिहास असतो, असायला हवा. पण इतिहासकार निराशावादी असतात त्यामुळे संस्कृतिप्रवाहाच्या तीरावर जे जीवन फुलत असते त्याकडे ते दुर्लक्ष करतात आणि तिच्या रक्तलांच्छित प्रवाहाचेच चित्रण करत राहतात. "

   असं काही वाचलं की वाटतं वाचनाच्या आवडीचं सार्थक झालं. पण असं काही वाचलं की हमखास वाटतं की अरे मलाही असं काही लिहता आलं असतं तर.....
जर तरच्या गोष्टी करण्यात काही अर्थ नाही.
tags: Will Durant, History, English Literature

-सौरभ.

बुधवार, २७ जानेवारी, २०१०

विल ड्युरंट

   विल ड्युरंट हे एक अमेरिकन इतिहासकार आणि तत्वज्ञ होते. त्यांच्याशी म्हणजे त्याच्या पुस्तकांशी, थोड्याफार विचारांशी ओळख कशी झाली? ते आता सांगत नाही. पुढच्या नोंदीत बघू.

   तर विल ड्युरंट हे त्यांच्या 'द स्टोरी ऑफ सिव्हिलायझेशन' या अकरा खंडी ग्रंथासाठी प्रसिद्ध आहेत. ही त्यांची ग्रंथमालिका अतिशय गाजली. थोडीफार कल्पना येण्यासाठी त्यांनी लिहलेला, त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेला हा नमुन्यादाखल एक परिच्छेद बघा.

   It is a mistake to think that the past is dead. Nothing that has ever happened is quite without influence at this moment. The present is merely the past rolled up and concentrated in this second of time. You, too, are your past; often your face is your autobiography; you are what you are because of what you have been; because of your heredity stretching back into forgotten generations; because of every element of environment that has affected you, every man or woman that has met you, every book that you have read, every experience that you have had; all these are accumulated in your memory, your body, your character, your soul. So with a city, a country, and a race; it is its past, and cannot be understood without it.

   पुढे ते म्हणतात - Perhaps the cause of our contemporary pessimism is our tendency to view history as a turbulent stream of conflicts - between individuals in economic life, between groups in politics, between creeds in religion, between states in war. This is the more dramatic side of history; it captures the eye of the historian and the interest of the reader. But if we turn from that Mississippi of strife, hot with hate and dark with blood, to look upon the banks of the stream, we find quieter but more inspiring scenes: women rearing children, men building homes, peasants drawing food from the soil, artisans making the conveniences of life, statesmen sometimes organizing peace instead of war, teachers forming savages into citizens, musicians taming our hearts with harmony and rhythm, scientists patiently accumulating knowledge, philosophers groping for truth, saints suggesting the wisdom of love. History has been too often a picture of the bloody stream. The history of civilization is a record of what happened on the banks.

   शेवटची दोन वाक्यं थक्क, नि:शब्द करणारी आहेत. एवढे दिवस आपण कोणता इतिहास शिकत आहोत मग? जे शिकवायला पाहिजे, शिकायलं हवं होतं ते राहूनच गेलं वाटतं.

   असो. तर पुढच्या नोंदीत या खालच्या परिच्छेदाचा साधा सोपा मराठी अनुवाद बघूयात. सुरेख आहे तो.

-सौरभ

सोमवार, २५ जानेवारी, २०१०

प्रस्तावना

संस्मरणीय ब्लॉगवरची ही पहिलीच नोंद आहे. काही दिवसांपूर्वी, खरंतर वर्षंच झाली असतील, ब्लॉगिंगचे एक दोन प्रयत्न करुन झाले होते. पण पहिल्या दोन तीन नोंदींपुढे काही लिहणं सरकलं नाही. वेळ आली नव्हती असं म्हणता येईल. मोठमोठे लेखक ही एवढी पुस्तकं कशी लिहतात याचं आश्चर्य मला आधीपासूनच आहे. मी जे थोडंफार लेखन संकेतस्थळांवर केलं आहे त्यावेळचा अनुभव विचारात घेतला तर एखादी कल्पना स्फुरली की ती मनात इतकी घोळत राहते की बहुतांश विचार त्याचेच चालू राहतात हे माहिती होतं. लेखकांचंही असंच काही असावं.
ब्लॉगिंग बाबतची दुसरी एक गोष्ट म्हणजे तुमच्या मनातले विचार तुम्ही मांडता, ते प्रसिद्ध करता, (ते वाचनीय असतील तर) अनेकजण ते वाचतात. थोडक्यात सांगायचं झालं तर अशी एक खिडकी तुम्ही ब्लॉगिंगने उघडता ज्यातून बाहेरच्यांनाही तुमच्या मनात थोडंफार डोकंवायची संधी मिळते. इथेच थोडी गोची होते. निदान माझी तरी झाल्याचं म्हणता येईल. तुम्ही लिहलेले लेख, अनुभव, आठवणी, काही बाबींबद्दलची तुमची मतं यावरुन तुमची विचार
करण्याची पद्धत देखील कळून येते. माणूस कसा आहे ते कळायला लागतं. स्वत:बाबतच्या अशा काही गोष्टी जेव्हा तुम्ही इतरांसोबत वाटता तेव्हा कालांतराने "अरेच्चा! मी तर सगळंच लिहून बसलो, माझ्याबाबतीत जाणून घेण्यासारखं आता काही उरलेलं नाही" असंही वाटण्याची शक्यता आहे. थोडक्यात स्वत:च्या व्यक्तिमत्त्वात इतरांना जरा जास्तच डोकावू देण्याचा हा प्रकार आहे. (* हे विचार कदाचित फक्त माझ्याच डोक्यात वळवळत असतील, इतरांनाही असंच वाटायला पाहिजे असं काही नाही.) त्यामुळेच ब्लॉग लिहणे, नियमाने लिहणे, स्वत:चे विचार शब्दरुप करणे (वॉव!) वगैरे बर्‍यापैकी धाडसाची गोष्ट आहे असं मला वाटतं. ब्लॉग नियमाने लिहणार्‍यांचे मला कौतुक वाटते. "लोक काय म्हणतील?" याचा जरा जास्त विचार करणार्‍यांना ब्लॉग लिहायला जड जात असावे असाही माझा आपला एक अंदाज आहे. (परत एकदा *)

असो. आता या ब्लॉगच्या विषयांकडे वळू यात. अर्थातच माझ्या आवडीच्या विषयांवरच मी येथे लिहीन. आपल्या आवडत्या कार्यक्षेत्रातच तुम्ही शिरला असाल तर ते त्या कामाचं ओझं वाटत नाही तसंच आपल्या आवडत्या बाबींवर लिहणंही अवघड नसावं असं सध्या तरी मानून चाललो आहे. मग कोणत्या विषयांवर मी लिहणार आहे? साहित्याचा नंबर अर्थातच वरचा लागेल. वाचलेली पुस्तकं, त्यातनं काढलेली टिपणं वगैरे कुणासोबत वाटायला मला नक्कीच
आवडेल. दुसरा विषय आहे तो म्हणजे फोटोग्राफी. माझी काही मला बरी वाटत असलेली चित्रं देखील मी इथे प्रसिद्ध करीन. आणि त्यानंतर ते म्हणजे संगीत. या विषयाबाबत मी नक्की काय करणार आहे, काय लिहणार आहे हे खुद्द माझं मलाच माहित नाहीये. ते पुढचं पुढे बघू. त्यामुळे संगीत इथंच संपलं. या व्यतिरीक्त अनुभव, प्रवासवर्णनं वाचायला कुणाची हरकत असणार आहे का? नाही ना? धन्यवाद. हेच मला अपेक्षित होतं.

तर असा हा सरळ सरळ मामला आहे. काहीतरी वाचनीय आणि संस्मरणीय तुम्हाला देऊ शकेल असं मला वाटतं ते कसं जमतं ते पाहूयात.
अच्छा. भेटूयात पुढच्या लेखात.

-सौरभ.

ता.क. : एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे या ब्लॉगवर प्रसिद्ध होणार्‍या नोंदी अगदी आटोपशीर ठेवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आजकाल आधीच लोकांचा इंटरनेटवर इतका वेळ जात असतो त्यात माझ्या ब्लॉगची भर नको.
(त्यात विचित्रपणा असा की एवढा वेळ घालवूनही नंतर हातात काही पडलंय असं वाटत नाही. इतका वेळ वाया गेल्याबद्दल मग स्वत:चाच राग येतो.*) तर तसं होऊ नये असा प्रयत्न राहील. या ब्लॉगवर छोटीशी चक्कर मारायची,
वाचनीय असेल तर वाचायचं नाही तर पुढे तुमच्या कामांना तुम्ही मोकळे.