सोमवार, १ फेब्रुवारी, २०१०

अत्रे शैली...

    आचार्य अत्र्यांचे लिखाण मला आवडते. इतरांनाही आवडत असावे, पण असं कुणी फारसे म्हणताना दिसत नाही. कारण म्हणायचा अवकाश की अत्रे विरोधक लगेच पुढे सरसावतात. आणि मग तुम्हाला वेड्यात काढतात, तुमच्या चुका दाखवतात. त्यांचे कुठे चुकले, ते असेच होते, त्यांचे वागणे तसेच होते इ.इ. गोष्टी उदाहरणांसकट ते तुम्हाला सांगतात. थोडक्यात काय तर ते तुम्हाला झोडपू पाहतात. पण आपण तिकडे लक्ष देऊ नये.
    मला वाटते अत्र्यांचे व्यक्तिमत्वच असे आहे की ज्यांना ते आवडतात त्यांना ते शंभर टक्के आवडतात आणि आवडले नाही तर बिलकूलच आवडत नाहीत. म्हणजे एखाद्याला तुम्ही भेटला तर तो तुम्हाला असे म्हणणार नाही की, "अरे अत्रे काय फाकडू लिहतात रे! पण त्यांचे इथे जरा चुकलेच" वगैरे वगैरे. एवढे स्पष्टीकरण पुरेसे आहे.
    अत्र्यांचे लिखाणातले मला आवडते ती म्हणजे त्यांची भाषा. अत्र्यांइतके सुगम, सोपे मराठी लिहणारे मराठी भाषेत इतर कोणी असल्यास मला ते माहित नाही. त्यांची काही पुस्तके वाचली आहेत (महापूर, हशा आणि टाळ्या, बत्ताशी आणि इतर कथा, मी कसा झालो, कर्‍हेचे पाणी इ.)त्यावरुन मला तरी असे वाटले. त्यात बोजड, कृत्रिम भाषा सापडणार नाही. ज्याचा मराठी वर्तमानपत्रे, मराठी साहित्य म्हणेज एकूणातच लिहिण्यावाचण्याशी फारसा संबंध आला नाही अशा व्यक्तीलाही समजण्यास अडचण पडणार नाही असे.
    वृत्तपत्र चालवण्यात अत्र्यांचे बरेच आयुष्य गेले असल्याने असे असावे. वृत्तपत्रातली भाषा हा एक वेगळाच प्रकार आहे. त्यात जडजंबाल भाषेत लिहून काही उपयोगाचे नाही. एकदा वाचून समजले नाही तर लोक सरळ पान उलटतात. परत वाचून समजून घेण्याच्या फंदात कुणी पडत नाही. दुसरे असे की वृत्तपत्राचे आयुष्य असते उणेपुरे एक दिवसाचे. दुसर्‍या दिवशी त्याची रद्दी होते. पुढे त्याचा काही वापर झालाच तर तो फुलपुडी बांधण्यात किंवा वाण्याकडे.
    त्यामुळे अत्र्यांची हीच सोपी भाषा इतर साहित्यातही उतरली असे मानता येईल. अर्थात त्यांनी स्वत: असा काही विचार केला होता का हे आपल्याला आता कसे कळणार?
tags: literature, writing style, opinion, newspaper
-सौरभ.

२ टिप्पण्या:

  1. हो. अत्र्यांची भाषा ही अतिशय सोपी होती. छोटी छोटी वाक्ये आणि सोपे शब्द असत.त्यांचे लिखाण वाचत रहावे असे आहे. जे लिहीत ते अगदी मनापासून असे.’मी कसा झालो’ मधील ’मी कोण’ हे काव्यच आहे. मलाही त्यांचे लिखाण खूप आवडते.

    उत्तर द्याहटवा
  2. सीमा टिल्लू,
    प्रतिक्रियेबद्दल आभार. मी कसा झालो हे माझे आवडते पुस्तक आहे. त्यांचे ’अशा गोष्टी अशा गंमती’ हे पुस्तक तुम्ही वाचले आहे का? एकाहून एक भन्नाट किस्से आहेत या पुस्तकात.

    उत्तर द्याहटवा