रविवार, २८ फेब्रुवारी, २०१०

विश्रांती...

८ मार्च पर्यंत ब्लॉग लिखाणातून विश्रांती घेत आहे.
धन्यवाद.

-सौरभ.

शनिवार, २७ फेब्रुवारी, २०१०

घोर अपेक्षाभंग.....

    यावर्षी नेहमी प्रमाणे अर्थसंकल्प सादर झाला, त्यावर उलटसुलट चर्चा झाल्या, वाद प्रतिवाद झाले, काय महागलं काय स्वस्त झालं याच्या बातम्या जनतेने बारीक डोळे करुन वाचल्या.

    पण माझी मात्र घोर निराशा केली आहे या अर्थसंकल्पाने..... एका नाही दोन्ही अर्थसंकल्पांनी. वर्षभरात एकदाच येणारा योग चुकला खरा....

    मी अगदी आतुरतेने वाट बघत असलेली गोष्ट घडलीच नाही. 'तोंडाला पाने पुसली' हा वाक्प्रचार यावेळेस काही केल्या मला वर्तमान पत्रांच्या मुखपृष्ठावर वाचायला मिळाला नाही. असंघटितांच्या तोंडाला पाने पुसली असे बाबा आढाव म्हणाले पण ही बातमी अगदी कुठे कोपर्‍यात होती.

    बॅनर्जी बाईंनी रेल्वे अर्थसंकल्पात महाराष्ट्राला भरभरुन दिले. (त्यालाही महाराष्ट्राच्या झोळीत किंवा पदरात अमुक अमुक पडले अशा बातम्या वृत्तपत्रांनी छापल्या.) प्रणवदांनी सामान्यांचा खिसा कापणारा अर्थसंकल्प सादर केला, म्हणजे काही देणार होते आणि दिले नसते तर तोंडाला पाने पुसली असे म्हणता आले असते,मुळात त्यांनी काही दिलेच नाही मग असे कसे म्हणणार?

    एवढे नाही निदान 'अर्थसंकल्पात महाराष्ट्राला गाजर' अशी बातमी तरी पाहिजे होती. अर्थात 'तोंडाला पाने पुसली'ची सर त्याला नाही पण तेवढ्यावर चालवून घेतले असते.

असो. घोर अपेक्षाभंग झाला आहे. :-)
tags: Language, phrases, humour
-सौरभ.

सोमवार, २२ फेब्रुवारी, २०१०

शब्दकोड्यातले काही खास शब्द!

    वृत्तपत्रातून नियमितपणे प्रसिद्ध होणारी शब्दकोडी सोडवण्याची बर्‍याच जणांना आवड असते. मध्यंतरी सुडोकूचे पण अगदी पेव फुटले होते. जवळजवळ प्रत्येक वृत्तपत्राने सुडोकू छापायला सुरुवात केली होती. मध्ये काही प्रदर्शनांना भेटी दिल्या तेव्हा तिथे सुडोकूची देखील पुस्तके विकायला ठेवलेली पाहून मी चाटच पडलो होतो.
    असो. तर सांगत होतो की वृत्तपत्रातून येणारी शब्दकोडी सोडवणे हा वेळ घालवण्याचा एक झकास उपाय आहे. तुम्हाला जर वाटत असेल की आपले मराठी बर्‍यापैकी आहे तर शब्दकोडी सोडवून पहा. तुम्हाला काही नवीन शोध लागण्याची शक्यता आहे. :-)
    ही शब्दकोडी दररोजच प्रसिद्ध होत असतात. काही जण त्याकडे ढुंकुनही पाहत नाहीत पण नियमाने कोडे सोडवणार्‍यांना एक दिवस कोडे आले नाही (शब्दकोडे न सुटण्याबद्दल मी म्हणत नाहीये तर प्रसिद्ध झाले नाही की) तर अस्वस्थ व्हायला होते. उदाहरणार्थ बर्‍याचदा कोडी सोमवार ते शुक्रवारच प्रसिद्ध होतात. पण मग कोडेवेड्यांसाठी रविवारी खास जंबो किंवा महा शब्दकोडे असते. हे नुसते महाच नसते तर यातल्या काळ्या चौकोनांची विशेष रचना (Design) ही बनवलेले असते.
    पट्टीचे कोडे सोडवणार्‍यांना त्यात येणारे खास शब्द माहित असतात. हे शब्द तुम्हाला माहित असणे जरुरीचे आहे. कारण हे शब्द खास शब्दकोड्याचेच शब्द असतात. रोजच्या जीवनात यांचा वापर कुणी करत नाही. शिवाय रोजचे कोडे बनवणारी व्यक्ती पण एकच असल्याने त्या व्यक्तीचे खास शब्द, शैली पण कळून यायला लागते.
    तर हे खास शब्द कोणते असतात? (मी काही पट्टीचा कोडे सोडवणारा नाही पण साधारणत: कधीतरी संपूर्ण सुटते आणि बर्‍याचदा एखादा दुसरा शब्द अडून बसतो/राहतो.) रमणा या शब्दाचा अर्थ किती जणांना माहित आहे? हा नेहमी येणारा शब्द आहे. त्याचा अर्थ होतो दक्षिणा वाटण्याची जागा! माहित होतं तुम्हाला? दुसरा एक आहे र नेच सुरु होणारा. फाशांवरुन शकुन ओळखण्याच्या विद्येला काय म्हणतात? काही अंदाज? याचा योग्य शब्द आहे रमल. हा एक विचित्रच शब्द आहे. एकवेळ जेवून राहण्याचे एक व्रत आहे त्याला काय म्हणतात? नक्त!

    तर असेच काही खास शब्द रोज कोडे सोडवलं तरच कळतील असे असतात. त्यासाठी आज कोडे सोडवून परत उद्या त्याचे उत्तर तपासून बघावे लागते. असे केलं तर निव्वळ दोन आठवड्यात तुम्हीही यात तरबेज होऊ शकाल. कधीतरी इंटरनेटवर विहरताना करताना कंटाळा आला तर कोडं सोडवून बघा. त्यात एक वेगळीच मजा आहे.
tags:Crossword, Language, Time pass
-सौरभ

शनिवार, २० फेब्रुवारी, २०१०

मराठीतील प्रवासवर्णने

    मराठीत अनेक दर्जेदार लेखकांनी दर्जेदार प्रवासवर्णने लिहून ठेवली आहेत. अगदी गोडसे भटजींपासून ते मीना प्रभूंपर्यंत वेगवेगळ्या लेखकांनी हा लेखनप्रकार हाताळलेला आहे. त्यात प्रत्येकाची लिहण्याची शैलीही वेगळी. त्यामुळे अगदी व्यामिश्र म्हणता येईल इतकी वेगवेगळी प्रवासवर्णने मराठीत आहेत. थोडी काही नावे देतो. वासंती घैसास यांनी भारतातील प्रवासावर वर्णने लिहली आहेत. पुलंची तीन प्रवासवर्णने 'अपूर्वाई', 'जावे त्यांच्या देशा' आणि 'पूर्वरंग' सगळ्यांना माहित आहेतच. ( तुम्ही अजूनही वाचली नसतील एकतर तुम्हाला वाचनाची आवडच नसावी किंवा मग तुम्हाला कर्मदरिद्री म्हणण्यास हरकत नाही.) त्यानंतर रमेश मंत्रींनी अतिशय उत्तम प्रवासवर्णने लिहली आहेत. ते युसिस मध्ये कामाला होते त्यामुळे त्यांची सारखीच भटकंती चालू असे. गंगाधर गाडगीळांची गोपुरांच्या प्रदेशात, 'चीन-एक अपूर्व अनुभव', 'नायगाराचे नादब्रम्ह', 'रॉकी-अमेरिकेचा हिमालय' अशी एकाहून एक उत्तम प्रवासवर्णने आहेत. पण त्यांचे 'सातासमुद्रापलीकडे' हे माझे भयंकर म्हणजे भयंकर आवडते पुस्तक आहे. थोड्याशा ललित अंगाने जाणारे हे पुस्तक म्हणजे मराठीतल्या प्रवासवर्णनांमधले एक मानाचे मान पान आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे मीना प्रभूंनी देखील उत्तम प्रवासवर्णने लिहली आहेत. उलट त्यांचा हा एकच लेखनप्रकार मी वाचला आहे. याशिवाय त्यांनी इतर काही लेखन केलेले असल्यास मला तरी माहिती नाही. यामध्ये 'इजिप्तायन', 'तुर्कनामा', 'ग्रीकांजली', 'रोमराज्य भाग १ आणि २', 'चीनी माती' वगैरे बरीच पुस्तके आहेत. अण्णा भाऊ साठे यांचे 'माझा रशियाचा प्रवास' हे अवघे साठ सत्त्तर पानांचे पुस्तक तर अवश्य वाचनीय आहे.

    अनेक उत्तमोत्तम पुस्तके मराठीत उपलब्ध आहेत. येत्या काही दिवसांत यांमधल्या काही पुस्तकांवर मी जरुर लिहीन. तोपर्यंत तुम्ही काही मिळवू शकलात तर जरुर वाचा. प्रत्येकाचीच पुस्तकाबद्दलची प्रतिक्रिया वेगवेगळी असते आणि वाचलेल्या सामाईक पुस्तकांबद्दल दुसर्‍याशी चर्चा करण्यासारखा आनंददायक अनुभव सारखा सारखा मिळत नाही.

-सौरभ.

गुरुवार, १८ फेब्रुवारी, २०१०

रेहमानचे गुणगुणणारे डास

काही दिवसांपूर्वी ए. आर. रेहमानचा नवीन संगीत अल्बम बाजारात आला होता. तुमच्या पैकी काही जणांनी त्याच्या जाहिराती टीव्हीवर पाहिल्या असतील. 'कनेक्शन्स' हे त्या अल्बमचं नाव.

त्यातली 'मॉस्किटो' नावाची रचना खूपच सुरेख आहे. एकदम अफलातून. तुम्ही अजून ऐकली नसेल तर जरुर ऐका. उगाचच नाही त्याला ऑस्कर आणि ग्रॅमी पुरस्कार मिळालेले!

तुमच्या प्रतिक्रिया जरुर कळवा!

सोमवार, १५ फेब्रुवारी, २०१०

छंदातूनच उपजीविका?

    आजकाल मुलांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रातच करियर करु देण्याचा सल्ला जो तो पालकांना देतो आहे. 'थ्री इडियटस' मध्येही हा विषय येऊन गेला आहे. ज्याची आपल्याला बिलकूल आवड नाही अशा क्षेत्रात काम करण्यापेक्षा आवडीच्या क्षेत्रात काम करुन कमी पैसे मिळाले तरी चालतील पण कामाचं समाधान मिळेल, तुमच्या आवडीचंच काम असल्यामुळे त्याचा ताण जाणवणार नाही असा यामागचा विचार आहे. पण आपल्यापैकी किती जण अशा त्यांच्या आवडीच्या क्षेत्रातच काम करत आहेत हा संशोधन करण्यासारखा विषय आहे.

    काही दिवसांपूर्वी वाचलेल्या माडगूळकरांच्या लेखात एक वेगळाच विचार वाचायला मिळाला. व्यंकटेश माडगूळकरांच्या 'चित्रे आणि चरित्रे' मध्ये एक लेख आहे. 'रंगरेषांचे मृगजळ' म्हणून. उत्तम आहे. माडगूळकरांना खरेतर चित्रकलेची फार आवड होती. पण परिस्थितीमुळे त्यांना चित्रकलेचा अभ्यास करता आला नाही. आपलं बालपण, आईच्या व्रतवैकल्यावेळी काढलेली वेगवेगळी चित्रं, पोळ्याला मातीचे बनवलेले बैल, शाळेतले चित्रकलेचे कलाल मास्तर, पुढे नोकरीधंद्यातले उमेदवारीचे दिवस अशा अनेक आठवणी माडगूळकरांनी या लेखातून आठवल्या आहेत.

त्यात ते म्हणतात,
    "आपल्या छंदातूनच उपजीविका करता आली, तर उपजीविका करणं हे माणसाच्या मानेवरचं जोखड न होता विटीदांडूसारखा एखादा खेळ होईल. पण असे भाग्यवान फारच थोडे असतात, की ज्यांचा छंद आणि उपजीविकेचं साधन एकच असतं. आणि जरी असलं, तरी ज्याचा उपयोग अनावश्यक वस्तू खरेदी करण्यापलीकडं होत नाही, असा अधिक पैसा मिळवण्यासाठी या छंदाचा, आणि स्व:तची उपजीविका करणार्‍या खेळाचा बोल बोल म्हणता धंदा होतो आणि कसलाही धंदा करायचा म्हटलं, की माणूस म्हणून आपण उणे उणेच होत जातो."

    पटण्यासारखे आहेत हे विचार. एखाद्याला समजा चित्रकलेची आवड आहे. पण अमुक एखाद्या चित्रकाराच्या चित्राला एवढी रक्कम मिळाली म्हणून मग आता माझीही चित्रं अशीच विकली जाण्यासाठी एखाद्याने विचार सुरु केला तर छंदाचा आनंद मिळणे दुर्लभ होऊन जाईल. पोस्टाची तिकिटं गोळा करणे हा मला वाटतं जगातल्या सर्वाधिक लोकांचा छंद असावा. आता त्यातही एखाद्या संग्राहकाने मी अमुक तमुक तिकिटे मिळवीनच आणि त्यातली काही विकून एवढे पैसे मिळतील असा विचार केला तर तो छंद मनाचा विरंगुळा न राहता डोकेदुखी होऊन बसेल, नाही का?
tags:Thoughts, Literature, Painting, Hobby
-सौरभ.

शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०१०

दरोड्याची तयारी

       दरोड्याची तयारी कशी करतात? त्यावेळेस काय काय बरोबर घ्यावे लागते? कोयता, लोखंडी गज? पाण्याची बाटली? कुणाला माहिती आहे का? दरोड्याच्या तयारीतील अमुक अमुक जणांना अटक ही बातमी आजकाल सारखीच पेपरात वाचायला मिळते. या बातमीने मला फारच प्रश्न पडायला लागले आहेत.

       आपल्याकडचे पोलिस खाते बर्‍यापैकी दक्ष असले तरी बहुतेक वेळा ते गुन्हा घडून गेल्यावरच जागे होतात. (जसे की अतिरेकी हल्ल्यानंतर सगळीकडे कडक सुरक्षा बंदोबस्त ठेवतात. त्याने काय होते हे अजून मला कळलेले नाही.) तर तेच पोलिस खाते दरोड्याच्या तयारीतल्या अमुक अमुक जणांना पकडते हे एकदम आश्चर्यजनक आहे.

       बरे दरोड्याच्या तयारीत जेवढ्या जणांना पकडतात तो आकडा नेहमी सहाच असतो असेही माझे निरीक्षण आहे. अगदी क्वचितप्रसंगी हा आकडा आठ असतो पण विषम तर तो मुळीच नसतो. मी या बातमीचा फार फार विचार केला आहे. कुणाला हे निरर्थक वाटण्याचा संभव आहे पण मला तरी बरेच प्रश्न पडले आहेत.

       या लोकांना जेव्हा पकडतात तेव्हा ते नक्की काय करत असतात? हत्यारं वगैरे परजून उभे असतात की बसलेले असतात? ( या टोळीचा म्होरक्या आणि त्याचे साथीदार एका वाळूच्या ढिगार्‍यावर अंधारात बसले आहेत, म्होरक्या हजेरी घेत आहे, "कारं तो चंद्या कुठं उलथलाय? आला का नाही?" ,"सरदार, त्याची म्हातारी मरायला टेकलेली हाय" वगैरे संवाद चालू आहेत असं एक चित्र मी बनवलं आहे पण ते खात्रीलायक वाटत नाही. ) त्यावेळेस हे एका रांगेत उभे असतात का? त्यावेळेस त्यांचा म्होरक्या कुठे उभा असतो? बरे पोलिसांना हे वेळेत समजते कसे?

       मग ते आल्यावर काय होते? एकदम रो रो करत पोलिसांची जीप येते आणि मग पळापळ होते, पोलिस त्यांना पकडतात, कोयते, काठ्या, लोखंडी गज जप्त करतात असे काही होते का? काहीच कळत नाही. ( आपल्या म्हातारीसाठी घरी राहिलेला चंद्या वाचला काय? )

       बरे मग नेमके तयारीत असतानाच कसे पकडतात? दरोडा घालताना किंवा दरोडा घालून झाल्यावर किती जणांना पकडतात? त्याची आकडेवारी काय?

       असो. असे हजार प्रश्न आहेत. मान्य आहे की कुणाला हे सगळेच हास्यास्पद वाटेल पण पेपरातली ही बातमी वाचली की मला दर वेळेस असे वाटत राहते. दरोड्याच्या तयारीतल्या गुंडांना बघायला मिळाले तर बरे होईल असेही वाटून जाते. :-)
Tags:Newspaper, Languagee, News, Satire
-सौरभ

बुधवार, १० फेब्रुवारी, २०१०

शिलॉंग पीक कडे.... - छायाचित्र    या ब्लॉगवर काही छायाचित्रेही मी टाकणार आहे. त्यातलं हे पहिलं. आसामच्या सहलीत शिलॉंग शहराला देखील भेट दिली होती. शिलॉंग शहराच्या आसपास बरेच पॉईंटस आहेत बघण्यासारखे. त्यातला शिलॉंग पीक हा आहे. येथून पूर्ण शिलॉंग शहराचे दृश्य बघता येते. शिलॉंग पीक कडे जाताना रस्त्यावर काढलेला हा फोटो.
Tags: Shillong. Photography, Camera, Travel

शुक्रवार, ५ फेब्रुवारी, २०१०

प्रभाते मल दर्शनम्।

    मागच्या नोंदीत मी अत्र्यांच्या शैलीबद्दल लिहले होते. त्यांच्या काही पुस्तकांची नावं सुद्धा त्यात होती. अत्र्यांचे एक पुस्तक 'ही ईश्वराची दया' मध्यंतरी वाचले. विविध विषयावरचे निबंध/लेख या पुस्तकात आहेत. 'प्राचीन भारत आणि गोमांस', 'प्राचीन भारतातील मद्यपान', 'आम्ही महार असतो तर..' असे एकाहून एक स्फोटक आणि भन्नाट लेख या पुस्तकात अत्र्यांनी लिहले आहेत. इथे त्याबद्दल अधिक काही लिहत नाही. इथेच सगळे लिहले तर तुम्ही ते पुस्तक कशाला वाचायला जाल? तर त्यातल्या एका लेखाचे शीर्षक आहे 'प्रभाते मल दर्शनम्|'

    'प्रभाते कर दर्शनम्' चा मूळचा संस्कृत श्लोक बहुतेकांना माहीत आहेच. तो इथे परत देत बसत नाही. या लेखात अत्र्यांनी विनोबा भावे यांचा खास त्यांच्या ष्टाईलने समाचार घेतला आहे. विनोबा भाव्यांचे एक वचन/मत असे आहे की प्रभाते मल दर्शनम्|. (मला वाटतं ’माझा साक्षात्कारी हृदयरो’ मध्ये अभय बंग यांनीही या वचनाचा उल्लेख केला आहे.) तर विनोबांच्या मते सकाळी मलाचे दर्शन घेऊन त्याच्या रुपावरुन आपल्या प्रकृतीचे उत्तम विश्लेषण करता येते. त्यानेच आहार विहार सुधारुन उत्तम आरोग्य संपादता येते. शिवाय आपल्या शरीरातून बाहेर पडलेल्या मलाचे ओंगळ रुप पाहून शरीराबद्दल अनासक्ती उत्पन्न होते वगैरे वगैरे....

अत्र्यांनी याचा समाचार घेताना म्हटले आहे
    'भंगी लोकांना रोजच्या रोज सामुदायिक मलदर्शन होते. मग त्यांना उत्तम तर्‍हेच्या आरोग्याचा, वैराग्याचा नि ऐश्वर्याचा कुठे लाभ होतो?'
    'मानवी शरीर हे खरोखरच निसर्गाचे देणे आहे. त्यात नाना तर्‍हेचे सौंदर्य भरलेले आहे. रुपाचे आहे, रंगाचे आहे, आकृतीचे आहे, बलाचे आहे, नाना तर्‍हेच्या गुणाचे आहे. अरे जा रे जा, आम्ही निसर्गाची निरामय अपत्ये ह्या सृष्टीतल्या हर्षाचा, आनंदाचा नि संतोषाचा आजन्म मनसोक्त आस्वाद घेऊ. तुम्ही पाहिजे तर खुशाल तुमच्या कमोदात दाढी खुपसून आपल्या मलाचे यथेच्छ दर्शन नाही तर सेवन करत बसा.'

    बापरे! काय भयंकर आहे ही भाषा! वाचता वाचता कधी अशा भाषेतलेही काही वाचायला मिळते.
Tags: Literature, Satire, Parody

सोमवार, १ फेब्रुवारी, २०१०

अत्रे शैली...

    आचार्य अत्र्यांचे लिखाण मला आवडते. इतरांनाही आवडत असावे, पण असं कुणी फारसे म्हणताना दिसत नाही. कारण म्हणायचा अवकाश की अत्रे विरोधक लगेच पुढे सरसावतात. आणि मग तुम्हाला वेड्यात काढतात, तुमच्या चुका दाखवतात. त्यांचे कुठे चुकले, ते असेच होते, त्यांचे वागणे तसेच होते इ.इ. गोष्टी उदाहरणांसकट ते तुम्हाला सांगतात. थोडक्यात काय तर ते तुम्हाला झोडपू पाहतात. पण आपण तिकडे लक्ष देऊ नये.
    मला वाटते अत्र्यांचे व्यक्तिमत्वच असे आहे की ज्यांना ते आवडतात त्यांना ते शंभर टक्के आवडतात आणि आवडले नाही तर बिलकूलच आवडत नाहीत. म्हणजे एखाद्याला तुम्ही भेटला तर तो तुम्हाला असे म्हणणार नाही की, "अरे अत्रे काय फाकडू लिहतात रे! पण त्यांचे इथे जरा चुकलेच" वगैरे वगैरे. एवढे स्पष्टीकरण पुरेसे आहे.
    अत्र्यांचे लिखाणातले मला आवडते ती म्हणजे त्यांची भाषा. अत्र्यांइतके सुगम, सोपे मराठी लिहणारे मराठी भाषेत इतर कोणी असल्यास मला ते माहित नाही. त्यांची काही पुस्तके वाचली आहेत (महापूर, हशा आणि टाळ्या, बत्ताशी आणि इतर कथा, मी कसा झालो, कर्‍हेचे पाणी इ.)त्यावरुन मला तरी असे वाटले. त्यात बोजड, कृत्रिम भाषा सापडणार नाही. ज्याचा मराठी वर्तमानपत्रे, मराठी साहित्य म्हणेज एकूणातच लिहिण्यावाचण्याशी फारसा संबंध आला नाही अशा व्यक्तीलाही समजण्यास अडचण पडणार नाही असे.
    वृत्तपत्र चालवण्यात अत्र्यांचे बरेच आयुष्य गेले असल्याने असे असावे. वृत्तपत्रातली भाषा हा एक वेगळाच प्रकार आहे. त्यात जडजंबाल भाषेत लिहून काही उपयोगाचे नाही. एकदा वाचून समजले नाही तर लोक सरळ पान उलटतात. परत वाचून समजून घेण्याच्या फंदात कुणी पडत नाही. दुसरे असे की वृत्तपत्राचे आयुष्य असते उणेपुरे एक दिवसाचे. दुसर्‍या दिवशी त्याची रद्दी होते. पुढे त्याचा काही वापर झालाच तर तो फुलपुडी बांधण्यात किंवा वाण्याकडे.
    त्यामुळे अत्र्यांची हीच सोपी भाषा इतर साहित्यातही उतरली असे मानता येईल. अर्थात त्यांनी स्वत: असा काही विचार केला होता का हे आपल्याला आता कसे कळणार?
tags: literature, writing style, opinion, newspaper
-सौरभ.