मंगळवार, ६ जुलै, २०१०

लिहिते व्हा!

    फारा वर्षांपूर्वी एक विचित्र पक्षी होऊन गेला. तो म्हणे पावसाळा आला की शेतकरी लोकांना पेरते व्हा, पेरते व्हा असा संदेश देत असे. मग शेतकरी उठत आणि पेरणी सुरु करत. आता हा पक्षी सध्या अस्तित्वात आहे की नाही आणि नसला तर शेतकर्‍यांनी या संभाव्य अडचणीतून कसा मार्ग काढला आहे कुणास ठाऊक? सध्या पर्यावरणाचे असे कंबरडे मोडलेले आहे की कोण कधी नामशेष होऊन जाईल काही सांगता यावयाचे नाही. काळ मोठा कठीण आला आहे. 'आमच्यावेळी असं नव्हतं' असं म्हणणारेही आता फारसे राहिले नाहीत यावरुनच काळ किती कठीण आला आहे, परिस्थितीने कसे गंभीर रुप धारण केले आहे याची तुम्हाला कल्पना करता येईल.

   असो. मला म्हणायचे आहे ते वेगळेच. मला असे म्हणायचे आहे की जर शेतात धान्य पिकवणार्‍या शेतकर्‍यांना असा काही संदेश कुणी देत असेल तर कागदावर कथा कवितांचे पीक घेऊ इच्छिणार्‍या "लेखकू" मंडळीना 'लिहिते व्हा!' असा संदेश का देऊ नये? तोच संदेश मी आज लेखकांना मी देऊन टाकतो.

    दरवेळेस लोक विचारतात तुम्हाला लेखन सुचते कसे हो? तुम्ही कोणत्या वेळेला लिहता? अर्थात हे लोक मला विचारतात असे मी म्हणत नाहीये. मी कुठे, मोठमोठे लेखक कुठे? उगाच गोड गैरसमज करुन घेऊ नका. बहुतांश लेखकांना हा प्रश्न विचारला जातो हे मी सांगतो आहे. मी म्हणतो लेखन सुचते कसे यात एवढे आश्चर्य वाटण्यासारखे काय आहे? हे म्हणजे तुम्हाला जेवण पचते कसे हो? असे विचारण्यासारखेच आहे. मला तर सुचते पटापट. मी आताच मागे दोनतीन लेख हातासरशी लिहून काढले. ग्रंथालयात गेलो, लिहला त्यावर लेख. परीक्षेला गेलो, लिहला त्यावर लेख. आता तर लिहण्यावरही हा लेख लिहायला बसलो आहे. आहे काय त्यात मोठेसे?

    त्यामुळेच लोकांना लिहायचे म्हटले की सुचत नाही याचे मला भारी आश्चर्य वाटते. ग्रॅहम ग्रीन या आंग्ल लेखकाला पण माझ्यासारखेच आश्चर्य वाटले. फरक एवढाच की त्याला आधी आश्चर्य वाटले आणि मला नंतर वाटले. पण म्हणून माझ्या आश्चर्याचे मूल्य उणावत नाही. असो. तो म्हणतो,"Writing is a form of therapy; sometimes I wonder how all those who do not write, compose or paint can manage to escape the madness, the melancholia, the panic fear which is inherent in the human situation." बघा कसे आहे? लिहणे हे एक प्रकारचे उपचारच आहेत. लिहिल्याशिवाय, काहीतरी रंगकाम केल्याशिवाय, तुम्ही जगूच कसे शकता? मनुष्यजातीला हा जो; कधी न संपणारा दुःखाचा, भीतीचा वारसा मिळालेला आहे त्यातून काहीतरी प्रसवल्याखेरीज तुमची सुटका होते तरी कशी? केवळ आणि केवळ दुःखाने भरलेल्या या निर्दय, पाषाणहृदयी जगात तुमचे चालते तरी कसे?

    कसले अफलातून वाक्य आहे पहा! आणि एवढे रोजचे जगणे जिथे एक संघर्ष होऊन बसले आहे, परिस्थितीशी दोन हात करावे लागतात तिथे तुम्हाला लिहायला सुचू नये म्हणजे कमाल आहे. लिहिता येण्याची जादू अजून तुम्हाला कळालेली दिसत नाही. लिहिण्यातले सुख काय वर्णावे? जाऊदे. सांगत बसत नाही. अनुभवासारखा दुसरा शिक्षक नाही म्हणतात. ( बघा आता हे वाक्य माझ्या आधीच कुणी लिहिले नसते तर तिघेही एका चांगल्या वाक्याला मुकलो असतो. आता हे तिघे कोण? तुम्ही लेको अगदीच हे आहात. त्यात एवढे डोके खाजवण्यासारखे काय आहे? मी, पर्यायाने तुम्ही आणि पर्यायाने हा लेखही!)

    मी काय सांगत होतो ते आता तुमच्या थोडेफार लक्षात आले असेल. शिवाय आता लेखन करायचे झाले तर असेही नाही की लेखनाला लागणारी सामग्री तुमच्याजवळ नाही. म्हणजे लेखक होण्यासाठी अगदी आवश्यक असते, ( म्हणजे लोकांचा असा पक्का ग्रह झाला आहे) त्या अनुभवांच्या शिदोरीबद्दल मी बोलत नाहीये. लेखनसामग्री म्हणजे कागदाचे भेंडोळे आणि लिहायला पेन. व्यंकटेश माडगूळकर लहानपणी उत्तम चित्रे काढत असत. त्यांचा चित्रकलेचा हात चांगला होता. त्यांचे चित्रकलेचे कलाल मास्तर त्यांना म्हणाले,"तुझा हात चांगला आहे. शिकलास, कष्ट केलेस तर चांगला चित्रकार होशील." पण माडगूळकरांची परिस्थिती होती गरीब. रंगांशी खेळायचे म्हटले तर रंग आणि इतर साधनांना पैसे पडत होते. लेखनाला मात्र असले काही लागत नव्हते. कागद आणि साधेसे शाईचे पेन असले तरी पुरत असे. मग चित्रकार व्हायचे न जमल्यामुळे त्यांनी हातात लेखणी घेतली. पुढे त्यांनी कागदावरचीच पण चित्रापेक्षा वेगळी अशी शब्दचित्रे काढली कशी, माणदेश अजरामर झाला कसा हे वेगळे सांगायची आवश्यकता नाही.

    हे झाले तेव्हाचे. सध्या मात्र ही साधनेही आवश्यक आहेत असे नाही. (याबाबत मात्र काळ मोठा कठीण आलेला नाही हे आपले सुदैवच म्हणायचे.) समोर संगणकाचा कीबोर्ड टंकायला असला तरी पुरते. सगळ्यांकडे असतोच तो. फक्त त्यावर काय बडवायचे तेवढे कळले पाहिजे.

    लेखनसामग्रीची सोय झाल्यावर आता काय उरले? लिहावे कसे हा प्रश्न अजून राहिलाच आहे. त्याबद्दलही सांगून टाकतो. मध्यंतरी रविंद्र पिंग्यांचे एक पुस्तक वाचले. अप्रतिम होते. त्यात त्यांचा अर्नेस्ट हेमिंग्वेवर एक लेख होता. अर्नेस्ट हेमिंग्वेने नवोदित लेखकांना एक संदेश देऊन ठेवला आहे. पिंग्यांच्याच शब्दात तो बघू. हेमिंग्वे म्हणतो,"सतत चांगलं, अधिकाधिक चांगलं लिहिण्याचा ध्यास घ्या. आजच्यापेक्षा उद्याचं अधिक कलात्मक लिहून झालं पाहिजे. परवाचं त्यापेक्षा अधिक दर्जेदार हवं. असं हे अधिकाधिक चांगलंच लिहिण्याचं व्रत मरेपर्यंत चालवा आणि दरम्यानच्या काळात न मरण्याचीही खबरदारी घ्या."
आहे की नाही कमाल? "अधिकाधिक चांगलंच लिहिण्याचं व्रत मरेपर्यंत चालवा आणि दरम्यानच्या काळात न मरण्याचीही खबरदारी घ्या." मझा आ गया. वाचलं आणि दिल एकदम खुष होऊन गेला.

    तर आहे हे असे आहे. लेखनसामग्रीची सोय लावून दिली, लिहावे कसे हे सांगून झाले आणि आता एवढे सांगितल्यावर तरी आता तुम्हाला लिहिण्यात काही अडचण येऊ अशी आशा करतो. त्यामुळे आता उठून, कमरा बांधून तुमच्या लेखणीचा उदयोस्तू करायला लागा. अर्थात लगेच तुम्हाला या प्राप्तकालात सुंदर लेणी खोदता यायची नाहीत. त्याला जरा वेळ लागेलच. हरकत नाही. शेवटी सब्रका फलच गोड होता है. पण शेवटी लिहाल ते अधिकाधिक चांगलं लिहिण्याचं मात्र विसरु नका. नाहीतर मी 'लिहिते व्हा!' चा संदेश देतोय आणि वाचकांनी किंवा लेखन छापायला जाल तर संपादकांनी तुम्हाला 'चालते व्हा!' चा संदेश देऊ नये म्हणजे मिळवली. काय समजलात?