अनुभव लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अनुभव लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, २५ मे, २०११

माझे उन्हाळी पर्यटन.

    या शहरात मी गेली कित्येक वर्षे राहतो आहे. त्याचा होणारा विकास, त्याची होणारी वाढ पाहतो आहे. म्हणता म्हणता या पुण्यात राहायला येऊन आता १६ वर्षे झाली. तरीही हे पुणं तसं मला आपलं अपरिचितच राहिलं आहे. आता पुण्याबाहेरच्या लांबवर पसरलेल्या एखाद्या उपनगरात गेलं की अगदी दुसर्‍या शहरात गेल्यासारखंच वाटतं. तिथले माहिती नसलेले रस्ते माझ्या अंगावर येतात आणि मला दडपून टाकतात. 'या भागात बरंच परिवर्तन झालंय की' हे माझं पालुपद पु़टपुटत मी कधी एकदा एखादा ओळखीचा कोपरा दिसतोय हे शोधत राहतो. हे जरा लांबच्या उपनगरांबाबत खरं असलं तरी मूळ गावातलं पुणंही तसं मला अपरिचितच आहे. कारण मी स्वतः पुण्याच्या उपनगरातच राहायला आहे. कधी कामानिमित्त मूळ भागात आलोच तर त्यापुरते आपले कामाचे रस्ते तेवढे माहित असतात. दुसरीकडे कुठे कशाला कुणाचं जाणं होतं? त्यामुळे शहरातले सगळे रस्ते तळहाताप्रमाणे माहित असलेल्यांबद्दल मला आदरही वाटतो आणि 'हा माणूस पूर्वी एखाद्या कुरियर कंपनीत तर कामाला नव्हता ना?' असा संशयही येतो. रस्त्यांच्याबाबतीत मी फारसा तल्लख नसलो तर अगदीच 'हा' सुद्धा नाही. तरीही एखाद्या वेळेस कुठे वेगळ्या भागात शिरलो तर अचानक 'अरेच्चा! हा रस्ता इकडे येऊन याला मिळतो होय? आणि आपल्याला जो एवढे दिवस तो वाटत होता; तो रस्ता हा आहे होय?' असे प्रसंग माझ्या बाबतीत बर्‍यापैकी घडतात, आणि आपलं आपलं म्हणतो त्या पुण्यातलेसुद्धा सगळे रस्ते आपल्याला माहित नाहीत अशा शरमेने मी बेचैन होतो. या प्रकारामुळे कुणी आपल्या पुणेरीपणावर संशयही घेऊ शकेल अशी थोडीशी भीतीही त्यामागे असते. आपल्या शहरातले, अगदी मूळ गावातलेही रस्ते आपल्याला माहित नसावेत म्हणजे त्याला काही अर्थ आहे?

    या रस्त्यांसारखीच गावातली जी प्रेक्षणीय ठिकाणं असतात ना, त्यांचीही तशीच गत असते. शहरातले सगळे रस्ते जसे माहित नसतात तशीच ही ठिकाणंही पाहायची राहून गेलेली असतात. त्यांबद्दलची काहीच माहिती आपल्याला नसते. पाहू पाहू म्हणत ही आपल्याच शहरातली ठिकाणं बघायचं आपण नेहमी पुढे ढकलत आलेले असतो. क्वचित एखादा बाहेरगावचा पाहुणा आपल्याकडे आला आणि त्याला अमकं अमकं ठिकाण बघायचं असले तर त्यालाही, 'अरे त्यात काय एवढं बघण्यासारखं आहे?' असं म्हणून आपण वेड्यात काढतो. आपल्या गावातलीच, आपल्या शहरातली ही ठिकाणं त्या शहराच्या नागरिकांकडून नेहमीच अशी दुर्लक्षिली का जातात? माझी एक बहिण लंडनला गेली कित्येक वर्षे राहते आहे. ती इकडे आली की तिच्याशी बर्‍याच गप्पा होत असतात लंडनबद्दल. मी इंग्रजी साहित्याचा विद्यार्थी असल्याने या लंडनबद्दल मला जाम कुतूहल आहे. एकदा का होईना, मी काहीही करुन लंडनला जाईनच आणि ते डोळाभरून पाहून येईन असा मी एक निश्चियही करुन ठेवला आहे. तर लंडनमधली बरीच, अगदी पाहिलीच पाहिजेत अशी ठिकाणं आठवून मी या बहिणीला दरवेळस विचारतो की 'अगं हे तू पाहिलंस का? तिकडे तू गेलेली आहेस का?' मग तिचा प्रश्न येतो की 'अरे तुला ही ठिकाणं कशी काय माहित?' या प्रश्नाचं उत्तर न देता मी माझा प्रश्न परत विचारतो. मग ती सांगते की 'नाहीरे, नाही पाहिलं, त्यात बघण्यासारखं काय आहे एवढं?' लंडनमध्ये राहताना युरोपवारी करुन आलेल्या आणि इंग्लंडमध्येही इतरत्र हिंडलेल्या तिचं लंडन मात्र अजून पाहायचं राहिलं आहे.

    आणि तसंच, कोणतीही भीड-मुर्वत न बाळगता मीपण हे सांगू इच्छितो की गेली इतकी वर्षे पुण्यात राहणार्‍या माझीही तीच गत झालेली आहे. परिस्थिती फारशी वेगळी नाही. पुण्यातली यच्चयावत पाहण्यासारख्या ठिकाणांना माझे पाय अजून लागायचे आहेत. एखाद्याचे पाय एखाद्या वास्तूला लागणं हा जरी थोरामोठ्यांसाठी वापरायचा वाक्प्रचार असला तरी माझ्याबाबतीत तो वापरायचे स्वातंत्र्य मी घेतो आहे याची नोंद घ्यावी. पुण्यातली बरीच नावाजलेली ठिकाणं पाहायचा योग अजून यायचा आहे. एखाद्या देवाच्या बाबतीत, किंवा नेमकेपणाने सांगायचे झाले तर वैष्णोदेवीचा वगैरे जो 'बुलावा आना चाहिये' हा प्रकार असतो तसाच माझाही ही ठिकाणं पाहायचा योग आलेला नाही. आणि प्रेक्षणीय ठिकाणांच्या बाबतीत तर बुलावा येण्याची वाट पाहणेही वेडपटपणाचे आहे. प्रेक्षणीय ठिकाणं काही धर्मक्षेत्रे, तीर्थक्षेत्रे नाहीत - आपल्या दर्शनेच्छूंना बुलावा पाठवायला. त्यामुळे आपले पाय जर या वास्तूंना लागायचे असतील तर स्वतःच काहीतरी हालचाल करणे आले.

    शनिवारवाड्याच्या अगदी बरोबर पाठीमागच्या बोळवजा रस्त्यावर एखादे महाविद्यालय असेल असे कुणालाही वाटण्याची सुतराम शक्यता नाही. मात्र तसे एक महाविद्यालय इथे आहे. एकेकाळी देशभर आणि त्याही पलीकडे विजयाची दुंदुभी वाजलेल्या मराठी सत्तेचे चढउतार पाहिलेल्या शनिवारवाड्याच्या मागेच हे महाविद्यालय उभे आहे. तसा पाहिलं तर मी या विद्यालयाचा विद्यार्थी नाही आणि नव्हतोही. त्यामुळे त्याच्याबद्दल माहिती असण्याचेही कारण नाही. मात्र जेव्हा माझ्या पदव्युत्तर परीक्षेचे केंद्र म्हणून या महाविद्यालयाची निश्चिती झाली तेव्हा मला त्याचे अस्तित्व कळून आले आणि पुणे हे विद्येचे माहेरघर आहे (विद्येचे माहेरघर ते निश्चितच आहे मात्र पूर्वेचे ऑक्सफर्ड मात्र मुळीच नाही याचीही इथे नोंद घ्यावी.) या विधानाला जरा अजून पुष्टी मिळाली. हो, असेच म्हटले पाहिजे कारण पुण्यात फिरताना नित्यनूतन, कल्पनाही करता येणार नाही अशा ठिकाणी शाळा,महाविद्यालये दिसत असतात. लांब कशाला जायला पाहिजे? शनिवारवाड्याच्या जवळच एकदा वसंत टॉकीजच्या बसस्टॉपवर उभा असताना, त्याच्या बरोबर समोरच; विश्रामबागवाड्यासारखीच दिसणारी एक भरपूर जुनी वास्तू आहे, तिच्यात मी उभ्या उभ्या, अगदी नी.वा.किंकर रात्रप्रशाला, रानडे बालक मंदिर पासून ते डे केअर सेंटर पर्यंत चार पाच शाळा मोजल्याचे मला पक्के आठवते आहे.

    असो. या महाविद्यालयात माझा प्रॅगमॅटिक्सचा तीन तासांचा पेपर संपवून जेव्हा मी सहा सव्वासहाच्या सुमारास बाहेर पडलो तेव्हा समोरच शनिवारवाड्याच्या कडेच्या बुरुजांरुन चालत असलेले काही दर्शनेच्छू मला दिसत होते. आता बस पकडून सरळ घरचा रस्ता सुधारण्याऐवजी संध्याकाळच्या शीतल वेळी अचानक मला शनिवारवाडा बघायला जावेसे वाटू लागले. उन्हाळ्याचा मोसम असल्याने उजेडही भरपूर होता. आणि तसा मी अजूनही स्वतंत्र पंछी असल्याने आणि कुठलाही जबाबदारीचा लबेदा चिकटला नसल्याने असे बेत त्वरित अंमलात (अजूनही) आणू शकतो. बसस्टॉपकडे जाणारा रस्ता सोडून मी मग शनिवारवाड्याच्या दर्शनी भागाकडे चालायला सुरुवात केली.

    पदपथावर चालताना हरतर्‍हेचा माल विकायला बसलेले विक्रेते दिसत होते. दहा रुपयात अगदी मुठीपेक्षाही लहान अशा आकाराच्या दोन कळसूत्री बाहुल्या नाचताना इतक्या सुंदर दिसत होत्या की त्यांच्या समोरुन जाताना; त्या पाहण्यासाठी काही वेळ थांबून राहिलेल्यांचा मला त्यादिवशी बिलकूल राग आला नाही. ते चित्र होतेच तेवढे मनोवेधक. या बाहुल्या एवढ्या कशा नाचत आहेत याचे कोडे काही मला सुटले नाही. विक्रेत्याच्या हातात तर कोणतीच दोरी वगैरे दिसत नव्हती. शिवाय बाहुल्या इतक्या एकमेकांना चिकटून नाचत होत्या की त्यांच्या मध्ये काही ताण दिलेल्या स्प्रिंगसारखे असलेच तरी ते बिलकूल दिसत नव्हते.

    विचार करतच मी पुढे निघालो, तर एकदम वेगवेगळ्या देवादिकांची चित्रे पदपथावर पसरलेली दिसली. त्याच्यात विशेष काही न वाटून पुढे सरकतो तर एकदम चित्रे हलल्याचा भास व्हायला लागला. मला तसा चांगल्या सशक्त नंबरचा चष्मा आहे त्यामुळे आपल्या दृष्टीत अचानक काही असुधारनीय समस्या आली की काय असे वाटायला लागले. मात्र नीट बारकाईने पाहिले तर सगळी चित्रे त्रिमितीय असल्याचे लक्षात आले. दांडिया खेळणारा कृष्ण वगैरे अचानक दुसर्‍याच पोझमध्ये उभा राहिलेला दिसायला लागला. मी न थांबता समोरुन चालत जाताना तर सगळ्याच चित्रांची भराभर होणारी हालचाल केवळ अप्रतिम होती. एवढे होईपर्यंत मी प्रेमळ विठ्ठलाचे मंदिर मागे टाकून ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिराच्या कमानी पर्यंत आलो होतो. प्रेमळ विठ्ठलाच्या मंदिराने मात्र माझे लक्ष चांगलेच वेधून घेतले. इथे मंदिरापेक्षा त्याच्या नावाने जास्त लक्ष वेधून घेतले असे म्हणता येईल. कारण खुन्या मुरलीधर, पासोड्या विठोबा, जिलब्या मारुती, बायक्या विष्णू, छिनाल बालाजी, पत्र्या मारुती, भिकारदास मारुती अशा नावांच्या जत्रावळीत 'प्रेमळ विठ्ठल' हे नाव खूपच सभ्य आणि सुसंस्कृत वाटते हे कुणीही कबूल करील. माझी स्मरणशक्ती मला दगा देत नसेल तर असे प्रेमळ नाव ठेवल्याबद्दल लगेच संबंधितांचा, अनासाये जवळच उपलब्ध असलेल्या शनिवारवाड्यावर जाहीर सत्कार करावा असे वाटण्यापर्यंत माझ्या भावना उचंबळल्या होत्या हे माझ्या अजूनही लक्षात आहे.

    इथून पुढे चालायला लागलो तर अचानक मध्येच बारक्या चौरंगासारखे काहीतरी पदपथावर मांडलेले दिसले. ते दुसरे तिसरे काही नसून वजनकाटा होता. वजन करावे की नाही हा विचार करत उभा राहिलो. कारण नुकताच परीक्षेचा पेपर देऊन आल्यामुळे परीक्षेचे मणभर ओझे अंगावरुन उतरलेले होते. त्यामुळे वजनही अचूक आले असते. पण शेवटी शनिवारवाडा बघायचा आहे तर त्याकडेच लवकर जावे म्हणून वजनाला बगल देऊन टाकली आणि पुढे निघालो.

    ब‌र्‍याचदा असे होते की नेहमी आपण कुठे निघालो की आपल्याला कुठेतरी जायचे असते. वाक्य समजायला जरा अवघड आहे हे. माझा म्हणण्याचा उद्देश हा की कुठे निघालो की आपले काहीतरी काम असते, कुठेतरी जायचे असते, कुणाला भेटायचे असते असे काहीतही कारण असते. "बस मिळेल की नाही?, घरी गेल्यावर भाजी कोणती करावी?, अमक्याचे आजारपण चालू आहे, तमक्याच्या लग्नाला जायचे आहे", असे हजारो विचार चाललेले असतात. त्यामुळे रस्त्यात चालतानाही कित्येक गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत असतात पण त्यांकडे आपले लक्ष नसते. आपण आपल्याच तंद्रीत, विचारात पुढे सरकत असतो. वाहनांच्या, फेरीवाल्यांच्या, पादचार्‍यांच्या गर्दीतून माणसे अगदी यंत्रवत चालत असतात. काही अडथळा आला - थांबले, मोकळा रस्ता मिळाला - चालले. पण त्यादिवशी माझ्या डोक्यात कसलेही विचार नव्हते. संध्याकाळच्या वेळी, रस्त्यावर समोर दिसेल ते बघत मी मोठ्या आनंदाने रमत गमत चाललो होतो. आणि त्या निरुद्देश भटकंतीची एक वेगळीच मजा अनुभवत होतो. अक्षरशः प्रत्येकानेच कधीतरी अगदी एकटे असे रस्त्याने भटकायला बाहेर पडले पाहिजे. केवळ एका प्रेक्षकाच्या भूमिकेतून आपले शहर पाहिले पाहिजे.

    शनिवारवाड्याच्या समोर आलो. इथे छोट्याशा वाहनतळावर अनेक चारचाकी गाड्या उभ्या होत्या. काहीशे वर्षांपूर्वी जिथे पेशव्याचे हत्ती झुलत असतील आणि रिकिबीत पाय अडकवून घोड्यांवर मांड ठोकली जात असेल तिथे आता फोक्सवॅगन आणि बीएमडब्ल्यू उभ्या होत्या. काळ नामक एका अवलियाला मी परत तिथल्या तिथे मनोमन सलाम ठोकला. पुढे निघालो तर मात्र माझ्या अंदाजापेक्षा बरीच जास्त माणसे शनिवारवाडा पाहायला आल्याचे मला जाणवले. ही जनता शिवाय पुणेरी सुद्धा वाटत नव्हती. जरा डोक्याला काम दिल्यावर लक्षात आले की ऐन उन्हाळ्यात, जेव्हा पर्यटकांचे लोंढेच्या लोंढे टुरिष्ट स्पॉटवर आक्रमण करतात, त्या काळात मी शनिवारवाडा बघायला आलेलो होतो. खरंच या शक्यतेचा मी बिलकूल विचार केलेला नव्हता. चालता चालता लगेचच पर्यटकांच्या पारंपारिक वेशातले दर्शनेच्छूंचे घोळके दिसायला लागले. डोक्यावर टोपी चढवलेले, पायात स्पोर्ट शूज घातेलेले, स्त्रिया पंजाबी ड्रेसात, मुलांचे रंगीबिरंगी कपडे, तरुण तरुणींचे टी-शर्टस, घट्ट जीन्स आणि बहुतेकांच्या हातात असलेला कॅमेरा. तिथून चालताना बरेच जण जे फोटो काढत होते, काढून घेत होते त्याच्यांमधूनच मला चालत जावे लागले आणि त्यांना तसा अडथळा केल्यामुळे, त्यांच्या पर्यटनानंदात व्यत्यय आणल्याने मलाही थोडे वाईट वाटले. खरेतर मी चांगला एवढी वर्षे पुण्यात राहतोय; पण का कोण जाणे, त्या उन्हाळी पर्यटकांच्या झुंडीत मला अगदीच लाजल्यासारखे व्हायला लागले. मध्येच एखाद्या पर्यटकाने, "काय हो, उगाच तुमच्या या शनिवारवाड्याचे नाव होऊन राहिले आहे भौ? इथे बघायला तर फारसे काही नाहीच!" असे म्हटले किंवा जाब विचारला तर काय उत्तर देणार होतो मी? खरेतर असे काही उत्तर द्यायला मी बांधील नव्हतो, ती माझी जबाबदारीही नव्हती, तरीही या विचाराने मी चांगलाच खचून गेलो आणि आत्मविश्वासाचा अभाव असलेला किंवा खांदे पाडून चालणारा मनुष्य जसा दिसतो ना तसा चालत राहिलो.

    बहुतांश 'टुरिष्ट स्पॉट' च्या इथे जशी खाण्यापिण्याचीही दाबून सोय असते तशी मात्र शनिवारवाड्याच्या पटांगणात फारशी आढळली नाही. मोजकेच पर्याय उपलब्ध होते. शिवाय माझ्या यच्चयावत शिक्षणाची सांगता करणारा, चांगला तीन तासांचा पेपर लिहिण्याचे मानसिक श्रम झाल्याने मलाही काही पोटाला आधार देण्याइतपत हवेच होते. शेवटी पाच रुपये मोजून; गरमागरम खार्‍या शेंगदाण्यांची एक पिंटुकली सुरनळी खरेदी करुन मी पुढे प्रयाण केले. शनिवारवाड्याच्या समोरच एका भव्य व्यासपीठासारख्या वाटणार्‍या कट्ट्यावर अनेक जण संध्याकाळच्या शांतवेळी बसून अवतीभवतीची मौज लुटत होते. सहकुटुंब, सहपरिवार आलेले काही जण होते, काही ज्येष्ठ आपल्या आयुष्याच्या संध्याकाळी या संध्येचा आनंद घेत होते, कॉलेजकुमार आपल्या मैत्रिणीबरोबर गुजगोष्टी करण्यासाठी आले होते, काही एकएकटे आपल्याच विचारात शनिवारवाड्याच्या भव्य दाराकडे बघत बसून होते. स्वतःही यांना सामील होण्यापेक्षा मी मात्र लगेच प्रवेशमार्गाकडे मोर्चा वळवला. दारातून खूपच लोक एकसारखे बाहेर येत होते. त्यामुळे मला काही लवकर आत जाता येईना. शेवटी कुठे एकदाची फट सापडून मी अजून काही लोकांबरोबर आत शिरकाव करु लागताच तिथेच आतल्या बाजूला उभ्या असलेल्या एका सुरक्षारक्षक वजा माणसाने सरळ 'बंद हो गया, कल आओ' असे फर्मान ऐकवले. काय? मला क्षणभर नीट कळलेच नाही काय ते. मग मात्र डोक्यात प्रकाश पडला आणि तिथल्याच एका पाटीवर वेळ पाहिली तर खरेच शनिवारवाडा बंद होण्याची संध्याकाळची वेळ सहा असल्याचे दिसले. म्हणजे आता ही जी सगळी माणसांची लाट माझ्या अंगावर फुटली होती ती सगळी वेळ संपल्याने सुरक्षारक्षकाने हाकलून काढलेली जनता होती. अरेरे! म्हणजे गेली १६ वर्षे पुण्यात राहणारा जेव्हा चांगली सवड काढून शनिवारवाडा बघायला जातो तेव्हा त्याला आत पाऊलही टाकू दिले जात नाही? काय म्हणावे याला? आणि जिथे मराठ्यांनी आपल्या दैदीप्य पराक्रमाचे झेंडे फडकवले तिथे या अशा हिंदीत आमची संभावना केली जाते? यात थोडा माझा दोष होता की काय न कळे! कारण जीन्स आणि टी-शर्ट घालून मी कुठे गेलो की लोक माझ्याशी हिंदीतच बोलायला सुरुवात का करतात कोण जाणे? तसा मग इतर लोकांचाही थोडा दोष असावा.

    असो. शनिवारवाडा बंद झाला होता, माझ्या पुण्यातले हे प्रेक्षणीय स्थळ बघायला मला परत यावे लागणार होते. नाउमेद न होता मग मी आधी वर्णन केल्याप्रमाणे मी पुन्हा समोरच्या लोकांमध्ये सामील झालो आणि एका एका शेंगदाण्याचा समाचार घ्यायला सुरुवात केली. शनिवारवाडा बंद झाला असला तरी त्याचे जे बलाढ्य दार आहे ते ही चांगलेच पाहण्यासारखे आहे. शिवाय त्याच्या वर मध्येच दोन खिळ्यांना एक भडक निळी पाटी लटकवून; त्यावर शनिवारवाडा असे लिहून संबंधितांनी या जागेची तपशीलवार(?) माहिती पुरवण्याचेही काम केले आहे.

    शनिवारवाडा आतून बघता आला नसला तरी मला त्याचे फारसे वाईट वाटले नाही. तसा माझा स्वभाव नाही आणि शिवाय तिथे हरठिकाणांहून आलेल्या वेगवेगळ्या माणसांना नुसते बघण्यातही एक वेगळाच आनंद होता. तो मी चांगलाच अनुभवला. माझ्या शेजारीच बसलेल्या एका कामकरी माणसाशी सुखदुःखाच्या चार गोष्टी बोललो. आपल्या दोन बलाढ्य बुलडॉग कुत्र्यांना घेऊन शनिवारवाड्यावर फिरायला आलेल्या आणि कट्ट्यावर बसलेल्यांच्या अगदी जवळून त्यांना नेणार्‍या एका धन्य पुणेकराची पुणेरी तर्‍हा बघून शेजारच्याकडे, 'शनिवारवाडा ही काही कुत्र्यांना फिरायला आणण्याची जागा नाही' अशी नापसंती व्यक्त केली. थोडक्यात सांगायचे तर वेळ मोठा सुरेख गेला. अखेर, अस्तंगत होत असलेल्या सूर्याबरोबरच अंधाराचे साम्राज्य ठळक व्हायला लागल्याने मी माझ्या शेजारच्याचा आणि शनिवारवाड्याचाही निरोप घेतला. मागच्या गर्द निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर दिसणार्‍या शनिवारवाड्याच्या दर्शनी भागावर एक अखेरची नजर टाकली आणि पुन्हा बसस्टॉपकडे चालायला सुरुवात केली. १६ वर्षे आणि थोडीशी पायपीट यातून मला जे 'शनिवारवाडा सहाला बंद होतो' हे तात्पर्य कळाले होते त्याच्याशी आजूबाजूच्या कुणालाच काही देणे घेणे नव्हते. पुन्हा तीच गर्दी आणि तीच वाहतूक. लवकरच तिचा एक भाग बनून गेलो. चालतानाच लक्षात आलं की हातातल्या शेंगदाणा पुडीत आता नुसती फोलपटं उरलेली आहेत.

मंगळवार, १८ मे, २०१०

परिक्षेचा दिवस...

    म्हणता म्हणता परीक्षा जवळ आलीये, जवळ आलीये करत आली सुद्धा. शेवटच्या महिन्यात अभ्यासाने चांगलाच जोर पकडला होता. कवितांचा अर्थ लावून लावून डोक्याचा पार भुगा होऊन गेला. दुर्बोध लिहणार्‍या कवींनी माझ्याकडून अजून चार शिव्या खाल्ल्या. ग्रीक मायथॉलॉजी नसती तर ह्या लोकांना उपाशी मरावे लागले असते हे माझे मत अजूनच ठाम झाले. लिटररी क्रिटिसिझममधून दुसर्‍यांवर टीकाटिपण्णी करता करता काही लेखकांना आपण स्वत:ही किती रटाळ पुस्तके लिहली आहेत याचेही भान राहिले नाही. निदान प्रसिद्ध करण्यापूर्वी स्वत:च्या पुस्तकाचे परीक्षण केले असते तर आपण लिहलेल्या लिखाणातल्या एकाही वाक्याचा अर्थ लागत नाही हे तरी त्यांच्या लक्षात आले असते. अर्थात यातही, वाळवंटात रखरखाटाने जीव जायची पाळी यावी आणि अचानक हिरवाईने मन सुखावून जावे, असे अनुभव देणारे प्राईड ऍंड प्रेज्युडिससारखे पुस्तकही होते, नाही असे नाही. तरीही एकंदर तक्क्यावर रेलून आरामशीरपणे पुस्तक वाचणे वेगळे आणि What is the tragic flaw in the character of Othello? How far it is responsible for his tragedy? या प्रश्नाचे उत्तर लिहणे वेगळे! नाही का?
    तर परीक्षेचा दिवस उगवला. सकाळी अकरा ते दुपारी दोनचा पेपर होता. आबासाहेब गरवारे महाविद्यालयात यंदा आमचे स्थळ आले होते. तसे पाहता या वेळी विद्यापीठाने ते खूपच जवळ दिले म्हणायचे. मागच्या वर्षी त्यांनी मला इंदिरा कॉलेज, ताथवडे इकडे पाठवले होते होते. परीक्षा केंद्र निवडताना पुणे निवडल्याचे मला स्पष्ट आठवत होते. आमच्या गरीबांच्या ऑक्सफर्डला ताथवडे पुण्यातच आहे असे वाटले असावे. त्यावेळी जायला एक; यायला एक तास लागत होता. मला मात्र वाटत होतं की मुंबईलाच चाललो आहे परीक्षा द्यायला.
    मात्र यंदा तसे नव्हते. परीक्षेची वेळही सोयस्कर होती. अभिजीतने जाता जाता मला सोडले असते आणि येताना मी आलो असतो. त्याला म्हटले, आपण गाडीतूनच जाऊया. तो हो म्हणाला. (नाहीतरी त्याला असे कुणीतरी म्हणायचे कारण पुरते, लगेच गाडी नेण्यासाठी.) मग निघालो. पुण्यातच जायचे असले तरी सकाळची वाहतूक लक्षात घेता वेळ तर लागणारच होता. गाडीत वाचायला मात्र काही घेतले नाही. उगाच गाडीत वाचायला काहीतरी घ्या आणि नंतर मळमळत असताना एम.ए. चा पेपर लिहा, असे नको व्हायला. मग पोहोचलो परीक्षा केंद्रावर.
एम.एच्या परीक्षांना सगळ्या प्रकारचे लोक हजर असतात. काही काही वेळा वृत्तपत्रात जसे 'समाजाच्या सर्व थरातून लोक आले होते' असे लिहलेले असते अगदी तसेच एम. ए.च्या परीक्षांचे असते. अगदी '८३व्या वर्षी आजींनी दिली एम.ए.ची परीक्षा' या बातमीतल्या आजीबाई नसल्या तरी कॉलेजकुमारांपासून ते ज्येष्ठ नागरीक म्हणता येईल इतपत विविध वयोगटातले परीक्षार्थी हजर असतात. बहुतेकांच्या हातात बाजारात मिळणार्‍या एकाच लेखकाच्या नोट्स होत्या. या नोट्सचा दर्जाही काय वर्णावा? तसे पाहिले तर एम.ए.च्या बहि:स्थ विद्यार्थ्यांचे हाल कुत्राही खात नाही. अगदी अभ्यासक्रम मिळवण्यापासून ते 'मटेरियल' गोळा करण्यापर्यंत त्यांना रक्त आटवावे लागते. परत मूळ पुस्तकं मिळायची मारामार. मूळ पुस्तक मागितले की अप्पा बळवंतातले दुकानदार हा कुठल्या परग्रहावरुन आला आहे असा चेहरा करुन तुमच्याकडे बघतात. आजूबाजूचे चारपाच जणही तुमच्याकडे अथ पासून इतिपर्यंत टवकारुन बघतात. च्यायला आजकाल मूळ पुस्तक वाचतो कोण?
    परत आणि पुणे विद्यापीठाच्या संकेतस्थळाबद्दल काय बोलावे? (खरोखर काहीच बोलत नाही. त्याच्यावर एक स्वतंत्र लेख लिहता येईल. उगाच ब्लॉगच्या एका उत्तम लेखाचा विषय कशाला वाया घालवा?)
    आपला नंबर कोणत्या खोलीमध्ये आला आहे हे बघण्यासाठी नोटीस बोर्डाजवळ भयंकर गर्दी उसळलेली असते. तिथे जाऊन मी माझा नंबर शोधतो. परीक्षा हॉलमध्ये शिरताना एवढा गलका कसला चालला आहे असा विचार केल्यावर लक्षात येते की अरे इथे जवळ जवळ ९० टक्के स्त्रियाच जमल्या आहेत. जशा सामुदायिक पोथी वाचन वगैरेला महिला जमतात तशा सामुदायिक एम.ए.परीक्षा द्यायला एखादे महिला मंडळ आले आहे की काय? प्रत्येकजण अगदी अनेक वर्षांच्या ओळखी असल्यासारख्या एकमेकींशी बोलायला सुरुवात करतात. अर्थात मला त्याचे काही वाईट वाटायचे कारण नाही पण थोडे अस्वस्थ वाटायला लागते. या सगळ्यांनी मिळून माझ्याविरुद्ध डाव केला आहे, ते सगळेजण मिळूनच पेपर लिहणार आहेत वगैरे वगैरे विचार माझ्या मनात यायला लागतात. मग परीक्षक वर्गात प्रवेश करतात. "सगळ्यांनी आपापल्या बॅगा, पर्स, सॅक्स पुढे आणून ठेवा. मोबाईल स्विच ऑफ करुन आपापल्या बॅगेत ठेवा. कुणाचाही मोबाईल वाजता कामा नये."वगैरे वगैरे.....
अचानक माझ्या लक्षात येतं की दरवेळेस माझ्या पुढच्या बाकावरचा परीक्षार्थी गैरहजर असण्याची परंपरा यंदा मोडीत निघालेली आहे. एक मुलगी माझ्या पुढच्या बाकावर बसलेली आहे. अर्थात तिचं लिहलेलं बघून मला उत्तरं लिहता येतील अशी शक्यता नसते. (परीक्षेत दहा बारा निबंधासारखी उत्तरं लिहायची असताना कॉपी कसली करणार डोंबलाची?) पण दरवेळेस परीक्षकच चालता चालता मध्येच त्या रिकाम्या बाकावर बसतात आणि एखादा सरडा जसा अगदी पार्श्वभूमीच्या रंगासारखा रंग घेऊन एकरुप होऊन जातो, तसाच हा परीक्षकही विद्यार्थ्यांत बसून, कॉपी करणार्‍याला रंगेहाथ पकडायचा विचार करत असावा. मात्र यावेळेस तसं होणार नसतं.
    मग उत्तरपत्रिका मिळते. माझ्या आख्ख्या विद्यार्थीजीवनातल्या सवयीप्रमाणे मी लगेच पानाच्या दोन्ही बाजूने अगदी थोडे थोडे समास आखून घ्यायला सुरुवात करतो. आपला परीक्षा क्रमांक, तारीख, विषय, सेंटर लिहून होतं. इंग्रजीच्या पेपरलाही मिडीयम ऑफ आन्सर लिहावे लागते. पाच दहा मिनिटं होतात आणि मग तो चिरपरिचित टण्णऽऽ असा आवाज होतो आणि 'याचसाठी केला होता अभ्यास' असं जिच्याबाबत म्हणता येईल ती प्रश्नपत्रिका माझ्या हातात येते. मी ती अधाशासारखी वाचायला सुरुवात करतो.

ह्म.... ह्म.....
अच्छा! .....
हा प्रश्न विचारलाय काय? .....
बोंबला.....
अरे चोरांनो..... कात्रीत पकडायला बघता काय?.....
अरेच्चा हा तर मागच्या वर्षीच्या पेपरात पण होता. अरेरे! मागच्या वर्षी आला म्हणून या वेळी येणार नाही असं वाटून त्याकडे फारसे लक्षच दिले नव्हते आपण....
अरे वा! याचे मुद्दे तर आपण सकाळीच वाचले आहेत. वा वा वा! .....

    माझे विचार सुरु होतात. मग एकदम वाचतच किती वेळ गेला हे लक्षात येऊन मी झरकन लिहायला सुरुवात करतो.
वेळ सरकत सरकत पुढे चाललेला असतो. थोडंफार लिहून होतं. मी इकडे तिकडे नजर टाकतो. काही हात भरभर लिहण्यात गुंतलेले असतात. काही शून्यात नजर लावून बसलेले असतात. असं रिकाम्या बसलेल्या लोकांकडे बघितल्यावर जरा बरं वाटतं. मात्र आता एक नवीनच त्रास सुरु झाला असल्याचं मला जाणवतं. माझ्यासमोर बसलेल्या मुलीचे केस सॉलीड लांब आहेत. अगदी शाम्पूच्या जाहिरातीत दाखवतात तसे 'स्मूथ नि सिल्की'! मध्येच तिने मानेला झटका दिला की तो आख्खाच्या आख्खा केशसांभार इकडून तिकडे हालतो. माझं लक्ष विचलित होतं. काय वैताग आहे हा? थोडं लिहलं की लगेच झटका. अजून एक परिच्छेद लिहला की परत झटका. मी वैतागतो. मग तो सरडा परीक्षकच काय वाईट होता?
    या वर्गात वरती फॅन लावलेले आहेत पण ते दोनच आहेत आणि नेहमीप्रमाणे माझ्यापासून बरेच लांब आहेत. एखादी वार्‍याची झुळूक आलीच तरी त्या गरम वार्‍याने बिलकूल गार वाटत नाही. बर्‍यापैकी उकाडा जाणवत राहतो. पांडुरंग सांगवीकरसारखा आपणही शर्ट काढून पेपर लिहावा की काय असा विचार माझ्या मनात येतो. पण तेवढे धाडस माझ्याच्याने अर्थातच होत नाही. उगाच एवढ्या बायाबापड्यांसमोर असला आचरटपणा कसा करणार?
    बघता बघता पेपराची वेळ संपत येते. शाम्पू मुलगी पण जोरात लिहीत असते. नेहमीप्रमाणे मी मागे पडलेला असतो. सुरुवातीच्या अक्षरात आणि आताच्या अक्षरात थोडा फरक दिसायला सुरुवात झालेली असते. रिस्टोरेशन कॉमेडीचे मुद्दे आठवता आठवत नसतात. बर्‍याच प्रयत्नांनी एक मुद्दा आठवतो. Licentious way of living..... दुसरा आठवतो Loose morals..... मग पुढचे सगळेच आठवायला लागतात Adulterous relationships.....वगैरे वगैरे

    ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर चं जसं गणितात एक आणि एकच उत्तर असतं तसं एम.ए. बाबत कधीच होत नाही. शिवाय गणितात आख्खा पेपर सोडवल्याचं एक समाधान तरी जाणवतं. आपण काय गणितं सोडवली आणि किती गुण मिळणार आहेत याचा स्पष्ट अंदाज बांधता येतो. इथे तसं काहीही नसतं. कितीही लिहलं तरी ते पुरेसं असल्यासारखं वाटत नाही. शेवटी शेवटी लिहून लिहून आपल्याला हात आहे की नाही याची जाणीवदेखील राहत नाही. अजून थोडा वेळ तसंच लिहलं तर सरळ हातापासून त्याचा वेगळा तुकडा पडेल असं वाटायला लागतं.
    वेळ संपल्याची घंटा होते. परीक्षक पेपर गोळा करायला सुरुवात करतात. एखादा चिवट गडी अजूनही लिहितच असतो. परीक्षक त्याच्या हातातून पेपर जवळजवळ हिसकावून घेतात. मी हाताची बोटं तुटेपर्यंत वाकवून, गेलेली संवेदना परत मिळवायचा प्रयत्न करत असतो. सुरुवातीसारखाच गलका वर्गात आता परत सुरु झालेला असतो. प्रश्नपत्रिकेचं पद्धतशीर शवविच्छेदन सुरु झालेलं असतं. शिवाय मला नेहमीप्रमाणे मागून काहीतरी शब्द ऐकू येतात, "आमचे हे नंदूरबारला असतात." "मग तुम्ही काय नोकरी वगैरे करता का?" वगैरे वगैरे... मात्र नंदूरबार पुण्यापासून किती लांब आहे याचा काही अंदाज नसल्याने नक्की किती हळहळ व्यक्त करावी हे मला कळत नाही. फारसा वेळ न घालवता मी पॅड, कंपास सॅकमध्ये भरतो आणि बाहेर पडतो.
    बाहेर आल्यावर उन्हाचा कडाका पाहून परीक्षा हॉलमधलं उकडणं म्हणजे काहीच नाही हा निष्कर्ष सहज निघतो. परत मग रिक्षाचा शोध. एकजण पुणे सातारा रोडला यायला तयार होतो. नेहमीसारखा खडाक टिंग आवाज नि रिक्षाचा प्रवास सुरु! दुपारच्या दोन वाजताच्या ऊन्हाच्या गरम झळा रिक्षात प्रवेश करत असतात. मी केलेला अभ्यास, मी लिहलेला पेपर आणि मला मिळणारे गुण यांचा विचार करत मी आरामशीरपणे मागे टेकून बसतो. चुक..... चुक..... चुक अशा आवाजात मीटरचे आकडे पडत राहतात.

सोमवार, १० मे, २०१०

दैनंदिनीतले एक पान...

    मराठी ग्रंथालयातून आणलेली पुस्तकं बरीच दिवस बदललेली नव्हती. गोनीदांचे रामायण तर एका बैठकीतच संपवले होते. दुसरे होते ते द. पा. खांबेटे यांचे मोठ्या माणसांच्या गंमतीदार गोष्टी. राजवाडे, सेतूमाधवराव पगडी, वासुदेवशास्त्री खरे, टिळक, आगरकर, राजारामशास्त्री भागवत, न.चि. केळकर, ज्ञानकोशकार केतकर, धर्मानंद कोसंबी, वा.म. जोशी, रानडे अशा पर्वतप्राय व्यक्तींच्या अनेक आठवणी, किस्से, त्यांचा व्यासंग वगैरे वगैरे...
    अभिजीत गाडीवरुन सोडतो म्हणाला. येताना बसने येणार होतो. निघालो. अभिजीतचे गाडी चालवणे म्हणजे काय! जीव मुठीत धरुनच त्याच्या मागे बसावे लागते. त्यात गाडी पण करिझ्मा. मग काय विचारायलाच नको. पुण्यातल्या वाहतुकीची तर मी धास्ती घेतली आहे. आधीच चालता नीट येण्याची मारामार, त्यात घरी सुखरुप येतो की नाही याची निश्चिती नाही.
ग्रंथालयात गेलो तर फारशी गर्दी नव्हती. हे ग्रंथालय म्हणजे पुणे मराठी ग्रंथालय. भलेमोठे आहे. कुठले पुस्तक मिळत नाही असे होत नाही. प्रत्येक पुस्तकावर साडेतीन रुपये असा सात रुपये दंड भरला. या ग्रंथालयात दहा दिवसात पुस्तक बदलावे लागते, नाहीतर दंड भरा. ब्रिटीश लायब्ररीत मात्र असे नाही, महिनाभर तर ठेवताच येते पण फोनवरुनही मुदत वाढवता येते. ब्रिटीश लायब्ररीबद्दल बरेच सांगण्यासारखे आहे ते नंतर कधीतरी.
    विशेष असे कुठलेच पुस्तक घ्यायचे नव्हते. त्यामुळे जास्त धुंडाळत न बसता टेबलावरच मिळालेली दोन घेतली. निवडक केशवसुत आणि निरंजन घाटे यांचा मृत्यूदूत हा विज्ञानकथा संग्रह.
    मग निघालो परत चालत, 'नीलम’ भांड्यांचे भले मोठे दुकान मागे पडले. नुमविच्या समोर आलो. या शाळेला इतके भयंकर रंग दिले आहेत अलीकडेच. कुणीतरी एखाद्या इमारतीला रंग देताना मूळ रंगांचा वापर करेल का? लाल काय, काळा काय, पिवळा काय कशाला काही अर्थच नाही. एखाध्या नुमवियाला याचा राग येईल पण खरेच हे रंग फारच विचित्र दिसतात. पुढे निघालो, अप्पा बळवंत चौक! जिकडे बघावे तिकडे पुस्तकांचीच दुकाने. धार्मिक पाहिजेत ती आहेत, कथा कादंबर्‍या आहेत, शालेय आहेत, क्रमिक आहेत, नोट्स आहेत गाईड्स आहेत, इंग्रजी आहेत, अनुवादित आहेत. पांढर्‍यावर काळे करण्यासाठी लागणार्‍या स्टेशनरीची भलीमोठी दुकाने आहेत. कोणी रस्त्यावर पथार्‍या मांडून बसले आहे, कोणी पुस्तके अर्ध्या किंमतीत विकत आहे, कुणी विकत घेत आहे. यात भर म्हणजे सकाळचे अकराचे रणरणते उन आणि पुणेरी रस्त्यांवरची अविभाज्य, बेफाम वाहतूक. मध्येच एमेटीवर एक ज्येष्ठ गृहस्थ आपल्या नातीला घेऊन निघाले होते. सिग्नलची वेळ संपली तरी हे आपले चाललेच आहेत पुढे पुढे. पोलिसाने शिट्टी वाजवली, त्यांना साईडला घेतले. मी पुढे निघालो, तर "एवढे काय अर्जंट काम काढले आहे आज, काका?" असे काहीतरी शब्द मागे ऐकू येत होते. प्रगतीत घुसलो. माझे एक अभ्यासाचे पुस्तक घेतले. बिचार्‍याकडे नव्हते, ते त्याने दुसरीकडून आणून दिले.
    मग पुढे चालत परत वसंत टॉकीजला आलो. सकाळच्या वेळेस फारशी गर्दी नव्हती. बसेस येत होत्या, जात होत्या, माणसे उतरत होती, चढत होती, काही पुढेच जाऊन थांबत होत्या, त्यांच्या मागे माणसांची पळापळ, कोणी मध्येच थुंकत होते. मग शेवटी बस आली एकदाची. बसमध्ये आलो. एकदम रिकामी. ड्रायव्हर,कंडक्टरशिवाय त्यात कुणीच नव्हते. गजबजलेल्या रस्त्यांवरुन बस निघाली. पुढेच बसलो होतो. थोडी पुढे जातेय न जातेय तोच परत बस थांबतेय, मध्येच एखादा रिक्षावाला कडमडतोय. बसची पाटी जरा विचित्रच आहे. विचित्र म्हणजे ती उलटी लावलेली आहे. कात्रज ते आकुर्डी स्टेशन. त्यामुळे बस आकुर्डीवरुन येऊन कात्रजला जाणार असूनही ती कात्रजला चाललीये की आकुर्डीला हे लोकांना कळत नाहीये. लोक मग पुढच्या दारात येऊन ड्रायव्हरला विचारतात. एक मध्यमवयीन गृहस्थ विचारतो,"कात्रज का?" ड्रायव्हर काहीच उत्तर देत नाही. गृहस्थ निघून जातो. पुढे एक बाई विचारते, "कात्रज का?" ड्रायव्हर या आत अशी मान हलवतो. बाई आत येते. कंडक्टर एव्हाना माझ्याजवळ येतो. मी दहा रुपयांची नोट देतो. तो एक रुपया सुट्टा मागतो. मी पाच रुपये आणि तिकीट घेतो. बस अजून पुढे सरकते. ती सरकतच असते. बहुतांश वेळ पहिल्यावरच, क्वचित दुसर्‍यावर आणि तिसरा टाकायला तर ड्रायव्हरला वेळच मिळत नाही. मला मात्र क्लच जास्त वेळ दाबून ठेऊ नये हा गाडी शिकताना शिकलेला धडा आठवतो. च्यायला, ही अवाढव्य बस किती ऍव्हरेज देत असेल? ग्लोबल वॉर्मिंग, ग्रीन हाऊस गॅसेस, इंधनबचत यांबद्दल या गृहस्थाचे काय मत असावे?
    पुढे हळूहळू सरकत बस मंडईजवळ येते. इथेही भयंकर गर्दी आहे. एवढे लोक, एवढी त्यांची खरेदी, बारीकसारीक टेंपो, हातगाड्या, मध्येच लागणारी मंदिरं, त्यापुढच्या भक्तांच्या रांगा, कोणी फुलं विकतंय, कोणी नारळ विकतंय, सॉलिड गोंधळ चालू आहे. स्वारगेटला आलो तर वाहतुकीची जाम कोंडी झालेली. इंचाइंचाने सुद्धा वाहतुक पुढे सरकायचे नाव घेईना. अचानक लक्षात येतं की अरे आपल्या सॅकमध्ये दोन सुंदर पुस्तकं आहेत. ती वाचायला इथेच सुरुवात करुया. निवडक केशवसुत.... लेखक वामन देशपांडे! मग मी कविता वाचायला सुरुवात करतो.

एक तुतारी द्या मज आणुनि,
फुंकिन मी जी स्वप्राणानें,
भेदुनि टाकेन सगळी गगनें,
दीर्घ जिच्या त्या किंकाळीनें,
अशी तुतारी द्या मजलागुनि.

इंजिनाजवळून येणारी गरम हवा, प्रदूषण, टळटळते ऊन, कोलाहल या सगळ्यांचे एक जालीम मिश्रण बसमध्ये तयार झाले आहे आणि मी आपला तुतारी वाचतो आहे.

जुने जाऊं द्या मरणालागूनि,
जाळूनि किंवा पुरूनी टाका,
सडत न एक्या ठायी टाका;
सावध! ऐका पुढल्या हांका;
खांद्यास चला खांदा भिडवुनि;

    या बसच्या समोरच दुसरी बस होती. ड्रायव्हर महाशय पुढच्या बसला इतकी चिकटवून चालले होते की जणू काही खांद्याला खांदा भिडवूनच चालला आहे. त्यातनं एखाद्या कोंबडीला पण जायची मारामार होईल. पाच, दहा, पंधरा मिनिटं झाली तर आम्ही आपले तिथेच. ड्रायव्हरच्या मुखावर मात्र कोणताही वैताग दिसत नाही. हे सगळे जणू काही रोजचेच आहे! तो शांतपणे सीटमागच्या कप्प्यातून पाण्याची बाटली (ऍक्वाफिना) बाहेर काढून पाण्याचे घोट घेत राहतो. सगळ्या आयुष्याचा कोळलेला अर्कच पचवण्याचे सामर्थ्य याच्यात असावे.

घातक भलत्या प्रतिबंधावर
हल्ला नेण्या करा त्वरा रे!
उन्नतिचा ध्वज उंच धरा रे
वीरांनो! तर पुढे सरा रे--
आवेशाने गर्जत ’हर-हर’!

    क्वचित पुढची बस सरकलीच तर क्लचवर तो बस उचलत असे. एव्हाना डाव्या बाजूलाही एक बस आलेली आहे. तिच्याही पुढे एक बस आहे. मात्र आमच्या आणि शेजारच्या बसमध्ये एक दुचाकीस्वार चांगलाच अडकलेला आहे. त्याला स्वारगेट चौकात डावीकडे हडपसरकडे जायचे आहे. तो डावीकडच्या बसचालकाला सांगतो की त्याला पलीकडे जाण्यासाठी त्याने थोडी जागा द्यावी. कारण हाही ड्रायव्हर त्याच्या पुढच्या बसला चिकटून चालला आहे. "तुला कुठं जायचंय?" ड्रायव्हरचा प्रश्न! "डावीकडे" हे उत्तर. "मलाही तिकडेच जायचंय" म्हणत ड्रायव्हर मला डोळा मारतो. मला भयंकर हसायला येतं. काय चाललंय काय राव? शेजारचा ड्रायव्हर अजून गाडी आत दाबतो, दुचाकीवाला ए, ओ करत ओरडायला लागतो. शेवटी एकदाचा सिग्नल सुटतो आणि आम्ही पुढे मार्गस्थ होतो. पुढे मग बीआरटीचा मार्ग! इथेही केवळ दोनच बसला यायला जायला जागा असूनही ड्रायव्हर आरामशीरपणे ओव्हरटेक करतोय. लोण्यातून सुरी फिरते तशी तो बस चालवतो. स्वारगेटनंतर लक्ष्मीनारायण, पंचमी हॉटेल, सिटीप्राईड येतं, जातं. बाराचा शो सुरु झालेला असावा. तिकिटखिडकीवर तुरळक माणसं दिसतात. स्टॉप येतात, लोक उतरतात, चढतात, थोड्या काळासाठी का होईना, कंडक्टरची गंगाजळी हळूहळू वाढतेय. विवेकानंद स्मारक येतं, छोट्याशा बागेत सावलीत स्वामी विवेकानंदांचा पुतळा उभा आहे. गळ्यात वाळलेला हार! शेवटी मी माझ्या स्टॉपवर उतरतो.

    ग्रंथालयातून दोन पुस्तकं बदलणं आणि एका पुस्तकाची खरेदी यांसाठी आपण घालवलेला वेळ याचा हिशोब करत मी घरी पोहोचतो. बघू! जमलं तर यावर एखादा लेखही लिहता येईल.