म्हणता म्हणता परीक्षा जवळ आलीये, जवळ आलीये करत आली सुद्धा. शेवटच्या महिन्यात अभ्यासाने चांगलाच जोर पकडला होता. कवितांचा अर्थ लावून लावून डोक्याचा पार भुगा होऊन गेला. दुर्बोध लिहणार्या कवींनी माझ्याकडून अजून चार शिव्या खाल्ल्या. ग्रीक मायथॉलॉजी नसती तर ह्या लोकांना उपाशी मरावे लागले असते हे माझे मत अजूनच ठाम झाले. लिटररी क्रिटिसिझममधून दुसर्यांवर टीकाटिपण्णी करता करता काही लेखकांना आपण स्वत:ही किती रटाळ पुस्तके लिहली आहेत याचेही भान राहिले नाही. निदान प्रसिद्ध करण्यापूर्वी स्वत:च्या पुस्तकाचे परीक्षण केले असते तर आपण लिहलेल्या लिखाणातल्या एकाही वाक्याचा अर्थ लागत नाही हे तरी त्यांच्या लक्षात आले असते. अर्थात यातही, वाळवंटात रखरखाटाने जीव जायची पाळी यावी आणि अचानक हिरवाईने मन सुखावून जावे, असे अनुभव देणारे प्राईड ऍंड प्रेज्युडिससारखे पुस्तकही होते, नाही असे नाही. तरीही एकंदर तक्क्यावर रेलून आरामशीरपणे पुस्तक वाचणे वेगळे आणि What is the tragic flaw in the character of Othello? How far it is responsible for his tragedy? या प्रश्नाचे उत्तर लिहणे वेगळे! नाही का?
तर परीक्षेचा दिवस उगवला. सकाळी अकरा ते दुपारी दोनचा पेपर होता. आबासाहेब गरवारे महाविद्यालयात यंदा आमचे स्थळ आले होते. तसे पाहता या वेळी विद्यापीठाने ते खूपच जवळ दिले म्हणायचे. मागच्या वर्षी त्यांनी मला इंदिरा कॉलेज, ताथवडे इकडे पाठवले होते होते. परीक्षा केंद्र निवडताना पुणे निवडल्याचे मला स्पष्ट आठवत होते. आमच्या गरीबांच्या ऑक्सफर्डला ताथवडे पुण्यातच आहे असे वाटले असावे. त्यावेळी जायला एक; यायला एक तास लागत होता. मला मात्र वाटत होतं की मुंबईलाच चाललो आहे परीक्षा द्यायला.
मात्र यंदा तसे नव्हते. परीक्षेची वेळही सोयस्कर होती. अभिजीतने जाता जाता मला सोडले असते आणि येताना मी आलो असतो. त्याला म्हटले, आपण गाडीतूनच जाऊया. तो हो म्हणाला. (नाहीतरी त्याला असे कुणीतरी म्हणायचे कारण पुरते, लगेच गाडी नेण्यासाठी.) मग निघालो. पुण्यातच जायचे असले तरी सकाळची वाहतूक लक्षात घेता वेळ तर लागणारच होता. गाडीत वाचायला मात्र काही घेतले नाही. उगाच गाडीत वाचायला काहीतरी घ्या आणि नंतर मळमळत असताना एम.ए. चा पेपर लिहा, असे नको व्हायला. मग पोहोचलो परीक्षा केंद्रावर.
एम.एच्या परीक्षांना सगळ्या प्रकारचे लोक हजर असतात. काही काही वेळा वृत्तपत्रात जसे 'समाजाच्या सर्व थरातून लोक आले होते' असे लिहलेले असते अगदी तसेच एम. ए.च्या परीक्षांचे असते. अगदी '८३व्या वर्षी आजींनी दिली एम.ए.ची परीक्षा' या बातमीतल्या आजीबाई नसल्या तरी कॉलेजकुमारांपासून ते ज्येष्ठ नागरीक म्हणता येईल इतपत विविध वयोगटातले परीक्षार्थी हजर असतात. बहुतेकांच्या हातात बाजारात मिळणार्या एकाच लेखकाच्या नोट्स होत्या. या नोट्सचा दर्जाही काय वर्णावा? तसे पाहिले तर एम.ए.च्या बहि:स्थ विद्यार्थ्यांचे हाल कुत्राही खात नाही. अगदी अभ्यासक्रम मिळवण्यापासून ते 'मटेरियल' गोळा करण्यापर्यंत त्यांना रक्त आटवावे लागते. परत मूळ पुस्तकं मिळायची मारामार. मूळ पुस्तक मागितले की अप्पा बळवंतातले दुकानदार हा कुठल्या परग्रहावरुन आला आहे असा चेहरा करुन तुमच्याकडे बघतात. आजूबाजूचे चारपाच जणही तुमच्याकडे अथ पासून इतिपर्यंत टवकारुन बघतात. च्यायला आजकाल मूळ पुस्तक वाचतो कोण?
परत आणि पुणे विद्यापीठाच्या संकेतस्थळाबद्दल काय बोलावे? (खरोखर काहीच बोलत नाही. त्याच्यावर एक स्वतंत्र लेख लिहता येईल. उगाच ब्लॉगच्या एका उत्तम लेखाचा विषय कशाला वाया घालवा?)
आपला नंबर कोणत्या खोलीमध्ये आला आहे हे बघण्यासाठी नोटीस बोर्डाजवळ भयंकर गर्दी उसळलेली असते. तिथे जाऊन मी माझा नंबर शोधतो. परीक्षा हॉलमध्ये शिरताना एवढा गलका कसला चालला आहे असा विचार केल्यावर लक्षात येते की अरे इथे जवळ जवळ ९० टक्के स्त्रियाच जमल्या आहेत. जशा सामुदायिक पोथी वाचन वगैरेला महिला जमतात तशा सामुदायिक एम.ए.परीक्षा द्यायला एखादे महिला मंडळ आले आहे की काय? प्रत्येकजण अगदी अनेक वर्षांच्या ओळखी असल्यासारख्या एकमेकींशी बोलायला सुरुवात करतात. अर्थात मला त्याचे काही वाईट वाटायचे कारण नाही पण थोडे अस्वस्थ वाटायला लागते. या सगळ्यांनी मिळून माझ्याविरुद्ध डाव केला आहे, ते सगळेजण मिळूनच पेपर लिहणार आहेत वगैरे वगैरे विचार माझ्या मनात यायला लागतात. मग परीक्षक वर्गात प्रवेश करतात. "सगळ्यांनी आपापल्या बॅगा, पर्स, सॅक्स पुढे आणून ठेवा. मोबाईल स्विच ऑफ करुन आपापल्या बॅगेत ठेवा. कुणाचाही मोबाईल वाजता कामा नये."वगैरे वगैरे.....
अचानक माझ्या लक्षात येतं की दरवेळेस माझ्या पुढच्या बाकावरचा परीक्षार्थी गैरहजर असण्याची परंपरा यंदा मोडीत निघालेली आहे. एक मुलगी माझ्या पुढच्या बाकावर बसलेली आहे. अर्थात तिचं लिहलेलं बघून मला उत्तरं लिहता येतील अशी शक्यता नसते. (परीक्षेत दहा बारा निबंधासारखी उत्तरं लिहायची असताना कॉपी कसली करणार डोंबलाची?) पण दरवेळेस परीक्षकच चालता चालता मध्येच त्या रिकाम्या बाकावर बसतात आणि एखादा सरडा जसा अगदी पार्श्वभूमीच्या रंगासारखा रंग घेऊन एकरुप होऊन जातो, तसाच हा परीक्षकही विद्यार्थ्यांत बसून, कॉपी करणार्याला रंगेहाथ पकडायचा विचार करत असावा. मात्र यावेळेस तसं होणार नसतं.
मग उत्तरपत्रिका मिळते. माझ्या आख्ख्या विद्यार्थीजीवनातल्या सवयीप्रमाणे मी लगेच पानाच्या दोन्ही बाजूने अगदी थोडे थोडे समास आखून घ्यायला सुरुवात करतो. आपला परीक्षा क्रमांक, तारीख, विषय, सेंटर लिहून होतं. इंग्रजीच्या पेपरलाही मिडीयम ऑफ आन्सर लिहावे लागते. पाच दहा मिनिटं होतात आणि मग तो चिरपरिचित टण्णऽऽ असा आवाज होतो आणि 'याचसाठी केला होता अभ्यास' असं जिच्याबाबत म्हणता येईल ती प्रश्नपत्रिका माझ्या हातात येते. मी ती अधाशासारखी वाचायला सुरुवात करतो.
ह्म.... ह्म.....
अच्छा! .....
हा प्रश्न विचारलाय काय? .....
बोंबला.....
अरे चोरांनो..... कात्रीत पकडायला बघता काय?.....
अरेच्चा हा तर मागच्या वर्षीच्या पेपरात पण होता. अरेरे! मागच्या वर्षी आला म्हणून या वेळी येणार नाही असं वाटून त्याकडे फारसे लक्षच दिले नव्हते आपण....
अरे वा! याचे मुद्दे तर आपण सकाळीच वाचले आहेत. वा वा वा! .....
माझे विचार सुरु होतात. मग एकदम वाचतच किती वेळ गेला हे लक्षात येऊन मी झरकन लिहायला सुरुवात करतो.
वेळ सरकत सरकत पुढे चाललेला असतो. थोडंफार लिहून होतं. मी इकडे तिकडे नजर टाकतो. काही हात भरभर लिहण्यात गुंतलेले असतात. काही शून्यात नजर लावून बसलेले असतात. असं रिकाम्या बसलेल्या लोकांकडे बघितल्यावर जरा बरं वाटतं. मात्र आता एक नवीनच त्रास सुरु झाला असल्याचं मला जाणवतं. माझ्यासमोर बसलेल्या मुलीचे केस सॉलीड लांब आहेत. अगदी शाम्पूच्या जाहिरातीत दाखवतात तसे 'स्मूथ नि सिल्की'! मध्येच तिने मानेला झटका दिला की तो आख्खाच्या आख्खा केशसांभार इकडून तिकडे हालतो. माझं लक्ष विचलित होतं. काय वैताग आहे हा? थोडं लिहलं की लगेच झटका. अजून एक परिच्छेद लिहला की परत झटका. मी वैतागतो. मग तो सरडा परीक्षकच काय वाईट होता?
या वर्गात वरती फॅन लावलेले आहेत पण ते दोनच आहेत आणि नेहमीप्रमाणे माझ्यापासून बरेच लांब आहेत. एखादी वार्याची झुळूक आलीच तरी त्या गरम वार्याने बिलकूल गार वाटत नाही. बर्यापैकी उकाडा जाणवत राहतो. पांडुरंग सांगवीकरसारखा आपणही शर्ट काढून पेपर लिहावा की काय असा विचार माझ्या मनात येतो. पण तेवढे धाडस माझ्याच्याने अर्थातच होत नाही. उगाच एवढ्या बायाबापड्यांसमोर असला आचरटपणा कसा करणार?
बघता बघता पेपराची वेळ संपत येते. शाम्पू मुलगी पण जोरात लिहीत असते. नेहमीप्रमाणे मी मागे पडलेला असतो. सुरुवातीच्या अक्षरात आणि आताच्या अक्षरात थोडा फरक दिसायला सुरुवात झालेली असते. रिस्टोरेशन कॉमेडीचे मुद्दे आठवता आठवत नसतात. बर्याच प्रयत्नांनी एक मुद्दा आठवतो. Licentious way of living..... दुसरा आठवतो Loose morals..... मग पुढचे सगळेच आठवायला लागतात Adulterous relationships.....वगैरे वगैरे
ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर चं जसं गणितात एक आणि एकच उत्तर असतं तसं एम.ए. बाबत कधीच होत नाही. शिवाय गणितात आख्खा पेपर सोडवल्याचं एक समाधान तरी जाणवतं. आपण काय गणितं सोडवली आणि किती गुण मिळणार आहेत याचा स्पष्ट अंदाज बांधता येतो. इथे तसं काहीही नसतं. कितीही लिहलं तरी ते पुरेसं असल्यासारखं वाटत नाही. शेवटी शेवटी लिहून लिहून आपल्याला हात आहे की नाही याची जाणीवदेखील राहत नाही. अजून थोडा वेळ तसंच लिहलं तर सरळ हातापासून त्याचा वेगळा तुकडा पडेल असं वाटायला लागतं.
वेळ संपल्याची घंटा होते. परीक्षक पेपर गोळा करायला सुरुवात करतात. एखादा चिवट गडी अजूनही लिहितच असतो. परीक्षक त्याच्या हातातून पेपर जवळजवळ हिसकावून घेतात. मी हाताची बोटं तुटेपर्यंत वाकवून, गेलेली संवेदना परत मिळवायचा प्रयत्न करत असतो. सुरुवातीसारखाच गलका वर्गात आता परत सुरु झालेला असतो. प्रश्नपत्रिकेचं पद्धतशीर शवविच्छेदन सुरु झालेलं असतं. शिवाय मला नेहमीप्रमाणे मागून काहीतरी शब्द ऐकू येतात, "आमचे हे नंदूरबारला असतात." "मग तुम्ही काय नोकरी वगैरे करता का?" वगैरे वगैरे... मात्र नंदूरबार पुण्यापासून किती लांब आहे याचा काही अंदाज नसल्याने नक्की किती हळहळ व्यक्त करावी हे मला कळत नाही. फारसा वेळ न घालवता मी पॅड, कंपास सॅकमध्ये भरतो आणि बाहेर पडतो.
बाहेर आल्यावर उन्हाचा कडाका पाहून परीक्षा हॉलमधलं उकडणं म्हणजे काहीच नाही हा निष्कर्ष सहज निघतो. परत मग रिक्षाचा शोध. एकजण पुणे सातारा रोडला यायला तयार होतो. नेहमीसारखा खडाक टिंग आवाज नि रिक्षाचा प्रवास सुरु! दुपारच्या दोन वाजताच्या ऊन्हाच्या गरम झळा रिक्षात प्रवेश करत असतात. मी केलेला अभ्यास, मी लिहलेला पेपर आणि मला मिळणारे गुण यांचा विचार करत मी आरामशीरपणे मागे टेकून बसतो. चुक..... चुक..... चुक अशा आवाजात मीटरचे आकडे पडत राहतात.
मंगळवार, १८ मे, २०१०
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कधी कधी स्वप्न पडल्याचं स्वप्न पडतं, तसा परिक्षेत 'परिक्षेचा दिवस' हा निबंधविषय असता तर तुम्हाला उत्तम गुण मिळाले असते. हमखास लागू होणारा नियम मात्र हा की गुणपत्रिका कॉपी करणार्यावर अॅडल्टरस प्रेम करते; त्या प्रेमाचा बोभाटा झाल्यास मात्र नशिबी फजिती लिहिल्या ज़ाते.
उत्तर द्याहटवापरिक्षेत एकच पेपर होता की उरलेल्या विषयांच्या अभ्यासाला ब्लॉगलेखनाच्या तुलनेत दुय्यम महत्त्व आहे?
- नानिवडेकर
Bhaarriii...sahiye kharech...!!!
उत्तर द्याहटवा"कधी कधी स्वप्न पडल्याचं स्वप्न पडतं, तसा परिक्षेत 'परिक्षेचा दिवस' हा निबंधविषय असता तर तुम्हाला उत्तम गुण मिळाले असते." - धन्यवाद.
उत्तर द्याहटवा"हमखास लागू होणारा नियम मात्र हा की गुणपत्रिका कॉपी करणार्यावर अॅडल्टरस प्रेम करते; त्या प्रेमाचा बोभाटा झाल्यास मात्र नशिबी फजिती लिहिल्या ज़ाते." - हा हा हा! :-)
"परिक्षेत एकच पेपर होता की उरलेल्या विषयांच्या अभ्यासाला ब्लॉगलेखनाच्या तुलनेत दुय्यम महत्त्व आहे?" - नाही तसे नाही. परीक्षा झाल्यावरच लेख लिहला आहे. :-)
मैथिली, प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
जगातला अल्टीमेट लेख आहे.... सुभाष (सॉरी, सौरभ) तू उत्तम लिखाण करतोस... उत्तम गद्य.... क्लासिक... मराठीमध्ये खूप महान लेखक होऊन गेले पण शैलीकरता माझे आवडते ३ लेखक होते. गोनीदा, श्रीना आणि पानवलकर... यांचे ललित खूप आवडते... त्यात आता तुझी भर पडली....
उत्तर द्याहटवासमीक्षा म्हणजे चांगला पिकलेला फणस काळजीपूर्वक फोडल्यावर गरे फेकून देऊन उरलेला अखाद्य भाग चघळत बसणे हे आपणास माहीत नाही काय?
उत्तर द्याहटवा"समीक्षा म्हणजे चांगला पिकलेला फणस काळजीपूर्वक फोडल्यावर गरे फेकून देऊन उरलेला अखाद्य भाग चघळत बसणे हे आपणास माहीत नाही काय?" - :-) झकास उपमा आहे.
उत्तर द्याहटवाधन्यवाद अनामित...
मस्त लेख. विद्यार्थी कोणत्याही भाषेच्या साहित्याचा असो, 'मोठी उत्तरे आठवणे व ती लिहिणे' हे दु:ख त्याला चुकत नाही.
उत्तर द्याहटवापरीक्षेचे दिवसः गेले (एकदाचे) ते दिन गेले!
(हा ब्लॉग पहिल्यांदाच वाचनात आला त्यामुळे जुन्या पोस्ट्सना प्रतिसाद देते आहे.) प्रतिक्रिया पोस्ट होते आहे, ते कळत नाही आहे.
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. (प्रतिक्रिया पोस्ट झाली आहे. :D )
उत्तर द्याहटवा