मराठी ग्रंथालयातून आणलेली पुस्तकं बरीच दिवस बदललेली नव्हती. गोनीदांचे रामायण तर एका बैठकीतच संपवले होते. दुसरे होते ते द. पा. खांबेटे यांचे मोठ्या माणसांच्या गंमतीदार गोष्टी. राजवाडे, सेतूमाधवराव पगडी, वासुदेवशास्त्री खरे, टिळक, आगरकर, राजारामशास्त्री भागवत, न.चि. केळकर, ज्ञानकोशकार केतकर, धर्मानंद कोसंबी, वा.म. जोशी, रानडे अशा पर्वतप्राय व्यक्तींच्या अनेक आठवणी, किस्से, त्यांचा व्यासंग वगैरे वगैरे...
अभिजीत गाडीवरुन सोडतो म्हणाला. येताना बसने येणार होतो. निघालो. अभिजीतचे गाडी चालवणे म्हणजे काय! जीव मुठीत धरुनच त्याच्या मागे बसावे लागते. त्यात गाडी पण करिझ्मा. मग काय विचारायलाच नको. पुण्यातल्या वाहतुकीची तर मी धास्ती घेतली आहे. आधीच चालता नीट येण्याची मारामार, त्यात घरी सुखरुप येतो की नाही याची निश्चिती नाही.
ग्रंथालयात गेलो तर फारशी गर्दी नव्हती. हे ग्रंथालय म्हणजे पुणे मराठी ग्रंथालय. भलेमोठे आहे. कुठले पुस्तक मिळत नाही असे होत नाही. प्रत्येक पुस्तकावर साडेतीन रुपये असा सात रुपये दंड भरला. या ग्रंथालयात दहा दिवसात पुस्तक बदलावे लागते, नाहीतर दंड भरा. ब्रिटीश लायब्ररीत मात्र असे नाही, महिनाभर तर ठेवताच येते पण फोनवरुनही मुदत वाढवता येते. ब्रिटीश लायब्ररीबद्दल बरेच सांगण्यासारखे आहे ते नंतर कधीतरी.
विशेष असे कुठलेच पुस्तक घ्यायचे नव्हते. त्यामुळे जास्त धुंडाळत न बसता टेबलावरच मिळालेली दोन घेतली. निवडक केशवसुत आणि निरंजन घाटे यांचा मृत्यूदूत हा विज्ञानकथा संग्रह.
मग निघालो परत चालत, 'नीलम’ भांड्यांचे भले मोठे दुकान मागे पडले. नुमविच्या समोर आलो. या शाळेला इतके भयंकर रंग दिले आहेत अलीकडेच. कुणीतरी एखाद्या इमारतीला रंग देताना मूळ रंगांचा वापर करेल का? लाल काय, काळा काय, पिवळा काय कशाला काही अर्थच नाही. एखाध्या नुमवियाला याचा राग येईल पण खरेच हे रंग फारच विचित्र दिसतात. पुढे निघालो, अप्पा बळवंत चौक! जिकडे बघावे तिकडे पुस्तकांचीच दुकाने. धार्मिक पाहिजेत ती आहेत, कथा कादंबर्या आहेत, शालेय आहेत, क्रमिक आहेत, नोट्स आहेत गाईड्स आहेत, इंग्रजी आहेत, अनुवादित आहेत. पांढर्यावर काळे करण्यासाठी लागणार्या स्टेशनरीची भलीमोठी दुकाने आहेत. कोणी रस्त्यावर पथार्या मांडून बसले आहे, कोणी पुस्तके अर्ध्या किंमतीत विकत आहे, कुणी विकत घेत आहे. यात भर म्हणजे सकाळचे अकराचे रणरणते उन आणि पुणेरी रस्त्यांवरची अविभाज्य, बेफाम वाहतूक. मध्येच एमेटीवर एक ज्येष्ठ गृहस्थ आपल्या नातीला घेऊन निघाले होते. सिग्नलची वेळ संपली तरी हे आपले चाललेच आहेत पुढे पुढे. पोलिसाने शिट्टी वाजवली, त्यांना साईडला घेतले. मी पुढे निघालो, तर "एवढे काय अर्जंट काम काढले आहे आज, काका?" असे काहीतरी शब्द मागे ऐकू येत होते. प्रगतीत घुसलो. माझे एक अभ्यासाचे पुस्तक घेतले. बिचार्याकडे नव्हते, ते त्याने दुसरीकडून आणून दिले.
मग पुढे चालत परत वसंत टॉकीजला आलो. सकाळच्या वेळेस फारशी गर्दी नव्हती. बसेस येत होत्या, जात होत्या, माणसे उतरत होती, चढत होती, काही पुढेच जाऊन थांबत होत्या, त्यांच्या मागे माणसांची पळापळ, कोणी मध्येच थुंकत होते. मग शेवटी बस आली एकदाची. बसमध्ये आलो. एकदम रिकामी. ड्रायव्हर,कंडक्टरशिवाय त्यात कुणीच नव्हते. गजबजलेल्या रस्त्यांवरुन बस निघाली. पुढेच बसलो होतो. थोडी पुढे जातेय न जातेय तोच परत बस थांबतेय, मध्येच एखादा रिक्षावाला कडमडतोय. बसची पाटी जरा विचित्रच आहे. विचित्र म्हणजे ती उलटी लावलेली आहे. कात्रज ते आकुर्डी स्टेशन. त्यामुळे बस आकुर्डीवरुन येऊन कात्रजला जाणार असूनही ती कात्रजला चाललीये की आकुर्डीला हे लोकांना कळत नाहीये. लोक मग पुढच्या दारात येऊन ड्रायव्हरला विचारतात. एक मध्यमवयीन गृहस्थ विचारतो,"कात्रज का?" ड्रायव्हर काहीच उत्तर देत नाही. गृहस्थ निघून जातो. पुढे एक बाई विचारते, "कात्रज का?" ड्रायव्हर या आत अशी मान हलवतो. बाई आत येते. कंडक्टर एव्हाना माझ्याजवळ येतो. मी दहा रुपयांची नोट देतो. तो एक रुपया सुट्टा मागतो. मी पाच रुपये आणि तिकीट घेतो. बस अजून पुढे सरकते. ती सरकतच असते. बहुतांश वेळ पहिल्यावरच, क्वचित दुसर्यावर आणि तिसरा टाकायला तर ड्रायव्हरला वेळच मिळत नाही. मला मात्र क्लच जास्त वेळ दाबून ठेऊ नये हा गाडी शिकताना शिकलेला धडा आठवतो. च्यायला, ही अवाढव्य बस किती ऍव्हरेज देत असेल? ग्लोबल वॉर्मिंग, ग्रीन हाऊस गॅसेस, इंधनबचत यांबद्दल या गृहस्थाचे काय मत असावे?
पुढे हळूहळू सरकत बस मंडईजवळ येते. इथेही भयंकर गर्दी आहे. एवढे लोक, एवढी त्यांची खरेदी, बारीकसारीक टेंपो, हातगाड्या, मध्येच लागणारी मंदिरं, त्यापुढच्या भक्तांच्या रांगा, कोणी फुलं विकतंय, कोणी नारळ विकतंय, सॉलिड गोंधळ चालू आहे. स्वारगेटला आलो तर वाहतुकीची जाम कोंडी झालेली. इंचाइंचाने सुद्धा वाहतुक पुढे सरकायचे नाव घेईना. अचानक लक्षात येतं की अरे आपल्या सॅकमध्ये दोन सुंदर पुस्तकं आहेत. ती वाचायला इथेच सुरुवात करुया. निवडक केशवसुत.... लेखक वामन देशपांडे! मग मी कविता वाचायला सुरुवात करतो.
एक तुतारी द्या मज आणुनि,
फुंकिन मी जी स्वप्राणानें,
भेदुनि टाकेन सगळी गगनें,
दीर्घ जिच्या त्या किंकाळीनें,
अशी तुतारी द्या मजलागुनि.
इंजिनाजवळून येणारी गरम हवा, प्रदूषण, टळटळते ऊन, कोलाहल या सगळ्यांचे एक जालीम मिश्रण बसमध्ये तयार झाले आहे आणि मी आपला तुतारी वाचतो आहे.
जुने जाऊं द्या मरणालागूनि,
जाळूनि किंवा पुरूनी टाका,
सडत न एक्या ठायी टाका;
सावध! ऐका पुढल्या हांका;
खांद्यास चला खांदा भिडवुनि;
या बसच्या समोरच दुसरी बस होती. ड्रायव्हर महाशय पुढच्या बसला इतकी चिकटवून चालले होते की जणू काही खांद्याला खांदा भिडवूनच चालला आहे. त्यातनं एखाद्या कोंबडीला पण जायची मारामार होईल. पाच, दहा, पंधरा मिनिटं झाली तर आम्ही आपले तिथेच. ड्रायव्हरच्या मुखावर मात्र कोणताही वैताग दिसत नाही. हे सगळे जणू काही रोजचेच आहे! तो शांतपणे सीटमागच्या कप्प्यातून पाण्याची बाटली (ऍक्वाफिना) बाहेर काढून पाण्याचे घोट घेत राहतो. सगळ्या आयुष्याचा कोळलेला अर्कच पचवण्याचे सामर्थ्य याच्यात असावे.
घातक भलत्या प्रतिबंधावर
हल्ला नेण्या करा त्वरा रे!
उन्नतिचा ध्वज उंच धरा रे
वीरांनो! तर पुढे सरा रे--
आवेशाने गर्जत ’हर-हर’!
क्वचित पुढची बस सरकलीच तर क्लचवर तो बस उचलत असे. एव्हाना डाव्या बाजूलाही एक बस आलेली आहे. तिच्याही पुढे एक बस आहे. मात्र आमच्या आणि शेजारच्या बसमध्ये एक दुचाकीस्वार चांगलाच अडकलेला आहे. त्याला स्वारगेट चौकात डावीकडे हडपसरकडे जायचे आहे. तो डावीकडच्या बसचालकाला सांगतो की त्याला पलीकडे जाण्यासाठी त्याने थोडी जागा द्यावी. कारण हाही ड्रायव्हर त्याच्या पुढच्या बसला चिकटून चालला आहे. "तुला कुठं जायचंय?" ड्रायव्हरचा प्रश्न! "डावीकडे" हे उत्तर. "मलाही तिकडेच जायचंय" म्हणत ड्रायव्हर मला डोळा मारतो. मला भयंकर हसायला येतं. काय चाललंय काय राव? शेजारचा ड्रायव्हर अजून गाडी आत दाबतो, दुचाकीवाला ए, ओ करत ओरडायला लागतो. शेवटी एकदाचा सिग्नल सुटतो आणि आम्ही पुढे मार्गस्थ होतो. पुढे मग बीआरटीचा मार्ग! इथेही केवळ दोनच बसला यायला जायला जागा असूनही ड्रायव्हर आरामशीरपणे ओव्हरटेक करतोय. लोण्यातून सुरी फिरते तशी तो बस चालवतो. स्वारगेटनंतर लक्ष्मीनारायण, पंचमी हॉटेल, सिटीप्राईड येतं, जातं. बाराचा शो सुरु झालेला असावा. तिकिटखिडकीवर तुरळक माणसं दिसतात. स्टॉप येतात, लोक उतरतात, चढतात, थोड्या काळासाठी का होईना, कंडक्टरची गंगाजळी हळूहळू वाढतेय. विवेकानंद स्मारक येतं, छोट्याशा बागेत सावलीत स्वामी विवेकानंदांचा पुतळा उभा आहे. गळ्यात वाळलेला हार! शेवटी मी माझ्या स्टॉपवर उतरतो.
ग्रंथालयातून दोन पुस्तकं बदलणं आणि एका पुस्तकाची खरेदी यांसाठी आपण घालवलेला वेळ याचा हिशोब करत मी घरी पोहोचतो. बघू! जमलं तर यावर एखादा लेखही लिहता येईल.
सोमवार, १० मे, २०१०
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
>>> ग्रंथालयातून दोन पुस्तकं बदलणं आणि एका पुस्तकाची खरेदी यांसाठी आपण घालवलेला वेळ याचा हिशोब करत मी घरी पोहोचतो. बघू! जमलं तर यावर एखादा लेखही लिहता येईल.
उत्तर द्याहटवा-- ha, ha, lai bhari. Jamalay lekh!
Classic lekh... ekdam awadala... nirikshan bhari ahe.. pan lekh jast bhawanyache karan weglech ahe.. this used to be my time table of the vacation after 10th standard.. exactly the same... Going from Ramyanagari with 13 number bus to PuMaGr and then coming back by 13 or 2 or khadi machine.. ek number... ani shewati shewati kawita tar mastach ghetlis...
उत्तर द्याहटवाAlso, just for the sake of information, I have book which is nothing but a hard bound photocopy of Keshawsut's poetry diary. It contains all his poems in his own handwriting... Jewha milale tewha harakhun gelo hoto...
उत्तर द्याहटवानंदन, थॅंक्स! तुझा ब्लॉग काय म्हणतोय? :-(
उत्तर द्याहटवानिखिल, अरे हो! आपण कधीतरी सायकलवरपण जात असू. आठवतंय का तुला? तुझे खाते आता चालू आहे का?
हे केशवसुतांचे समग्र पुस्तक आहे का? कोणता प्रकाशक? काही माहिती?
are lai bhari!!!!!classic zalay lekh! pune jiwant keles tu!! awadla apalyala!!
उत्तर द्याहटवाbtw te samgr keshavsut pustak Maharashtra govt. nech publish kele ahe.
धन्यवाद बेल्लारीकर!
उत्तर द्याहटवाहे पुस्तक कुठे मिळते का बघतो आता! काही अडचण येऊ नये.
"लोण्यातून सुरी फिरते तशी तो बस चालवतो." ...
उत्तर द्याहटवासुंदर!!! आज प्रथमच तुमचा ब्लॉग वाचला. लिहिण्याची शैली आवडली.
धन्यवाद गौरी!
उत्तर द्याहटवा