गुरुवार, १६ जून, २०११

इंद्रधनुष्य

       बराच वेळ जोर धरलेला पाऊस आता ओसरला होता. खिडकीच्या काचांवरचे पावसाचे थेंब ओघळून गेले होते. पावसानंतर नेहमी जाणवणारा हवेतला गारवा एकाच वेळी सुखकर वाटत होता आणि अंगावर काटाही आणत होता. मागे रेंगाळलेले पावसाचे एकदोन थेंब पडत होते पण त्यांच्याकडे खास लक्ष देण्याची काही गरज नव्हती. पावसात काही काळ विसावलेली रस्त्यावरली वाहतूक परत गती पकडत होती आणि पावसापासून बचाव करण्याकरता दुकानांच्या दर्शनी भागात थांबलेले लोकही एक एक करुन आपल्या वाटेने निघाले होते. सुटलेल्या थंडगार वार्‍यामुळे आपले हात अंगाभोवती लपेटून, रस्त्यावरच्या पाण्यातून वाट काढत माणसं परत चालायला लागली होती.

       घरातली टेलिफोनची रिंग तीनचारदा वाजली आणि थांबली. आतल्या खोलीतून कुणीतरी फोन घेतला असावा. कारण पहिल्या हॅलो नंतर चालू झालेलं बोलणं लांबून अस्पष्ट ऐकू येत होतं. थोड्यावेळाने तेही थांबलं आणि एका महिलेच्या आवाजातली हाक घरभरात ऐकू आली.

       "अमित, काय करतोयस? इकडे ये. काम आहे जरा."

       ज्या कुणाला ही हाक मारली होती तो २२ वर्षांचा एक तरुण मुलगा होता. सध्या तरी तो कॉंम्प्युटरसमोर बसलेला होता आणि पहिल्या हाकेला ओ देण्यासाठी तो कधीच प्रसिद्ध नव्हता. त्यामुळे आतनं काहीतरी आवाज आला अशी नोंद त्याच्या मेंदूने केली खरी पण त्याजोगी हालचाल करायच्या फंदात कुणी पडले नाही. भिंतीवरल्या घड्याळातल्या लंबकाची इकडून तिकडे आंदोलने चालूच होती. थोडा वेळ असाच गेल्यावर दुसर्‍यांदा मारलेली हाक मात्र पहिल्यापेक्षा खूपच जोरात होती आणि घरभर भल्यामोठ्या आवाजात अगदी स्पष्टपणे ऐकू आली. एवढ्या मोठ्या आवाजाचा इच्छित परिणाम न होता तर आश्चर्यच! तो तरुण मुलगा चेहर्‍यावर आठ्या घेऊन मुकाट्याने उठला. घरात कुणीही मोठ्या आवाजात बोलले, ओरडले, हाका मारल्या तर त्याला अस्वस्थ वाटत असे आणि 'नेहमीच हा आवाज घराबाहेर गेला असेल का?', 'कुणाला ऐकू आला असेल का?', 'एवढ्या मोठ्याने घरात आरडाओरडा करायची काही गरज आहे का?' असे प्रश्न त्याच्या मनात उत्पन्न होत. त्या बाबतीत खरंतर एवढा विचार करायची गरज नव्हती पण त्याला अस्वस्थ वाटत असे हेही तितकेच खरे होते. दुसरे म्हणजे वेळेवर न जाऊन पुढच्या आरडाओरड्याला तोंड देण्यापेक्षा आता लगेच जागेवरुन हलले तर ते जास्त फायद्याचे होते. कारण एकदा वेळेवर गेलं नाही तर त्याच्या आईची बडबड बराच वेळ चालू राहिली असती आणि आधी सांगितल्याप्रमाणे त्याला मोठमोठ्या आवाजात बोललेले, आरडाओरडा केलेले तर बिलकुल आवडत नसे. त्यामुळे शक्यतोवर ते टाळण्याकडे त्याचा साहजिकच कल असे.

"काय झालं एवढं मोठमोठ्याने हाका मारायला? काय काम आहे?"
"पहिल्या हाकेलाच ओ दिली असती आणि आत आला असतास तर मग कुणाला ओरडावं लागलं असतं?"
"तुला मी कितीवेळा सांगितलंय मोठमोठ्याने हाका मारत जाऊ नकोस म्हणून?"
"पण तसं केल्याशिवाय तुम्ही हालत नाही त्याला मी काय करु?"

       हे शेवटचे वाक्य एकदम खरे होते. मोठ्या आवाजात हाक मारल्याशिवाय या घरात कुणीही कधीही हालत नसे. आणि आपण मोठ्या आवाजात हाका मारलेले, बोललेले, ओरडलेले आपल्या मुलाला आवडत नाही हेही या आईला चांगले माहित होते. तरीही कधीकधी ती मुद्दाम तसे करत असे; कारण मग असं मुद्दाम मोठ्या आवाजात बोलल्यावर आपल्या मुलाचा संत्रस्त, वैतागलेला चेहरा बघण्यातही एक वेगळीच मजा येत असे. आताही त्याच्या नकळत आपले हसू दाबत आणि आपल्या बोलण्यातून ते जाणवणार नाही याची काळजी घेत तिने पुढे बोलायला सुरुवात केली.

       "अभिजीतचा फोन आला होता. आपल्या गाडीची चावी हरवली आहे. तुला घरातली दुसरी चावी घेऊन शालिमारजवळ बोलवलं आहे."
"काय? काय हरवलं आहे?" त्याने विचारले.
"चावी"
"कशाची चावी?"
"आपल्या गाडीची"
"कुठली गाडी?"
"दुचाकी रे!"
"कशी काय हरवली?"
"ते काय त्याने सांगितलं नाही. तुला पाठवून दे म्हणाला. शालिमारजवळ तो उभा आहे. लगेच यायला सांगितलं आहे."
"पण अशी कशी काय हरवली चावी? गाडी घेऊनच गेला आहे ना तो? मग चालवतानाच कशी हरवली मध्येच?"
"ते काय सांगितलं नाही त्याने. बहुतेक खिशातून पडली असेल."
"काय वैताग आहे हा! आता जा म्हणाव बोंबलत पावसात. आणि मी जाऊ कसा? गाडी तर तोच घेऊन गेला आहे."
"तुला रिक्षाने यायला सांगितलं आहे."
"रिक्षाने? एवढ्या जवळ यायला रिक्षावाला तयार होईल का?"
"न यायला काय झालं? दीडदोन किलोमीटर तर सहज असेल शालिमार."
"नाहीतर आपली चारचाकी गाडी घेऊन जाऊ का?"
"काही नको. तुझ्याकडे अजून लायसन्स नाही."
"पण मला चालवता तर येते ना?"
"तरीही नको. सांगितलंय तेवढं कर."

       आता इथे पुढे बोलायला काही उरलंच नव्हतं असं म्हणता येईल. या मुलाला चारचाकी गाडी चालवता येत होती हे खरे असले तरी शहरात, सगळ्या वाहतुकीत गाडी चालवायला त्याला अजूनही नीटसे जमत नव्हते. त्यामुळे आपले म्हणणे त्याने अजून पुढे रेटले नाही. शिवाय वाहतुक पोलिसाने पकडले तर काय? या प्रश्नाचाही विचार करणे आवश्यक होते. विनाकारण भुर्दंड सोसावा लागण्याची शक्यता होती.

       बेडरुममधल्या लाकडी कपाटातल्या ड्रॉवर्समध्ये पाच दहा मिनिटं उलथापालथ केल्यावर शेवटी त्याला ती दुसरी जादाची चावी सापडली आणि नंतर पॅंट बदलून, खिशात पैशाचं पाकीट, कंगवा टाकून, जातोय म्हणून आईला सांगून तो बाहेर पडला.

       वैतागत, चरफडत जरी तो घराबाहेर पडला असला तरी बाहेर आल्यावर मात्र त्याची मनःस्थिती लवकरच बदलली. रस्त्यावर आल्यावर त्या थंडगार हवेत त्याने छाती भरुन एक दीर्घ श्वास घेतला कारण घरातल्या पेक्षा बाहेर तर हवा अजूनच ताजी आणि प्रसन्न वाटत होती. पाऊस पडून गेल्यावर सगळेच कसे ताजेतवाने, धुतल्यासारखे स्वच्छ वाटत होते. रस्त्याकडेचा झाडांचा यात पहिला नंबर होता आणि त्यांच्या खालोखाल डांबराच्या काळ्या कुळकुळीत रस्त्याला दुसरा नंबर द्यायला कुणाचेच दुमत झाले नसते. पाऊस पडायचा थांबला असला तरी त्याचे एक सर्वत्र भरुन असलेले अस्तित्व मात्र सतत जाणवत होते. अशा या उल्हसित करणार्‍या वातावरणात रस्त्यावरच्या तुरळक रहदारीतून तो पुढे निघाला. रिक्षा स्टॅंडकडे जाताना मध्येच एका अवाढव्य बसच्या खाली, अजूनही कोरड्या असलेल्या रस्त्यावर बसलेले, एकदम गरीब चेहरा एक असलेले कुत्रे त्याला दिसले. थोडीशी मान बाहेर काढून कुत्र्याने इकडे तिकडे बघितले, बाहेरचा अंदाज घेतला आणि आपले अंग झटकून गाडीखालून बाहेर आले आणि उभे राहिले. त्यानंतर मग पुढचे पाय लांबवून, त्यानंतर मागचे पाय लांबवून त्याने भलाथोरला आळस दिला आणि डावीउजवीकडे बघून, रस्ता ओलांडून पलीकडच्या गल्लीत ते दिसेनासे झाले.

       रिक्षावाला यायला तयार होईल की नाही ही जी शंका या मुलाला वाटत होती ती सुदैवाने फोल ठरली आणि नेहमीचे खडाक टिंगचे काम आटोपून रिक्षावाल्याने रिक्षा रस्त्यावर घेतली. पाचदहा मिनिटातच शालिमार आले नि रिक्षाचे झालेले भाडे देऊन त्याने आपल्या भावाला शोधायला, टाचा उंचावून,मान वर करुन रस्ता पालथा घालायला सुरुवात केली. शालिमारच्या इथे त्याला बोलावले होते खरे पण रस्त्याच्या कोणत्या बाजूला आपल्याला बोलावले आहे हे त्याला माहित नव्हते. ते आता स्वत:च शोधणे भाग होते. भावावर मनातून चरफडण्याखेरीज दुसरे अजून काहीही करण्यासारखे नव्हते.

       या दोन भावांमधले नाते तसे अगदी सर्वसामान्य, नेहमी आढळणारे असेच होते. तो स्वत: २२ वर्षांचा आणि त्याचा भाऊ त्याच्यापेक्षा तीन चार वर्षांनी मोठा होता. त्यामुळे साहजिकच थोरल्या आणि धाकट्यामध्ये बहुतांश वेळा पहायला मिळतात तसेच मतभेद, वेगवेगळी मते, त्यावरुन वादविवाद असे या दोघांमध्येही होते. आपल्या लहान भाऊ लहान आहे, त्याला काही कळत नाही, धाकटा असल्याने त्याला उपदेश करणे हे आपले कर्तव्य आहे हे जेवढे थोरल्याला वाटत असे तेवढेच धाकट्याला आपला भाऊ बावळट आहे, वेंधळा आहे, नुसता म्हणायला थोरला आहे असे वाटत असे. एकमेकांबाबत असे वाटण्याबाबत तरी दोघे समान होते असे म्हणता येईल. या दोघांमध्ये थोरल्या भावाच्या वस्तू बर्‍याचदा विसरत, गहाळ होत किंवा घरात अगदी डोळ्यासमोर असल्या तरी त्या दिसत नसत आणि आजही तसेच काही तरी झाले होते.

       बराच वेळ इकडेतिकडे शोधूनही जेव्हा त्याला त्यांची गाडी, आणि तिची चावी शोधत असलेला भाऊ दिसेना तेव्हा या मुलाने परत घरी फोन लावला; आणि त्याला जसे वाटत होते तसेच झाले. घरुन त्याला काही महत्त्वाची माहिती मिळाली नाहीच उलट डोळे उघडे ठेऊन जरा इकडे तिकडे बघायचा सल्ला मात्र मिळाला. वैतागून त्याने फोन बंद केला आणि पुन्हा नव्याने बारकाईने शोध घ्यायला सुरुवात केली. शोधत शोधत तो शालिमार पासून थोडासा पुढे आल्यावर मात्र त्याला आता काय करावे हे सुचेना. काय करावे याचा विचार करत असतानाच अचानक त्याचा भाऊ त्याला दिसला. रस्त्यावरुन खाली वाकून शोधत असल्याने एवढा वेळ तो एका गाडीमागे लपला होता, तो आता उभा राहिल्यावर एकदम दृष्टीपथात आला. एवढा वेळ तो न दिसण्यामागे हे कारण होते हे बघून त्यालाही जरा हसू आले. जवळच थोड्या अंतरावर बिनचावीची त्यांची गाडीही निमूटपणे उभी होती. तिच्याही एकूण रुपावर जरा खिन्नतेचं सावट पसरल्यासारखं वाटत होतं.

       "अरे काय झालं? कशी हरवली चावी?"
"काय माहित नाही ना अरे! आत्ता माझ्या खिशात होती आणि आता बघतोय तर नाहीये."
"म्हणजे? तू इथे गाडी लावली होतीस का?"
"मग मी काय सांगतोय? इथे गाडी लावल्यावरच ती गेली. गाडी चालवताना चावी कशी हरवेल बावळट माणसा?"
"तुझं काय काम होतं ते झालं का? इथे गाडी कशाला लावली होती?"
"इथे गाडी लावून मी झेरॉक्स काढायला गेलो होतो. परत आलो तर चावी नाहीयेच खिशात. एकदम गायबच झाली."
"तू नक्कीच कुठेतरी पाडली असशील. तुझे हे दरवेळेसचे आहे."
"आता इथं रस्त्यावर बडबड करण्यापेक्षा चावी शोधायला जरा मदत केलीस ना तर बरे होईल."
"गाडीलाच असेल नाही तर लावलेली. नीट बघ."
"मला वाटतं चावी गाडीलाच लावलेली असती तर मला लगेच कळले असते, नाही का?"
"तू इथे गाडी लावल्यावर कुठे कुठे गेला होतास? तिकडे जाऊन बघून आलास का?"
"जाउन आलो. नाही मिळाली कुठेच. एकदम कशी गायब झाली कळतच नाहीये."
"परत जाऊन बघून येऊ चल आपण."

       एवढं बोलून झाल्यावर त्या दोघांची दुक्कल परत चावी शोधण्यासाठी रस्ता सोडून जवळच्या इमारतीकडे निघाली. त्याच्याआधी जवळच्याच एका पानटपरीवर जाऊन या मुलाने चावीबद्दल चौकशी केली पण विशेष असे काही हाती लागले नाही. पानटपरीवाल्याने अशी काही चावी आपल्याला न दिसल्याचे सांगितले. रात्रभर गिर्‍हाईकांच्या गर्दीने ओसंडून वाहणार्‍या, इमारतीच्या दर्शनी भागात असलेल्या एका हॉटेलामध्ये आता सकाळी निवांतपणे फरशी धुण्याचे काम चालले होते आणि त्या पाण्याचे ओघळ बाहेर पर्यंत आलेले होते. त्या हॉटेलात काम करणार्‍या पोर्‍याला पण चावीबद्दल काहीच माहित नव्हते. त्यामुळे इमारतीच्या मागच्या बाजूला असलेल्या झेरॉक्सच्या दुकानाकडे या दोघांनी आपला मोर्चा वळवला आणि इमारत ओलांडून ते मागे निघाले. पण तिकडेही दहा मिनिटे रस्ता धुंडाळून, झेरॉक्सवाल्या दुकानदाराला विचारुनही काहीच उपयोग झाला नाही.

       "जाउदे, आता किती वेळ शोधत बसणार? मला नाही वाटत आता चावी सापडेल. आणि ही दुसरी चावी मी आणलीये ना. ती आहेच की!" कंटाळून धाकट्याने हा प्रकार उरकता घेण्याच्या दृष्टीने सुचवले.
"ठीक आहे चल. जास्त वेळ वाया घालवण्यात काही अर्थ नाही. पण या आहे त्या चावीवरुन लवकर दुसरी चावी बनवून घेतली पाहिजे. नाहीतर ही सुद्धा हरवली तर पंचाईत होऊन बसेल."
"त्याला काय वेळ लागतोय? लगेच मिळेल करुन."

       मात्र दहा पंधरा मिनिटांनी जेव्हा ते इमारतीच्या मागच्या भागातून दर्शनी भागात आले तेव्हा त्यांच्या गाडीचा तिथे मागमूसही नव्हता. जिथे गाडी उभी केलेली होती ती जागा पूर्ण रिकामी होती आणि तिथेच रस्त्यावर साठलेल्या थोड्याशा पाण्यात, पेट्रोलचे चारदोन थेंब पडून तयार झालेले छोटेसे इंद्रधनुष्य सोडले तर दुसर्‍या कशाचेही नामोनिशाण नव्हते.

       

बुधवार, २५ मे, २०११

माझे उन्हाळी पर्यटन.

    या शहरात मी गेली कित्येक वर्षे राहतो आहे. त्याचा होणारा विकास, त्याची होणारी वाढ पाहतो आहे. म्हणता म्हणता या पुण्यात राहायला येऊन आता १६ वर्षे झाली. तरीही हे पुणं तसं मला आपलं अपरिचितच राहिलं आहे. आता पुण्याबाहेरच्या लांबवर पसरलेल्या एखाद्या उपनगरात गेलं की अगदी दुसर्‍या शहरात गेल्यासारखंच वाटतं. तिथले माहिती नसलेले रस्ते माझ्या अंगावर येतात आणि मला दडपून टाकतात. 'या भागात बरंच परिवर्तन झालंय की' हे माझं पालुपद पु़टपुटत मी कधी एकदा एखादा ओळखीचा कोपरा दिसतोय हे शोधत राहतो. हे जरा लांबच्या उपनगरांबाबत खरं असलं तरी मूळ गावातलं पुणंही तसं मला अपरिचितच आहे. कारण मी स्वतः पुण्याच्या उपनगरातच राहायला आहे. कधी कामानिमित्त मूळ भागात आलोच तर त्यापुरते आपले कामाचे रस्ते तेवढे माहित असतात. दुसरीकडे कुठे कशाला कुणाचं जाणं होतं? त्यामुळे शहरातले सगळे रस्ते तळहाताप्रमाणे माहित असलेल्यांबद्दल मला आदरही वाटतो आणि 'हा माणूस पूर्वी एखाद्या कुरियर कंपनीत तर कामाला नव्हता ना?' असा संशयही येतो. रस्त्यांच्याबाबतीत मी फारसा तल्लख नसलो तर अगदीच 'हा' सुद्धा नाही. तरीही एखाद्या वेळेस कुठे वेगळ्या भागात शिरलो तर अचानक 'अरेच्चा! हा रस्ता इकडे येऊन याला मिळतो होय? आणि आपल्याला जो एवढे दिवस तो वाटत होता; तो रस्ता हा आहे होय?' असे प्रसंग माझ्या बाबतीत बर्‍यापैकी घडतात, आणि आपलं आपलं म्हणतो त्या पुण्यातलेसुद्धा सगळे रस्ते आपल्याला माहित नाहीत अशा शरमेने मी बेचैन होतो. या प्रकारामुळे कुणी आपल्या पुणेरीपणावर संशयही घेऊ शकेल अशी थोडीशी भीतीही त्यामागे असते. आपल्या शहरातले, अगदी मूळ गावातलेही रस्ते आपल्याला माहित नसावेत म्हणजे त्याला काही अर्थ आहे?

    या रस्त्यांसारखीच गावातली जी प्रेक्षणीय ठिकाणं असतात ना, त्यांचीही तशीच गत असते. शहरातले सगळे रस्ते जसे माहित नसतात तशीच ही ठिकाणंही पाहायची राहून गेलेली असतात. त्यांबद्दलची काहीच माहिती आपल्याला नसते. पाहू पाहू म्हणत ही आपल्याच शहरातली ठिकाणं बघायचं आपण नेहमी पुढे ढकलत आलेले असतो. क्वचित एखादा बाहेरगावचा पाहुणा आपल्याकडे आला आणि त्याला अमकं अमकं ठिकाण बघायचं असले तर त्यालाही, 'अरे त्यात काय एवढं बघण्यासारखं आहे?' असं म्हणून आपण वेड्यात काढतो. आपल्या गावातलीच, आपल्या शहरातली ही ठिकाणं त्या शहराच्या नागरिकांकडून नेहमीच अशी दुर्लक्षिली का जातात? माझी एक बहिण लंडनला गेली कित्येक वर्षे राहते आहे. ती इकडे आली की तिच्याशी बर्‍याच गप्पा होत असतात लंडनबद्दल. मी इंग्रजी साहित्याचा विद्यार्थी असल्याने या लंडनबद्दल मला जाम कुतूहल आहे. एकदा का होईना, मी काहीही करुन लंडनला जाईनच आणि ते डोळाभरून पाहून येईन असा मी एक निश्चियही करुन ठेवला आहे. तर लंडनमधली बरीच, अगदी पाहिलीच पाहिजेत अशी ठिकाणं आठवून मी या बहिणीला दरवेळस विचारतो की 'अगं हे तू पाहिलंस का? तिकडे तू गेलेली आहेस का?' मग तिचा प्रश्न येतो की 'अरे तुला ही ठिकाणं कशी काय माहित?' या प्रश्नाचं उत्तर न देता मी माझा प्रश्न परत विचारतो. मग ती सांगते की 'नाहीरे, नाही पाहिलं, त्यात बघण्यासारखं काय आहे एवढं?' लंडनमध्ये राहताना युरोपवारी करुन आलेल्या आणि इंग्लंडमध्येही इतरत्र हिंडलेल्या तिचं लंडन मात्र अजून पाहायचं राहिलं आहे.

    आणि तसंच, कोणतीही भीड-मुर्वत न बाळगता मीपण हे सांगू इच्छितो की गेली इतकी वर्षे पुण्यात राहणार्‍या माझीही तीच गत झालेली आहे. परिस्थिती फारशी वेगळी नाही. पुण्यातली यच्चयावत पाहण्यासारख्या ठिकाणांना माझे पाय अजून लागायचे आहेत. एखाद्याचे पाय एखाद्या वास्तूला लागणं हा जरी थोरामोठ्यांसाठी वापरायचा वाक्प्रचार असला तरी माझ्याबाबतीत तो वापरायचे स्वातंत्र्य मी घेतो आहे याची नोंद घ्यावी. पुण्यातली बरीच नावाजलेली ठिकाणं पाहायचा योग अजून यायचा आहे. एखाद्या देवाच्या बाबतीत, किंवा नेमकेपणाने सांगायचे झाले तर वैष्णोदेवीचा वगैरे जो 'बुलावा आना चाहिये' हा प्रकार असतो तसाच माझाही ही ठिकाणं पाहायचा योग आलेला नाही. आणि प्रेक्षणीय ठिकाणांच्या बाबतीत तर बुलावा येण्याची वाट पाहणेही वेडपटपणाचे आहे. प्रेक्षणीय ठिकाणं काही धर्मक्षेत्रे, तीर्थक्षेत्रे नाहीत - आपल्या दर्शनेच्छूंना बुलावा पाठवायला. त्यामुळे आपले पाय जर या वास्तूंना लागायचे असतील तर स्वतःच काहीतरी हालचाल करणे आले.

    शनिवारवाड्याच्या अगदी बरोबर पाठीमागच्या बोळवजा रस्त्यावर एखादे महाविद्यालय असेल असे कुणालाही वाटण्याची सुतराम शक्यता नाही. मात्र तसे एक महाविद्यालय इथे आहे. एकेकाळी देशभर आणि त्याही पलीकडे विजयाची दुंदुभी वाजलेल्या मराठी सत्तेचे चढउतार पाहिलेल्या शनिवारवाड्याच्या मागेच हे महाविद्यालय उभे आहे. तसा पाहिलं तर मी या विद्यालयाचा विद्यार्थी नाही आणि नव्हतोही. त्यामुळे त्याच्याबद्दल माहिती असण्याचेही कारण नाही. मात्र जेव्हा माझ्या पदव्युत्तर परीक्षेचे केंद्र म्हणून या महाविद्यालयाची निश्चिती झाली तेव्हा मला त्याचे अस्तित्व कळून आले आणि पुणे हे विद्येचे माहेरघर आहे (विद्येचे माहेरघर ते निश्चितच आहे मात्र पूर्वेचे ऑक्सफर्ड मात्र मुळीच नाही याचीही इथे नोंद घ्यावी.) या विधानाला जरा अजून पुष्टी मिळाली. हो, असेच म्हटले पाहिजे कारण पुण्यात फिरताना नित्यनूतन, कल्पनाही करता येणार नाही अशा ठिकाणी शाळा,महाविद्यालये दिसत असतात. लांब कशाला जायला पाहिजे? शनिवारवाड्याच्या जवळच एकदा वसंत टॉकीजच्या बसस्टॉपवर उभा असताना, त्याच्या बरोबर समोरच; विश्रामबागवाड्यासारखीच दिसणारी एक भरपूर जुनी वास्तू आहे, तिच्यात मी उभ्या उभ्या, अगदी नी.वा.किंकर रात्रप्रशाला, रानडे बालक मंदिर पासून ते डे केअर सेंटर पर्यंत चार पाच शाळा मोजल्याचे मला पक्के आठवते आहे.

    असो. या महाविद्यालयात माझा प्रॅगमॅटिक्सचा तीन तासांचा पेपर संपवून जेव्हा मी सहा सव्वासहाच्या सुमारास बाहेर पडलो तेव्हा समोरच शनिवारवाड्याच्या कडेच्या बुरुजांरुन चालत असलेले काही दर्शनेच्छू मला दिसत होते. आता बस पकडून सरळ घरचा रस्ता सुधारण्याऐवजी संध्याकाळच्या शीतल वेळी अचानक मला शनिवारवाडा बघायला जावेसे वाटू लागले. उन्हाळ्याचा मोसम असल्याने उजेडही भरपूर होता. आणि तसा मी अजूनही स्वतंत्र पंछी असल्याने आणि कुठलाही जबाबदारीचा लबेदा चिकटला नसल्याने असे बेत त्वरित अंमलात (अजूनही) आणू शकतो. बसस्टॉपकडे जाणारा रस्ता सोडून मी मग शनिवारवाड्याच्या दर्शनी भागाकडे चालायला सुरुवात केली.

    पदपथावर चालताना हरतर्‍हेचा माल विकायला बसलेले विक्रेते दिसत होते. दहा रुपयात अगदी मुठीपेक्षाही लहान अशा आकाराच्या दोन कळसूत्री बाहुल्या नाचताना इतक्या सुंदर दिसत होत्या की त्यांच्या समोरुन जाताना; त्या पाहण्यासाठी काही वेळ थांबून राहिलेल्यांचा मला त्यादिवशी बिलकूल राग आला नाही. ते चित्र होतेच तेवढे मनोवेधक. या बाहुल्या एवढ्या कशा नाचत आहेत याचे कोडे काही मला सुटले नाही. विक्रेत्याच्या हातात तर कोणतीच दोरी वगैरे दिसत नव्हती. शिवाय बाहुल्या इतक्या एकमेकांना चिकटून नाचत होत्या की त्यांच्या मध्ये काही ताण दिलेल्या स्प्रिंगसारखे असलेच तरी ते बिलकूल दिसत नव्हते.

    विचार करतच मी पुढे निघालो, तर एकदम वेगवेगळ्या देवादिकांची चित्रे पदपथावर पसरलेली दिसली. त्याच्यात विशेष काही न वाटून पुढे सरकतो तर एकदम चित्रे हलल्याचा भास व्हायला लागला. मला तसा चांगल्या सशक्त नंबरचा चष्मा आहे त्यामुळे आपल्या दृष्टीत अचानक काही असुधारनीय समस्या आली की काय असे वाटायला लागले. मात्र नीट बारकाईने पाहिले तर सगळी चित्रे त्रिमितीय असल्याचे लक्षात आले. दांडिया खेळणारा कृष्ण वगैरे अचानक दुसर्‍याच पोझमध्ये उभा राहिलेला दिसायला लागला. मी न थांबता समोरुन चालत जाताना तर सगळ्याच चित्रांची भराभर होणारी हालचाल केवळ अप्रतिम होती. एवढे होईपर्यंत मी प्रेमळ विठ्ठलाचे मंदिर मागे टाकून ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिराच्या कमानी पर्यंत आलो होतो. प्रेमळ विठ्ठलाच्या मंदिराने मात्र माझे लक्ष चांगलेच वेधून घेतले. इथे मंदिरापेक्षा त्याच्या नावाने जास्त लक्ष वेधून घेतले असे म्हणता येईल. कारण खुन्या मुरलीधर, पासोड्या विठोबा, जिलब्या मारुती, बायक्या विष्णू, छिनाल बालाजी, पत्र्या मारुती, भिकारदास मारुती अशा नावांच्या जत्रावळीत 'प्रेमळ विठ्ठल' हे नाव खूपच सभ्य आणि सुसंस्कृत वाटते हे कुणीही कबूल करील. माझी स्मरणशक्ती मला दगा देत नसेल तर असे प्रेमळ नाव ठेवल्याबद्दल लगेच संबंधितांचा, अनासाये जवळच उपलब्ध असलेल्या शनिवारवाड्यावर जाहीर सत्कार करावा असे वाटण्यापर्यंत माझ्या भावना उचंबळल्या होत्या हे माझ्या अजूनही लक्षात आहे.

    इथून पुढे चालायला लागलो तर अचानक मध्येच बारक्या चौरंगासारखे काहीतरी पदपथावर मांडलेले दिसले. ते दुसरे तिसरे काही नसून वजनकाटा होता. वजन करावे की नाही हा विचार करत उभा राहिलो. कारण नुकताच परीक्षेचा पेपर देऊन आल्यामुळे परीक्षेचे मणभर ओझे अंगावरुन उतरलेले होते. त्यामुळे वजनही अचूक आले असते. पण शेवटी शनिवारवाडा बघायचा आहे तर त्याकडेच लवकर जावे म्हणून वजनाला बगल देऊन टाकली आणि पुढे निघालो.

    ब‌र्‍याचदा असे होते की नेहमी आपण कुठे निघालो की आपल्याला कुठेतरी जायचे असते. वाक्य समजायला जरा अवघड आहे हे. माझा म्हणण्याचा उद्देश हा की कुठे निघालो की आपले काहीतरी काम असते, कुठेतरी जायचे असते, कुणाला भेटायचे असते असे काहीतही कारण असते. "बस मिळेल की नाही?, घरी गेल्यावर भाजी कोणती करावी?, अमक्याचे आजारपण चालू आहे, तमक्याच्या लग्नाला जायचे आहे", असे हजारो विचार चाललेले असतात. त्यामुळे रस्त्यात चालतानाही कित्येक गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत असतात पण त्यांकडे आपले लक्ष नसते. आपण आपल्याच तंद्रीत, विचारात पुढे सरकत असतो. वाहनांच्या, फेरीवाल्यांच्या, पादचार्‍यांच्या गर्दीतून माणसे अगदी यंत्रवत चालत असतात. काही अडथळा आला - थांबले, मोकळा रस्ता मिळाला - चालले. पण त्यादिवशी माझ्या डोक्यात कसलेही विचार नव्हते. संध्याकाळच्या वेळी, रस्त्यावर समोर दिसेल ते बघत मी मोठ्या आनंदाने रमत गमत चाललो होतो. आणि त्या निरुद्देश भटकंतीची एक वेगळीच मजा अनुभवत होतो. अक्षरशः प्रत्येकानेच कधीतरी अगदी एकटे असे रस्त्याने भटकायला बाहेर पडले पाहिजे. केवळ एका प्रेक्षकाच्या भूमिकेतून आपले शहर पाहिले पाहिजे.

    शनिवारवाड्याच्या समोर आलो. इथे छोट्याशा वाहनतळावर अनेक चारचाकी गाड्या उभ्या होत्या. काहीशे वर्षांपूर्वी जिथे पेशव्याचे हत्ती झुलत असतील आणि रिकिबीत पाय अडकवून घोड्यांवर मांड ठोकली जात असेल तिथे आता फोक्सवॅगन आणि बीएमडब्ल्यू उभ्या होत्या. काळ नामक एका अवलियाला मी परत तिथल्या तिथे मनोमन सलाम ठोकला. पुढे निघालो तर मात्र माझ्या अंदाजापेक्षा बरीच जास्त माणसे शनिवारवाडा पाहायला आल्याचे मला जाणवले. ही जनता शिवाय पुणेरी सुद्धा वाटत नव्हती. जरा डोक्याला काम दिल्यावर लक्षात आले की ऐन उन्हाळ्यात, जेव्हा पर्यटकांचे लोंढेच्या लोंढे टुरिष्ट स्पॉटवर आक्रमण करतात, त्या काळात मी शनिवारवाडा बघायला आलेलो होतो. खरंच या शक्यतेचा मी बिलकूल विचार केलेला नव्हता. चालता चालता लगेचच पर्यटकांच्या पारंपारिक वेशातले दर्शनेच्छूंचे घोळके दिसायला लागले. डोक्यावर टोपी चढवलेले, पायात स्पोर्ट शूज घातेलेले, स्त्रिया पंजाबी ड्रेसात, मुलांचे रंगीबिरंगी कपडे, तरुण तरुणींचे टी-शर्टस, घट्ट जीन्स आणि बहुतेकांच्या हातात असलेला कॅमेरा. तिथून चालताना बरेच जण जे फोटो काढत होते, काढून घेत होते त्याच्यांमधूनच मला चालत जावे लागले आणि त्यांना तसा अडथळा केल्यामुळे, त्यांच्या पर्यटनानंदात व्यत्यय आणल्याने मलाही थोडे वाईट वाटले. खरेतर मी चांगला एवढी वर्षे पुण्यात राहतोय; पण का कोण जाणे, त्या उन्हाळी पर्यटकांच्या झुंडीत मला अगदीच लाजल्यासारखे व्हायला लागले. मध्येच एखाद्या पर्यटकाने, "काय हो, उगाच तुमच्या या शनिवारवाड्याचे नाव होऊन राहिले आहे भौ? इथे बघायला तर फारसे काही नाहीच!" असे म्हटले किंवा जाब विचारला तर काय उत्तर देणार होतो मी? खरेतर असे काही उत्तर द्यायला मी बांधील नव्हतो, ती माझी जबाबदारीही नव्हती, तरीही या विचाराने मी चांगलाच खचून गेलो आणि आत्मविश्वासाचा अभाव असलेला किंवा खांदे पाडून चालणारा मनुष्य जसा दिसतो ना तसा चालत राहिलो.

    बहुतांश 'टुरिष्ट स्पॉट' च्या इथे जशी खाण्यापिण्याचीही दाबून सोय असते तशी मात्र शनिवारवाड्याच्या पटांगणात फारशी आढळली नाही. मोजकेच पर्याय उपलब्ध होते. शिवाय माझ्या यच्चयावत शिक्षणाची सांगता करणारा, चांगला तीन तासांचा पेपर लिहिण्याचे मानसिक श्रम झाल्याने मलाही काही पोटाला आधार देण्याइतपत हवेच होते. शेवटी पाच रुपये मोजून; गरमागरम खार्‍या शेंगदाण्यांची एक पिंटुकली सुरनळी खरेदी करुन मी पुढे प्रयाण केले. शनिवारवाड्याच्या समोरच एका भव्य व्यासपीठासारख्या वाटणार्‍या कट्ट्यावर अनेक जण संध्याकाळच्या शांतवेळी बसून अवतीभवतीची मौज लुटत होते. सहकुटुंब, सहपरिवार आलेले काही जण होते, काही ज्येष्ठ आपल्या आयुष्याच्या संध्याकाळी या संध्येचा आनंद घेत होते, कॉलेजकुमार आपल्या मैत्रिणीबरोबर गुजगोष्टी करण्यासाठी आले होते, काही एकएकटे आपल्याच विचारात शनिवारवाड्याच्या भव्य दाराकडे बघत बसून होते. स्वतःही यांना सामील होण्यापेक्षा मी मात्र लगेच प्रवेशमार्गाकडे मोर्चा वळवला. दारातून खूपच लोक एकसारखे बाहेर येत होते. त्यामुळे मला काही लवकर आत जाता येईना. शेवटी कुठे एकदाची फट सापडून मी अजून काही लोकांबरोबर आत शिरकाव करु लागताच तिथेच आतल्या बाजूला उभ्या असलेल्या एका सुरक्षारक्षक वजा माणसाने सरळ 'बंद हो गया, कल आओ' असे फर्मान ऐकवले. काय? मला क्षणभर नीट कळलेच नाही काय ते. मग मात्र डोक्यात प्रकाश पडला आणि तिथल्याच एका पाटीवर वेळ पाहिली तर खरेच शनिवारवाडा बंद होण्याची संध्याकाळची वेळ सहा असल्याचे दिसले. म्हणजे आता ही जी सगळी माणसांची लाट माझ्या अंगावर फुटली होती ती सगळी वेळ संपल्याने सुरक्षारक्षकाने हाकलून काढलेली जनता होती. अरेरे! म्हणजे गेली १६ वर्षे पुण्यात राहणारा जेव्हा चांगली सवड काढून शनिवारवाडा बघायला जातो तेव्हा त्याला आत पाऊलही टाकू दिले जात नाही? काय म्हणावे याला? आणि जिथे मराठ्यांनी आपल्या दैदीप्य पराक्रमाचे झेंडे फडकवले तिथे या अशा हिंदीत आमची संभावना केली जाते? यात थोडा माझा दोष होता की काय न कळे! कारण जीन्स आणि टी-शर्ट घालून मी कुठे गेलो की लोक माझ्याशी हिंदीतच बोलायला सुरुवात का करतात कोण जाणे? तसा मग इतर लोकांचाही थोडा दोष असावा.

    असो. शनिवारवाडा बंद झाला होता, माझ्या पुण्यातले हे प्रेक्षणीय स्थळ बघायला मला परत यावे लागणार होते. नाउमेद न होता मग मी आधी वर्णन केल्याप्रमाणे मी पुन्हा समोरच्या लोकांमध्ये सामील झालो आणि एका एका शेंगदाण्याचा समाचार घ्यायला सुरुवात केली. शनिवारवाडा बंद झाला असला तरी त्याचे जे बलाढ्य दार आहे ते ही चांगलेच पाहण्यासारखे आहे. शिवाय त्याच्या वर मध्येच दोन खिळ्यांना एक भडक निळी पाटी लटकवून; त्यावर शनिवारवाडा असे लिहून संबंधितांनी या जागेची तपशीलवार(?) माहिती पुरवण्याचेही काम केले आहे.

    शनिवारवाडा आतून बघता आला नसला तरी मला त्याचे फारसे वाईट वाटले नाही. तसा माझा स्वभाव नाही आणि शिवाय तिथे हरठिकाणांहून आलेल्या वेगवेगळ्या माणसांना नुसते बघण्यातही एक वेगळाच आनंद होता. तो मी चांगलाच अनुभवला. माझ्या शेजारीच बसलेल्या एका कामकरी माणसाशी सुखदुःखाच्या चार गोष्टी बोललो. आपल्या दोन बलाढ्य बुलडॉग कुत्र्यांना घेऊन शनिवारवाड्यावर फिरायला आलेल्या आणि कट्ट्यावर बसलेल्यांच्या अगदी जवळून त्यांना नेणार्‍या एका धन्य पुणेकराची पुणेरी तर्‍हा बघून शेजारच्याकडे, 'शनिवारवाडा ही काही कुत्र्यांना फिरायला आणण्याची जागा नाही' अशी नापसंती व्यक्त केली. थोडक्यात सांगायचे तर वेळ मोठा सुरेख गेला. अखेर, अस्तंगत होत असलेल्या सूर्याबरोबरच अंधाराचे साम्राज्य ठळक व्हायला लागल्याने मी माझ्या शेजारच्याचा आणि शनिवारवाड्याचाही निरोप घेतला. मागच्या गर्द निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर दिसणार्‍या शनिवारवाड्याच्या दर्शनी भागावर एक अखेरची नजर टाकली आणि पुन्हा बसस्टॉपकडे चालायला सुरुवात केली. १६ वर्षे आणि थोडीशी पायपीट यातून मला जे 'शनिवारवाडा सहाला बंद होतो' हे तात्पर्य कळाले होते त्याच्याशी आजूबाजूच्या कुणालाच काही देणे घेणे नव्हते. पुन्हा तीच गर्दी आणि तीच वाहतूक. लवकरच तिचा एक भाग बनून गेलो. चालतानाच लक्षात आलं की हातातल्या शेंगदाणा पुडीत आता नुसती फोलपटं उरलेली आहेत.

मंगळवार, ६ जुलै, २०१०

लिहिते व्हा!

    फारा वर्षांपूर्वी एक विचित्र पक्षी होऊन गेला. तो म्हणे पावसाळा आला की शेतकरी लोकांना पेरते व्हा, पेरते व्हा असा संदेश देत असे. मग शेतकरी उठत आणि पेरणी सुरु करत. आता हा पक्षी सध्या अस्तित्वात आहे की नाही आणि नसला तर शेतकर्‍यांनी या संभाव्य अडचणीतून कसा मार्ग काढला आहे कुणास ठाऊक? सध्या पर्यावरणाचे असे कंबरडे मोडलेले आहे की कोण कधी नामशेष होऊन जाईल काही सांगता यावयाचे नाही. काळ मोठा कठीण आला आहे. 'आमच्यावेळी असं नव्हतं' असं म्हणणारेही आता फारसे राहिले नाहीत यावरुनच काळ किती कठीण आला आहे, परिस्थितीने कसे गंभीर रुप धारण केले आहे याची तुम्हाला कल्पना करता येईल.

   असो. मला म्हणायचे आहे ते वेगळेच. मला असे म्हणायचे आहे की जर शेतात धान्य पिकवणार्‍या शेतकर्‍यांना असा काही संदेश कुणी देत असेल तर कागदावर कथा कवितांचे पीक घेऊ इच्छिणार्‍या "लेखकू" मंडळीना 'लिहिते व्हा!' असा संदेश का देऊ नये? तोच संदेश मी आज लेखकांना मी देऊन टाकतो.

    दरवेळेस लोक विचारतात तुम्हाला लेखन सुचते कसे हो? तुम्ही कोणत्या वेळेला लिहता? अर्थात हे लोक मला विचारतात असे मी म्हणत नाहीये. मी कुठे, मोठमोठे लेखक कुठे? उगाच गोड गैरसमज करुन घेऊ नका. बहुतांश लेखकांना हा प्रश्न विचारला जातो हे मी सांगतो आहे. मी म्हणतो लेखन सुचते कसे यात एवढे आश्चर्य वाटण्यासारखे काय आहे? हे म्हणजे तुम्हाला जेवण पचते कसे हो? असे विचारण्यासारखेच आहे. मला तर सुचते पटापट. मी आताच मागे दोनतीन लेख हातासरशी लिहून काढले. ग्रंथालयात गेलो, लिहला त्यावर लेख. परीक्षेला गेलो, लिहला त्यावर लेख. आता तर लिहण्यावरही हा लेख लिहायला बसलो आहे. आहे काय त्यात मोठेसे?

    त्यामुळेच लोकांना लिहायचे म्हटले की सुचत नाही याचे मला भारी आश्चर्य वाटते. ग्रॅहम ग्रीन या आंग्ल लेखकाला पण माझ्यासारखेच आश्चर्य वाटले. फरक एवढाच की त्याला आधी आश्चर्य वाटले आणि मला नंतर वाटले. पण म्हणून माझ्या आश्चर्याचे मूल्य उणावत नाही. असो. तो म्हणतो,"Writing is a form of therapy; sometimes I wonder how all those who do not write, compose or paint can manage to escape the madness, the melancholia, the panic fear which is inherent in the human situation." बघा कसे आहे? लिहणे हे एक प्रकारचे उपचारच आहेत. लिहिल्याशिवाय, काहीतरी रंगकाम केल्याशिवाय, तुम्ही जगूच कसे शकता? मनुष्यजातीला हा जो; कधी न संपणारा दुःखाचा, भीतीचा वारसा मिळालेला आहे त्यातून काहीतरी प्रसवल्याखेरीज तुमची सुटका होते तरी कशी? केवळ आणि केवळ दुःखाने भरलेल्या या निर्दय, पाषाणहृदयी जगात तुमचे चालते तरी कसे?

    कसले अफलातून वाक्य आहे पहा! आणि एवढे रोजचे जगणे जिथे एक संघर्ष होऊन बसले आहे, परिस्थितीशी दोन हात करावे लागतात तिथे तुम्हाला लिहायला सुचू नये म्हणजे कमाल आहे. लिहिता येण्याची जादू अजून तुम्हाला कळालेली दिसत नाही. लिहिण्यातले सुख काय वर्णावे? जाऊदे. सांगत बसत नाही. अनुभवासारखा दुसरा शिक्षक नाही म्हणतात. ( बघा आता हे वाक्य माझ्या आधीच कुणी लिहिले नसते तर तिघेही एका चांगल्या वाक्याला मुकलो असतो. आता हे तिघे कोण? तुम्ही लेको अगदीच हे आहात. त्यात एवढे डोके खाजवण्यासारखे काय आहे? मी, पर्यायाने तुम्ही आणि पर्यायाने हा लेखही!)

    मी काय सांगत होतो ते आता तुमच्या थोडेफार लक्षात आले असेल. शिवाय आता लेखन करायचे झाले तर असेही नाही की लेखनाला लागणारी सामग्री तुमच्याजवळ नाही. म्हणजे लेखक होण्यासाठी अगदी आवश्यक असते, ( म्हणजे लोकांचा असा पक्का ग्रह झाला आहे) त्या अनुभवांच्या शिदोरीबद्दल मी बोलत नाहीये. लेखनसामग्री म्हणजे कागदाचे भेंडोळे आणि लिहायला पेन. व्यंकटेश माडगूळकर लहानपणी उत्तम चित्रे काढत असत. त्यांचा चित्रकलेचा हात चांगला होता. त्यांचे चित्रकलेचे कलाल मास्तर त्यांना म्हणाले,"तुझा हात चांगला आहे. शिकलास, कष्ट केलेस तर चांगला चित्रकार होशील." पण माडगूळकरांची परिस्थिती होती गरीब. रंगांशी खेळायचे म्हटले तर रंग आणि इतर साधनांना पैसे पडत होते. लेखनाला मात्र असले काही लागत नव्हते. कागद आणि साधेसे शाईचे पेन असले तरी पुरत असे. मग चित्रकार व्हायचे न जमल्यामुळे त्यांनी हातात लेखणी घेतली. पुढे त्यांनी कागदावरचीच पण चित्रापेक्षा वेगळी अशी शब्दचित्रे काढली कशी, माणदेश अजरामर झाला कसा हे वेगळे सांगायची आवश्यकता नाही.

    हे झाले तेव्हाचे. सध्या मात्र ही साधनेही आवश्यक आहेत असे नाही. (याबाबत मात्र काळ मोठा कठीण आलेला नाही हे आपले सुदैवच म्हणायचे.) समोर संगणकाचा कीबोर्ड टंकायला असला तरी पुरते. सगळ्यांकडे असतोच तो. फक्त त्यावर काय बडवायचे तेवढे कळले पाहिजे.

    लेखनसामग्रीची सोय झाल्यावर आता काय उरले? लिहावे कसे हा प्रश्न अजून राहिलाच आहे. त्याबद्दलही सांगून टाकतो. मध्यंतरी रविंद्र पिंग्यांचे एक पुस्तक वाचले. अप्रतिम होते. त्यात त्यांचा अर्नेस्ट हेमिंग्वेवर एक लेख होता. अर्नेस्ट हेमिंग्वेने नवोदित लेखकांना एक संदेश देऊन ठेवला आहे. पिंग्यांच्याच शब्दात तो बघू. हेमिंग्वे म्हणतो,"सतत चांगलं, अधिकाधिक चांगलं लिहिण्याचा ध्यास घ्या. आजच्यापेक्षा उद्याचं अधिक कलात्मक लिहून झालं पाहिजे. परवाचं त्यापेक्षा अधिक दर्जेदार हवं. असं हे अधिकाधिक चांगलंच लिहिण्याचं व्रत मरेपर्यंत चालवा आणि दरम्यानच्या काळात न मरण्याचीही खबरदारी घ्या."
आहे की नाही कमाल? "अधिकाधिक चांगलंच लिहिण्याचं व्रत मरेपर्यंत चालवा आणि दरम्यानच्या काळात न मरण्याचीही खबरदारी घ्या." मझा आ गया. वाचलं आणि दिल एकदम खुष होऊन गेला.

    तर आहे हे असे आहे. लेखनसामग्रीची सोय लावून दिली, लिहावे कसे हे सांगून झाले आणि आता एवढे सांगितल्यावर तरी आता तुम्हाला लिहिण्यात काही अडचण येऊ अशी आशा करतो. त्यामुळे आता उठून, कमरा बांधून तुमच्या लेखणीचा उदयोस्तू करायला लागा. अर्थात लगेच तुम्हाला या प्राप्तकालात सुंदर लेणी खोदता यायची नाहीत. त्याला जरा वेळ लागेलच. हरकत नाही. शेवटी सब्रका फलच गोड होता है. पण शेवटी लिहाल ते अधिकाधिक चांगलं लिहिण्याचं मात्र विसरु नका. नाहीतर मी 'लिहिते व्हा!' चा संदेश देतोय आणि वाचकांनी किंवा लेखन छापायला जाल तर संपादकांनी तुम्हाला 'चालते व्हा!' चा संदेश देऊ नये म्हणजे मिळवली. काय समजलात?

मंगळवार, १ जून, २०१०

हे जग सुंदर आहे? आहेच!

    हे जग सुंदर आहे असे माझे स्पष्ट मत आहे. कुणी म्हणेल "आम्हाला मान्य नाही". कुणी म्हणेल "आत्ता कळलं काय? बावळट आहेस लेका!"

    पण मी खरंच सांगतोय. हे जग सुंदरच आहे. रोज सकाळी मी उठतो. नित्यकर्मे पार पाडत असतो. नळाला पाणी येत असतं. गॅस गिझरच्या कृपेने केवळ ४० (की ५० पैसे?) पैशात गरम पाण्याची बादली मिळते. पेपर वाचायला जावं तर काहीबाही भयंकर बातम्या वाचायला मिळतात. पण अवघ्या तीन रुपयात ('सकाळ'च्या एका अंकाच्या छपाईला १८ रुपये खर्च येत असताना) कोणताही उपद्व्याप न करता जगाच्या उलाढाली कोणीतरी तुमच्या पर्यंत पोहोचवत असताना, त्या बातम्यांचे फारसे वाईट वाटून घेण्याचे काही कारण आहे का?

    आंघोळ उरकून बाहेर यावं तर खाली कांदे बटाटेवाल्याची हातगाडी आलेली असते. पों पों हॉर्न वाजवणारा इडली वाला एक चक्कर मारुन जातो. खारीवाल्याची ती नेहमीची ऍल्युमिनियमची भली मोठी पेटी सायकलवरून इकडेतिकडे फिरत असते. एवढंच काय तयार मोड आलेली मटकी सुद्धा मिळते. निदान आमच्या इथे तरी मिळते बुवा. आता अजून तुम्हाला काय पाहिजे? 'मटकी मोडाची' म्हणत जाणारी ही मटकीवाली मी रोज 'ऐकतो', अजुन तिला पाहिलेलं नाही. पण पाहायचा मी प्रयत्नही करत नाही. उगाच तिच्या आवाजावरुन माझ्या मनात तयार झालेली तिची प्रतिमा, तिला प्रत्यक्षात पाहून विस्कटून जाण्याची भीती मला वाटते. ( हे वाक्य थोडं तसलं झाले आहे, पण हरकत नाही. लेखकाला तेवढे स्वातंत्र्य असते.)

    मग मी टीव्ही लावतो. सकाळच्या वेळेस इथे फारसे काही घडत नसते. इथले सगळे दळण संध्याकाळी सातनंतर सुरु होते. सकाळी कुणाला टीव्ही बघायला वेळ नसतो, असे असले तरी काहीतरी तर दाखवावेच लागते. मग काय दाखवतात? तर इथेही कुणीतरी पोटावरची चरबी विरघळवणारे उपकरण, स्लिम सोना बेल्ट तयार करायचे कष्ट घेतलेले असतात. ही जाहिरात करतानाही केवळ प्रेक्षकांचे 'तोंद' विरघळावे म्हणून कुणीतरी एवढा वेळ गरम पट्टा पोटाला लावून घामाघूम होऊन बसलेले असते. या जाहिरातीत काम करणार्‍या सुंदरी पण भयंकर असतात. त्या फारच पुरूषी वाटतात. मग पुढचा चॅनल! तर इथेही माझ्या उद्योगधंद्याला कुणाची नजर लागू नये म्हणून कुणीतरी एवढे परिश्रम घेऊन, संशोधन करुन Evil Eye Shielding Technique वापरुन नजर सुरक्षा कवच बनवलेले असते. ते पाहून मला एकदम गलबलल्यासारखे होऊन जाते. मन एकदम भरुन येते. शिवाय ते तुम्हाला ५००० नाही, ४००० नाही, ३००० हजारही नाही तर केवळ २४९५ वगैरे किंमतीला दिले जाते. अशा परोपकारी व्यक्तींच्या सदहेतूबद्दल काही शंका घेण्याचे कारण आहे का? किती नावं ठेवाल? परत एकदा विचार करा! जग सुंदर आहे की नाही? आहेच!

    असो. तुम्हाला एक प्रसंग सांगतो, त्याशिवाय मी काय सांगतो ते तुम्हाला पटायचं नाही. आमचे एक परिचित एकदा बसने जायला निघाले. बसस्टॉपवर उभे होते. बस आली, बसथांब्यावर थांबली. हे सांगण्यासारखे आहे कारण बस पुण्यातली होती. (पुण्यात तुम्ही बसथांब्यावर थांबलात आणि बस तुमच्या समोर बसथांब्यावर थांबली तर सरळ अंगाचा चिमटा घेऊन बघावा. त्याने एकतर तुम्ही झोपेतून तरी जागे व्हाल, नाहीतर आजचा दिवस तुमचा आहे हे लक्षात घेऊन प्रेयसीला लग्नाची मागणी घालणे, मित्राकडे बरेच दिवस थकलेले पैसे मागणे अशी कामे उरकून घ्यावीत. ताबडतोब होऊन जातात!) . तर सांगत होतो की बस पुण्यातली होती, बसचा कंडक्टर पुण्यातला होता, हे गृहस्थही पुण्यातलेच होते आणि हा प्रकारही पुण्यातच घडण्यासारखा होता. तर बसमध्ये चढल्यावर कंडक्टर या गृहस्थांकडे आला (अहो आश्चर्यम!) आणि त्यांना विचारलं, "कुठं जायचंय?", गृहस्थांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर द्यायचे म्हणून अमुक अमुक जाण्याचे ठिकाण सांगितले. सर्व काही सुरळीतपणे चालू होते. उन्हातून बसमध्ये शिरल्यामुळे हे गृहस्थ रुमालाने घाम पुसण्यात मग्न झाले. कंडक्टरने त्यांचे तिकिट फाडले आणि त्यांच्या पुढे धरले. गृहस्थांचा घाम पुसून झाल्यावर त्यांना कंडक्टर आपल्याकडे काहीतरी काम आहे अशा नजरेने बघत असलेला दिसला. त्यांनी विचारले, "काय?"

    कंडक्टर वैतागला, त्याच्या चेहर्‍यावर आठी स्पष्टपणे झळकली. शिवाय 'हे पार्सल कुठल्या गावाहून आले आहे' ची सूक्ष्म छटाही त्यात मिसळलेली होती. "अहो, तुमचं तिकीट घ्या! सात रुपये झाले, सुट्टे नाहीत, दोन असले तर द्या, म्हणजे पाच द्यायला, नाहीतर उतरताना घ्या".

    रुमालाची घडी आपल्या खिशात ठेवत गृहस्थ म्हणाले, "अहो पण माझ्याकडे पास आहे, मला तिकिटाची काही आवश्यकता नाही". पुढे बसमध्ये कसे दोन गट पडले, कसा गदारोळ उडाला, कशी बाचाबाची झाली वगैरे मी सांगत बसत नाही. बसमधल्या सामान्यजनांना कोणाची बाजू बरोबर आहे हे ठरवणे अगदीच अशक्य होऊन बसले आणि कोणीच माघार घेत नसल्याने सर्वसामान्य परिस्थितीत जे करण्यात येते तेच करण्यात आले. बस आपला नेहमीचा रस्ता सोडून पोलिस स्टेशनाकडे वळली.

    पोलिस स्टेशनात विशेष म्हणजे त्या दिवशी पोलिस हजर होते. त्यांनी सगळे गार्‍हाणे ऐकून घेतले. आता पुढे काय ह्याची उत्सुकता सगळ्यांना वाटत होती. वेळ वाया जातोय म्हणून काही चाकरमाने निघून गेले असले तरी काही डांबरट लोक पुढे काय होते ते पाहण्यासाठी थांबलेले होते.

    पण पुढे काहीच झाले नाही. सायबांनी स्वत: तिकिटाचे सात रुपये भरले. शिपायाला सांगून दोन चहा मागवले. कंडक्टर आणि गृहस्थाला चहा पाजला. अटक, वॉरंट, जामीनावर सुटका, जातमुचलका (हा शब्द कसला सेक्सी आहे राव!), न्यायालयीन कोठडी, थर्ड डिग्री यातले काही म्हणजे काही झाले नाही. And they all lived happily ever after च्या चालीवर सगळेच सुरळीत होऊन गेले.

    बघा विचार करा! असा अनुभव यायला भाग्य लागते. हे जग सुंदर नसते तर असे काही शक्य झाले असते का? तिकिटाचे पैसे भरायचे राहिलेच बाजूला, मस्तपैकी चहाने वगैरे सरबराई झाली. तीसुद्धा पोलिस स्टेशनात. याला काय म्हणावे? या सगळ्याचे तात्पर्य काय? तात्पर्य दुसरे काही नाही! हे जग सुंदर आहेच.

    सावकाश विचार करुन तुमचे मत सांगा, तोपर्यंत मी हा लेख प्रसिद्ध करतो. ( बाकी लेख प्रसिद्ध करणे आणि तो प्रसिद्ध होणे/असणे या दोन्ही भिन्न बाबी आहेत. पण आपण एकाच शब्दावर काम उरकत आहोत. What you say?)

मंगळवार, १८ मे, २०१०

परिक्षेचा दिवस...

    म्हणता म्हणता परीक्षा जवळ आलीये, जवळ आलीये करत आली सुद्धा. शेवटच्या महिन्यात अभ्यासाने चांगलाच जोर पकडला होता. कवितांचा अर्थ लावून लावून डोक्याचा पार भुगा होऊन गेला. दुर्बोध लिहणार्‍या कवींनी माझ्याकडून अजून चार शिव्या खाल्ल्या. ग्रीक मायथॉलॉजी नसती तर ह्या लोकांना उपाशी मरावे लागले असते हे माझे मत अजूनच ठाम झाले. लिटररी क्रिटिसिझममधून दुसर्‍यांवर टीकाटिपण्णी करता करता काही लेखकांना आपण स्वत:ही किती रटाळ पुस्तके लिहली आहेत याचेही भान राहिले नाही. निदान प्रसिद्ध करण्यापूर्वी स्वत:च्या पुस्तकाचे परीक्षण केले असते तर आपण लिहलेल्या लिखाणातल्या एकाही वाक्याचा अर्थ लागत नाही हे तरी त्यांच्या लक्षात आले असते. अर्थात यातही, वाळवंटात रखरखाटाने जीव जायची पाळी यावी आणि अचानक हिरवाईने मन सुखावून जावे, असे अनुभव देणारे प्राईड ऍंड प्रेज्युडिससारखे पुस्तकही होते, नाही असे नाही. तरीही एकंदर तक्क्यावर रेलून आरामशीरपणे पुस्तक वाचणे वेगळे आणि What is the tragic flaw in the character of Othello? How far it is responsible for his tragedy? या प्रश्नाचे उत्तर लिहणे वेगळे! नाही का?
    तर परीक्षेचा दिवस उगवला. सकाळी अकरा ते दुपारी दोनचा पेपर होता. आबासाहेब गरवारे महाविद्यालयात यंदा आमचे स्थळ आले होते. तसे पाहता या वेळी विद्यापीठाने ते खूपच जवळ दिले म्हणायचे. मागच्या वर्षी त्यांनी मला इंदिरा कॉलेज, ताथवडे इकडे पाठवले होते होते. परीक्षा केंद्र निवडताना पुणे निवडल्याचे मला स्पष्ट आठवत होते. आमच्या गरीबांच्या ऑक्सफर्डला ताथवडे पुण्यातच आहे असे वाटले असावे. त्यावेळी जायला एक; यायला एक तास लागत होता. मला मात्र वाटत होतं की मुंबईलाच चाललो आहे परीक्षा द्यायला.
    मात्र यंदा तसे नव्हते. परीक्षेची वेळही सोयस्कर होती. अभिजीतने जाता जाता मला सोडले असते आणि येताना मी आलो असतो. त्याला म्हटले, आपण गाडीतूनच जाऊया. तो हो म्हणाला. (नाहीतरी त्याला असे कुणीतरी म्हणायचे कारण पुरते, लगेच गाडी नेण्यासाठी.) मग निघालो. पुण्यातच जायचे असले तरी सकाळची वाहतूक लक्षात घेता वेळ तर लागणारच होता. गाडीत वाचायला मात्र काही घेतले नाही. उगाच गाडीत वाचायला काहीतरी घ्या आणि नंतर मळमळत असताना एम.ए. चा पेपर लिहा, असे नको व्हायला. मग पोहोचलो परीक्षा केंद्रावर.
एम.एच्या परीक्षांना सगळ्या प्रकारचे लोक हजर असतात. काही काही वेळा वृत्तपत्रात जसे 'समाजाच्या सर्व थरातून लोक आले होते' असे लिहलेले असते अगदी तसेच एम. ए.च्या परीक्षांचे असते. अगदी '८३व्या वर्षी आजींनी दिली एम.ए.ची परीक्षा' या बातमीतल्या आजीबाई नसल्या तरी कॉलेजकुमारांपासून ते ज्येष्ठ नागरीक म्हणता येईल इतपत विविध वयोगटातले परीक्षार्थी हजर असतात. बहुतेकांच्या हातात बाजारात मिळणार्‍या एकाच लेखकाच्या नोट्स होत्या. या नोट्सचा दर्जाही काय वर्णावा? तसे पाहिले तर एम.ए.च्या बहि:स्थ विद्यार्थ्यांचे हाल कुत्राही खात नाही. अगदी अभ्यासक्रम मिळवण्यापासून ते 'मटेरियल' गोळा करण्यापर्यंत त्यांना रक्त आटवावे लागते. परत मूळ पुस्तकं मिळायची मारामार. मूळ पुस्तक मागितले की अप्पा बळवंतातले दुकानदार हा कुठल्या परग्रहावरुन आला आहे असा चेहरा करुन तुमच्याकडे बघतात. आजूबाजूचे चारपाच जणही तुमच्याकडे अथ पासून इतिपर्यंत टवकारुन बघतात. च्यायला आजकाल मूळ पुस्तक वाचतो कोण?
    परत आणि पुणे विद्यापीठाच्या संकेतस्थळाबद्दल काय बोलावे? (खरोखर काहीच बोलत नाही. त्याच्यावर एक स्वतंत्र लेख लिहता येईल. उगाच ब्लॉगच्या एका उत्तम लेखाचा विषय कशाला वाया घालवा?)
    आपला नंबर कोणत्या खोलीमध्ये आला आहे हे बघण्यासाठी नोटीस बोर्डाजवळ भयंकर गर्दी उसळलेली असते. तिथे जाऊन मी माझा नंबर शोधतो. परीक्षा हॉलमध्ये शिरताना एवढा गलका कसला चालला आहे असा विचार केल्यावर लक्षात येते की अरे इथे जवळ जवळ ९० टक्के स्त्रियाच जमल्या आहेत. जशा सामुदायिक पोथी वाचन वगैरेला महिला जमतात तशा सामुदायिक एम.ए.परीक्षा द्यायला एखादे महिला मंडळ आले आहे की काय? प्रत्येकजण अगदी अनेक वर्षांच्या ओळखी असल्यासारख्या एकमेकींशी बोलायला सुरुवात करतात. अर्थात मला त्याचे काही वाईट वाटायचे कारण नाही पण थोडे अस्वस्थ वाटायला लागते. या सगळ्यांनी मिळून माझ्याविरुद्ध डाव केला आहे, ते सगळेजण मिळूनच पेपर लिहणार आहेत वगैरे वगैरे विचार माझ्या मनात यायला लागतात. मग परीक्षक वर्गात प्रवेश करतात. "सगळ्यांनी आपापल्या बॅगा, पर्स, सॅक्स पुढे आणून ठेवा. मोबाईल स्विच ऑफ करुन आपापल्या बॅगेत ठेवा. कुणाचाही मोबाईल वाजता कामा नये."वगैरे वगैरे.....
अचानक माझ्या लक्षात येतं की दरवेळेस माझ्या पुढच्या बाकावरचा परीक्षार्थी गैरहजर असण्याची परंपरा यंदा मोडीत निघालेली आहे. एक मुलगी माझ्या पुढच्या बाकावर बसलेली आहे. अर्थात तिचं लिहलेलं बघून मला उत्तरं लिहता येतील अशी शक्यता नसते. (परीक्षेत दहा बारा निबंधासारखी उत्तरं लिहायची असताना कॉपी कसली करणार डोंबलाची?) पण दरवेळेस परीक्षकच चालता चालता मध्येच त्या रिकाम्या बाकावर बसतात आणि एखादा सरडा जसा अगदी पार्श्वभूमीच्या रंगासारखा रंग घेऊन एकरुप होऊन जातो, तसाच हा परीक्षकही विद्यार्थ्यांत बसून, कॉपी करणार्‍याला रंगेहाथ पकडायचा विचार करत असावा. मात्र यावेळेस तसं होणार नसतं.
    मग उत्तरपत्रिका मिळते. माझ्या आख्ख्या विद्यार्थीजीवनातल्या सवयीप्रमाणे मी लगेच पानाच्या दोन्ही बाजूने अगदी थोडे थोडे समास आखून घ्यायला सुरुवात करतो. आपला परीक्षा क्रमांक, तारीख, विषय, सेंटर लिहून होतं. इंग्रजीच्या पेपरलाही मिडीयम ऑफ आन्सर लिहावे लागते. पाच दहा मिनिटं होतात आणि मग तो चिरपरिचित टण्णऽऽ असा आवाज होतो आणि 'याचसाठी केला होता अभ्यास' असं जिच्याबाबत म्हणता येईल ती प्रश्नपत्रिका माझ्या हातात येते. मी ती अधाशासारखी वाचायला सुरुवात करतो.

ह्म.... ह्म.....
अच्छा! .....
हा प्रश्न विचारलाय काय? .....
बोंबला.....
अरे चोरांनो..... कात्रीत पकडायला बघता काय?.....
अरेच्चा हा तर मागच्या वर्षीच्या पेपरात पण होता. अरेरे! मागच्या वर्षी आला म्हणून या वेळी येणार नाही असं वाटून त्याकडे फारसे लक्षच दिले नव्हते आपण....
अरे वा! याचे मुद्दे तर आपण सकाळीच वाचले आहेत. वा वा वा! .....

    माझे विचार सुरु होतात. मग एकदम वाचतच किती वेळ गेला हे लक्षात येऊन मी झरकन लिहायला सुरुवात करतो.
वेळ सरकत सरकत पुढे चाललेला असतो. थोडंफार लिहून होतं. मी इकडे तिकडे नजर टाकतो. काही हात भरभर लिहण्यात गुंतलेले असतात. काही शून्यात नजर लावून बसलेले असतात. असं रिकाम्या बसलेल्या लोकांकडे बघितल्यावर जरा बरं वाटतं. मात्र आता एक नवीनच त्रास सुरु झाला असल्याचं मला जाणवतं. माझ्यासमोर बसलेल्या मुलीचे केस सॉलीड लांब आहेत. अगदी शाम्पूच्या जाहिरातीत दाखवतात तसे 'स्मूथ नि सिल्की'! मध्येच तिने मानेला झटका दिला की तो आख्खाच्या आख्खा केशसांभार इकडून तिकडे हालतो. माझं लक्ष विचलित होतं. काय वैताग आहे हा? थोडं लिहलं की लगेच झटका. अजून एक परिच्छेद लिहला की परत झटका. मी वैतागतो. मग तो सरडा परीक्षकच काय वाईट होता?
    या वर्गात वरती फॅन लावलेले आहेत पण ते दोनच आहेत आणि नेहमीप्रमाणे माझ्यापासून बरेच लांब आहेत. एखादी वार्‍याची झुळूक आलीच तरी त्या गरम वार्‍याने बिलकूल गार वाटत नाही. बर्‍यापैकी उकाडा जाणवत राहतो. पांडुरंग सांगवीकरसारखा आपणही शर्ट काढून पेपर लिहावा की काय असा विचार माझ्या मनात येतो. पण तेवढे धाडस माझ्याच्याने अर्थातच होत नाही. उगाच एवढ्या बायाबापड्यांसमोर असला आचरटपणा कसा करणार?
    बघता बघता पेपराची वेळ संपत येते. शाम्पू मुलगी पण जोरात लिहीत असते. नेहमीप्रमाणे मी मागे पडलेला असतो. सुरुवातीच्या अक्षरात आणि आताच्या अक्षरात थोडा फरक दिसायला सुरुवात झालेली असते. रिस्टोरेशन कॉमेडीचे मुद्दे आठवता आठवत नसतात. बर्‍याच प्रयत्नांनी एक मुद्दा आठवतो. Licentious way of living..... दुसरा आठवतो Loose morals..... मग पुढचे सगळेच आठवायला लागतात Adulterous relationships.....वगैरे वगैरे

    ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर चं जसं गणितात एक आणि एकच उत्तर असतं तसं एम.ए. बाबत कधीच होत नाही. शिवाय गणितात आख्खा पेपर सोडवल्याचं एक समाधान तरी जाणवतं. आपण काय गणितं सोडवली आणि किती गुण मिळणार आहेत याचा स्पष्ट अंदाज बांधता येतो. इथे तसं काहीही नसतं. कितीही लिहलं तरी ते पुरेसं असल्यासारखं वाटत नाही. शेवटी शेवटी लिहून लिहून आपल्याला हात आहे की नाही याची जाणीवदेखील राहत नाही. अजून थोडा वेळ तसंच लिहलं तर सरळ हातापासून त्याचा वेगळा तुकडा पडेल असं वाटायला लागतं.
    वेळ संपल्याची घंटा होते. परीक्षक पेपर गोळा करायला सुरुवात करतात. एखादा चिवट गडी अजूनही लिहितच असतो. परीक्षक त्याच्या हातातून पेपर जवळजवळ हिसकावून घेतात. मी हाताची बोटं तुटेपर्यंत वाकवून, गेलेली संवेदना परत मिळवायचा प्रयत्न करत असतो. सुरुवातीसारखाच गलका वर्गात आता परत सुरु झालेला असतो. प्रश्नपत्रिकेचं पद्धतशीर शवविच्छेदन सुरु झालेलं असतं. शिवाय मला नेहमीप्रमाणे मागून काहीतरी शब्द ऐकू येतात, "आमचे हे नंदूरबारला असतात." "मग तुम्ही काय नोकरी वगैरे करता का?" वगैरे वगैरे... मात्र नंदूरबार पुण्यापासून किती लांब आहे याचा काही अंदाज नसल्याने नक्की किती हळहळ व्यक्त करावी हे मला कळत नाही. फारसा वेळ न घालवता मी पॅड, कंपास सॅकमध्ये भरतो आणि बाहेर पडतो.
    बाहेर आल्यावर उन्हाचा कडाका पाहून परीक्षा हॉलमधलं उकडणं म्हणजे काहीच नाही हा निष्कर्ष सहज निघतो. परत मग रिक्षाचा शोध. एकजण पुणे सातारा रोडला यायला तयार होतो. नेहमीसारखा खडाक टिंग आवाज नि रिक्षाचा प्रवास सुरु! दुपारच्या दोन वाजताच्या ऊन्हाच्या गरम झळा रिक्षात प्रवेश करत असतात. मी केलेला अभ्यास, मी लिहलेला पेपर आणि मला मिळणारे गुण यांचा विचार करत मी आरामशीरपणे मागे टेकून बसतो. चुक..... चुक..... चुक अशा आवाजात मीटरचे आकडे पडत राहतात.