हे जग सुंदर आहे असे माझे स्पष्ट मत आहे. कुणी म्हणेल "आम्हाला मान्य नाही". कुणी म्हणेल "आत्ता कळलं काय? बावळट आहेस लेका!"
पण मी खरंच सांगतोय. हे जग सुंदरच आहे. रोज सकाळी मी उठतो. नित्यकर्मे पार पाडत असतो. नळाला पाणी येत असतं. गॅस गिझरच्या कृपेने केवळ ४० (की ५० पैसे?) पैशात गरम पाण्याची बादली मिळते. पेपर वाचायला जावं तर काहीबाही भयंकर बातम्या वाचायला मिळतात. पण अवघ्या तीन रुपयात ('सकाळ'च्या एका अंकाच्या छपाईला १८ रुपये खर्च येत असताना) कोणताही उपद्व्याप न करता जगाच्या उलाढाली कोणीतरी तुमच्या पर्यंत पोहोचवत असताना, त्या बातम्यांचे फारसे वाईट वाटून घेण्याचे काही कारण आहे का?
आंघोळ उरकून बाहेर यावं तर खाली कांदे बटाटेवाल्याची हातगाडी आलेली असते. पों पों हॉर्न वाजवणारा इडली वाला एक चक्कर मारुन जातो. खारीवाल्याची ती नेहमीची ऍल्युमिनियमची भली मोठी पेटी सायकलवरून इकडेतिकडे फिरत असते. एवढंच काय तयार मोड आलेली मटकी सुद्धा मिळते. निदान आमच्या इथे तरी मिळते बुवा. आता अजून तुम्हाला काय पाहिजे? 'मटकी मोडाची' म्हणत जाणारी ही मटकीवाली मी रोज 'ऐकतो', अजुन तिला पाहिलेलं नाही. पण पाहायचा मी प्रयत्नही करत नाही. उगाच तिच्या आवाजावरुन माझ्या मनात तयार झालेली तिची प्रतिमा, तिला प्रत्यक्षात पाहून विस्कटून जाण्याची भीती मला वाटते. ( हे वाक्य थोडं तसलं झाले आहे, पण हरकत नाही. लेखकाला तेवढे स्वातंत्र्य असते.)
मग मी टीव्ही लावतो. सकाळच्या वेळेस इथे फारसे काही घडत नसते. इथले सगळे दळण संध्याकाळी सातनंतर सुरु होते. सकाळी कुणाला टीव्ही बघायला वेळ नसतो, असे असले तरी काहीतरी तर दाखवावेच लागते. मग काय दाखवतात? तर इथेही कुणीतरी पोटावरची चरबी विरघळवणारे उपकरण, स्लिम सोना बेल्ट तयार करायचे कष्ट घेतलेले असतात. ही जाहिरात करतानाही केवळ प्रेक्षकांचे 'तोंद' विरघळावे म्हणून कुणीतरी एवढा वेळ गरम पट्टा पोटाला लावून घामाघूम होऊन बसलेले असते. या जाहिरातीत काम करणार्या सुंदरी पण भयंकर असतात. त्या फारच पुरूषी वाटतात. मग पुढचा चॅनल! तर इथेही माझ्या उद्योगधंद्याला कुणाची नजर लागू नये म्हणून कुणीतरी एवढे परिश्रम घेऊन, संशोधन करुन Evil Eye Shielding Technique वापरुन नजर सुरक्षा कवच बनवलेले असते. ते पाहून मला एकदम गलबलल्यासारखे होऊन जाते. मन एकदम भरुन येते. शिवाय ते तुम्हाला ५००० नाही, ४००० नाही, ३००० हजारही नाही तर केवळ २४९५ वगैरे किंमतीला दिले जाते. अशा परोपकारी व्यक्तींच्या सदहेतूबद्दल काही शंका घेण्याचे कारण आहे का? किती नावं ठेवाल? परत एकदा विचार करा! जग सुंदर आहे की नाही? आहेच!
असो. तुम्हाला एक प्रसंग सांगतो, त्याशिवाय मी काय सांगतो ते तुम्हाला पटायचं नाही. आमचे एक परिचित एकदा बसने जायला निघाले. बसस्टॉपवर उभे होते. बस आली, बसथांब्यावर थांबली. हे सांगण्यासारखे आहे कारण बस पुण्यातली होती. (पुण्यात तुम्ही बसथांब्यावर थांबलात आणि बस तुमच्या समोर बसथांब्यावर थांबली तर सरळ अंगाचा चिमटा घेऊन बघावा. त्याने एकतर तुम्ही झोपेतून तरी जागे व्हाल, नाहीतर आजचा दिवस तुमचा आहे हे लक्षात घेऊन प्रेयसीला लग्नाची मागणी घालणे, मित्राकडे बरेच दिवस थकलेले पैसे मागणे अशी कामे उरकून घ्यावीत. ताबडतोब होऊन जातात!) . तर सांगत होतो की बस पुण्यातली होती, बसचा कंडक्टर पुण्यातला होता, हे गृहस्थही पुण्यातलेच होते आणि हा प्रकारही पुण्यातच घडण्यासारखा होता. तर बसमध्ये चढल्यावर कंडक्टर या गृहस्थांकडे आला (अहो आश्चर्यम!) आणि त्यांना विचारलं, "कुठं जायचंय?", गृहस्थांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर द्यायचे म्हणून अमुक अमुक जाण्याचे ठिकाण सांगितले. सर्व काही सुरळीतपणे चालू होते. उन्हातून बसमध्ये शिरल्यामुळे हे गृहस्थ रुमालाने घाम पुसण्यात मग्न झाले. कंडक्टरने त्यांचे तिकिट फाडले आणि त्यांच्या पुढे धरले. गृहस्थांचा घाम पुसून झाल्यावर त्यांना कंडक्टर आपल्याकडे काहीतरी काम आहे अशा नजरेने बघत असलेला दिसला. त्यांनी विचारले, "काय?"
कंडक्टर वैतागला, त्याच्या चेहर्यावर आठी स्पष्टपणे झळकली. शिवाय 'हे पार्सल कुठल्या गावाहून आले आहे' ची सूक्ष्म छटाही त्यात मिसळलेली होती. "अहो, तुमचं तिकीट घ्या! सात रुपये झाले, सुट्टे नाहीत, दोन असले तर द्या, म्हणजे पाच द्यायला, नाहीतर उतरताना घ्या".
रुमालाची घडी आपल्या खिशात ठेवत गृहस्थ म्हणाले, "अहो पण माझ्याकडे पास आहे, मला तिकिटाची काही आवश्यकता नाही". पुढे बसमध्ये कसे दोन गट पडले, कसा गदारोळ उडाला, कशी बाचाबाची झाली वगैरे मी सांगत बसत नाही. बसमधल्या सामान्यजनांना कोणाची बाजू बरोबर आहे हे ठरवणे अगदीच अशक्य होऊन बसले आणि कोणीच माघार घेत नसल्याने सर्वसामान्य परिस्थितीत जे करण्यात येते तेच करण्यात आले. बस आपला नेहमीचा रस्ता सोडून पोलिस स्टेशनाकडे वळली.
पोलिस स्टेशनात विशेष म्हणजे त्या दिवशी पोलिस हजर होते. त्यांनी सगळे गार्हाणे ऐकून घेतले. आता पुढे काय ह्याची उत्सुकता सगळ्यांना वाटत होती. वेळ वाया जातोय म्हणून काही चाकरमाने निघून गेले असले तरी काही डांबरट लोक पुढे काय होते ते पाहण्यासाठी थांबलेले होते.
पण पुढे काहीच झाले नाही. सायबांनी स्वत: तिकिटाचे सात रुपये भरले. शिपायाला सांगून दोन चहा मागवले. कंडक्टर आणि गृहस्थाला चहा पाजला. अटक, वॉरंट, जामीनावर सुटका, जातमुचलका (हा शब्द कसला सेक्सी आहे राव!), न्यायालयीन कोठडी, थर्ड डिग्री यातले काही म्हणजे काही झाले नाही. And they all lived happily ever after च्या चालीवर सगळेच सुरळीत होऊन गेले.
बघा विचार करा! असा अनुभव यायला भाग्य लागते. हे जग सुंदर नसते तर असे काही शक्य झाले असते का? तिकिटाचे पैसे भरायचे राहिलेच बाजूला, मस्तपैकी चहाने वगैरे सरबराई झाली. तीसुद्धा पोलिस स्टेशनात. याला काय म्हणावे? या सगळ्याचे तात्पर्य काय? तात्पर्य दुसरे काही नाही! हे जग सुंदर आहेच.
सावकाश विचार करुन तुमचे मत सांगा, तोपर्यंत मी हा लेख प्रसिद्ध करतो. ( बाकी लेख प्रसिद्ध करणे आणि तो प्रसिद्ध होणे/असणे या दोन्ही भिन्न बाबी आहेत. पण आपण एकाच शब्दावर काम उरकत आहोत. What you say?)
मंगळवार, १ जून, २०१०
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
JABARADAST....!!! :D :D :D
उत्तर द्याहटवाहो खरचं जग सुंदर आहे .... हो
उत्तर द्याहटवाmasta re! jag/cup sundar aahe :D
उत्तर द्याहटवामैथिली, राज आणि राजेंद्र! थॅंक्स!
उत्तर द्याहटवाsahi!
उत्तर द्याहटवाधन्यवाद हर्षद!
उत्तर द्याहटवा