गुरुवार, १६ जून, २०११

इंद्रधनुष्य

       बराच वेळ जोर धरलेला पाऊस आता ओसरला होता. खिडकीच्या काचांवरचे पावसाचे थेंब ओघळून गेले होते. पावसानंतर नेहमी जाणवणारा हवेतला गारवा एकाच वेळी सुखकर वाटत होता आणि अंगावर काटाही आणत होता. मागे रेंगाळलेले पावसाचे एकदोन थेंब पडत होते पण त्यांच्याकडे खास लक्ष देण्याची काही गरज नव्हती. पावसात काही काळ विसावलेली रस्त्यावरली वाहतूक परत गती पकडत होती आणि पावसापासून बचाव करण्याकरता दुकानांच्या दर्शनी भागात थांबलेले लोकही एक एक करुन आपल्या वाटेने निघाले होते. सुटलेल्या थंडगार वार्‍यामुळे आपले हात अंगाभोवती लपेटून, रस्त्यावरच्या पाण्यातून वाट काढत माणसं परत चालायला लागली होती.

       घरातली टेलिफोनची रिंग तीनचारदा वाजली आणि थांबली. आतल्या खोलीतून कुणीतरी फोन घेतला असावा. कारण पहिल्या हॅलो नंतर चालू झालेलं बोलणं लांबून अस्पष्ट ऐकू येत होतं. थोड्यावेळाने तेही थांबलं आणि एका महिलेच्या आवाजातली हाक घरभरात ऐकू आली.

       "अमित, काय करतोयस? इकडे ये. काम आहे जरा."

       ज्या कुणाला ही हाक मारली होती तो २२ वर्षांचा एक तरुण मुलगा होता. सध्या तरी तो कॉंम्प्युटरसमोर बसलेला होता आणि पहिल्या हाकेला ओ देण्यासाठी तो कधीच प्रसिद्ध नव्हता. त्यामुळे आतनं काहीतरी आवाज आला अशी नोंद त्याच्या मेंदूने केली खरी पण त्याजोगी हालचाल करायच्या फंदात कुणी पडले नाही. भिंतीवरल्या घड्याळातल्या लंबकाची इकडून तिकडे आंदोलने चालूच होती. थोडा वेळ असाच गेल्यावर दुसर्‍यांदा मारलेली हाक मात्र पहिल्यापेक्षा खूपच जोरात होती आणि घरभर भल्यामोठ्या आवाजात अगदी स्पष्टपणे ऐकू आली. एवढ्या मोठ्या आवाजाचा इच्छित परिणाम न होता तर आश्चर्यच! तो तरुण मुलगा चेहर्‍यावर आठ्या घेऊन मुकाट्याने उठला. घरात कुणीही मोठ्या आवाजात बोलले, ओरडले, हाका मारल्या तर त्याला अस्वस्थ वाटत असे आणि 'नेहमीच हा आवाज घराबाहेर गेला असेल का?', 'कुणाला ऐकू आला असेल का?', 'एवढ्या मोठ्याने घरात आरडाओरडा करायची काही गरज आहे का?' असे प्रश्न त्याच्या मनात उत्पन्न होत. त्या बाबतीत खरंतर एवढा विचार करायची गरज नव्हती पण त्याला अस्वस्थ वाटत असे हेही तितकेच खरे होते. दुसरे म्हणजे वेळेवर न जाऊन पुढच्या आरडाओरड्याला तोंड देण्यापेक्षा आता लगेच जागेवरुन हलले तर ते जास्त फायद्याचे होते. कारण एकदा वेळेवर गेलं नाही तर त्याच्या आईची बडबड बराच वेळ चालू राहिली असती आणि आधी सांगितल्याप्रमाणे त्याला मोठमोठ्या आवाजात बोललेले, आरडाओरडा केलेले तर बिलकुल आवडत नसे. त्यामुळे शक्यतोवर ते टाळण्याकडे त्याचा साहजिकच कल असे.

"काय झालं एवढं मोठमोठ्याने हाका मारायला? काय काम आहे?"
"पहिल्या हाकेलाच ओ दिली असती आणि आत आला असतास तर मग कुणाला ओरडावं लागलं असतं?"
"तुला मी कितीवेळा सांगितलंय मोठमोठ्याने हाका मारत जाऊ नकोस म्हणून?"
"पण तसं केल्याशिवाय तुम्ही हालत नाही त्याला मी काय करु?"

       हे शेवटचे वाक्य एकदम खरे होते. मोठ्या आवाजात हाक मारल्याशिवाय या घरात कुणीही कधीही हालत नसे. आणि आपण मोठ्या आवाजात हाका मारलेले, बोललेले, ओरडलेले आपल्या मुलाला आवडत नाही हेही या आईला चांगले माहित होते. तरीही कधीकधी ती मुद्दाम तसे करत असे; कारण मग असं मुद्दाम मोठ्या आवाजात बोलल्यावर आपल्या मुलाचा संत्रस्त, वैतागलेला चेहरा बघण्यातही एक वेगळीच मजा येत असे. आताही त्याच्या नकळत आपले हसू दाबत आणि आपल्या बोलण्यातून ते जाणवणार नाही याची काळजी घेत तिने पुढे बोलायला सुरुवात केली.

       "अभिजीतचा फोन आला होता. आपल्या गाडीची चावी हरवली आहे. तुला घरातली दुसरी चावी घेऊन शालिमारजवळ बोलवलं आहे."
"काय? काय हरवलं आहे?" त्याने विचारले.
"चावी"
"कशाची चावी?"
"आपल्या गाडीची"
"कुठली गाडी?"
"दुचाकी रे!"
"कशी काय हरवली?"
"ते काय त्याने सांगितलं नाही. तुला पाठवून दे म्हणाला. शालिमारजवळ तो उभा आहे. लगेच यायला सांगितलं आहे."
"पण अशी कशी काय हरवली चावी? गाडी घेऊनच गेला आहे ना तो? मग चालवतानाच कशी हरवली मध्येच?"
"ते काय सांगितलं नाही त्याने. बहुतेक खिशातून पडली असेल."
"काय वैताग आहे हा! आता जा म्हणाव बोंबलत पावसात. आणि मी जाऊ कसा? गाडी तर तोच घेऊन गेला आहे."
"तुला रिक्षाने यायला सांगितलं आहे."
"रिक्षाने? एवढ्या जवळ यायला रिक्षावाला तयार होईल का?"
"न यायला काय झालं? दीडदोन किलोमीटर तर सहज असेल शालिमार."
"नाहीतर आपली चारचाकी गाडी घेऊन जाऊ का?"
"काही नको. तुझ्याकडे अजून लायसन्स नाही."
"पण मला चालवता तर येते ना?"
"तरीही नको. सांगितलंय तेवढं कर."

       आता इथे पुढे बोलायला काही उरलंच नव्हतं असं म्हणता येईल. या मुलाला चारचाकी गाडी चालवता येत होती हे खरे असले तरी शहरात, सगळ्या वाहतुकीत गाडी चालवायला त्याला अजूनही नीटसे जमत नव्हते. त्यामुळे आपले म्हणणे त्याने अजून पुढे रेटले नाही. शिवाय वाहतुक पोलिसाने पकडले तर काय? या प्रश्नाचाही विचार करणे आवश्यक होते. विनाकारण भुर्दंड सोसावा लागण्याची शक्यता होती.

       बेडरुममधल्या लाकडी कपाटातल्या ड्रॉवर्समध्ये पाच दहा मिनिटं उलथापालथ केल्यावर शेवटी त्याला ती दुसरी जादाची चावी सापडली आणि नंतर पॅंट बदलून, खिशात पैशाचं पाकीट, कंगवा टाकून, जातोय म्हणून आईला सांगून तो बाहेर पडला.

       वैतागत, चरफडत जरी तो घराबाहेर पडला असला तरी बाहेर आल्यावर मात्र त्याची मनःस्थिती लवकरच बदलली. रस्त्यावर आल्यावर त्या थंडगार हवेत त्याने छाती भरुन एक दीर्घ श्वास घेतला कारण घरातल्या पेक्षा बाहेर तर हवा अजूनच ताजी आणि प्रसन्न वाटत होती. पाऊस पडून गेल्यावर सगळेच कसे ताजेतवाने, धुतल्यासारखे स्वच्छ वाटत होते. रस्त्याकडेचा झाडांचा यात पहिला नंबर होता आणि त्यांच्या खालोखाल डांबराच्या काळ्या कुळकुळीत रस्त्याला दुसरा नंबर द्यायला कुणाचेच दुमत झाले नसते. पाऊस पडायचा थांबला असला तरी त्याचे एक सर्वत्र भरुन असलेले अस्तित्व मात्र सतत जाणवत होते. अशा या उल्हसित करणार्‍या वातावरणात रस्त्यावरच्या तुरळक रहदारीतून तो पुढे निघाला. रिक्षा स्टॅंडकडे जाताना मध्येच एका अवाढव्य बसच्या खाली, अजूनही कोरड्या असलेल्या रस्त्यावर बसलेले, एकदम गरीब चेहरा एक असलेले कुत्रे त्याला दिसले. थोडीशी मान बाहेर काढून कुत्र्याने इकडे तिकडे बघितले, बाहेरचा अंदाज घेतला आणि आपले अंग झटकून गाडीखालून बाहेर आले आणि उभे राहिले. त्यानंतर मग पुढचे पाय लांबवून, त्यानंतर मागचे पाय लांबवून त्याने भलाथोरला आळस दिला आणि डावीउजवीकडे बघून, रस्ता ओलांडून पलीकडच्या गल्लीत ते दिसेनासे झाले.

       रिक्षावाला यायला तयार होईल की नाही ही जी शंका या मुलाला वाटत होती ती सुदैवाने फोल ठरली आणि नेहमीचे खडाक टिंगचे काम आटोपून रिक्षावाल्याने रिक्षा रस्त्यावर घेतली. पाचदहा मिनिटातच शालिमार आले नि रिक्षाचे झालेले भाडे देऊन त्याने आपल्या भावाला शोधायला, टाचा उंचावून,मान वर करुन रस्ता पालथा घालायला सुरुवात केली. शालिमारच्या इथे त्याला बोलावले होते खरे पण रस्त्याच्या कोणत्या बाजूला आपल्याला बोलावले आहे हे त्याला माहित नव्हते. ते आता स्वत:च शोधणे भाग होते. भावावर मनातून चरफडण्याखेरीज दुसरे अजून काहीही करण्यासारखे नव्हते.

       या दोन भावांमधले नाते तसे अगदी सर्वसामान्य, नेहमी आढळणारे असेच होते. तो स्वत: २२ वर्षांचा आणि त्याचा भाऊ त्याच्यापेक्षा तीन चार वर्षांनी मोठा होता. त्यामुळे साहजिकच थोरल्या आणि धाकट्यामध्ये बहुतांश वेळा पहायला मिळतात तसेच मतभेद, वेगवेगळी मते, त्यावरुन वादविवाद असे या दोघांमध्येही होते. आपल्या लहान भाऊ लहान आहे, त्याला काही कळत नाही, धाकटा असल्याने त्याला उपदेश करणे हे आपले कर्तव्य आहे हे जेवढे थोरल्याला वाटत असे तेवढेच धाकट्याला आपला भाऊ बावळट आहे, वेंधळा आहे, नुसता म्हणायला थोरला आहे असे वाटत असे. एकमेकांबाबत असे वाटण्याबाबत तरी दोघे समान होते असे म्हणता येईल. या दोघांमध्ये थोरल्या भावाच्या वस्तू बर्‍याचदा विसरत, गहाळ होत किंवा घरात अगदी डोळ्यासमोर असल्या तरी त्या दिसत नसत आणि आजही तसेच काही तरी झाले होते.

       बराच वेळ इकडेतिकडे शोधूनही जेव्हा त्याला त्यांची गाडी, आणि तिची चावी शोधत असलेला भाऊ दिसेना तेव्हा या मुलाने परत घरी फोन लावला; आणि त्याला जसे वाटत होते तसेच झाले. घरुन त्याला काही महत्त्वाची माहिती मिळाली नाहीच उलट डोळे उघडे ठेऊन जरा इकडे तिकडे बघायचा सल्ला मात्र मिळाला. वैतागून त्याने फोन बंद केला आणि पुन्हा नव्याने बारकाईने शोध घ्यायला सुरुवात केली. शोधत शोधत तो शालिमार पासून थोडासा पुढे आल्यावर मात्र त्याला आता काय करावे हे सुचेना. काय करावे याचा विचार करत असतानाच अचानक त्याचा भाऊ त्याला दिसला. रस्त्यावरुन खाली वाकून शोधत असल्याने एवढा वेळ तो एका गाडीमागे लपला होता, तो आता उभा राहिल्यावर एकदम दृष्टीपथात आला. एवढा वेळ तो न दिसण्यामागे हे कारण होते हे बघून त्यालाही जरा हसू आले. जवळच थोड्या अंतरावर बिनचावीची त्यांची गाडीही निमूटपणे उभी होती. तिच्याही एकूण रुपावर जरा खिन्नतेचं सावट पसरल्यासारखं वाटत होतं.

       "अरे काय झालं? कशी हरवली चावी?"
"काय माहित नाही ना अरे! आत्ता माझ्या खिशात होती आणि आता बघतोय तर नाहीये."
"म्हणजे? तू इथे गाडी लावली होतीस का?"
"मग मी काय सांगतोय? इथे गाडी लावल्यावरच ती गेली. गाडी चालवताना चावी कशी हरवेल बावळट माणसा?"
"तुझं काय काम होतं ते झालं का? इथे गाडी कशाला लावली होती?"
"इथे गाडी लावून मी झेरॉक्स काढायला गेलो होतो. परत आलो तर चावी नाहीयेच खिशात. एकदम गायबच झाली."
"तू नक्कीच कुठेतरी पाडली असशील. तुझे हे दरवेळेसचे आहे."
"आता इथं रस्त्यावर बडबड करण्यापेक्षा चावी शोधायला जरा मदत केलीस ना तर बरे होईल."
"गाडीलाच असेल नाही तर लावलेली. नीट बघ."
"मला वाटतं चावी गाडीलाच लावलेली असती तर मला लगेच कळले असते, नाही का?"
"तू इथे गाडी लावल्यावर कुठे कुठे गेला होतास? तिकडे जाऊन बघून आलास का?"
"जाउन आलो. नाही मिळाली कुठेच. एकदम कशी गायब झाली कळतच नाहीये."
"परत जाऊन बघून येऊ चल आपण."

       एवढं बोलून झाल्यावर त्या दोघांची दुक्कल परत चावी शोधण्यासाठी रस्ता सोडून जवळच्या इमारतीकडे निघाली. त्याच्याआधी जवळच्याच एका पानटपरीवर जाऊन या मुलाने चावीबद्दल चौकशी केली पण विशेष असे काही हाती लागले नाही. पानटपरीवाल्याने अशी काही चावी आपल्याला न दिसल्याचे सांगितले. रात्रभर गिर्‍हाईकांच्या गर्दीने ओसंडून वाहणार्‍या, इमारतीच्या दर्शनी भागात असलेल्या एका हॉटेलामध्ये आता सकाळी निवांतपणे फरशी धुण्याचे काम चालले होते आणि त्या पाण्याचे ओघळ बाहेर पर्यंत आलेले होते. त्या हॉटेलात काम करणार्‍या पोर्‍याला पण चावीबद्दल काहीच माहित नव्हते. त्यामुळे इमारतीच्या मागच्या बाजूला असलेल्या झेरॉक्सच्या दुकानाकडे या दोघांनी आपला मोर्चा वळवला आणि इमारत ओलांडून ते मागे निघाले. पण तिकडेही दहा मिनिटे रस्ता धुंडाळून, झेरॉक्सवाल्या दुकानदाराला विचारुनही काहीच उपयोग झाला नाही.

       "जाउदे, आता किती वेळ शोधत बसणार? मला नाही वाटत आता चावी सापडेल. आणि ही दुसरी चावी मी आणलीये ना. ती आहेच की!" कंटाळून धाकट्याने हा प्रकार उरकता घेण्याच्या दृष्टीने सुचवले.
"ठीक आहे चल. जास्त वेळ वाया घालवण्यात काही अर्थ नाही. पण या आहे त्या चावीवरुन लवकर दुसरी चावी बनवून घेतली पाहिजे. नाहीतर ही सुद्धा हरवली तर पंचाईत होऊन बसेल."
"त्याला काय वेळ लागतोय? लगेच मिळेल करुन."

       मात्र दहा पंधरा मिनिटांनी जेव्हा ते इमारतीच्या मागच्या भागातून दर्शनी भागात आले तेव्हा त्यांच्या गाडीचा तिथे मागमूसही नव्हता. जिथे गाडी उभी केलेली होती ती जागा पूर्ण रिकामी होती आणि तिथेच रस्त्यावर साठलेल्या थोड्याशा पाण्यात, पेट्रोलचे चारदोन थेंब पडून तयार झालेले छोटेसे इंद्रधनुष्य सोडले तर दुसर्‍या कशाचेही नामोनिशाण नव्हते.

       

३ टिप्पण्या: