सोमवार, १५ फेब्रुवारी, २०१०

छंदातूनच उपजीविका?

    आजकाल मुलांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रातच करियर करु देण्याचा सल्ला जो तो पालकांना देतो आहे. 'थ्री इडियटस' मध्येही हा विषय येऊन गेला आहे. ज्याची आपल्याला बिलकूल आवड नाही अशा क्षेत्रात काम करण्यापेक्षा आवडीच्या क्षेत्रात काम करुन कमी पैसे मिळाले तरी चालतील पण कामाचं समाधान मिळेल, तुमच्या आवडीचंच काम असल्यामुळे त्याचा ताण जाणवणार नाही असा यामागचा विचार आहे. पण आपल्यापैकी किती जण अशा त्यांच्या आवडीच्या क्षेत्रातच काम करत आहेत हा संशोधन करण्यासारखा विषय आहे.

    काही दिवसांपूर्वी वाचलेल्या माडगूळकरांच्या लेखात एक वेगळाच विचार वाचायला मिळाला. व्यंकटेश माडगूळकरांच्या 'चित्रे आणि चरित्रे' मध्ये एक लेख आहे. 'रंगरेषांचे मृगजळ' म्हणून. उत्तम आहे. माडगूळकरांना खरेतर चित्रकलेची फार आवड होती. पण परिस्थितीमुळे त्यांना चित्रकलेचा अभ्यास करता आला नाही. आपलं बालपण, आईच्या व्रतवैकल्यावेळी काढलेली वेगवेगळी चित्रं, पोळ्याला मातीचे बनवलेले बैल, शाळेतले चित्रकलेचे कलाल मास्तर, पुढे नोकरीधंद्यातले उमेदवारीचे दिवस अशा अनेक आठवणी माडगूळकरांनी या लेखातून आठवल्या आहेत.

त्यात ते म्हणतात,
    "आपल्या छंदातूनच उपजीविका करता आली, तर उपजीविका करणं हे माणसाच्या मानेवरचं जोखड न होता विटीदांडूसारखा एखादा खेळ होईल. पण असे भाग्यवान फारच थोडे असतात, की ज्यांचा छंद आणि उपजीविकेचं साधन एकच असतं. आणि जरी असलं, तरी ज्याचा उपयोग अनावश्यक वस्तू खरेदी करण्यापलीकडं होत नाही, असा अधिक पैसा मिळवण्यासाठी या छंदाचा, आणि स्व:तची उपजीविका करणार्‍या खेळाचा बोल बोल म्हणता धंदा होतो आणि कसलाही धंदा करायचा म्हटलं, की माणूस म्हणून आपण उणे उणेच होत जातो."

    पटण्यासारखे आहेत हे विचार. एखाद्याला समजा चित्रकलेची आवड आहे. पण अमुक एखाद्या चित्रकाराच्या चित्राला एवढी रक्कम मिळाली म्हणून मग आता माझीही चित्रं अशीच विकली जाण्यासाठी एखाद्याने विचार सुरु केला तर छंदाचा आनंद मिळणे दुर्लभ होऊन जाईल. पोस्टाची तिकिटं गोळा करणे हा मला वाटतं जगातल्या सर्वाधिक लोकांचा छंद असावा. आता त्यातही एखाद्या संग्राहकाने मी अमुक तमुक तिकिटे मिळवीनच आणि त्यातली काही विकून एवढे पैसे मिळतील असा विचार केला तर तो छंद मनाचा विरंगुळा न राहता डोकेदुखी होऊन बसेल, नाही का?
tags:Thoughts, Literature, Painting, Hobby
-सौरभ.

४ टिप्पण्या:

  1. बरोबर आहे. चित्रपटात दाखवायला सोपे असते. मला गायन आवडते. मी आता माझी माहितीतंत्रज्ञानातली नोकरी सोडली व गायला लागलो तर मला कोणती बॅंक घरासाठी कर्ज देईल?

    उत्तर द्याहटवा
  2. साधक, तुमची प्रतिक्रिया भन्नाट आहे. हसून पुरेवाट झाली. एक गायक सलवार कुडता घालून एकदम आयसीआयसीआय बॅंकेच्या समोर उभा आहे असे चित्रच डोळ्यांपुढे आले. जियो.

    उत्तर द्याहटवा