शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०१०

दरोड्याची तयारी

       दरोड्याची तयारी कशी करतात? त्यावेळेस काय काय बरोबर घ्यावे लागते? कोयता, लोखंडी गज? पाण्याची बाटली? कुणाला माहिती आहे का? दरोड्याच्या तयारीतील अमुक अमुक जणांना अटक ही बातमी आजकाल सारखीच पेपरात वाचायला मिळते. या बातमीने मला फारच प्रश्न पडायला लागले आहेत.

       आपल्याकडचे पोलिस खाते बर्‍यापैकी दक्ष असले तरी बहुतेक वेळा ते गुन्हा घडून गेल्यावरच जागे होतात. (जसे की अतिरेकी हल्ल्यानंतर सगळीकडे कडक सुरक्षा बंदोबस्त ठेवतात. त्याने काय होते हे अजून मला कळलेले नाही.) तर तेच पोलिस खाते दरोड्याच्या तयारीतल्या अमुक अमुक जणांना पकडते हे एकदम आश्चर्यजनक आहे.

       बरे दरोड्याच्या तयारीत जेवढ्या जणांना पकडतात तो आकडा नेहमी सहाच असतो असेही माझे निरीक्षण आहे. अगदी क्वचितप्रसंगी हा आकडा आठ असतो पण विषम तर तो मुळीच नसतो. मी या बातमीचा फार फार विचार केला आहे. कुणाला हे निरर्थक वाटण्याचा संभव आहे पण मला तरी बरेच प्रश्न पडले आहेत.

       या लोकांना जेव्हा पकडतात तेव्हा ते नक्की काय करत असतात? हत्यारं वगैरे परजून उभे असतात की बसलेले असतात? ( या टोळीचा म्होरक्या आणि त्याचे साथीदार एका वाळूच्या ढिगार्‍यावर अंधारात बसले आहेत, म्होरक्या हजेरी घेत आहे, "कारं तो चंद्या कुठं उलथलाय? आला का नाही?" ,"सरदार, त्याची म्हातारी मरायला टेकलेली हाय" वगैरे संवाद चालू आहेत असं एक चित्र मी बनवलं आहे पण ते खात्रीलायक वाटत नाही. ) त्यावेळेस हे एका रांगेत उभे असतात का? त्यावेळेस त्यांचा म्होरक्या कुठे उभा असतो? बरे पोलिसांना हे वेळेत समजते कसे?

       मग ते आल्यावर काय होते? एकदम रो रो करत पोलिसांची जीप येते आणि मग पळापळ होते, पोलिस त्यांना पकडतात, कोयते, काठ्या, लोखंडी गज जप्त करतात असे काही होते का? काहीच कळत नाही. ( आपल्या म्हातारीसाठी घरी राहिलेला चंद्या वाचला काय? )

       बरे मग नेमके तयारीत असतानाच कसे पकडतात? दरोडा घालताना किंवा दरोडा घालून झाल्यावर किती जणांना पकडतात? त्याची आकडेवारी काय?

       असो. असे हजार प्रश्न आहेत. मान्य आहे की कुणाला हे सगळेच हास्यास्पद वाटेल पण पेपरातली ही बातमी वाचली की मला दर वेळेस असे वाटत राहते. दरोड्याच्या तयारीतल्या गुंडांना बघायला मिळाले तर बरे होईल असेही वाटून जाते. :-)
Tags:Newspaper, Languagee, News, Satire
-सौरभ

२ टिप्पण्या:

  1. सौरभ, आपले निरिक्षण बरोबर आहे. पोलीस असेच करतात. दरोड्याचा गुन्हा होण्यासाठी ५ लोक असवते असे कायदा आहे. त्यामुळे नेहमी ५ पेक्षा जास्त लोक दाखीविले जातात. यातील खरी गमत्त तुमाला सांगितले तर विस्वाश बसणार नाही. पकडले गेलेले बरेच लोक कोठे जमलेले नसतात तर पोलिसांनी घरी जाऊन पकडून आणलेले असतात. पोलिसांना अशा खूप लोकांची माहिती असते, की जे असे गुन्हे करीत असतात. पोलीसानाही कामाचे टार्गेट ठरून दिलेले असते. अशा टोळ्या पकडल्याचे दाखविण्यासाठी ते हा प्रकार करतात. दरोडे पडल्यावर आरोपी सापडत नाहीत. म्हणून किमान दरोडे पडण्याआधी तरी आम्ही आरोपी पकडतो असे दाखविले जाते. त्यातील संख्या पोलिसच्या मनावर असते. ५ पेक्ष जास्त झाले मान्ह्जे झाले.असा हा सारा प्रकार असतो. तयारी वगेरे काही नसते. हा सगळा बनव असतो.. पोलीस बाजारातून वस्तू आणून त्या जप्त केल्याचे दाखवितात. पण एक निश्चित कि त्यात सामान्य लोकांना पकडून आणत नैत. असतात ते गुनेगारच असतात. मानून आम्ही पेपरवाले पण त्याकडे दुर्लक्ष करतो.
    http://policenama.blogspot.com

    उत्तर द्याहटवा
  2. माहितीसाठी धन्यवाद विजयसिंह.

    -सौरभ.

    उत्तर द्याहटवा