शनिवार, २० फेब्रुवारी, २०१०

मराठीतील प्रवासवर्णने

    मराठीत अनेक दर्जेदार लेखकांनी दर्जेदार प्रवासवर्णने लिहून ठेवली आहेत. अगदी गोडसे भटजींपासून ते मीना प्रभूंपर्यंत वेगवेगळ्या लेखकांनी हा लेखनप्रकार हाताळलेला आहे. त्यात प्रत्येकाची लिहण्याची शैलीही वेगळी. त्यामुळे अगदी व्यामिश्र म्हणता येईल इतकी वेगवेगळी प्रवासवर्णने मराठीत आहेत. थोडी काही नावे देतो. वासंती घैसास यांनी भारतातील प्रवासावर वर्णने लिहली आहेत. पुलंची तीन प्रवासवर्णने 'अपूर्वाई', 'जावे त्यांच्या देशा' आणि 'पूर्वरंग' सगळ्यांना माहित आहेतच. ( तुम्ही अजूनही वाचली नसतील एकतर तुम्हाला वाचनाची आवडच नसावी किंवा मग तुम्हाला कर्मदरिद्री म्हणण्यास हरकत नाही.) त्यानंतर रमेश मंत्रींनी अतिशय उत्तम प्रवासवर्णने लिहली आहेत. ते युसिस मध्ये कामाला होते त्यामुळे त्यांची सारखीच भटकंती चालू असे. गंगाधर गाडगीळांची गोपुरांच्या प्रदेशात, 'चीन-एक अपूर्व अनुभव', 'नायगाराचे नादब्रम्ह', 'रॉकी-अमेरिकेचा हिमालय' अशी एकाहून एक उत्तम प्रवासवर्णने आहेत. पण त्यांचे 'सातासमुद्रापलीकडे' हे माझे भयंकर म्हणजे भयंकर आवडते पुस्तक आहे. थोड्याशा ललित अंगाने जाणारे हे पुस्तक म्हणजे मराठीतल्या प्रवासवर्णनांमधले एक मानाचे मान पान आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे मीना प्रभूंनी देखील उत्तम प्रवासवर्णने लिहली आहेत. उलट त्यांचा हा एकच लेखनप्रकार मी वाचला आहे. याशिवाय त्यांनी इतर काही लेखन केलेले असल्यास मला तरी माहिती नाही. यामध्ये 'इजिप्तायन', 'तुर्कनामा', 'ग्रीकांजली', 'रोमराज्य भाग १ आणि २', 'चीनी माती' वगैरे बरीच पुस्तके आहेत. अण्णा भाऊ साठे यांचे 'माझा रशियाचा प्रवास' हे अवघे साठ सत्त्तर पानांचे पुस्तक तर अवश्य वाचनीय आहे.

    अनेक उत्तमोत्तम पुस्तके मराठीत उपलब्ध आहेत. येत्या काही दिवसांत यांमधल्या काही पुस्तकांवर मी जरुर लिहीन. तोपर्यंत तुम्ही काही मिळवू शकलात तर जरुर वाचा. प्रत्येकाचीच पुस्तकाबद्दलची प्रतिक्रिया वेगवेगळी असते आणि वाचलेल्या सामाईक पुस्तकांबद्दल दुसर्‍याशी चर्चा करण्यासारखा आनंददायक अनुभव सारखा सारखा मिळत नाही.

-सौरभ.

२ टिप्पण्या:

  1. उत्तम आढावा. ’वंगचित्रे’ला प्रवासवर्णन म्हणता येईल का? कदाचित कठोर व्याख्येत बसणार नाही, पण तेही प्रवासवर्णनच. बाकी ’धुक्यातून लाल ताऱ्याकडे’ ह्या काणेकरांच्या पुस्तकाबद्दल (रशियाचे प्रवासवर्णन) बरंच ऐकलं आहे, पण पुस्तक काही सापडत नाही :(

    उत्तर द्याहटवा
  2. प्रतिसादाला उशीर झाला आहे. क्षमस्व!

    वंगचित्रे कोणाचे आहे? माहितच नाही... :-(

    धुक्यातून लाल तार्‍याकडे उत्तम आहे. कसे काय विसरलो मी? तशी बरीच प्रवासवर्णने राहिली आहेतच म्हणा.

    उत्तर द्याहटवा