शुक्रवार, २९ जानेवारी, २०१०

ललित नभी मेघ चार....

   काही दिवसांपूर्वी शांता शेळके यांचे 'ललित नभी मेघ चार' वाचत होतो. ललित लेख आणि ते देखील शांताबाईंचे हा एक दुग्धशर्करा योग आहे. मुळात ललित हा प्रकारच इतका सुंदर आहे (ललित नावाखाली बोजड, दुर्बोध आणि अति अलंकारिक भाषा वापरुन ललित लिहणारे इथे अपेक्षित नाहीत.) तर या पुस्तकात असाच काही संदर्भासाठी विल ड्युरंट यांचा आधीच्या नोंदीतला परिच्छेद शांताबाईंनी दिलेला आहे. साध्या सोप्या भाषेतला हा मराठी अनुवाद या नोंदीत बघू.
   "मानवी संस्कृती हा एक वाहता प्रवाह आहे. त्याला किनारे आहेत. माणसे आपापसात लढतात. चोर्‍यामार्‍या करतात. एकमेकांचा वध करतात. खूप संघर्ष करतात. त्यांच्या रक्ताने हा प्रवाह भरुन जातो आणि इतिहास या संघर्षाची, रक्तपाताची इमानेइतबारे नोंद करतो. पण त्याच वेळी याच या प्रवाहाच्या दोन्ही तीरांवर, शांतपणे, कुण्याच्या ध्यानातही येणार नाही अशा रीतीने, माणसे प्रेम करतात. विवाहबद्ध होतात. मुलाबाळांना जन्म देऊन त्यांचे संगोपन करतात. गाणी म्हणतात, नाचतात आणि कविता लिहतात. मानवी संस्कृतीचा इतिहास म्हणजे खरोखर या प्रवाहाच्या तीरावर जे घडते त्याचा इतिहास असतो, असायला हवा. पण इतिहासकार निराशावादी असतात त्यामुळे संस्कृतिप्रवाहाच्या तीरावर जे जीवन फुलत असते त्याकडे ते दुर्लक्ष करतात आणि तिच्या रक्तलांच्छित प्रवाहाचेच चित्रण करत राहतात. "

   असं काही वाचलं की वाटतं वाचनाच्या आवडीचं सार्थक झालं. पण असं काही वाचलं की हमखास वाटतं की अरे मलाही असं काही लिहता आलं असतं तर.....
जर तरच्या गोष्टी करण्यात काही अर्थ नाही.
tags: Will Durant, History, English Literature

-सौरभ.

५ टिप्पण्या:

  1. शांत शेळके शांत शेळके आहेत...

    उत्तर द्याहटवा
  2. > "Perhaps the cause of our contemporary pessimism is our tendency to view history as a turbulent stream of conflicts...
    >---

    शांताबाईंच्या शैलीबद्‌दल बोलायलाच नको, पण विल ड्युरंटचे विचार मला सैरावैरा धावत असल्यासारखे वाटताहेत. एकीकडे तो म्हणतो की इतिहासकार निराशावादी असतात, ज्याचा काहीही पुरावा तो देत नाही. आपल्या संस्कृतीवर विश्वास असलेले औरंगज़ेबासारखे, हिटलरसारखे, पोपसारखे आशावादी लोक ती लादायचा प्रयत्न करतात, जेणेकरून ती तीराकाठची संस्कृती त्यांच्या श्रद्‌धांना धरून फुलत रहावी. आपल्या भल्याबुर्‍या संस्कृतीवर विश्वास असलेले (शिवाजीसारखे) आशावादी लोक परकीय आक्रमणाविरुद्‌ध प्रखर लढा देतात, जेणेकरून ती तीराकाठची संस्कृती रुजलेल्या श्रद्‌धांना धरून फुलत रहावी. असल्या भव्य लढ्यांचं इतिहासकारांना वाटणारं आकर्षण हा त्यांच्या निराशावादाचा पुरावा नाही; आणि गुळचट नाचगाण्यांच्या कथा लिहिणे-वाचणे यात आशावाद वगैरे काही नाही.

    आणि 'contemporary pessimism ... turbulent stream of conflicts'? लोक अष्टौप्रहर क्रिकेट आणि सिनेमा पाहण्यात गुंतले आहेत. ५५-५६ वर्षाचे घोडे आपले वाढदिवस साज़रे करतात आणि काहीतरी चिकनचुकन खाऊन हज़ारो रुपये उधळतात, दारु पिऊन बरळतात. यात कुठला आला निराशावाद? आज़ अगदीच मागासलेले देश सोडल्यास इतकं ऐषारामाचं, conflict-free आयुष्य पूर्वी मानवज़ातीच्या वाट्याला आलेलं नसावं.

    शिवाय इतिहास हा काही राजकारण, राज्यकर्ते, राजवटी यांचाच असतो, असं नाही. तो साहित्याचा असू शकतो, अगदी क्रिकेटचाही असू शकतो.

    उत्तर द्याहटवा
  3. निखिल, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. मात्र ती डोक्यावरुन गेली.

    नानिवडेकर, विल ड्युरंट असेच म्हणत आहे की बर्‍याच वेळेला इतिहासकार ’रक्तलांच्छित’ इतिहासाचे ( turbulent stream of conflicts ) चित्रण करीत असल्यानेच आपण इतिहासाकडे एका निराशवादी दृष्टिकोनातून बघत आहोत. दुसर्‍या बाजूचा इतिहासही लक्षात घेतला पाहिजे.
    अगदी कुणालाही विचारलं तर त्याला अगदी दुसर्‍या महायुद्धातल्या वगैरे सुद्धा एक दोन घटना सांगता येतील. पण त्याच माणसाला मानवी जीवनात कसकसे बदल होत गेले, मानवी जीवन सुखकर करणारे वेगवेगळे शोध कधी लागले ते सांगता यायचं नाही.
    "शिवाय इतिहास हा काही राजकारण, राज्यकर्ते, राजवटी यांचाच असतो, असं नाही. तो साहित्याचा असू शकतो, अगदी क्रिकेटचाही असू शकतो."
    तुम्ही याला दुजोराच देत आहात.

    उत्तर द्याहटवा
  4. सौरभराव : विल ड्युरंटच्या डोक्यात एक कल्पना आली, आणि तो सगळ्या गोष्टींना तिच्यात भरडतो आहे. ज़सा तो, तसेच त्याचे तुमच्यासारखे वाचक. 'इतिहास साहित्याचा असू शकतो' याचा अर्थ 'तसा इतिहास आहे, आणि तो लोक वाचतात' असा मला अभिप्रेत होता. त्यात ड्युरंटला दुज़ोरा नाही. पहिले निष्कर्ष काढायचा, मग त्या चष्म्यातून जग पहायचं, असा तुमचा प्रकार मला वाटतो आहे. रामानी रावणाला मारलं हे लोक आठवतात, तसं बापाच्या शब्दाखातर राज्य सोडलं, त्याआधी कौसल्येकडे 'चंद्र हवा' हट्ट केला, या गोष्टीही आठवतात. विज्ञानामुळे मानवी जीवनाची ऐहिक बाज़ू सुधारली, हे प्रत्येकाला माहीत असतं. औरंगज़ेब माहीत असतो, तसेच कबीर, तुकाराम, तानसेन माहीत असतात.

    इतिहासातली 'रक्तलांच्छित पानं' भव्य असतात, अनेकदा दूरगामी परिणाम केलेली असतात. त्या चित्रणाचा निराशावादाशी काय संबंध आहे, हे पहिले तुम्ही सांगा. माणूस युद्‌ध करतो/वाचतो त्यापेक्षा जास्त वेळा मंदिरात ज़ातो. इतिहासकार त्याची कितपत दखल घेताहेत याची चिंता तो ड्युरंटसारख्या माणसांवर सोडून आपली कामं करत राहतो.
    .

    'ललित नभी मेघ चार' याचा संबंध शान्ताबाई शेळक्यांच्या ललितलेखनाशी आहे की फक्त 'ललित' मधल्या लेखनाशी आहे?

    - नानिवडेकर

    उत्तर द्याहटवा
  5. थांबा थांबा थांबा!
    नानिवडेकर आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार. माफ करा मात्र एकाच चष्म्यातून बघणे वगैरे हे जरा जास्तच होते आहे (तसा मला चष्मा आहेच म्हणा.) तरीपण येथे मी स्पष्ट सांगतो की एखाद्या लेखाचा, लेखकाचा, मतांचा एवढ्या खोलात जाऊन विचार करुन माझे डोके शिणून जाते. दुसरे असे की माझे वाचन बहुतांश वेळा त्याचा आनंद घेण्यासाठीच मर्यादीत असते. उगाच एखाद्या विषयावर जसे की आता कम्युनिझम वर माझे मत बनवायचे आहे तर त्या संदर्भात पुस्तके वाचून बनवणे असे मी करत नाही. जे वाचतो, त्यातले काही आवडले की त्याची नोंद करुन ठेवावी असे एकंदर काम आहे. प्रामुख्याने यासाठीच या ब्लॉगचा घाट घातला आहे. आज मी इथे काही लिहणार, उद्या त्याच्यावर काहीतरी विचारणा होणार, मग त्याचा प्रतिवाद करा, मग आपली बाजू जोरकस मांडण्याकरीता परत संदर्भ शोधा, रोजच आता कसे प्रत्युत्तर देऊ याचा ताण सहन करा असे हे सगळे कशाकरिता? मग हा ब्लॉग चालवणे एक दिव्य होऊन बसेल. तर ते मला अपेक्षित नाही.
    कुणाला वाटेल बाजू लंगडी पडल्याने मी सपशेल माघार घेतली. वाटू दे, हरकत नाही. कुणी म्हणेल मग पहिल्या प्रतिक्रियेतून कशाला प्रतिवाद केलात, हे तेव्हाच कळत नव्हते का? (एखादी वस्तू धाडकन खाली कोसळावी तसा हा प्रकार कुठे चालला आहे, कुठे जाण्याची चिन्हे आहेत हे माझ्या अचानकच लक्षात आले) कुणी म्हणेल तुम्हाला काय उत्तम, छान, सुंदर अशाच प्रतिक्रिया तुमच्या ब्लॉगवर अपेक्षित आहेत का? वगैरे वगैरे. काय वाटायचं ते वाटू देत.
    तुमच्या मताचा अनादर करु इच्छित नाही मात्र उगाच डोके शिणवण्यात या सगळ्याचा शेवट होणार असेल तर मला ते करायचे नाही.
    येथेच थांबतो.
    धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा