सोमवार, २५ जानेवारी, २०१०

प्रस्तावना

संस्मरणीय ब्लॉगवरची ही पहिलीच नोंद आहे. काही दिवसांपूर्वी, खरंतर वर्षंच झाली असतील, ब्लॉगिंगचे एक दोन प्रयत्न करुन झाले होते. पण पहिल्या दोन तीन नोंदींपुढे काही लिहणं सरकलं नाही. वेळ आली नव्हती असं म्हणता येईल. मोठमोठे लेखक ही एवढी पुस्तकं कशी लिहतात याचं आश्चर्य मला आधीपासूनच आहे. मी जे थोडंफार लेखन संकेतस्थळांवर केलं आहे त्यावेळचा अनुभव विचारात घेतला तर एखादी कल्पना स्फुरली की ती मनात इतकी घोळत राहते की बहुतांश विचार त्याचेच चालू राहतात हे माहिती होतं. लेखकांचंही असंच काही असावं.
ब्लॉगिंग बाबतची दुसरी एक गोष्ट म्हणजे तुमच्या मनातले विचार तुम्ही मांडता, ते प्रसिद्ध करता, (ते वाचनीय असतील तर) अनेकजण ते वाचतात. थोडक्यात सांगायचं झालं तर अशी एक खिडकी तुम्ही ब्लॉगिंगने उघडता ज्यातून बाहेरच्यांनाही तुमच्या मनात थोडंफार डोकंवायची संधी मिळते. इथेच थोडी गोची होते. निदान माझी तरी झाल्याचं म्हणता येईल. तुम्ही लिहलेले लेख, अनुभव, आठवणी, काही बाबींबद्दलची तुमची मतं यावरुन तुमची विचार
करण्याची पद्धत देखील कळून येते. माणूस कसा आहे ते कळायला लागतं. स्वत:बाबतच्या अशा काही गोष्टी जेव्हा तुम्ही इतरांसोबत वाटता तेव्हा कालांतराने "अरेच्चा! मी तर सगळंच लिहून बसलो, माझ्याबाबतीत जाणून घेण्यासारखं आता काही उरलेलं नाही" असंही वाटण्याची शक्यता आहे. थोडक्यात स्वत:च्या व्यक्तिमत्त्वात इतरांना जरा जास्तच डोकावू देण्याचा हा प्रकार आहे. (* हे विचार कदाचित फक्त माझ्याच डोक्यात वळवळत असतील, इतरांनाही असंच वाटायला पाहिजे असं काही नाही.) त्यामुळेच ब्लॉग लिहणे, नियमाने लिहणे, स्वत:चे विचार शब्दरुप करणे (वॉव!) वगैरे बर्‍यापैकी धाडसाची गोष्ट आहे असं मला वाटतं. ब्लॉग नियमाने लिहणार्‍यांचे मला कौतुक वाटते. "लोक काय म्हणतील?" याचा जरा जास्त विचार करणार्‍यांना ब्लॉग लिहायला जड जात असावे असाही माझा आपला एक अंदाज आहे. (परत एकदा *)

असो. आता या ब्लॉगच्या विषयांकडे वळू यात. अर्थातच माझ्या आवडीच्या विषयांवरच मी येथे लिहीन. आपल्या आवडत्या कार्यक्षेत्रातच तुम्ही शिरला असाल तर ते त्या कामाचं ओझं वाटत नाही तसंच आपल्या आवडत्या बाबींवर लिहणंही अवघड नसावं असं सध्या तरी मानून चाललो आहे. मग कोणत्या विषयांवर मी लिहणार आहे? साहित्याचा नंबर अर्थातच वरचा लागेल. वाचलेली पुस्तकं, त्यातनं काढलेली टिपणं वगैरे कुणासोबत वाटायला मला नक्कीच
आवडेल. दुसरा विषय आहे तो म्हणजे फोटोग्राफी. माझी काही मला बरी वाटत असलेली चित्रं देखील मी इथे प्रसिद्ध करीन. आणि त्यानंतर ते म्हणजे संगीत. या विषयाबाबत मी नक्की काय करणार आहे, काय लिहणार आहे हे खुद्द माझं मलाच माहित नाहीये. ते पुढचं पुढे बघू. त्यामुळे संगीत इथंच संपलं. या व्यतिरीक्त अनुभव, प्रवासवर्णनं वाचायला कुणाची हरकत असणार आहे का? नाही ना? धन्यवाद. हेच मला अपेक्षित होतं.

तर असा हा सरळ सरळ मामला आहे. काहीतरी वाचनीय आणि संस्मरणीय तुम्हाला देऊ शकेल असं मला वाटतं ते कसं जमतं ते पाहूयात.
अच्छा. भेटूयात पुढच्या लेखात.

-सौरभ.

ता.क. : एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे या ब्लॉगवर प्रसिद्ध होणार्‍या नोंदी अगदी आटोपशीर ठेवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आजकाल आधीच लोकांचा इंटरनेटवर इतका वेळ जात असतो त्यात माझ्या ब्लॉगची भर नको.
(त्यात विचित्रपणा असा की एवढा वेळ घालवूनही नंतर हातात काही पडलंय असं वाटत नाही. इतका वेळ वाया गेल्याबद्दल मग स्वत:चाच राग येतो.*) तर तसं होऊ नये असा प्रयत्न राहील. या ब्लॉगवर छोटीशी चक्कर मारायची,
वाचनीय असेल तर वाचायचं नाही तर पुढे तुमच्या कामांना तुम्ही मोकळे.

३ टिप्पण्या:

 1. आपले अभिनंदन, इतका सुटसुटीत ब्लॉग मला आपण माझ्या इथे प्रतिक्रया दिलीत म्हणून वाचावयास मिळाला. पण म्हणता तसे लिखाण वरून व्यक्तीच्या विचारांची पद्दत, लेखकाचे बरेचसे व्यक्तिगत पैलू पण ओळखता येतात. ही एक व्यक्तिगत गोष्ट पब्लिक होते. कारण लिखाण हे लेखकाचा आत्मा असतो. आपले लिखाण स्पष्टवक्ते पणा, व मुद्देसूद विचार दर्शवते. मला आपला ब्लॉग आवडला, आपल्याला पुढील लिखाणासाठी शुभेश्चा!!!

  उत्तर द्याहटवा
 2. शुभेच्छांबद्दल अनेक आभार. बघू पुढचे लिखाण कसे जमते ते!

  -सौरभ.

  उत्तर द्याहटवा
 3. मलाही असेच वाटते. एखाद्या व्यक्तीचा संपुर्ण ब्लॉग वाचला तर ते लेखन करणारी व्यक्ती कशी असेल याचा आपण परफ़ेक्ट अंदाज बांधु शकतो. पण महेंद्र कुलकर्णी (kayvatelte.com) म्हणतात ते मला पटते, ब्लॉगला जर पर्सनल टच असेल तर लेखन मनाला जास्त भिडते.

  उत्तर द्याहटवा