रविवार, ११ एप्रिल, २०१०

गावाकडे...

    गेले काही दिवस ब्लॉग लिखाणातून विश्रांती घेतली होती. मामाकडे जाऊन गावाला चांगला आठवडाभर राहून आलो. दरवेळेस जाऊन एक दोन दिवसांसाठी तोंड दाखवून परत येत असल्यानं यावेळेस भरपूर राहण्याची तयारी करुनच गेलो होतो. मामाचा आग्रहही होताच. करमत नाही, कंटाळाच येतो वगैरे कारणं एकदम बाजूला सारून टाकली. शहरात रोज संगणकाची, इंटरनेटची सवय लागलेली होती. एक दिवस इंटरनेटवर भटकणे, विरोप तपासले नाहीत तर चुकल्या चुकल्यासारखं वाटतं. अजूनही हे मान्य करायला कचरतो पण इंटरनेट, संगणकाचे मला व्यसन लागले आहे असे म्हटल्यास चुकीचे होणार नाही. त्यामुळे गावाला जाताना बरोबर लॅपटॉप घेतला नाही, मोबाईल तर माझ्याजवळ नाहीच त्यामुळे त्याचा काही प्रश्नच नव्हता. यात कॅमेरा पण आणलेला नाही हे माझ्या तिथे गेल्यावर लक्षात आले. हळहळ वाटली पण झाले ते बरेच झाले असे मानून गप्प बसलो.

   वेळ कसा काढायचा म्हणून अर्थातच पुस्तकं वाचायला घेतली होती. अभ्यासाच्या पुस्तकांमध्ये इंग्रजी पुस्तकं, इंग्रजी डिक्शनरी घेतली. ग्रंथालयातून आणलेले वसंत बापटांचे देशांतरीच्या गोष्टी, खांडेकरांचा वनदेवता हा रुपक कथांचा संग्रह पिशवीत टाकला आणि निघालो. आईला आणि मला सोडून भाऊ परत निघून गेला.

   पुण्यामुंबईत भारनियमन बंद झालेले असले तरी गावाकडे ते अजूनही चालूच आहे. इथल्या लोकांनी त्यांचे रोजचे जगणेही त्याच्या वेळापत्रकाप्रमाणे आखून टाकले आहे. टीव्हीवरचे रोज बघितलेच पाहिजे असे काही नसल्याने (संगणक वापरातून वेळ मिळाला तर टीव्ही बघशील ना असे आईचे मत आहे ) वीज असली काय नसली काय काही फरक पडत नव्हता. इतर दुसरी वीज लागतील अशी उपकरणं पुण्यातच सोडून आलो त्यामुळे भारनियमनाचे वेळापत्रक लक्षात ठेवण्याचे काही कारण नव्हते. उन्हाळ्यात रात्री झोपताना अगदी गळ्याशी आले तरच पंखा लागतो आणि शिवाय पुण्यात सूर्य आता आग ओकायला लागला असला तरी गावाकडे त्याचे चटके बसत नव्हते. त्यामुळे पंख्याचाही प्रश्न निकालात निघाला.

   पहिल्या दिवशी कोणाचे काय, कोणाचे काय वगैरे क्षेमकुशल विचारुन झाले. नाहीतरी पुण्यापासून तसे गाव जवळच आहे त्यामुळे अगदीच कित्येक वर्षांनी भेटतो आहे वगैरे प्रकार नव्हता. दुसर्‍या दिवशी काय करु हा प्रश्न छळायला लागला. पुस्तकं आणलेली असली तरी ती पिशवीतून काढून वाचायला हातात घ्यायची इच्छा होईना.

   मामाने इकडे कोकाकोलाची एजन्सी घेतलेली आहे. त्याचा स्वतःचा टेंपो आहे. या भागातल्या विविध दुकाने, हॉटेलांमध्ये तो माल पुरवतो. शिवाय कोंबड्यांचे पोल्ट्री फार्म आहेत. बर्‍यापैकी शेती आहे. त्यामुळे गावी गेल्यावर मळ्यात जाणे हा नेहमीचा परिपाठ आहे. कोकाकोलाची एजन्सी चालवणे हे कष्टाचे काम आहे. माल घेऊन गाडी आली तर तो उतरवून घेणे, आधीचे रिकाम्या बाटल्यांचे क्रेट त्यात भरुन देणे हे दरेक तीन चार दिवसाला करायचे काम असते. शिवाय आलेला माल टेंपोत भरून दुकानांमध्ये माल पुरवणे, त्यांच्याकडूनचे रिकामे क्रेट गोळा करणे, ते परत आणून उतरवणे असे भरगच्च काम असते. शिवाय दुकाना,हॉटेलांमधून गोळा केलेले क्रेट वर्गीकरण केलेले नसतात. हे एक वेगळेच म्हटले तर सोपे पण वेळखाऊ काम आहे. म्हणजे एखाद्याला जर समजा स्प्राईटचे दहा, कोकचे पाच, माझाचे सहा क्रेट दिलेले असतील तर परत घेताना मात्र रिकाम्या बाटल्या सगळ्या एकत्र येतात. म्हणजे कोक, स्प्राईट, माझा, फँटा सगळे एकत्रच येते. या मग रिकाम्या बाटल्या कंपनीला जसेच्या तशा पाठवता येत नाहीत. वर्गीकरण करुन पाठवावे लागते. अन्यथा परत ते वेगळे करायचे पैसेही कंपनी कापून घेते. बहुराष्ट्रीय कंपन्यांची ही मनमानीच म्हणावी लागेल. गावाला गेल्यावर मग हे कामही करुन बघितले. मळ्यात फ्रीज नसल्याने काम करुन झाल्यावर मग त्यातलीच एक माझाची बाटली फोडून गरमगरम शीतपेयाची मजा घेतली.

   झोपायला पण मग मळ्यातच. कोंबड्यांचे खाद्य, त्याचा विशिष्ट वास, इकडून तिकडून खुडबुड करत फिरणारे उंदीर, त्यामुळे सतत अंधारात आपल्याबरोबर अजूनही कोणी या खोलीत आहे असे होणारे भयकारी भास अशा वातावरणात जमिनीवर पथारी पसरुन गुडूप झोपून गेलो. एकदम नीरव म्हणतात त्या शांततेत!

-सौरभ.

२ टिप्पण्या:

  1. उत्तम लेख, सौरभराव. मराठी ब्लॉगवरचे आजोळचे लेख म्हणजे आजीच्या कंटाळवाण्या आठवणी हे समीकरण झालेलं आहे. तुम्ही कोका-कोला बाटल्या वगैरे नवीन माहिती पुरवलीत.

    उत्तर द्याहटवा