बराच वेळ जोर धरलेला पाऊस आता ओसरला होता. खिडकीच्या काचांवरचे पावसाचे थेंब ओघळून गेले होते. पावसानंतर नेहमी जाणवणारा हवेतला गारवा एकाच वेळी सुखकर वाटत होता आणि अंगावर काटाही आणत होता. मागे रेंगाळलेले पावसाचे एकदोन थेंब पडत होते पण त्यांच्याकडे खास लक्ष देण्याची काही गरज नव्हती. पावसात काही काळ विसावलेली रस्त्यावरली वाहतूक परत गती पकडत होती आणि पावसापासून बचाव करण्याकरता दुकानांच्या दर्शनी भागात थांबलेले लोकही एक एक करुन आपल्या वाटेने निघाले होते. सुटलेल्या थंडगार वार्यामुळे आपले हात अंगाभोवती लपेटून, रस्त्यावरच्या पाण्यातून वाट काढत माणसं परत चालायला लागली होती.
घरातली टेलिफोनची रिंग तीनचारदा वाजली आणि थांबली. आतल्या खोलीतून कुणीतरी फोन घेतला असावा. कारण पहिल्या हॅलो नंतर चालू झालेलं बोलणं लांबून अस्पष्ट ऐकू येत होतं. थोड्यावेळाने तेही थांबलं आणि एका महिलेच्या आवाजातली हाक घरभरात ऐकू आली.
"अमित, काय करतोयस? इकडे ये. काम आहे जरा."
ज्या कुणाला ही हाक मारली होती तो २२ वर्षांचा एक तरुण मुलगा होता. सध्या तरी तो कॉंम्प्युटरसमोर बसलेला होता आणि पहिल्या हाकेला ओ देण्यासाठी तो कधीच प्रसिद्ध नव्हता. त्यामुळे आतनं काहीतरी आवाज आला अशी नोंद त्याच्या मेंदूने केली खरी पण त्याजोगी हालचाल करायच्या फंदात कुणी पडले नाही. भिंतीवरल्या घड्याळातल्या लंबकाची इकडून तिकडे आंदोलने चालूच होती. थोडा वेळ असाच गेल्यावर दुसर्यांदा मारलेली हाक मात्र पहिल्यापेक्षा खूपच जोरात होती आणि घरभर भल्यामोठ्या आवाजात अगदी स्पष्टपणे ऐकू आली. एवढ्या मोठ्या आवाजाचा इच्छित परिणाम न होता तर आश्चर्यच! तो तरुण मुलगा चेहर्यावर आठ्या घेऊन मुकाट्याने उठला. घरात कुणीही मोठ्या आवाजात बोलले, ओरडले, हाका मारल्या तर त्याला अस्वस्थ वाटत असे आणि 'नेहमीच हा आवाज घराबाहेर गेला असेल का?', 'कुणाला ऐकू आला असेल का?', 'एवढ्या मोठ्याने घरात आरडाओरडा करायची काही गरज आहे का?' असे प्रश्न त्याच्या मनात उत्पन्न होत. त्या बाबतीत खरंतर एवढा विचार करायची गरज नव्हती पण त्याला अस्वस्थ वाटत असे हेही तितकेच खरे होते. दुसरे म्हणजे वेळेवर न जाऊन पुढच्या आरडाओरड्याला तोंड देण्यापेक्षा आता लगेच जागेवरुन हलले तर ते जास्त फायद्याचे होते. कारण एकदा वेळेवर गेलं नाही तर त्याच्या आईची बडबड बराच वेळ चालू राहिली असती आणि आधी सांगितल्याप्रमाणे त्याला मोठमोठ्या आवाजात बोललेले, आरडाओरडा केलेले तर बिलकुल आवडत नसे. त्यामुळे शक्यतोवर ते टाळण्याकडे त्याचा साहजिकच कल असे.
"काय झालं एवढं मोठमोठ्याने हाका मारायला? काय काम आहे?"
"पहिल्या हाकेलाच ओ दिली असती आणि आत आला असतास तर मग कुणाला ओरडावं लागलं असतं?"
"तुला मी कितीवेळा सांगितलंय मोठमोठ्याने हाका मारत जाऊ नकोस म्हणून?"
"पण तसं केल्याशिवाय तुम्ही हालत नाही त्याला मी काय करु?"
हे शेवटचे वाक्य एकदम खरे होते. मोठ्या आवाजात हाक मारल्याशिवाय या घरात कुणीही कधीही हालत नसे. आणि आपण मोठ्या आवाजात हाका मारलेले, बोललेले, ओरडलेले आपल्या मुलाला आवडत नाही हेही या आईला चांगले माहित होते. तरीही कधीकधी ती मुद्दाम तसे करत असे; कारण मग असं मुद्दाम मोठ्या आवाजात बोलल्यावर आपल्या मुलाचा संत्रस्त, वैतागलेला चेहरा बघण्यातही एक वेगळीच मजा येत असे. आताही त्याच्या नकळत आपले हसू दाबत आणि आपल्या बोलण्यातून ते जाणवणार नाही याची काळजी घेत तिने पुढे बोलायला सुरुवात केली.
"अभिजीतचा फोन आला होता. आपल्या गाडीची चावी हरवली आहे. तुला घरातली दुसरी चावी घेऊन शालिमारजवळ बोलवलं आहे."
"काय? काय हरवलं आहे?" त्याने विचारले.
"चावी"
"कशाची चावी?"
"आपल्या गाडीची"
"कुठली गाडी?"
"दुचाकी रे!"
"कशी काय हरवली?"
"ते काय त्याने सांगितलं नाही. तुला पाठवून दे म्हणाला. शालिमारजवळ तो उभा आहे. लगेच यायला सांगितलं आहे."
"पण अशी कशी काय हरवली चावी? गाडी घेऊनच गेला आहे ना तो? मग चालवतानाच कशी हरवली मध्येच?"
"ते काय सांगितलं नाही त्याने. बहुतेक खिशातून पडली असेल."
"काय वैताग आहे हा! आता जा म्हणाव बोंबलत पावसात. आणि मी जाऊ कसा? गाडी तर तोच घेऊन गेला आहे."
"तुला रिक्षाने यायला सांगितलं आहे."
"रिक्षाने? एवढ्या जवळ यायला रिक्षावाला तयार होईल का?"
"न यायला काय झालं? दीडदोन किलोमीटर तर सहज असेल शालिमार."
"नाहीतर आपली चारचाकी गाडी घेऊन जाऊ का?"
"काही नको. तुझ्याकडे अजून लायसन्स नाही."
"पण मला चालवता तर येते ना?"
"तरीही नको. सांगितलंय तेवढं कर."
आता इथे पुढे बोलायला काही उरलंच नव्हतं असं म्हणता येईल. या मुलाला चारचाकी गाडी चालवता येत होती हे खरे असले तरी शहरात, सगळ्या वाहतुकीत गाडी चालवायला त्याला अजूनही नीटसे जमत नव्हते. त्यामुळे आपले म्हणणे त्याने अजून पुढे रेटले नाही. शिवाय वाहतुक पोलिसाने पकडले तर काय? या प्रश्नाचाही विचार करणे आवश्यक होते. विनाकारण भुर्दंड सोसावा लागण्याची शक्यता होती.
बेडरुममधल्या लाकडी कपाटातल्या ड्रॉवर्समध्ये पाच दहा मिनिटं उलथापालथ केल्यावर शेवटी त्याला ती दुसरी जादाची चावी सापडली आणि नंतर पॅंट बदलून, खिशात पैशाचं पाकीट, कंगवा टाकून, जातोय म्हणून आईला सांगून तो बाहेर पडला.
वैतागत, चरफडत जरी तो घराबाहेर पडला असला तरी बाहेर आल्यावर मात्र त्याची मनःस्थिती लवकरच बदलली. रस्त्यावर आल्यावर त्या थंडगार हवेत त्याने छाती भरुन एक दीर्घ श्वास घेतला कारण घरातल्या पेक्षा बाहेर तर हवा अजूनच ताजी आणि प्रसन्न वाटत होती. पाऊस पडून गेल्यावर सगळेच कसे ताजेतवाने, धुतल्यासारखे स्वच्छ वाटत होते. रस्त्याकडेचा झाडांचा यात पहिला नंबर होता आणि त्यांच्या खालोखाल डांबराच्या काळ्या कुळकुळीत रस्त्याला दुसरा नंबर द्यायला कुणाचेच दुमत झाले नसते. पाऊस पडायचा थांबला असला तरी त्याचे एक सर्वत्र भरुन असलेले अस्तित्व मात्र सतत जाणवत होते. अशा या उल्हसित करणार्या वातावरणात रस्त्यावरच्या तुरळक रहदारीतून तो पुढे निघाला. रिक्षा स्टॅंडकडे जाताना मध्येच एका अवाढव्य बसच्या खाली, अजूनही कोरड्या असलेल्या रस्त्यावर बसलेले, एकदम गरीब चेहरा एक असलेले कुत्रे त्याला दिसले. थोडीशी मान बाहेर काढून कुत्र्याने इकडे तिकडे बघितले, बाहेरचा अंदाज घेतला आणि आपले अंग झटकून गाडीखालून बाहेर आले आणि उभे राहिले. त्यानंतर मग पुढचे पाय लांबवून, त्यानंतर मागचे पाय लांबवून त्याने भलाथोरला आळस दिला आणि डावीउजवीकडे बघून, रस्ता ओलांडून पलीकडच्या गल्लीत ते दिसेनासे झाले.
रिक्षावाला यायला तयार होईल की नाही ही जी शंका या मुलाला वाटत होती ती सुदैवाने फोल ठरली आणि नेहमीचे खडाक टिंगचे काम आटोपून रिक्षावाल्याने रिक्षा रस्त्यावर घेतली. पाचदहा मिनिटातच शालिमार आले नि रिक्षाचे झालेले भाडे देऊन त्याने आपल्या भावाला शोधायला, टाचा उंचावून,मान वर करुन रस्ता पालथा घालायला सुरुवात केली. शालिमारच्या इथे त्याला बोलावले होते खरे पण रस्त्याच्या कोणत्या बाजूला आपल्याला बोलावले आहे हे त्याला माहित नव्हते. ते आता स्वत:च शोधणे भाग होते. भावावर मनातून चरफडण्याखेरीज दुसरे अजून काहीही करण्यासारखे नव्हते.
या दोन भावांमधले नाते तसे अगदी सर्वसामान्य, नेहमी आढळणारे असेच होते. तो स्वत: २२ वर्षांचा आणि त्याचा भाऊ त्याच्यापेक्षा तीन चार वर्षांनी मोठा होता. त्यामुळे साहजिकच थोरल्या आणि धाकट्यामध्ये बहुतांश वेळा पहायला मिळतात तसेच मतभेद, वेगवेगळी मते, त्यावरुन वादविवाद असे या दोघांमध्येही होते. आपल्या लहान भाऊ लहान आहे, त्याला काही कळत नाही, धाकटा असल्याने त्याला उपदेश करणे हे आपले कर्तव्य आहे हे जेवढे थोरल्याला वाटत असे तेवढेच धाकट्याला आपला भाऊ बावळट आहे, वेंधळा आहे, नुसता म्हणायला थोरला आहे असे वाटत असे. एकमेकांबाबत असे वाटण्याबाबत तरी दोघे समान होते असे म्हणता येईल. या दोघांमध्ये थोरल्या भावाच्या वस्तू बर्याचदा विसरत, गहाळ होत किंवा घरात अगदी डोळ्यासमोर असल्या तरी त्या दिसत नसत आणि आजही तसेच काही तरी झाले होते.
बराच वेळ इकडेतिकडे शोधूनही जेव्हा त्याला त्यांची गाडी, आणि तिची चावी शोधत असलेला भाऊ दिसेना तेव्हा या मुलाने परत घरी फोन लावला; आणि त्याला जसे वाटत होते तसेच झाले. घरुन त्याला काही महत्त्वाची माहिती मिळाली नाहीच उलट डोळे उघडे ठेऊन जरा इकडे तिकडे बघायचा सल्ला मात्र मिळाला. वैतागून त्याने फोन बंद केला आणि पुन्हा नव्याने बारकाईने शोध घ्यायला सुरुवात केली. शोधत शोधत तो शालिमार पासून थोडासा पुढे आल्यावर मात्र त्याला आता काय करावे हे सुचेना. काय करावे याचा विचार करत असतानाच अचानक त्याचा भाऊ त्याला दिसला. रस्त्यावरुन खाली वाकून शोधत असल्याने एवढा वेळ तो एका गाडीमागे लपला होता, तो आता उभा राहिल्यावर एकदम दृष्टीपथात आला. एवढा वेळ तो न दिसण्यामागे हे कारण होते हे बघून त्यालाही जरा हसू आले. जवळच थोड्या अंतरावर बिनचावीची त्यांची गाडीही निमूटपणे उभी होती. तिच्याही एकूण रुपावर जरा खिन्नतेचं सावट पसरल्यासारखं वाटत होतं.
"अरे काय झालं? कशी हरवली चावी?"
"काय माहित नाही ना अरे! आत्ता माझ्या खिशात होती आणि आता बघतोय तर नाहीये."
"म्हणजे? तू इथे गाडी लावली होतीस का?"
"मग मी काय सांगतोय? इथे गाडी लावल्यावरच ती गेली. गाडी चालवताना चावी कशी हरवेल बावळट माणसा?"
"तुझं काय काम होतं ते झालं का? इथे गाडी कशाला लावली होती?"
"इथे गाडी लावून मी झेरॉक्स काढायला गेलो होतो. परत आलो तर चावी नाहीयेच खिशात. एकदम गायबच झाली."
"तू नक्कीच कुठेतरी पाडली असशील. तुझे हे दरवेळेसचे आहे."
"आता इथं रस्त्यावर बडबड करण्यापेक्षा चावी शोधायला जरा मदत केलीस ना तर बरे होईल."
"गाडीलाच असेल नाही तर लावलेली. नीट बघ."
"मला वाटतं चावी गाडीलाच लावलेली असती तर मला लगेच कळले असते, नाही का?"
"तू इथे गाडी लावल्यावर कुठे कुठे गेला होतास? तिकडे जाऊन बघून आलास का?"
"जाउन आलो. नाही मिळाली कुठेच. एकदम कशी गायब झाली कळतच नाहीये."
"परत जाऊन बघून येऊ चल आपण."
एवढं बोलून झाल्यावर त्या दोघांची दुक्कल परत चावी शोधण्यासाठी रस्ता सोडून जवळच्या इमारतीकडे निघाली. त्याच्याआधी जवळच्याच एका पानटपरीवर जाऊन या मुलाने चावीबद्दल चौकशी केली पण विशेष असे काही हाती लागले नाही. पानटपरीवाल्याने अशी काही चावी आपल्याला न दिसल्याचे सांगितले. रात्रभर गिर्हाईकांच्या गर्दीने ओसंडून वाहणार्या, इमारतीच्या दर्शनी भागात असलेल्या एका हॉटेलामध्ये आता सकाळी निवांतपणे फरशी धुण्याचे काम चालले होते आणि त्या पाण्याचे ओघळ बाहेर पर्यंत आलेले होते. त्या हॉटेलात काम करणार्या पोर्याला पण चावीबद्दल काहीच माहित नव्हते. त्यामुळे इमारतीच्या मागच्या बाजूला असलेल्या झेरॉक्सच्या दुकानाकडे या दोघांनी आपला मोर्चा वळवला आणि इमारत ओलांडून ते मागे निघाले. पण तिकडेही दहा मिनिटे रस्ता धुंडाळून, झेरॉक्सवाल्या दुकानदाराला विचारुनही काहीच उपयोग झाला नाही.
"जाउदे, आता किती वेळ शोधत बसणार? मला नाही वाटत आता चावी सापडेल. आणि ही दुसरी चावी मी आणलीये ना. ती आहेच की!" कंटाळून धाकट्याने हा प्रकार उरकता घेण्याच्या दृष्टीने सुचवले.
"ठीक आहे चल. जास्त वेळ वाया घालवण्यात काही अर्थ नाही. पण या आहे त्या चावीवरुन लवकर दुसरी चावी बनवून घेतली पाहिजे. नाहीतर ही सुद्धा हरवली तर पंचाईत होऊन बसेल."
"त्याला काय वेळ लागतोय? लगेच मिळेल करुन."
मात्र दहा पंधरा मिनिटांनी जेव्हा ते इमारतीच्या मागच्या भागातून दर्शनी भागात आले तेव्हा त्यांच्या गाडीचा तिथे मागमूसही नव्हता. जिथे गाडी उभी केलेली होती ती जागा पूर्ण रिकामी होती आणि तिथेच रस्त्यावर साठलेल्या थोड्याशा पाण्यात, पेट्रोलचे चारदोन थेंब पडून तयार झालेले छोटेसे इंद्रधनुष्य सोडले तर दुसर्या कशाचेही नामोनिशाण नव्हते.
गुरुवार, १६ जून, २०११
बुधवार, २५ मे, २०११
माझे उन्हाळी पर्यटन.
या शहरात मी गेली कित्येक वर्षे राहतो आहे. त्याचा होणारा विकास, त्याची होणारी वाढ पाहतो आहे. म्हणता म्हणता या पुण्यात राहायला येऊन आता १६ वर्षे झाली. तरीही हे पुणं तसं मला आपलं अपरिचितच राहिलं आहे. आता पुण्याबाहेरच्या लांबवर पसरलेल्या एखाद्या उपनगरात गेलं की अगदी दुसर्या शहरात गेल्यासारखंच वाटतं. तिथले माहिती नसलेले रस्ते माझ्या अंगावर येतात आणि मला दडपून टाकतात. 'या भागात बरंच परिवर्तन झालंय की' हे माझं पालुपद पु़टपुटत मी कधी एकदा एखादा ओळखीचा कोपरा दिसतोय हे शोधत राहतो. हे जरा लांबच्या उपनगरांबाबत खरं असलं तरी मूळ गावातलं पुणंही तसं मला अपरिचितच आहे. कारण मी स्वतः पुण्याच्या उपनगरातच राहायला आहे. कधी कामानिमित्त मूळ भागात आलोच तर त्यापुरते आपले कामाचे रस्ते तेवढे माहित असतात. दुसरीकडे कुठे कशाला कुणाचं जाणं होतं? त्यामुळे शहरातले सगळे रस्ते तळहाताप्रमाणे माहित असलेल्यांबद्दल मला आदरही वाटतो आणि 'हा माणूस पूर्वी एखाद्या कुरियर कंपनीत तर कामाला नव्हता ना?' असा संशयही येतो. रस्त्यांच्याबाबतीत मी फारसा तल्लख नसलो तर अगदीच 'हा' सुद्धा नाही. तरीही एखाद्या वेळेस कुठे वेगळ्या भागात शिरलो तर अचानक 'अरेच्चा! हा रस्ता इकडे येऊन याला मिळतो होय? आणि आपल्याला जो एवढे दिवस तो वाटत होता; तो रस्ता हा आहे होय?' असे प्रसंग माझ्या बाबतीत बर्यापैकी घडतात, आणि आपलं आपलं म्हणतो त्या पुण्यातलेसुद्धा सगळे रस्ते आपल्याला माहित नाहीत अशा शरमेने मी बेचैन होतो. या प्रकारामुळे कुणी आपल्या पुणेरीपणावर संशयही घेऊ शकेल अशी थोडीशी भीतीही त्यामागे असते. आपल्या शहरातले, अगदी मूळ गावातलेही रस्ते आपल्याला माहित नसावेत म्हणजे त्याला काही अर्थ आहे?
या रस्त्यांसारखीच गावातली जी प्रेक्षणीय ठिकाणं असतात ना, त्यांचीही तशीच गत असते. शहरातले सगळे रस्ते जसे माहित नसतात तशीच ही ठिकाणंही पाहायची राहून गेलेली असतात. त्यांबद्दलची काहीच माहिती आपल्याला नसते. पाहू पाहू म्हणत ही आपल्याच शहरातली ठिकाणं बघायचं आपण नेहमी पुढे ढकलत आलेले असतो. क्वचित एखादा बाहेरगावचा पाहुणा आपल्याकडे आला आणि त्याला अमकं अमकं ठिकाण बघायचं असले तर त्यालाही, 'अरे त्यात काय एवढं बघण्यासारखं आहे?' असं म्हणून आपण वेड्यात काढतो. आपल्या गावातलीच, आपल्या शहरातली ही ठिकाणं त्या शहराच्या नागरिकांकडून नेहमीच अशी दुर्लक्षिली का जातात? माझी एक बहिण लंडनला गेली कित्येक वर्षे राहते आहे. ती इकडे आली की तिच्याशी बर्याच गप्पा होत असतात लंडनबद्दल. मी इंग्रजी साहित्याचा विद्यार्थी असल्याने या लंडनबद्दल मला जाम कुतूहल आहे. एकदा का होईना, मी काहीही करुन लंडनला जाईनच आणि ते डोळाभरून पाहून येईन असा मी एक निश्चियही करुन ठेवला आहे. तर लंडनमधली बरीच, अगदी पाहिलीच पाहिजेत अशी ठिकाणं आठवून मी या बहिणीला दरवेळस विचारतो की 'अगं हे तू पाहिलंस का? तिकडे तू गेलेली आहेस का?' मग तिचा प्रश्न येतो की 'अरे तुला ही ठिकाणं कशी काय माहित?' या प्रश्नाचं उत्तर न देता मी माझा प्रश्न परत विचारतो. मग ती सांगते की 'नाहीरे, नाही पाहिलं, त्यात बघण्यासारखं काय आहे एवढं?' लंडनमध्ये राहताना युरोपवारी करुन आलेल्या आणि इंग्लंडमध्येही इतरत्र हिंडलेल्या तिचं लंडन मात्र अजून पाहायचं राहिलं आहे.
आणि तसंच, कोणतीही भीड-मुर्वत न बाळगता मीपण हे सांगू इच्छितो की गेली इतकी वर्षे पुण्यात राहणार्या माझीही तीच गत झालेली आहे. परिस्थिती फारशी वेगळी नाही. पुण्यातली यच्चयावत पाहण्यासारख्या ठिकाणांना माझे पाय अजून लागायचे आहेत. एखाद्याचे पाय एखाद्या वास्तूला लागणं हा जरी थोरामोठ्यांसाठी वापरायचा वाक्प्रचार असला तरी माझ्याबाबतीत तो वापरायचे स्वातंत्र्य मी घेतो आहे याची नोंद घ्यावी. पुण्यातली बरीच नावाजलेली ठिकाणं पाहायचा योग अजून यायचा आहे. एखाद्या देवाच्या बाबतीत, किंवा नेमकेपणाने सांगायचे झाले तर वैष्णोदेवीचा वगैरे जो 'बुलावा आना चाहिये' हा प्रकार असतो तसाच माझाही ही ठिकाणं पाहायचा योग आलेला नाही. आणि प्रेक्षणीय ठिकाणांच्या बाबतीत तर बुलावा येण्याची वाट पाहणेही वेडपटपणाचे आहे. प्रेक्षणीय ठिकाणं काही धर्मक्षेत्रे, तीर्थक्षेत्रे नाहीत - आपल्या दर्शनेच्छूंना बुलावा पाठवायला. त्यामुळे आपले पाय जर या वास्तूंना लागायचे असतील तर स्वतःच काहीतरी हालचाल करणे आले.
शनिवारवाड्याच्या अगदी बरोबर पाठीमागच्या बोळवजा रस्त्यावर एखादे महाविद्यालय असेल असे कुणालाही वाटण्याची सुतराम शक्यता नाही. मात्र तसे एक महाविद्यालय इथे आहे. एकेकाळी देशभर आणि त्याही पलीकडे विजयाची दुंदुभी वाजलेल्या मराठी सत्तेचे चढउतार पाहिलेल्या शनिवारवाड्याच्या मागेच हे महाविद्यालय उभे आहे. तसा पाहिलं तर मी या विद्यालयाचा विद्यार्थी नाही आणि नव्हतोही. त्यामुळे त्याच्याबद्दल माहिती असण्याचेही कारण नाही. मात्र जेव्हा माझ्या पदव्युत्तर परीक्षेचे केंद्र म्हणून या महाविद्यालयाची निश्चिती झाली तेव्हा मला त्याचे अस्तित्व कळून आले आणि पुणे हे विद्येचे माहेरघर आहे (विद्येचे माहेरघर ते निश्चितच आहे मात्र पूर्वेचे ऑक्सफर्ड मात्र मुळीच नाही याचीही इथे नोंद घ्यावी.) या विधानाला जरा अजून पुष्टी मिळाली. हो, असेच म्हटले पाहिजे कारण पुण्यात फिरताना नित्यनूतन, कल्पनाही करता येणार नाही अशा ठिकाणी शाळा,महाविद्यालये दिसत असतात. लांब कशाला जायला पाहिजे? शनिवारवाड्याच्या जवळच एकदा वसंत टॉकीजच्या बसस्टॉपवर उभा असताना, त्याच्या बरोबर समोरच; विश्रामबागवाड्यासारखीच दिसणारी एक भरपूर जुनी वास्तू आहे, तिच्यात मी उभ्या उभ्या, अगदी नी.वा.किंकर रात्रप्रशाला, रानडे बालक मंदिर पासून ते डे केअर सेंटर पर्यंत चार पाच शाळा मोजल्याचे मला पक्के आठवते आहे.
असो. या महाविद्यालयात माझा प्रॅगमॅटिक्सचा तीन तासांचा पेपर संपवून जेव्हा मी सहा सव्वासहाच्या सुमारास बाहेर पडलो तेव्हा समोरच शनिवारवाड्याच्या कडेच्या बुरुजांरुन चालत असलेले काही दर्शनेच्छू मला दिसत होते. आता बस पकडून सरळ घरचा रस्ता सुधारण्याऐवजी संध्याकाळच्या शीतल वेळी अचानक मला शनिवारवाडा बघायला जावेसे वाटू लागले. उन्हाळ्याचा मोसम असल्याने उजेडही भरपूर होता. आणि तसा मी अजूनही स्वतंत्र पंछी असल्याने आणि कुठलाही जबाबदारीचा लबेदा चिकटला नसल्याने असे बेत त्वरित अंमलात (अजूनही) आणू शकतो. बसस्टॉपकडे जाणारा रस्ता सोडून मी मग शनिवारवाड्याच्या दर्शनी भागाकडे चालायला सुरुवात केली.
पदपथावर चालताना हरतर्हेचा माल विकायला बसलेले विक्रेते दिसत होते. दहा रुपयात अगदी मुठीपेक्षाही लहान अशा आकाराच्या दोन कळसूत्री बाहुल्या नाचताना इतक्या सुंदर दिसत होत्या की त्यांच्या समोरुन जाताना; त्या पाहण्यासाठी काही वेळ थांबून राहिलेल्यांचा मला त्यादिवशी बिलकूल राग आला नाही. ते चित्र होतेच तेवढे मनोवेधक. या बाहुल्या एवढ्या कशा नाचत आहेत याचे कोडे काही मला सुटले नाही. विक्रेत्याच्या हातात तर कोणतीच दोरी वगैरे दिसत नव्हती. शिवाय बाहुल्या इतक्या एकमेकांना चिकटून नाचत होत्या की त्यांच्या मध्ये काही ताण दिलेल्या स्प्रिंगसारखे असलेच तरी ते बिलकूल दिसत नव्हते.
विचार करतच मी पुढे निघालो, तर एकदम वेगवेगळ्या देवादिकांची चित्रे पदपथावर पसरलेली दिसली. त्याच्यात विशेष काही न वाटून पुढे सरकतो तर एकदम चित्रे हलल्याचा भास व्हायला लागला. मला तसा चांगल्या सशक्त नंबरचा चष्मा आहे त्यामुळे आपल्या दृष्टीत अचानक काही असुधारनीय समस्या आली की काय असे वाटायला लागले. मात्र नीट बारकाईने पाहिले तर सगळी चित्रे त्रिमितीय असल्याचे लक्षात आले. दांडिया खेळणारा कृष्ण वगैरे अचानक दुसर्याच पोझमध्ये उभा राहिलेला दिसायला लागला. मी न थांबता समोरुन चालत जाताना तर सगळ्याच चित्रांची भराभर होणारी हालचाल केवळ अप्रतिम होती. एवढे होईपर्यंत मी प्रेमळ विठ्ठलाचे मंदिर मागे टाकून ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिराच्या कमानी पर्यंत आलो होतो. प्रेमळ विठ्ठलाच्या मंदिराने मात्र माझे लक्ष चांगलेच वेधून घेतले. इथे मंदिरापेक्षा त्याच्या नावाने जास्त लक्ष वेधून घेतले असे म्हणता येईल. कारण खुन्या मुरलीधर, पासोड्या विठोबा, जिलब्या मारुती, बायक्या विष्णू, छिनाल बालाजी, पत्र्या मारुती, भिकारदास मारुती अशा नावांच्या जत्रावळीत 'प्रेमळ विठ्ठल' हे नाव खूपच सभ्य आणि सुसंस्कृत वाटते हे कुणीही कबूल करील. माझी स्मरणशक्ती मला दगा देत नसेल तर असे प्रेमळ नाव ठेवल्याबद्दल लगेच संबंधितांचा, अनासाये जवळच उपलब्ध असलेल्या शनिवारवाड्यावर जाहीर सत्कार करावा असे वाटण्यापर्यंत माझ्या भावना उचंबळल्या होत्या हे माझ्या अजूनही लक्षात आहे.
इथून पुढे चालायला लागलो तर अचानक मध्येच बारक्या चौरंगासारखे काहीतरी पदपथावर मांडलेले दिसले. ते दुसरे तिसरे काही नसून वजनकाटा होता. वजन करावे की नाही हा विचार करत उभा राहिलो. कारण नुकताच परीक्षेचा पेपर देऊन आल्यामुळे परीक्षेचे मणभर ओझे अंगावरुन उतरलेले होते. त्यामुळे वजनही अचूक आले असते. पण शेवटी शनिवारवाडा बघायचा आहे तर त्याकडेच लवकर जावे म्हणून वजनाला बगल देऊन टाकली आणि पुढे निघालो.
बर्याचदा असे होते की नेहमी आपण कुठे निघालो की आपल्याला कुठेतरी जायचे असते. वाक्य समजायला जरा अवघड आहे हे. माझा म्हणण्याचा उद्देश हा की कुठे निघालो की आपले काहीतरी काम असते, कुठेतरी जायचे असते, कुणाला भेटायचे असते असे काहीतही कारण असते. "बस मिळेल की नाही?, घरी गेल्यावर भाजी कोणती करावी?, अमक्याचे आजारपण चालू आहे, तमक्याच्या लग्नाला जायचे आहे", असे हजारो विचार चाललेले असतात. त्यामुळे रस्त्यात चालतानाही कित्येक गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत असतात पण त्यांकडे आपले लक्ष नसते. आपण आपल्याच तंद्रीत, विचारात पुढे सरकत असतो. वाहनांच्या, फेरीवाल्यांच्या, पादचार्यांच्या गर्दीतून माणसे अगदी यंत्रवत चालत असतात. काही अडथळा आला - थांबले, मोकळा रस्ता मिळाला - चालले. पण त्यादिवशी माझ्या डोक्यात कसलेही विचार नव्हते. संध्याकाळच्या वेळी, रस्त्यावर समोर दिसेल ते बघत मी मोठ्या आनंदाने रमत गमत चाललो होतो. आणि त्या निरुद्देश भटकंतीची एक वेगळीच मजा अनुभवत होतो. अक्षरशः प्रत्येकानेच कधीतरी अगदी एकटे असे रस्त्याने भटकायला बाहेर पडले पाहिजे. केवळ एका प्रेक्षकाच्या भूमिकेतून आपले शहर पाहिले पाहिजे.
शनिवारवाड्याच्या समोर आलो. इथे छोट्याशा वाहनतळावर अनेक चारचाकी गाड्या उभ्या होत्या. काहीशे वर्षांपूर्वी जिथे पेशव्याचे हत्ती झुलत असतील आणि रिकिबीत पाय अडकवून घोड्यांवर मांड ठोकली जात असेल तिथे आता फोक्सवॅगन आणि बीएमडब्ल्यू उभ्या होत्या. काळ नामक एका अवलियाला मी परत तिथल्या तिथे मनोमन सलाम ठोकला. पुढे निघालो तर मात्र माझ्या अंदाजापेक्षा बरीच जास्त माणसे शनिवारवाडा पाहायला आल्याचे मला जाणवले. ही जनता शिवाय पुणेरी सुद्धा वाटत नव्हती. जरा डोक्याला काम दिल्यावर लक्षात आले की ऐन उन्हाळ्यात, जेव्हा पर्यटकांचे लोंढेच्या लोंढे टुरिष्ट स्पॉटवर आक्रमण करतात, त्या काळात मी शनिवारवाडा बघायला आलेलो होतो. खरंच या शक्यतेचा मी बिलकूल विचार केलेला नव्हता. चालता चालता लगेचच पर्यटकांच्या पारंपारिक वेशातले दर्शनेच्छूंचे घोळके दिसायला लागले. डोक्यावर टोपी चढवलेले, पायात स्पोर्ट शूज घातेलेले, स्त्रिया पंजाबी ड्रेसात, मुलांचे रंगीबिरंगी कपडे, तरुण तरुणींचे टी-शर्टस, घट्ट जीन्स आणि बहुतेकांच्या हातात असलेला कॅमेरा. तिथून चालताना बरेच जण जे फोटो काढत होते, काढून घेत होते त्याच्यांमधूनच मला चालत जावे लागले आणि त्यांना तसा अडथळा केल्यामुळे, त्यांच्या पर्यटनानंदात व्यत्यय आणल्याने मलाही थोडे वाईट वाटले. खरेतर मी चांगला एवढी वर्षे पुण्यात राहतोय; पण का कोण जाणे, त्या उन्हाळी पर्यटकांच्या झुंडीत मला अगदीच लाजल्यासारखे व्हायला लागले. मध्येच एखाद्या पर्यटकाने, "काय हो, उगाच तुमच्या या शनिवारवाड्याचे नाव होऊन राहिले आहे भौ? इथे बघायला तर फारसे काही नाहीच!" असे म्हटले किंवा जाब विचारला तर काय उत्तर देणार होतो मी? खरेतर असे काही उत्तर द्यायला मी बांधील नव्हतो, ती माझी जबाबदारीही नव्हती, तरीही या विचाराने मी चांगलाच खचून गेलो आणि आत्मविश्वासाचा अभाव असलेला किंवा खांदे पाडून चालणारा मनुष्य जसा दिसतो ना तसा चालत राहिलो.
बहुतांश 'टुरिष्ट स्पॉट' च्या इथे जशी खाण्यापिण्याचीही दाबून सोय असते तशी मात्र शनिवारवाड्याच्या पटांगणात फारशी आढळली नाही. मोजकेच पर्याय उपलब्ध होते. शिवाय माझ्या यच्चयावत शिक्षणाची सांगता करणारा, चांगला तीन तासांचा पेपर लिहिण्याचे मानसिक श्रम झाल्याने मलाही काही पोटाला आधार देण्याइतपत हवेच होते. शेवटी पाच रुपये मोजून; गरमागरम खार्या शेंगदाण्यांची एक पिंटुकली सुरनळी खरेदी करुन मी पुढे प्रयाण केले. शनिवारवाड्याच्या समोरच एका भव्य व्यासपीठासारख्या वाटणार्या कट्ट्यावर अनेक जण संध्याकाळच्या शांतवेळी बसून अवतीभवतीची मौज लुटत होते. सहकुटुंब, सहपरिवार आलेले काही जण होते, काही ज्येष्ठ आपल्या आयुष्याच्या संध्याकाळी या संध्येचा आनंद घेत होते, कॉलेजकुमार आपल्या मैत्रिणीबरोबर गुजगोष्टी करण्यासाठी आले होते, काही एकएकटे आपल्याच विचारात शनिवारवाड्याच्या भव्य दाराकडे बघत बसून होते. स्वतःही यांना सामील होण्यापेक्षा मी मात्र लगेच प्रवेशमार्गाकडे मोर्चा वळवला. दारातून खूपच लोक एकसारखे बाहेर येत होते. त्यामुळे मला काही लवकर आत जाता येईना. शेवटी कुठे एकदाची फट सापडून मी अजून काही लोकांबरोबर आत शिरकाव करु लागताच तिथेच आतल्या बाजूला उभ्या असलेल्या एका सुरक्षारक्षक वजा माणसाने सरळ 'बंद हो गया, कल आओ' असे फर्मान ऐकवले. काय? मला क्षणभर नीट कळलेच नाही काय ते. मग मात्र डोक्यात प्रकाश पडला आणि तिथल्याच एका पाटीवर वेळ पाहिली तर खरेच शनिवारवाडा बंद होण्याची संध्याकाळची वेळ सहा असल्याचे दिसले. म्हणजे आता ही जी सगळी माणसांची लाट माझ्या अंगावर फुटली होती ती सगळी वेळ संपल्याने सुरक्षारक्षकाने हाकलून काढलेली जनता होती. अरेरे! म्हणजे गेली १६ वर्षे पुण्यात राहणारा जेव्हा चांगली सवड काढून शनिवारवाडा बघायला जातो तेव्हा त्याला आत पाऊलही टाकू दिले जात नाही? काय म्हणावे याला? आणि जिथे मराठ्यांनी आपल्या दैदीप्य पराक्रमाचे झेंडे फडकवले तिथे या अशा हिंदीत आमची संभावना केली जाते? यात थोडा माझा दोष होता की काय न कळे! कारण जीन्स आणि टी-शर्ट घालून मी कुठे गेलो की लोक माझ्याशी हिंदीतच बोलायला सुरुवात का करतात कोण जाणे? तसा मग इतर लोकांचाही थोडा दोष असावा.
असो. शनिवारवाडा बंद झाला होता, माझ्या पुण्यातले हे प्रेक्षणीय स्थळ बघायला मला परत यावे लागणार होते. नाउमेद न होता मग मी आधी वर्णन केल्याप्रमाणे मी पुन्हा समोरच्या लोकांमध्ये सामील झालो आणि एका एका शेंगदाण्याचा समाचार घ्यायला सुरुवात केली. शनिवारवाडा बंद झाला असला तरी त्याचे जे बलाढ्य दार आहे ते ही चांगलेच पाहण्यासारखे आहे. शिवाय त्याच्या वर मध्येच दोन खिळ्यांना एक भडक निळी पाटी लटकवून; त्यावर शनिवारवाडा असे लिहून संबंधितांनी या जागेची तपशीलवार(?) माहिती पुरवण्याचेही काम केले आहे.
शनिवारवाडा आतून बघता आला नसला तरी मला त्याचे फारसे वाईट वाटले नाही. तसा माझा स्वभाव नाही आणि शिवाय तिथे हरठिकाणांहून आलेल्या वेगवेगळ्या माणसांना नुसते बघण्यातही एक वेगळाच आनंद होता. तो मी चांगलाच अनुभवला. माझ्या शेजारीच बसलेल्या एका कामकरी माणसाशी सुखदुःखाच्या चार गोष्टी बोललो. आपल्या दोन बलाढ्य बुलडॉग कुत्र्यांना घेऊन शनिवारवाड्यावर फिरायला आलेल्या आणि कट्ट्यावर बसलेल्यांच्या अगदी जवळून त्यांना नेणार्या एका धन्य पुणेकराची पुणेरी तर्हा बघून शेजारच्याकडे, 'शनिवारवाडा ही काही कुत्र्यांना फिरायला आणण्याची जागा नाही' अशी नापसंती व्यक्त केली. थोडक्यात सांगायचे तर वेळ मोठा सुरेख गेला. अखेर, अस्तंगत होत असलेल्या सूर्याबरोबरच अंधाराचे साम्राज्य ठळक व्हायला लागल्याने मी माझ्या शेजारच्याचा आणि शनिवारवाड्याचाही निरोप घेतला. मागच्या गर्द निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर दिसणार्या शनिवारवाड्याच्या दर्शनी भागावर एक अखेरची नजर टाकली आणि पुन्हा बसस्टॉपकडे चालायला सुरुवात केली. १६ वर्षे आणि थोडीशी पायपीट यातून मला जे 'शनिवारवाडा सहाला बंद होतो' हे तात्पर्य कळाले होते त्याच्याशी आजूबाजूच्या कुणालाच काही देणे घेणे नव्हते. पुन्हा तीच गर्दी आणि तीच वाहतूक. लवकरच तिचा एक भाग बनून गेलो. चालतानाच लक्षात आलं की हातातल्या शेंगदाणा पुडीत आता नुसती फोलपटं उरलेली आहेत.

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)