गुरुवार, २९ एप्रिल, २०१०

समज गैरसमज...

    "आई, मला एक सांग, या विवाह नामक प्रकाराची लोकांना एवढी आवड का आहे बरे? जो तो उठतो तो आपला विवाह करायला बघत असतो. आणि म्हणे की लोकांचा विवाह संस्थेवरचा विश्वास उडायला लागला आहे. लुच्चे, खोटारडे कुठले!"

"नाही तरी तुझी काही लग्नाची तयारी नाही. सांगून सांगून थकले मी. माझी अर्धी लाकडं आता स्मशानात गेली तरी सूनमुख पाहण्याचं काही माझ्या नशिबात दिसत नाही. ज्यांना करायचा आहे ते करतील. तुला त्याचा त्रास का बाबा?

"मला त्रास का म्हणजे? वा गं वा! पेपरात असलं काही छापून येतं ते आम्हालाच वाचावं लागतं ना? ऑं? तुम्हाला काय करायचं ते करा म्हणावं चार भिंतींच्या आत! पेपरात छापून आणून आमच्या आईवडिलांची आमच्या मागे भुणभुण कशाला सुरु करता?"

"अरे पण कधी ना कधी तर लग्न करायलाच लागणार ना बाबा? पुढे तुझं वय वाढल्यावर हातीपायी धड मुलगी मिळायची मारामार होऊन बसेल."

"अगं आई, असं नसतं आता आजकाल, एकाने पोट भरलं नाहीतर लोक तीनचार देखील करायला मागे पुढे पाहत नाहीत. आणि वयाचा तरी कुठे प्रश्न उरला आहे? अगं जिथे ’बालिकावधू’चं लग्न लोक मिटक्या मारत बघत आहेत आणि कसल्या कसल्या वाह्यात लोकांचे ’स्वयंवर’ होऊन त्यांना बायका मिळत आहेत तिथे माझ्या लग्नाची काय काळजी करतेस?"

"अरे देवा! कालचं बालिकावधू बघायचं राहून गेलं की रे! अरे न्यूजचॅनलवर त्या दोघांची एकत्र अशी पहिलीच मुलाखत लागली होती ती बघता बघता राहूनच गेलं."

"असल्या मालिकांचं रोजचं दळण बघणारी, डोक्याने अधू असलेली माणसं आहेत; म्हणूनच या कुलवधूंचं फावलं आहे."

"काय म्हणालास?"

"कुठे काय? काही नाही. तूच कुणा दोघांबद्दल काहीतरी सांगत होतीस."

"काय छान दिसत होते दोघं अरे... मला तर फार आनंद झाला बघ. किती वाद, भानगडी झाल्या पण शेवटी सगळं काही सुरळीत झालं हे काय कमी आहे का?"

"एवढं सगळं काही बाहेर आल्यावर आता तसं सुरळीत चाललंय असंच म्हणावं लागेल. तू म्हणतेस ते बरोबर आहे. तसे वयाच्या मानानं चांगलेच आहेत म्हणायचे दोघेही दिसायला. तो तर काय परराष्ट्रातलाच ना? ती पण तशी ठीक आहे म्हणा."

"परराष्ट्र? अं हो हो, ते परराष्ट्रच आहे म्हणा! पण मी काय म्हणते की एवढे चांगले चांगले इतर पर्याय असताना आधीच एक लग्न झालेला मुलगा तिने का निवडला असावा?"

"मला काय माहित? नोकरीला जशी अनुभवाची गरज असते तसेच आता लग्नाचा जोडीदारही अनुभवीच हवा असा लोकांचा ग्रह होऊ लागलेला दिसतो."

"काय माहित बाबा? तसेही असेल. कशाचा कशाला धरबंद राहिलेला नाही. उद्या काय बघावे लागेल, वाचावे लागेल काही सांगता यायचे नाही."

"पण मी काय म्हणतो आई, ही बातमी बाहेर फुटलीच कशी? स्वत:च्या लग्नाची बातमी पेपरात छापून येते, रिकामटेकडे लोक ती चांगली चघळत बसतात, तिचं चर्वितचर्वण करतात, हे पाहून यांना काहीच कसं वाटत नाही?"

"अरे हे सगळं त्या नालायक मीडियाचं काम रे! ब्रेकिंग न्यूज मिळवता मिळवता स्वत:चं कंबरडं मोडायची वेळ आली तरी त्यांना काही व्हायचं नाही."

"हो ना तसे आहे खरे! पण मी काय म्हणतो, हा एवढा सगळा गदारोळ झाला, एवढी लफडी कुलंगडी बाहेर पडली, आता त्या संघांचे काय होणार काय माहित!"

"संघाचे काय होणार कप्पाळ! तो पुढेही त्याची खेळी खेळतच राहील बघ. उलट त्याच्या कामगिरीत सुधारणाच होईल बघ."

"सुधारणा कसली व्हायची आहे डोंबलाची. त्याला खूप पश्चाताप होऊन त्याच्या वागणुकीत सुधारणा होईल असे तुला वाटत असेल तर तो भ्रमच म्हटला पाहिजे."

"हो रे बाबा! पुरुषाचीच जात ती! कधी सुधरायची नाही. पण आता कोणत्या देशाचे प्रतिनिधित्व करणार वगैरे काही कळलं का रे?"

"प्रतिनिधित्व वगैरे काही नाही आता. भारतातून गच्छंती व्हायची वेळ आल्यावर कसलं आलं आहे प्रतिनिधित्व?"

"असं का बोलतोस रे? मी तर त्यांना आशीर्वाद दिलाय. ’सुखाने नांदा पुष्कळ’!"

"काय म्हणालीस? हे बरं आहे की! तुला बरं सगळं माहित असतं आजकाल आई! तुला अगदी नावसुद्धा माहित आहे सुनंदा पुष्कर?"




"काय? कोण ही सुनंदा पुष्कर? कशाबद्दल बोलतो आहेस? तू स्वत: कोणती मुलगी बघितली आहेस का? माझी काही हरकत नाही हं बाबा! उगीच डोक्यात राख घालून घेऊ नकोस."

"काय? माझं लग्न सुनंदा पुष्करशी? अगं आई काय बरळतेस तू?"

"अरे गाढवा तू काय बोलतो आहेस मग?

"अगं आई मी तर शशी थरुर आणि सुनंदा पुष्कर यांच्याबद्दल बोलत होतो. तू कशाबद्दल बोलत होतीस?"


"अरे देवा, मी तर सानिया आणि शोएब मलिक बद्दल बोलत होते रे..."

"दुर्दैव आपलं, दुसरं काय? मी काय म्हणतो आई, आता आपण लोकांच्या दुसर्‍या तिसर्‍या लग्नाबद्दल, जी निश्चितच अभिनामाने सांगण्यासारखी गोष्ट नाहीये, तिच्याबद्दल बोलत असतानाही; मी जे बोलत होतो त्याचसारख्या दुसर्‍या एका घटनेबद्दल तू बोलत होतीस याला काय म्हणावं? जगाची नीतिमत्ता एवढी खालावली गेल्या काही वर्षांत?"

"चिंता करण्यासारखीच परिस्थिती आहे बाबा! कलियुग कलियुग म्हणतात ते हेच."

"आई तुझी माफी मागितली पाहिजे."

"कसली माफी मागतोस बाबा? जिथं लोकांनाच काही लाज उरलेली नाही, तिथं तू आणि मी एकमेकांची माफी मागून काय होणार? जे जे होईल ते बघत राहणे हेच सामान्य माणसाच्या हातात राहिले आहे."

३ टिप्पण्या: