शुक्रवार, ५ फेब्रुवारी, २०१०

प्रभाते मल दर्शनम्।

    मागच्या नोंदीत मी अत्र्यांच्या शैलीबद्दल लिहले होते. त्यांच्या काही पुस्तकांची नावं सुद्धा त्यात होती. अत्र्यांचे एक पुस्तक 'ही ईश्वराची दया' मध्यंतरी वाचले. विविध विषयावरचे निबंध/लेख या पुस्तकात आहेत. 'प्राचीन भारत आणि गोमांस', 'प्राचीन भारतातील मद्यपान', 'आम्ही महार असतो तर..' असे एकाहून एक स्फोटक आणि भन्नाट लेख या पुस्तकात अत्र्यांनी लिहले आहेत. इथे त्याबद्दल अधिक काही लिहत नाही. इथेच सगळे लिहले तर तुम्ही ते पुस्तक कशाला वाचायला जाल? तर त्यातल्या एका लेखाचे शीर्षक आहे 'प्रभाते मल दर्शनम्|'

    'प्रभाते कर दर्शनम्' चा मूळचा संस्कृत श्लोक बहुतेकांना माहीत आहेच. तो इथे परत देत बसत नाही. या लेखात अत्र्यांनी विनोबा भावे यांचा खास त्यांच्या ष्टाईलने समाचार घेतला आहे. विनोबा भाव्यांचे एक वचन/मत असे आहे की प्रभाते मल दर्शनम्|. (मला वाटतं ’माझा साक्षात्कारी हृदयरो’ मध्ये अभय बंग यांनीही या वचनाचा उल्लेख केला आहे.) तर विनोबांच्या मते सकाळी मलाचे दर्शन घेऊन त्याच्या रुपावरुन आपल्या प्रकृतीचे उत्तम विश्लेषण करता येते. त्यानेच आहार विहार सुधारुन उत्तम आरोग्य संपादता येते. शिवाय आपल्या शरीरातून बाहेर पडलेल्या मलाचे ओंगळ रुप पाहून शरीराबद्दल अनासक्ती उत्पन्न होते वगैरे वगैरे....

अत्र्यांनी याचा समाचार घेताना म्हटले आहे
    'भंगी लोकांना रोजच्या रोज सामुदायिक मलदर्शन होते. मग त्यांना उत्तम तर्‍हेच्या आरोग्याचा, वैराग्याचा नि ऐश्वर्याचा कुठे लाभ होतो?'
    'मानवी शरीर हे खरोखरच निसर्गाचे देणे आहे. त्यात नाना तर्‍हेचे सौंदर्य भरलेले आहे. रुपाचे आहे, रंगाचे आहे, आकृतीचे आहे, बलाचे आहे, नाना तर्‍हेच्या गुणाचे आहे. अरे जा रे जा, आम्ही निसर्गाची निरामय अपत्ये ह्या सृष्टीतल्या हर्षाचा, आनंदाचा नि संतोषाचा आजन्म मनसोक्त आस्वाद घेऊ. तुम्ही पाहिजे तर खुशाल तुमच्या कमोदात दाढी खुपसून आपल्या मलाचे यथेच्छ दर्शन नाही तर सेवन करत बसा.'

    बापरे! काय भयंकर आहे ही भाषा! वाचता वाचता कधी अशा भाषेतलेही काही वाचायला मिळते.
Tags: Literature, Satire, Parody

९ टिप्पण्या:

  1. वा भन्नाट... अत्रे म्हणजे माझ्या बाबांचं दैवत आहे. त्यांना सांगतो हा ब्लोग वाचायला.. :-)

    उत्तर द्याहटवा
  2. सौरभराव : स्वत:च्या मळाचे (किंवा जीभेचेही) दर्शन घेऊन आपल्या प्रकृतीचे उत्तम विश्लेषण करता येते, हे विनोबांचे प्रतिपादन होते. ते खरे असावे. जीभ तर डॉक्टर पाहतातच. मळावरून प्रकृतीचा अंदाज़ घेण्याचा प्रयोग गांधीजींनीही साबरमती आश्रमात केला होता. तिथे भंगी अनेकांचा मळ पाहतात, हा दाखला कुचकामी आहे.

    मलदर्शनापासून बोध घेऊ पाहणारा माणूस सतत शौचकूपातच डोके खुपसून बसतो आणि तो आयुष्याचा मनसोक्त आस्वाद घेऊ शकत नाही, हे दोन निष्कर्ष तर मूर्खपणाचे आहेत. माझा अंदाज़ आहे की अत्र्यांचे विनोबांशी इतर कशावरून तरी बिनसले असावे, आणि त्यांनी नेहमीप्रमाणेच पातळी सोडून आचरट टीकेचा मार्ग पत्करला. 'अत्र्यांशी हस्तान्दोलन करणे म्हणजे विष्ठेत हात घालण्यासारखे आहे, इतका हा माणूस अपवित्र आहे', असे पु भा भावे एकदा म्हणाले होते. हा उल्लेख भाव्यांवर ग वा बेहेरे यांनी लिहिलेल्या नितान्तसुन्दर मृत्युलेखात आहे. तो लेख पुस्तकरूपानी, बेहेरे यांनी लिहिलेल्या इतर मृत्युलेखांबरोबर, प्रसिद्‌ध झाला आहे. हिंदुत्त्वाच्या मुद्‌द्‌यावरून दोघांत काही भांडण झाले होते.

    अत्रे किती थोर होते, याबद्‌दलही भावे यांनी अत्र्यांच्या पश्चात लिहिले होते. मला दोघेही लेखक आवडतात. भावे कट्टर सावरकरवादी आणि ज़ुनाट विचारांचे. या दोन्ही कारणांसाठी मला त्यांच्याबद्‌दल आदर आहे.

    उत्तर द्याहटवा
  3. हिंदुत्त्वाच्या मुद्‌द्‌यावरून दोघांत काही भांडण झाले होते.
    --> दोघांत म्हणजे अत्रे आणि भावे यांच्यात. (भावे आणि बेहेरे यांचेही पुढे इतर कशावरून तरी भांडण झाले, ज़ो अबोला भाव्यांच्या मृत्युपर्यंत कायमच राहिला.)

    उत्तर द्याहटवा
  4. हेरंब, प्रतिसादाबद्दल धन्यवाद...
    जरुर तुमच्या वडिलांना ही नोंद वाचायला सांगा. उलट हे पुस्तकच त्यांना आणून द्या. :-)

    उत्तर द्याहटवा
  5. नानिवडेकर, तुमच्या प्रतिसादाबद्दल मनापासून आभारी आहे.
    खरे आहे की अत्र्यांची भाषा काही वेळा अगदी शिवराळ होते आणि खालच्या पातळीला घसरलेली वाटते/असते. नुसते वाचणेही अशक्य वाटायला लागते.
    त्यांच्याबद्दल नेहमीच टोकाची आवडणारी आणि न आवडणारी मते बघायला मिळतात.
    अनंत काणेकरांनी म्हटले आहे की, "अत्रे हे एक कंम्प्लीट पॅकेज आहे. तुम्हाला हिमालय हवा आहे पण त्यातल्या दर्‍या नकोत असे म्हणून चालणार नाही. शिखरे, दर्‍याखोर्‍यांसह हा सगळा हिमालय बनतो. घ्या अथवा राहू द्या."
    भावे आणि बेहरे यांचे संदर्भ दिल्याबद्दलही धन्यवाद. आता त्यांची पुस्तके मिळवून वाचायला हवीत. तुम्ही काही पुस्तके सुचवू शकाल का?

    उत्तर द्याहटवा
  6. "मला वाटते अत्र्यांचे व्यक्तिमत्वच असे आहे की ज्यांना ते आवडतात त्यांना ते शंभर टक्के आवडतात आणि आवडले नाही तर बिलकूलच आवडत नाहीत. म्हणजे एखाद्याला तुम्ही भेटला तर तो तुम्हाला असे म्हणणार नाही की, "अरे अत्रे काय फाकडू लिहतात रे! पण त्यांचे इथे जरा चुकलेच" वगैरे वगैरे."
    ---

    हा तुमचा का समज़ आहे, कळत नाही. त्याला काही आधार नाही. अत्र्यांमधे मोठे गुण होते, पण दोषही मोठे होते. ते विस्मृतीत गेल्यासारखे आहेत, असा माझा समज़* आहे. तितपतच त्यांची श्रेणी मला वाटते. पु ल त्यांच्यापेक्षा कितीतरी मोठे, आणि तेही ३०-४० वर्षांनंतर विसरले ज़ाऊ शकतात.

    सोप्या भाषेवर अत्र्यांचा आग्रह होता. तो विडंबनांतही दिसतो. आणि 'प्रीतीवीण वेडापिसा जीव झाला, प्रेमासाठी सखे गं झालो भुकेला' अशा गद्‌याइतक्या समज़ायला सोप्या ब्रह्‌मचारी चित्रपटातल्या गीतांतूनही त्यांची प्रतिभा दिसते. उलट भावे-बेहेरे-गोखले (विद्‌याधर) हे सावरकरवादी लोक त्यांच्या दैवताप्रमाणेच बोज़ड लिहिणारे. राजकीयदृष्ट्या माझ्यावर बेहेर्‍यांचा प्रभाव होता आणि आहे. पण त्यांच्या भाषा अनेकदा कृत्रिमकडे झुकलेली असते. आज़ बेहेर्‍यांना कोणीही* ओळखत नाही (अज़ून एक निष्कर्ष, ठाम विधान नाही). पण त्यांची गवाक्ष, कटाक्ष, वगैरे १०-१२ पुस्तकं तरी होती. ही पुण्यात पौड फाट्यावरून नवसह्‌याद्रीकडे ज़ाणार्‍या रस्त्यावर 'प्रसाद वाचनालया'त १५ वर्षांपूर्वी होती. भाव्यांच्या कथा प्रसिद्‌ध आहेत, पण मला कधीच कोणाच्याच कथा आवडलेल्या नाहीत. त्यांचं 'प्रथमपुरुषी एकवचनी' नावाचं आत्मचरित्र तीन भागांत आहे. 'विठ्ठला पांडुरंगा' हा त्यांच्या लेखांचा संग्रह खूप चांगला आहे. ते 'पापस्तान', 'रक्तपिती' (कम्युनिस्ट), गांधीजी, एस एम, 'नागोपंत' गोरे यांना सडकून शिव्या देत. या कशाहीबद्‌दल तुमच्या कोमल वगैरे भावना असल्यास भाव्यांच्या वाट्याला ज़ाऊ नका. 'रक्त आणि अश्रू' हे भाव्यांचं पुस्तक सुद्‌धा वाचनीय आहे.

    उत्तर द्याहटवा
  7. अत्र्यांबद्दलचा समज ओळखीच्या लोकांमुळे झाला असेल. माझे नातेवाईक, मित्रमंडळी यांच्यात काहीजणांना अत्रे (त्यांचे लिखाण) बिलकुल आवडत नाहीत आणि काहींना खूपच आवडतात.
    प्रत्येकाप्रमाणे आवडते/नावडते लेखक आहेतच पण कुणाबद्दलही माझ्या कोमल भावना वगैरे नाहीत. उलट तेच तेच लेखक वाचून मला कंटाळा आला आहे. ही पुस्तके मिळतात का ते बघतो आता.

    उत्तर द्याहटवा
  8. अत्रे हे आमचे दैवत. लेख आवडला. तुमचा ब्लॉग अतिशय चांगला आहे. लिहीत राहा. वाचत राहू.

    उत्तर द्याहटवा
  9. एक मनोगती, तुमच्या हुरुप वाढवणार्‍या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार.

    उत्तर द्याहटवा